भोंडा महादेव मंदिर

भटाळा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक पौराणिक वारसा लाभला आहे. येथील अनेक प्राचीन वास्तू गोंड साम्राज्याची साक्ष देत असल्या तरी त्यापूर्वीच्या हजारो वर्षांचा इतिहास येथील भूगर्भात दडलेला आहे. वरोरा तालुक्यातील भटाळा गाव हे या प्राचीन वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. ‘शिल्पग्रामअशी या गावाची जिल्ह्यात ख्याती आहे. येथे असलेल्या १०व्या शतकातील महादेवाच्या दुमजली मंदिराची स्थापत्यशैली हे अभ्यासकांसाठी उलगडलेले कोडे आहे. या मंदिरातील भव्य वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग समजले जाते.

महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा हे गाव . . ४५ व्या सालापासून अस्तित्वात होते, हे येथील शिल्पांवरून कळते. मौर्य, सातवाहन, वाकाटक, गुप्त, परमार, चालुक्‍य, नागवंशीय राजांनी या भूमीवर राज्य केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. या राजांनी आपल्या काळात अनेक वास्तू आणि मंदिरांची निर्मिती केली होती. असे सांगितले जाते की प्राचीन काळी भटाळा येथे कोरलेली दगडी शिल्पे परदेशातही पाठविली जात असत. गावात आजही अनेक ठिकाणी पाषाणातील शिल्पे आणि मूर्ती आढळतात. याशिवाय येथील प्राचीन भवानी मंदिरावरील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे त्याच परिसरात असणाऱ्या ऋषी तलाव परिसरातील कोरीव लेण्यांमुळे याची साक्ष पटते. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारतर्फे भटाळा गाव हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

गावाच्या पश्चिमेस महादेवाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. लालसर पिवळ्या वालुकामय दगडात बांधलेले हे मंदिर जिल्ह्यातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दुमजली असून या मंदिरावर शिखर नाही. यासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते की शेकडो वर्षांपूर्वी या मंदिरावर वीज पडली होती. त्यामुळे मंदिरासह त्यावरील शिखर, कळस आणि आमलकाची हानी झाली होती. पुनःर्निर्मिती करताना शिखराविनाच या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे शिखर नसलेले मंदिर म्हणून या मंदिरालाभोंडा महादेवअसे नाव पडले.

पूर्वपश्चिम ५२ फूट आणि उत्तरदक्षिण ३६ फूट असा या मंदिराचा आकार आहे. अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिराची विशेषतः उंचीच्या संदर्भातील स्थापत्यरचना ही असामान्य आहे. मंदिर हे आधीच उंच असून अंतराळ आणि गर्भगृहावर आणखी एक मजला आहे. या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी खालून कोणतीही सोय नाही, त्यामुळे केवळ स्थापत्याच्या दृष्टिकोनातून अशी रचना करण्यात आली असावी, असे सांगितले जाते; परंतु अशा प्रकारची रचना दुर्मिळ असून पुरातत्त्व विभाग, इतिहासतज्ज्ञ अभ्यासकांना या दुसऱ्या मजल्यासंदर्भातील कोडे उलगडलेले नाही.

जमिनीपासून ते फूट उंचीवर हे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताना समोर अनेक मोठमोठे त्रिशूळ दिसतात. भाविकांनी नवसपूर्तीनंतर ते ठेवल्याचे सांगितले जाते. प्रांगणात संपूर्ण फरसबंदी असून तेथून थेट मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. या मंदिराला प्रवेशद्वार नसून अंतराळातच एकामागे एक असे दगडी खांब आहेत. यापैकी आतील खांबांवर नक्षीकाम असून बाहेरील खांबांवर मात्र विशेष कोरीव काम दिसत नाही. येथील अंतराळ आयताकृती आणि लांबट असून मध्यभागी काळ्या पाषाणातील नंदी स्थित आहे. अंतराळाच्या वितानावरही (छत) नक्षीकाम आहे.

अंतराळामधून गर्भगृहात प्रवेश होतो. येथील गर्भगृह मोठ्या आकाराचे असून त्यात चार स्तंभ आहेतस्तंभावर राष्ट्रकुटकालीन कलश गवाक्षाची चिन्हे कोरलेली आहेत. या स्तंभांच्या मध्यभागी फूट उंच आणि सुमारे १० फूट लांबीची अखंड काळ्या पाषाणाची भव्य शिवपिंडी आहे. शिवपिंडीचा वारीमार्ग (पाणी वा तीर्थ बाहेर पडण्याचा मार्ग) सरळ भिंतीत गेला असल्याने येथे प्रदक्षिणेला आपसूकच अटकाव होतो. (शिवपिंडीला प्रदक्षिणा घातली जात नाही. याचा विचार करून या पिंडीचे टोक गाभाऱ्याच्या भिंतीला टेकविले असावे) ही शिवपिंडी या मंदिराचे वैशिष्ट्य असून विदर्भातील ती सर्वात मोठी शिवपिंडी समजली जाते. या परिसरात सर्वत्र लालसर पिवळा वालुकामय दगड आहे. जवळपास कुठेही काळा पाषाण अस्तित्वात नसताना ही अवाढव्य अखंड काळ्या पाषाणाची शिवपिंडी येथे कोठून कशी आणण्यात आली, याचेही अभ्यासकांना कोडे आहे.

या मंदिराच्या बाह्य भिंती काही ठिकाणी सपाट, तर काही ठिकाणी त्यावर कोरीव काम आहे. अंतराळाच्या बाह्य भिंतींवर डाव्या उजव्या बाजूवर देवकोष्टके आहेत; परंतु त्यातील मूर्ती मात्र नीट ओळखता येत नाहीत. गर्भगृहाच्या भिंतीवरील देवकोष्टकांमध्ये कार्तिकेय, शिव आणि चामुंडा यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या अंतराळावर आणि गर्भगृहावर निमुळते शिखर नसल्याने मंदिराचा कालखंड निश्चित करणे अवघड असले तरी गावात आढळणारी विविध पाषाण शिल्पे मूर्तीवरून मंदिर निर्मितीचा कालखंड साधारण दहावे शतक म्हणजेच राष्ट्रकुटकालातील असावा, असे तज्ञांचे मत आहे. महाशिवरात्रीला या मंदिरातून रथयात्रा निघते. यावेळी येथे तीन दिवसांची जत्रा भरते.

उपयुक्त माहिती:

  • वरोरापासून १३ किमी, तर चंद्रपूरपासून ९५ किमी अंतरावर
  • वरोरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home