श्री १००८ आदिनाथ स्वामी दिगंबर जैन संस्थान
भातकुली, ता. भातकुली, जि. अमरावती
अमरावती जिल्ह्यातील पेढी नदीच्या तीरावर वसलेले भातकुली हे गाव ‘श्री १००८ आदिनाथ स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र’ म्हणून परिचित आहे. जैन परंपरेतील प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ या क्षेत्राचे मुख्य अधिष्ठाता आहेत. अमरावतीसह विदर्भातील जैन समुदायाचे हे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. स्थानिक भाविक परंपरेने आदिनाथ भगवंतांना ‘श्री भातकुली बाबा’ या नावाने पूजतात. जमिनीतून प्रकट झालेली काळ्या पाषाणातील अतिशयकारी आदिनाथ मूर्ती आणि शेकडो वर्षांची अखंड उपासना हे या क्षेत्राचे वैशिष्ट्य मानले जाते. दरवर्षी कार्तिक महिन्यात येथे आयोजित केला जाणारा रथोत्सव व जत्रोत्सव हा येथील प्रमुख उत्सव आहे.
भातकुली या गावाला प्रदीर्घ ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. प्राचीन काळात हा प्रदेश ‘भोजकट’ या नावाने विदर्भाची उपराजधानी म्हणून ओळखला जात असे. इ.स. १९११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अमरावती जिल्हा गॅझेटिअर’मधील नोंदीनुसार भातकुली हेच प्राचीन काळातील भोजकट नगर होय. या ऐतिहासिक ओळखीला प्राचीन शिलालेखांचे भक्कम पुरावे मिळतात.
मध्य प्रदेशातील भरहूट येथील प्राचीन बौद्ध स्तूपावर कोरलेल्या इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील ब्राह्मी शिलालेखांमध्ये भोजकट नगराचा स्पष्ट उल्लेख आढळतो. वाकाटक घराण्यातील नृपती दुसरा प्रवरसेन याच्या अठराव्या राज्यवर्षातील ‘चम्मक ताम्रपटा’मध्ये या परिसराचा निर्देश ‘भोजकट राज्य’ असा प्रशासकीय विभाग म्हणून नोंदवलेला आहे. पेढी नदीच्या खोऱ्यात वसलेले हे नगर मौर्य, सातवाहन, वाकाटक आणि राष्ट्रकूट यांच्या कालखंडात मध्य भारतातील एक महत्त्वाचे राजकीय व व्यापारी केंद्र राहिले.
जैन परंपरेनुसार कालचक्राच्या अवसर्पिणी काळातील कल्पवृक्षांचा प्रभाव संपल्यानंतर मानवी संस्कृतीला असि, मसि, कृषी, विद्या, वाणिज्य आणि शिल्प या षट्कर्मांची शिकवण देणारे युगप्रवर्तक महापुरुष म्हणून भगवान आदिनाथ ओळखले जातात. जैन धर्मग्रंथांनुसार भगवान आदिनाथांचे मूळ लांछन वृषभ (बैल) आहे. गोमुख यक्ष आणि चक्रेश्वरी देवी ही त्यांची शासन दैवते मानली जातात. महाभारतकालीन कथेनुसार विदर्भ देशाचा राजा भीष्मक याचा ज्येष्ठ पुत्र आणि रुक्मिणीचा बंधू राजा रुक्मी याने भोजकट शहराची स्थापना केली. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केल्यानंतर झालेल्या युद्धात रुक्मी पराभूत झाला.
त्या पराभवानंतर मूळ राजधानी कुंडिनपूर येथे परत न जाण्याची प्रतिज्ञा करून त्याने पश्चिमेस भोजकट नगराची स्थापना केली. स्थानिक मान्यतेनुसार राजा रुक्मीने भोजकट येथे राज्य स्थापन केल्यानंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.
मध्ययुगीन कालखंडात स्थानिक राजवंशांचा ऱ्हास आणि परकीय आक्रमणे यांमुळे विदर्भातील अनेक मंदिरांना अवकळा आली. त्या अस्थिरतेच्या काळात धार्मिक मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी त्या विहिरी, नद्या किंवा जमिनीखाली दडवून ठेवण्याची पद्धत रूढ झाली. याच कालखंडात विक्रम संवत ११५६ (इ.स. १०९९) मध्ये आदिनाथ भगवंतांची मूर्ती येथील भुईकोट किल्ल्यातील जमिनीखाली सुरक्षितपणे पुरून ठेवली गेली. जमिनीखाली सुरक्षित राहिलेली ही मूर्ती सुमारे सातशे वर्षे अज्ञात अवस्थेत होती. अठराव्या शतकाच्या अखेरीस भातकुली गावच्या पाटलाला स्वप्नात आदिनाथ भगवंतांचा दृष्टांत झाला आणि गावातील एका विशिष्ट जागेत मूर्ती पुरलेली असल्याची माहिती मिळाली. पाटलाने ग्रामस्थांच्या मदतीने त्या जागेचे उत्खनन केले असता तेथे ही मूर्ती सुस्थितीत सापडली. मूर्ती बाहेर काढून तिची विधिवत प्रतिष्ठापना केली गेली. या स्थानाची वार्ता समजताच विख्यात दिगंबर जैन संत आचार्य नेमीसागरजी महाराज भातकुली येथे आले. त्यांनी मूर्तीचे बारकाईने निरीक्षण करून ती जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांचीच प्राचीन मूर्ती असल्याचे प्रमाणित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मूळ मंदिर उभारले गेले. त्यानंतर नागपूरचे सावकार गुलाब सावजी यांनी देणगी देऊन मंदिराचा विस्तार घडवून आणला. पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते ही आदिनाथ मूर्ती सुमारे अडीच ते तीन हजार वर्षे प्राचीन मानली जाते.
मंदिराचा परिसर उंच बाह्य तटबंदीने वेढलेला आहे. प्रवेशद्वारावर राजस्थानी स्थापत्यशैलीची छाप दिसते. या महाद्वाराची मध्यवर्ती लाकडी चौकट सुमारे २० ते २५ फूट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर उभ्या रचनेतील देवकोष्टकांमध्ये रंगकाम केलेली द्वारपालशिल्पे आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी महिरपी कमानीदार वितान आणि सज्जावर पारंपरिक नगारखाना आहे. महाद्वारातून आत आल्यावर फरसबंद प्रांगण दृष्टीस पडते. प्रांगणात तटबंदीलगत कार्यालय, अतिथीगृह, धर्मशाळा, भोजनालय आणि विश्राममंडप उभारलेले आहेत. मंदिराची अंतर्गत रचना सभामंडप आणि एकाच रेषेत असलेली तीन गर्भगृहे अशी त्रिदल पद्धतीची आहे. सभामंडपात स्तंभपाद, स्तंभदंड, कणी आणि हस्त अशी घडण असलेले नक्षीदार स्तंभ आहेत. हे स्तंभ महिरपी तोरणांनी जोडलेले आहेत. या तोरणांवर देवीदेवता व यक्षांची शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपात जैन मुनींच्या प्रवचनासाठी लाकडी मखराची व्यवस्था आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वारावर कोरीव पट्ट्या आहेत. गर्भगृहाच्या द्वाराशी शेंदूरचर्चित क्षेत्रपाल व पद्मावती देवीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात प्राचीन काळातील एक लाकडी ध्यानासन आहे. याला स्थानिक बोलीत ‘पाटा’ म्हटले जाते. या पाटावर बसून ध्यानसाधना करण्याची जुनी परंपरा येथे जपली जात आहे.
गर्भगृहाच्या केंद्रस्थानी वज्रपीठावरील मखरात भगवान आदिनाथ यांची काळ्या पाषाणातील ध्यान मुद्रेतील पद्मासनस्थ मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचे छत्र आहे. मागील प्रभावळीवर जैन धर्मातील अष्टमंगल चिन्हे व अमृतकलश कोरलेले आहेत. मखरावर पर्णलता व पुष्पलतांचे कोरीव काम आहे. मुख्य मूर्तीसमोर चांदीचे पूजापीठ आणि धातूच्या लहान जिनप्रतिमा ठेवलेल्या आहेत. गर्भगृहाच्या अंतर्भागात स्तंभांनी जोडलेला प्रदक्षिणामार्ग आहे. त्यातील देवकोष्टकांमध्ये धातूच्या तीर्थंकर मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहाच्या उजव्या बाजूच्या दुसऱ्या गर्भगृहात वज्रपीठावर २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांच्या तीन पद्मासनस्थ मूर्ती आहेत. यात मध्यभागी पांढऱ्या संगमरवराची, डावीकडे काळ्या पाषाणाची आणि उजवीकडे तपकिरी पाषाणाची मूर्ती आहे. पार्श्वनाथांच्या मस्तकावर पंचफणी नागछत्र आहे. कमठ असुराच्या उपसर्गापासून धरणेंद्र यक्ष व पद्मावती देवीने त्यांचे रक्षण केल्याचा पौराणिक संदर्भ या रचनेतून व्यक्त होतो. मुख्य गर्भगृहाच्या डाव्या बाजूला पायऱ्या उतरून जाणाऱ्या एका खोल गर्भगृहात आठवे तीर्थंकर भगवान चंद्रप्रभू यांची पांढऱ्या संगमरवराची पद्मासनस्थ मूर्ती आहे.
चंद्रकोर हे त्यांचे लांछन आहे. विजय यक्ष व ज्वालामालिनी यक्षिणी ही त्यांची शासन दैवते आहेत.
मंदिराच्या छतावर भगवान बाहुबलींचे एक लहान मंदिर आणि तिन्ही गर्भगृहांत पार्श्वनाथ मूर्ती असलेले दुसरे त्रिदल मंदिर आहे. छताच्या चारही बाजूंना कौलारू सज्जा आहे. त्यावर गजराजशिल्पे कोरलेली आहेत. छताच्या कठड्यावर राजस्थानी व मराठा वास्तुशैलीतील कांगोरेदार आणि नक्षीदार कठडा तसेच लघुछत्र्यांची मांडणी आहे. सभामंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. मुख्य गर्भगृहावर चार थरांचे वर निमुळते होत गेलेले नागर पद्धतीचे शिखर आहे. त्यावर उपशिखरे, आमलक, कळस व ध्वजदंड उभारलेला आहे. बाजूच्या गर्भगृहांवर पिरॅमिड आकाराची शिखरे उभारलेली आहेत.
या तीर्थक्षेत्रात दैनंदिन धार्मिक उपक्रम नियमितपणे पार पाडले जातात. दररोज पहाटे ५ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जातात. पहाटे ५:३० वाजता मंदिरातील मुख्य आदिनाथ मूर्तीसह इतर तीर्थंकरांचा प्रक्षाल विधी, जिनेंद्र जलाभिषेक आणि मंत्रोच्चारात शांतिधारा केली जाते.
त्यानंतर भाविकांकडून नित्यनियम पूजा व अष्टद्रव्याने अर्घ्य समर्पण होते. सकाळी ८ वाजता मंगल आरती होते. दिवसभर भाविकांना पद्मासनस्थ तीर्थंकरांचे दर्शन घेता येते. दुपारी मूर्तींना शास्त्रोक्त नैवेद्य अर्पण केला जातो. सायंकाळी ६:४५ वाजता सायंपूजा, धूपारती आणि दीपारती केली जाते. रात्री ८ वाजता शयन आरती पार पडल्यानंतर मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद केले जातात.
कार्तिक वद्य पंचमी हा येथील सर्वांत मोठा वार्षिक उत्सवाचा दिवस मानला जातो. या दिवशी येथे तीन दिवस चालणाऱ्या मोठ्या जत्रोत्सवाला प्रारंभ होतो. या निमित्ताने ‘श्री भातकुली बाबा’ यांची पारंपरिक पालखी आणि लाकडी रथाची नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढली जाते. या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्यासह विदर्भातून हजारो भाविक भातकुली येथे येतात. चैत्र कृष्ण नवमीला भगवान आदिनाथ यांचा जन्म व तप कल्याणक महोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात महामस्तकाभिषेक, शांतिधारा आणि विशेष विधान पूजेचे आयोजन केले जाते. भाद्रपद महिन्यात भाद्रपद शुक्ल पंचमी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत दहा दिवसांचा ‘दशलक्षण महापर्व’ उत्साहात पार पडतो. या काळात मंदिरात रोज सकाळी तत्त्वार्थसूत्र वाचन, धार्मिक प्रवचने, विशेष पूजा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. याव्यतिरिक्त चैत्र शुक्ल त्रयोदशीला महावीर जयंती, वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया, आषाढ मासातील वीर शासन जयंती आणि श्रावण शुद्ध सप्तमीला मोक्षसप्तमी यांसारखे सण साजरे केले जातात.
उपयुक्त माहिती
- अमरावती रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून २० किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून भातकुलीसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- संस्थानच्या प्रांगणात भाविकांसाठी धर्मशाळा, अतिथीगृह आणि भोजनालयाची सुविधा उपलब्ध
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. / दूरध्वनी : ०७२१२३८९०४१, ९८२३०३९२९९
