रोकडोबा हनुमान मंदिर

परचंडा, ता. अहमदपूर, जि. लातूर

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात परचंडा हे गाव वसलेले असून येथे प्रसिद्ध रोकडोबा हनुमान मंदिर आहे. स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायतीची महसूल निर्मिती आणि तंत्रज्ञानाचा पारदर्शक वापर करणाऱ्या या परचंडा गावाने शासकीय स्तरावरील ‘आर. आर. पाटील सुंदर गाव’ योजनेअंतर्गत २०२१-२२ या वर्षात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून ३० लाख रुपयांचा रोख पुरस्कार मिळविला होता. याच गावामध्ये आर्थिक संकटे दूर करणारे स्थान म्हणून रोकडोबा हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याचे छतविरहित गर्भगृह हे असून ही विशिष्ट वास्तुरचना आणि हे स्थान परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे.

महर्षी वाल्मिकी रचित ‘रामायण’ या महाकाव्यातील उत्तरकांडात (सर्ग ३५ आणि ३६), ‘महाभारत’ ग्रंथातील वनपर्वामध्ये तसेच ‘शिवपुराण’ आणि ‘स्कंदपुराण’ या प्राचीन ग्रंथांमधील संदर्भानुसार, जन्मल्याबरोबर मारुतीला सूर्याचे आकर्षण वाटले होते. उगवता सूर्य हे एखादे लाल पक्के फळ असावे असे समजून मारुतीने आकाशी झेप घेतली आणि सूर्य पकडण्याचा प्रयत्न केला. मारुतीने सूर्य गिळल्यास संपूर्ण जगाचा विनाश होईल आणि सर्वत्र अंधार पसरेल अशी भीती वाटल्यामुळे सर्व देवांनी इंद्राला यातून मार्ग काढण्याची विनंती केली. तेव्हा इंद्राने परिस्थितीचे गांभीर्य पाहून मारुतीवर वज्र प्रहार केला. वज्राच्या या प्रहारामुळे डावी हनुवटी तुटून मारुती मूर्छित झाले आणि पर्वतावर पडले. हनुवटीला संस्कृतमध्ये ‘हनु’ म्हणतात आणि ती तुटल्यामुळेच त्यांना पुढे ‘हनुमान’ हे नाव मिळाले.

आपल्या पुत्राला अशा प्रकारे गंभीर इजा झाल्याचे पाहून त्याचे पिता पवन म्हणजेच वायुदेव संतापले. त्यांनी क्रोधाच्या भरात आपली गती थांबवून पृथ्वीवरील सर्व हवा काढून घेण्यास सुरुवात केली. वायूचा प्रवाह पूर्णपणे थांबल्यामुळे सर्व प्राणिमात्रांचा श्वास कोंडू लागला आणि सृष्टीतील जीवन धोक्यात आले. जगाचा विनाश अटळ आहे असे वाटल्यामुळे सर्व देव वायुदेवाला शरण गेले आणि त्यांनी हनुमानाला झालेल्या इजेची भरपाई करून देण्याचे वचन दिले. वायुदेवाला संतुष्ट करण्यासाठी आणि बाल हनुमानाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सर्व देवांनी त्याला दिव्य शक्ती आणि विविध वर प्रदान केले. यानुसार सूर्यदेवाने आपल्या तेजाचा शंभरावा भाग हनुमानाला दिला, ज्यामुळे हनुमानाला सूर्यासारखे तेज प्राप्त झाले. वरुणदेवाने हनुमानाला पाण्यापासून कधीही इजा होणार नाही, असा वर देऊन आपल्या शक्तीचा काही भाग त्याला दिला, ज्यामुळे जल हे हनुमानाला कधीही बाधू शकत नव्हते.

त्याचप्रमाणे, यमदेवाने हनुमानाला चिरंजीवी होण्याचा वर दिला. कुबेराने हनुमानाला आपली गदा अर्पण करून धनाची कधीही कमतरता भासणार नाही असा वर दिला. देवांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी जगातील कोणतेही शस्त्र हनुमानाला इजा करणार नाही असा वर दिला, ज्यामुळे सर्व प्रकारची शस्त्रे हनुमानासमोर निकामी ठरणार होती. सर्व देवांनी आपल्या पुत्राला वेगवेगळ्या शक्ती अर्पण केल्याचे पाहून वायुदेवाने आपल्या गतीची शक्ती हनुमानाला दिली, ज्यामुळे हनुमानाला वायुवेगाने प्रवास करण्याची क्षमता प्राप्त झाली.

देवांनी बाल हनुमानाला दिलेल्या या वरांशी आणि वैश्विक शक्तींशी येथील मंदिराचा थेट संबंध जोडला जातो. वायुदेव आणि सूर्यदेव यांनी दिलेल्या शक्तींचा प्रवाह थेट मारुतीच्या मूर्तीमध्ये अखंडपणे संचारत राहावा या संकल्पनेतून गर्भगृहाला छत बांधण्यात आलेले नाही. निसर्गातील मोकळा वायू आणि सूर्याचा थेट प्रकाश मूर्तीवर पडावा, असा यामागील हेतू आहे. भूतकाळात या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार करण्यात आला, मात्र गर्भगृहावर बांधलेले छत काही ना काही कारणाने प्रत्येक वेळी कोसळून पडले. शेवटी हा दैवी संकेत मानून गर्भगृहाचे छत खुलेच ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला, ज्यामुळे सूर्यप्रकाश, मोकळा वायू आणि वैश्विक शक्तींचा संचार मूर्तीमध्ये अखंड राहतो.

मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. स्वागतकमानीच्या दोन्ही बाजूस आयताकृती चौथरे असून त्यावर चार स्तंभांचा नगारखाना बांधला आहे. या नगारखान्यावर पहारेकऱ्यांची शिल्पे आणि गजमुख आकाराचे हस्त कोरीव कामात तयार केलेले आहेत. या कमानीच्या चारही कोनांवर दास हनुमानाची शिल्पे आहेत. बाह्यभिंतीतील देवकोष्टकांमध्ये पर्वतधारी हनुमान, साईबाबा आणि गजानन महाराज यांची शिल्पे कोरलेली आहेत. नगारखान्याच्या छतावर शिखर, आमलक व कळस आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीमध्ये प्रवेशद्वार आणि दोन उपद्वारे असून या उपद्वारांच्या स्तंभांवर घुमटाकार शिखरे, आमलक व कळस आहेत. प्रवेशद्वाराच्या छताच्या मधोमध हनुमानाची उभ्या स्थितीतील सुमारे वीस फूट उंच मूर्ती लक्ष वेधून घेते.

प्रवेशद्वारापासून मंदिरासमोरील प्रांगणात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाम वृक्षांच्या रांगा आहेत. तिथून खासगी वाहने थेट प्रांगणातील मोठ्या वाहनतळापर्यंत पोहोचतात. विविध वृक्ष असलेल्या या प्रांगणात भाविकांसाठी आसने, सेवेकऱ्यांची निवासस्थाने, स्वयंपाकघर, अन्नछत्र, साठवण कक्ष आणि मंगल कार्यालय अशा सुविधा उपलब्ध आहेत. मंदिराची एकूण वास्तुरचना मुखमंडप, सभामंडप, मुख्य सभामंडप व गर्भगृह अशी विभागलेली आहे.

प्रांगणापेक्षा उंच असलेल्या मुखमंडपाच्या दोन्ही बाजूस महिरपी तोरण आहे. पुढील बंदिस्त सभामंडपात गोलाकार नक्षीदार स्तंभ असून छताला काचेचे झुंबर आणि वितानावर काचेची मीनाकारी सजावट केलेली आहे. खिडक्यांमुळे या भागात मोकळी हवा व भरपूर प्रकाश राहतो. या सभामंडपात डाव्या बाजूला तीन देवकक्ष आहेत. त्यांत अनुक्रमे वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाई, श्रीराम-सीता आणि नंदीसह शिवपिंड स्थापित आहे.

सभामंडपाच्या पुढे उंचावर मुख्य सभामंडप बांधला असून याच्या प्रवेशद्वारासमोर कोरीव पाषाणात बांधलेल्या दोन गोलाकार दीपमाळा आहेत. या सभामंडपाच्या छताला नवसाच्या शेकडो पितळी घंटा टांगलेल्या आहेत. येथील डाव्या बाजूच्या देवकक्षात श्रीराम, लक्ष्मण, जानकी व दास मारुती यांच्या मूर्ती आहेत, तर मध्यभागात द्रविडी पद्धतीची कापडी दानपेटी म्हणजेच हुंडी टांगलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापुढे वज्रपीठावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी व आतील भिंतींवर नक्षीदार सुवर्ण आच्छादन केलेले आहे. प्रवेशद्वाराला चांदीच्या नक्षीदार झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर रोकडोबा हनुमानाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे. मागील नक्षीदार सोनेरी भिंतीमध्ये श्रीराम आणि सीतामाई यांची उठावशिल्पे आहेत. गर्भगृहाला छत नसल्यामुळे त्यावर शिखर किंवा कळस बांधलेला नाही, त्यामुळे उघड्या छतातून सूर्यप्रकाश किंवा पौर्णिमेचे चांदणे थेट गर्भगृहात येते. मुखमंडपाच्या छतावर मात्र मध्यभागी घुमटाकार शिखर, आमलक व कळस आहे.

हनुमान जयंती हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव असून या निमित्ताने हनुमानाचा पालखी सोहळा साजरा केला जातो आणि उत्सवमूर्तीची ग्रामप्रदक्षिणा होते. या यात्रेदरम्यान पूजा साहित्य, मिठाई, गृहपयोगी वस्तू व कृषी उत्पादनांची तात्पुरती बाजारपेठ भरते.

याशिवाय रामनवमी, महाशिवरात्री, आषाढी व कार्तिकी एकादशी, दसरा आणि दिवाळी या सणांना महाभिषेक, भजन, कीर्तन, ग्रंथपठण व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर शनिवारी येथे चार ते पाच हजार भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यांच्यासाठी महाप्रसादाची सोय केली जाते. भाविकांना दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत या मंदिरात रोकडोबा हनुमानाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • अहमदपूर येथून १२ किमी अंतरावर
  • लातूर शहरापासून ५६ किमी अंतरावर
  • अहमदपूर येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

रोकडोबा हनुमान मंदिर

परचंदा, तालुका अहमदपुर, जिला लातूर

Back To Home