लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात देवर्जन गावाजवळ हत्तीबेट हे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थान आहे. हे स्थान निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम मानले जाते. येथे सहाव्या शतकातील प्राचीन लेण्यांचा वारसा आढळतो. सन १९४६ च्या हैदराबाद मुक्तिसंग्रामात हे ठिकाण स्वातंत्र्यसैनिकांचे ठाणे होते. येथील दुर्गम डोंगराचा आसरा घेऊन सैनिकांनी निजामाच्या सैन्याविरुद्ध लढा दिला. एकेकाळी ओसाड असलेल्या या बालघाट डोंगररांगेत लोकचळवळीतून आणि जलसंधारणाच्या कामांतून मोठी पर्यावरणीय क्रांती झाली आहे. त्यामुळे या परिसराला महाराष्ट्राच्या नकाशावर महत्त्वाचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक स्थान मिळालेले आहे.
हत्तीबेटाचे क्षेत्र हनुमंतवाडी, देवर्जन, धर्मापुरी आणि करवंदी या चार गावांच्या सीमारेषांवर पसरले आहे. या परिसराचे एकूण क्षेत्रफळ ४१ हेक्टर आहे. देवर्जन गावापासून हे स्थान सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील एका टेकडीवर आहे. उदगीर तालुक्यातील जळकोट रस्त्यावरून येथे येण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध आहे. या बेटावर दहा लेणी आणि सुमारे ५०० मीटर लांबीचा भुयारी मार्ग खोदलेला आहे.
या स्थानाला हत्तीबेट हे नाव मिळण्यामागे एक स्थानिक कथा सांगितली जाते. त्यानसार, या डोंगराजवळ पूर्वी एक मोठा तलाव होता. त्या तलावात मगरींचा वास होता. एकदा तहानेने व्याकुळ झालेला एक हत्ती तेथे पाणी पिण्यासाठी गेला. त्या वेळी तलावातील मगरीने हत्तीचा पाय पकडला. संकटसमयी हत्तीने भगवान विष्णूचा धावा केला.
विष्णूने तेथे प्रकट होऊन मगरीच्या तावडीतून हत्तीची सुटका केली. विष्णूच्या दर्शनाने हत्तीला मोक्ष मिळाला. त्यानंतर त्या हत्तीला पाषाण रूप प्राप्त झाले आणि तो डोंगराच्या रूपात स्थित झाला. या टेकडीवर प्राचीन काळी धर्मपुरी ऋषींचे वास्तव्य होते. या ऋषींच्या नावावरूनच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावाला धर्मपुरी हे नाव मिळाले आहे.
डोंगराच्या पायथ्याशी पर्यटन विभागाचा नोंदणी कक्ष आहे. येथे येणाऱ्या सर्व भाविक आणि पर्यटकांना स्वतःचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. डोंगराच्या पायथ्याशी श्रीदत्त मंदिर लेणी स्थित आहेत. सन १९८६ मध्ये येथे ध्यानधारणा करणाऱ्या रामपुरी महाराजांनी या लेण्यांमध्ये श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीची स्थापना केली. या मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. गर्भगृहातील वज्रपीठावरील मखरामध्ये श्रीदत्तात्रेयांची मूर्ती आहे.
श्रीदत्त मंदिर लेण्यांच्या बाजूला शृंगेरी मठांतर्गत सोहमपुरी महाराज तपोभूमी म्हणजेच ध्यानगुफा आहे. या गुफेला अरुंद प्रवेशद्वार आणि प्रवेशमार्ग आहे. गुंफेच्या आत सोहमपुरी महाराज यांची प्रतिमा आणि शिवपिंड स्थापित आहे. या गुंफेच्या डाव्या बाजूला मध्यलेणी आहे. या लेणीमध्ये मारुतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. मध्यलेणीच्या शेजारी पाताळ लेणी आहे. या पाताळ लेणीत सुमारे ५० फूट खोल कुंड आहे. या कुंडाच्या तळाशी नैसर्गिक जलस्रोत आढळतो. मध्यलेणीच्या दुसऱ्या बाजूला महादेव लेणी आहे. या लेणीच्या प्रवेशद्वारात शिवपिंड स्थापित आहे. त्याच्या आत एक गुफा आहे. प्राचीन काळात योगी पुरुष या गुफेमध्ये ध्यानधारणा करत असत.
डोंगराच्या माथ्यावर अनेक धार्मिक स्थळे आहेत. वर जाण्यासाठी पाषाणात बांधलेला पायरी मार्ग उपलब्ध आहे. गर्द झाडीतून जाणाऱ्या या मार्गावर ठिकठिकाणी आसनांची व्यवस्था केलेली आहे. डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर सद्गुरू गंगाराम महाराज यांच्या समाधीकडे जाणाऱ्या मार्गावर एकाच ठिकाणी पाच औदुंबर वृक्ष असलेला पार आढळतो. हा औदुंबर वृक्ष भाविकांचे मनोरथ पूर्ण करतो, अशी श्रद्धा आहे. या पारावर पाषाणाच्या पद्मपादुका, शिवलिंग आणि गणेशमूर्ती स्थापित आहे. अपत्यप्राप्तीसाठी भाविक या वृक्षाला नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यावर वृक्षाच्या फांद्यांना लहान पाळणे बांधले जातात.
येथून काही अंतरावर एक बालोद्यान आहे. या उद्यानामध्ये मुलांच्या मनोरंजनासाठी घसरगुंडी, संतुलन फळी, झोपाळे आणि विविध प्राण्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. उद्यानापासून काही अंतरावर सद्गुरू गंगाराम बुवा महाराज यांची संजीवनी समाधी आणि लेणी आहे. या लेण्यासमोर तटबंदी असलेले प्रांगण आहे. प्रांगणात सभोवताली भाविकांसाठी आसनांची सोय केली आहे. येथील एका लहान देवळीत हनुमान आणि जगदंबा देवीची मूर्ती आहे. प्रांगणामध्ये बारमाही फुलणारे चाफ्याचे झाड आणि एक पाणपोई आहे. या ठिकाणी दर एकादशीला भजन व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
पुढे डोंगराच्या पोटात एक लांबलचक गुफा आहे. येथे सद्गुरू गंगाराम बुवा महाराज यांच्या समाधीचा चौथरा बांधलेला आहे. त्यावर त्यांची पितळी मूर्ती स्थापित आहे. गुफेत गुरुआसन देखील आहे. गुफेच्या मागील भिंतीवर १० फूट उंचीची, पद्मासनातील भगवान विष्णूची मूर्ती कोरलेली आहे. विष्णूच्या मुकुटावर सप्तफणी नागाचे छत्र आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला त्यांचे वाहन असलेल्या गरुडाचे शिल्प कोरलेले आहे. या समाधीची दैनंदिन पूजाअर्चा ‘गंगाराम बुवा’ यांच्या घराण्यातील वारसदार पिढ्यानपिढ्या करतात. या गुफेमध्येच सद्गुरूंना भगवान बालाजी विष्णूने प्रत्यक्ष दर्शन दिले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. नंतरच्या काळात याच गुफेत ह.भ.प. गोपाळ अण्णा महाराज अपशिंगेकर यांनी बेलपत्र अनुष्ठान केले होते. त्यांच्या पश्चात हनुमंत महाराज अपशिंगेकर यांनी केवळ झाडपाला खाऊन येथे तपश्चर्या केली होती. या गुफेपासून काही अंतरावर व्याघ्रगुफा आहे.
डोंगराच्या पश्चिम बाजूला एक पाण्याचा झरा आहे. हाच येथील पाण्याचा एकमेव स्रोत मानला जातो. प्रभू रामाने बाण मारून हा झरा निर्माण केला होता, अशी स्थानिक श्रद्धा आहे. डोंगरावर श्रीरामाच्या रथाच्या चाकांच्या खुणा उमटल्याचे सांगितले जाते. डोंगरात काही ठिकाणी असलेले खड्डे म्हणजे हत्तीच्या पायांच्या खुणा मानल्या जातात.
येथे श्रीदत्त जयंती, दसरा आणि दिवाळी हे प्रमुख वार्षिक उत्सव साजरे केले जातात. उत्सवाच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक येथे उपस्थित असतात. दत्त जयंतीला श्रीदत्तात्रेयांचा जन्मोत्सव आणि पालखी सोहळा आयोजित केला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवाला आपट्याची पाने अर्पण करून भाविक एकमेकांना सोने वाटतात. या उत्सवामध्ये सिमोलंघन हा कार्यक्रम असतो. दर महिन्याची एकादशी, पौर्णिमा आणि वार्षिक उत्सवांच्या वेळी येथे महाआरती, महाप्रसाद, भजन, कीर्तन व प्रवचन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाविकांना या मंदिरात सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घेता येते.