एकमुखी दत्त मंदिर

झिरी, बडनेरा, ता. जि. अमरावती

विदर्भातील अमरावती जिल्ह्यांतर्गत बडनेरा शहरातील झिरी परिसरात एकमुखी दत्त मंदिर हे प्राचीन परंपरेचे महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. महाराष्ट्रात दत्तात्रेयांचे त्रिमुखी रूप परिचित असले, तरी वैदिक, औपनिषदिक आणि प्राचीन परंपरेत दत्तात्रेयांचे मूळ स्वरूप एकमुखी आणि दिगंबर वर्णिलेले आढळते. ‘शांडिल्योपनिषद’, ‘दत्तात्रेयोपनिषद’ आणि ‘मार्कंडेय पुराण’ या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये दत्तात्रेयांचे ध्यान एकमुखी, अवधूत व शांत स्वरूपात आलेले आहे. नवनाथांच्या परंपरेत दत्तात्रेयांना आद्यगुरू मानले गेले. नाथ संप्रदायाने एकमुखी दत्तोपासना खऱ्या अर्थाने घरोघरी पोहोचवली. पुढे सोळाव्या शतकातील संत दासोपंत, निरंजन रघुनाथ, रघुनाथ स्वामी आणि विसाव्या शतकातील आधुनिक दत्त संप्रदायाचे प्रणेते वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी यांनी आपल्या वाङ्मयात एकमुखी दत्तात्रेयांच्या ध्यानाचा पुरस्कार केला. या मंदिरात सुमारे चारशे ते पाचशे वर्षे जुनी षड्भुज एकमुखी दत्तमूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे. नाथ आणि दत्त परंपरेतील मूळ अद्वैत उपासनेचा वारसा येथे प्रत्ययास येतो.

या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घडलेल्या एका आध्यात्मिक घटनेशी जोडलेला आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे कनिष्ठ बंधू ब्रह्मचारी योगीराज सीताराम महाराज टेंबे यांनी धर्मजागृती करत विदर्भात संचार केला होता. त्यांनी ९ मार्च १९१९ रोजी झिरी परिसरातील औदुंबराच्या पारावर ओंकारोच्चार आणि प्राणायाम क्रियेद्वारे समाधी घेतली. या प्रसंगानंतर उपस्थित स्थानिक भाविकांनी समाधीसमोर दत्तमंदिर उभारण्याचा संकल्प केला. त्याच काळात हिंगोली येथील मारवाडी सावकार आणि टेंबे स्वामींचे एकनिष्ठ शिष्य हेमराज शेठ मुंदडा यांच्या संग्रही असलेली पंधराव्या किंवा सोळाव्या शतकातील प्राचीन एकमुखी दत्तमूर्ती या मंदिरासाठी आणण्याचा निर्णय झाला. स्थानिक आख्यायिकेनुसार ही मूर्ती पूर्वी परभणी जिल्ह्यातील गुंज येथील मंदिरात नेण्याचा प्रयत्न झाला होता. मूर्ती पोहोचण्यापूर्वीच त्या मंदिराचा सभामंडप कोसळला. त्यानंतर गुंज येथील पुजाऱ्याला दृष्टांत देऊन दत्तात्रेयांनी आपणास बडनेरा येथील झिरी क्षेत्री स्थापित करण्याचा आदेश दिला. या दृष्टांतानुसार हिंगोलीहून ही मूर्ती बडनेरा येथे आणण्यात आली. पुढे १२ जून १९२४ रोजी नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी यांच्या हस्ते या एकमुखी दत्तमूर्तीची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना पूर्ण झाली.

मंदिराच्या वास्तुरचनेत पारंपरिक मराठा स्थापत्यशैली आणि आधुनिक बांधकामाचा मिलाफ दिसतो. मंदिराभोवती दगडी तटबंदी उभारलेली आहे. प्रवेशद्वारासमोर स्वागतकमान उभारली आहे. या कमानीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या लांबट चौथऱ्यांच्या दर्शनी भागात गजराजशिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून फरसबंद प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजवीकडे एक विहीर पाहायला मिळते. या विहिरीच्या पाण्याचा झरा अक्षय मानला जातो. मंदिराची मुख्य वास्तू सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन विभागांत विभागलेली आहे. उंच जगतीवर (जोत्यावर) आधारलेल्या सभामंडपात प्रवेश करण्यासाठी समोरील बाजूने पायऱ्यांची रचना केलेली आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात सूर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी भिंतींमध्ये वातायने ठेवली आहेत. चौकोनी स्तंभांवर तोललेल्या या सभामंडपातील काचेच्या मखरांमध्ये वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आणि नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी यांच्या मूर्ती तसेच नामसमाधीची प्रतीके दर्शनासाठी ठेवली आहेत. येथे योगीराज सीताराम महाराज यांची मूळ समाधी आणि संगमरवरी मूर्ती पाहायला मिळते. उत्सवात वापरली जाणारी लाकडी पालखी याच सभामंडपात ठेवली जाते.

सभामंडपाच्या पुढे गर्भगृहाच्या द्वारासमोर योगी सीताराम महाराजांची चांदीची मूर्ती आहे. गर्भगृहाचे पाषाणी प्रवेशद्वार उभ्या धारेच्या कोरीव नक्षीकामाने अलंकृत केलेले आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी वज्रपीठावरील एका कोरीव मखरामध्ये पूर्वाभिमुख एकमुखी दत्तात्रेयांची प्राचीन मूर्ती उभी आहे. मूर्ती षड्भुज स्वरूपातील आहे. मूर्तीच्या हातांमध्ये त्रिशूळ, डमरू, चक्र, शंख, जपमाळ आणि पानपात्र कोरलेली आहेत. मूर्ती आपल्या पाठीमागे असलेल्या गायीस टेकून उभी आहे. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आणि पाठीमागे पानाफुलांची नक्षी असलेली चांदीची प्रभावळ आहे. मूर्तीच्या पुढ्यात नागेश्वराचा पितळी मुखवटा ठेवलेला आहे. वज्रपीठाच्या खालील पायरीवर नृसिंह सरस्वतींची लहान चांदीची मूर्ती आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणेसाठी प्रदक्षिणामार्ग ठेवलेला आहे. मंदिराचे मुख्य शिखर चौकोनी आकाराचे आहे. त्याच्या चारही बाजूंनी लघुशिखरे तसेच भूमिज शैलीतील उरुशृंग पद्धतीची प्रत्येकी चार अंगशिखरे आहेत. शिखराच्या बाह्य अंगावर काही रिकामी देवकोष्टके कोरलेली पाहायला मिळतात.

मंदिराच्या प्रांगणात आणि आजूबाजूच्या परिसरात इतर उपमंदिरे आणि शिल्पे आहेत. विहिरीच्या शेजारी पाच पायऱ्यांच्या उंच चौथऱ्यावर ‘दत्त गणेश संकटमोचन हनुमान’ मंदिर बांधलेले आहे. या मंदिरात वज्रपीठावर काळ्या पाषाणातील हनुमानाची मूर्ती आहे. दत्तमंदिराच्या समोरील प्रांगणात मगरीच्या पाठीवरील कमळामध्ये बसलेली चतुर्भुज लक्ष्मीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागील दोन हातांत त्रिशूळ व पानपात्र आहेत, तर पुढील दोन हातांत शिवलिंग धारण केलेले आहे. या मूर्तीजवळ एका वृक्षाच्या पारावर गणपतीचे छोटे देवालय आणि त्यामागील चौथऱ्यावर सवत्स धेनूचे शिल्प कोरलेले आहे. मंदिर आवारातील एका पुरातन वटवृक्षाखाली स्वतंत्र श्रीराम मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्यासह शेंदूरचर्चित मारुतीची मूर्ती आहे. मंदिरालगत भाविकांच्या सोयीसाठी दुमजली भक्तनिवास उभारण्यात आलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे झिरी तलाव, दत्त वाटिका आणि विविध वनस्पतींनी युक्त अशी नक्षत्र बाग विस्तारलेली आहे.

मंदिरात दररोज पहाटे ५.३० वाजल्यापासून भाविकांना दर्शन घेता येते. सकाळी ६ वाजता काकड आरती आणि त्यानंतर एकमुखी दत्तमूर्तीवर पंचामृत अभिषेक व महापूजा संपन्न होते. दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती करून महानैवेद्य दाखवला जातो. दुपारी १२.३० ते ४ या वेळेत गर्भगृह विश्रांतीसाठी बंद असते. सायंकाळी ७.३० वाजता धूपारती व संध्या आरती केली जाते, तर रात्री ९ वाजता शेजारतीने दैनंदिन दिनचर्येची सांगता होते. दर गुरुवारी तसेच एकादशी, पौर्णिमा आणि अमावास्येला मंदिरात अभिषेक व गुरुचरित्र पठणासाठी अनेक भाविक उपस्थित असतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होणारा श्री दत्त जयंती महोत्सव हा या देवस्थानातील सर्वांत मोठा वार्षिक सोहळा मानला जातो. हा महोत्सव मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत चालतो. दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे महाअभिषेक होतो. सायंकाळी ४ वाजता दत्त जन्माचे पारंपरिक कीर्तन होऊन पाळणा हलवला जातो. सायंकाळी फुलांनी सजवलेल्या पालखीत उत्सवमूर्ती ठेवून ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत ग्रामप्रदक्षिणा निघते. याशिवाय ९ मार्च रोजी योगीराज सीताराम महाराज टेंबे यांचा समाधी उत्सव, तसेच चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि दसरा-दिवाळी हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती

  • बडनेरा जंक्शन रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • अमरावती एसटी स्थानकापासून १० किमी अंतरावर
  • अमरावती व बडनेरा शहरातून एसटी व ऑटो रिक्षाची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात संस्थानचे भक्तनिवास तसेच निवास व न्याहारीसाठी पर्याय उपलब्ध
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४०३५३२५४८, चंद्रशेखर कुलकर्णी, अध्यक्ष, मो. ७०२०१८६१०६
Back To Home