ज्वालामुखी हिंगलाज देवी मंदिर
हिंगलासपूर, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलासपूर येथे ज्वालामुखी हिंगलाज देवीचे मंदिर आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील हिंगोल नदीच्या परिसरातील हिंगलाज मातेचे प्राचीन तीर्थस्थान शाक्त परंपरेतील ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. याच परंपरेशी संबंध सांगणारे हिंगलासपूर येथील हे स्थान देवस्थानाच्या परंपरा, सेवेकरी घराणे आणि मराठा वास्तूशैलीतील रचनेमुळे विशेष उल्लेखनीय ठरते. येथील देवी जागृत मानली जाते आणि ती भाविकांच्या नवसाला पावते, अशी स्थानिक श्रद्धा आहे. देशभरात हिंगलाज मातेची अनेक देवस्थाने आढळतात, परंतु या स्थानाला एक प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
मंदिराच्या परंपरेनुसार या देवस्थानाची स्थापना चौदाव्या शतकात म्हणजेच इसवी सन १३०३ मध्ये झाली. यामागे देवीच्या स्थलांतराची एक आख्यायिका सांगितली जाते. बलुचिस्तानातील आपल्या मूळ स्थानावरून देवी खऱ्या भक्ताच्या शोधार्थ निघाली. ब्रह्मदेवाच्या आदेशाने ती वऱ्हाडातील अकोली परिसरात आली. तेथील सत्य अरण्यात अमृतगिर महाराज ज्वालामुखी हिंगलाज मातेची तपश्चर्या करत होते. त्यांच्या माध्यमातून चिंतामणी भगत यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत चिंतामणी भगत खरे उतरल्यानंतर देवीने त्यांना दृष्टांत दिला. या दृष्टांतानुसार त्यांनी देवीची पालखी घनदाट अरण्यात आणली आणि तीन परकोटांच्या आत उंबराच्या झाडाखाली देवीचे स्थान उभारले. कालांतराने या देवस्थानाभोवती वस्ती वाढली आणि देवीच्या नावावरून या परिसराला हिंगलासपूर हे नाव रूढ झाले.
या देवस्थानाशी भगत घराण्याची अनेक पिढ्यांची शाक्त व नाथ संप्रदायाची सेवापरंपरा जोडलेली आहे.
मंदिरातील परंपरागत वंशावळीनुसार चिंतामणी भगत यांचा काळ सन १२५० ते १३५७ असा मानला जातो. त्यांच्यानंतर पिरकुजी भगत यांनी सन १४५३ पर्यंत देवीची पूजाअर्चा केली. पुढे कृष्णाजी भगत यांनी सन १५४४ पर्यंत, नागोजी भगत यांनी सन १६३८ पर्यंत, सटवाजी भगत यांनी सन १७३५ पर्यंत आणि आकाजी भगत यांनी सन १८३० पर्यंत सेवेकरी म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर गणोजी भगत यांनी सन १९२० पर्यंत आणि परशुरामजी भगत यांनी सन १९९२ पर्यंत मंदिराची सेवा केली. सध्या भगत घराण्यातील रामदास भगत ही सेवा सांभाळत आहेत.
मराठा वास्तूशैलीचा प्रभाव असलेल्या या देवस्थानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याची तीन परकोटांची रचना होय. बाहेरील पहिला परकोट पाषाण आणि विटांच्या बांधकामातील आहे. याला मजबूत तटबंदी आणि बुरुज बांधलेले आहेत. पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन बुरुज उभारले आहेत. या प्रवेशद्वारात एकामागून एक पाच द्वारशाखा कोरल्या आहेत. सर्वांत बाहेरील द्वारशाखेवर महिरपी तोरण कोरलेले आहे. नक्षीदार लाकडी झडपा लावलेल्या या दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूंना पहारेकरी कक्ष तयार केले आहेत. या दरवाजातून आत आल्यावर फरसबंद प्रांगण लागते. या प्रांगणात अलीकडील काळात बांधलेल्या काही वास्तू दिसतात.
पहिल्या प्रांगणापलीकडे दुसरा परकोट सुरू होतो. या तटबंदीचा खालचा अर्धा भाग दगडी आणि वरचा भाग विटांनी बांधलेला आहे. या दुसऱ्या परकोटातून आत आल्यानंतर समोर एक गोलाकार दीपमाळ उभारलेली आहे. या दीपमाळेच्या माथ्यावर अग्नी प्रज्वलित केल्यास तो परिसरातील अनेक गावांतून दिसतो, असे स्थानिक सांगतात. दीपमाळेजवळ देवीचे भक्त चिंतामणी भगत यांचे समाधी मंदिर बांधलेले आहे. चिंतामणी भगत यांच्या समाधी वास्तूच्या भिंतींवर स्तंभांची नक्षी कोरलेली आहे. छताच्या चारही कोपऱ्यांवर इंडो इस्लामिक शैलीतील मिनारसदृश लहान रचना आहेत. मध्यभागी असलेल्या घुमटाकार शिखरावर आमलक आणि कळस आहे.
चिंतामणी भगत यांच्या समाधीजवळ त्यांच्या वंशजांच्या आणि देवीच्या इतर सेवेकऱ्यांच्या समाध्या बांधलेल्या आहेत. याच भागात देवस्थानच्या सेवेकऱ्यांची निवासस्थाने उभारली आहेत. यापुढे तिसरा परकोट सुरू होतो. या तटबंदीत अनेक प्रवेशमार्ग ठेवले आहेत.
मुख्य प्रवेशद्वार दुमजली बांधलेले आहे. त्याच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांसाठी पीठे आणि आतील बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. देवीच्या उत्सवातील रथ किंवा बागडासाठी वापरली जाणारी जुनी लाकडी चाके याच भागात जतन करून ठेवली आहेत. या प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर मुख्य मंदिराचे फरसबंद प्रांगण लागते. तटबंदीच्या आतील बाजूंना ओवऱ्या बांधल्या आहेत. त्यात भाविकांसाठी खोल्या तसेच सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत. मंदिराजवळ स्वतंत्र यज्ञकुंड उभारले आहे, तसेच या परिसरात महादेव आणि हनुमानाची देवस्थानेही आहेत.
तिसऱ्या परकोटाच्या प्रांगणाच्या मध्यभागी सभामंडप आणि गर्भगृह अशी मुख्य मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी बाजूस तीन प्रवेशद्वारे आहेत. तिन्ही दरवाजांच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी कोरली आहे. या दरवाजांना नक्षीदार लाकडी झडपा बसवल्या आहेत. मधल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. सभामंडपात नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभांच्या माथ्यावर कणी आणि तिच्यावर लहान वामनस्तंभ कोरले आहेत.
हे स्तंभ अर्धचंद्राकार कमानींनी एकमेकांना जोडले आहेत. त्यावर छताची रचना केली आहे. वितानावर चक्राकार नक्षीकाम कोरलेले आहे. मंडपाच्या उजव्या व डाव्या बाजूस प्रत्येकी दोन अशी चार देवकोष्टके आहेत. त्यात गणपती, दत्तात्रेय आणि देवीच्या प्रतिमा आहेत.
सभामंडपाच्या पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार लागते. याच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहात वज्रपीठावर चांदीच्या मखरात ज्वालामुखी हिंगलाज देवीची चांदीची मूर्ती आहे. तिच्या शेजारी बाळकृष्ण आणि गणपती यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. देवप्रतिमांच्या वर चांदीचे छत्र टांगलेले आहे. मूर्तीजवळ देवीचे आयुध म्हणून त्रिशूळ ठेवलेले आहे. याच वज्रपीठावर देवीचे दुसरे तांदळा स्वरूपातील शेंदूरचर्चित पाषाणरूप आहे. गर्भगृहाच्या भिंतींवर विविध देवीदेवतांच्या तसबिरी लावलेल्या आहेत. मंदिराच्या छताच्या चारही बाजूंना कठड्याची रचना आहे. दर्शनी प्रवेशद्वाराच्या वरच्या कठड्यात देवकोष्टक बांधले आहे. त्यात ज्वालामुखी हिंगलाज देवीची प्रतिमा ठेवलेली आहे. छताच्या चारही कोपऱ्यांना मिनारसदृश स्तंभ उभारले आहेत.
गर्भगृहाच्या वर तीन थरांचे अष्टकोनी शिखर बांधलेले आहे. प्रत्येक थरावर आठ देवकोष्टके आहेत. शिखराच्या माथ्यावर आमलक, त्यावर कळस आणि ध्वजपताका लावली आहे. या देवस्थानातील चैत्रोत्सव गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस चालतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला देवीसमोर घटस्थापना केली जाते. रामनवमीपर्यंत हे व्रत चालते. पुढील दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात दर्शन घेता येते. या व्यतिरिक्त दसरा, दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमा हे सण येथे साजरे केले जातात.
हनुमान जयंतीच्या सुमारास चैत्रयात्रेतील वैशिष्ट्यपूर्ण ‘बागड’ सोहळा सुरू होतो. मंदिराच्या परंपरेनुसार या बागडात अकरा बैलगाड्या एकामागोमाग जोडल्या जातात. देवस्थानात जतन केलेली लाकडी चाके या गाड्यांना लावली जातात. पहिल्या गाडीत देवीची प्रतिमा ठेवली जाते. शेवटच्या गाडीत चिंतामणी महाराजांचा मुखवटा ठेवला जातो. हजारो भाविक हा बागडगाडा ओढत ग्रामप्रदक्षिणा करतात. त्यानंतर मिरवणूक पुन्हा मंदिरात येते. शारदीय नवरात्र हा येथील दुसरा प्रमुख उत्सव आहे. नवरात्राच्या दहा दिवसांत दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. अष्टमीला होमहवन करण्याची परंपरा पाळली जाते. उत्सवांच्या काळात भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
उपयुक्त माहिती
- नांदगाव खंडेश्वर येथून २० किमी अंतरावर
- अमरावती शहरापासून ३२ किमी अंतरावर
- अमरावती व नांदगाव खंडेश्वर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- नांदगाव खंडेश्वर येथे निवास व न्याहारीची सुविधा
