वटसिद्ध नागनाथ मंदिर आणि संजीवनी बेट

वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वसलेले वटसिद्ध नागनाथ मंदिर आणि लगतचे संजीवनी वनस्पती बेट हे आध्यात्मिक, वनस्पतीशास्त्र आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांचा एक अनोखा संगम आहे. हे प्राचीन मंदिर बाराव्या शतकातील असून ते या परिसराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची साक्ष देते. मंदिराच्या सभोवताली असलेल्या संरक्षित पठारावर दुर्मिळ औषधी वनस्पतींचा मोठा ठेवा आढळतो. स्थानिक परिसरातील जैवविविधता आणि श्रद्धा यांमुळे या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. आध्यात्मिक शांतता आणि आरोग्यदायी निसर्गरचना लाभलेले हे स्थान भाविक, वनस्पती संशोधक आणि वैद्यांसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळखले जाते.

‘नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथानुसार, वटसिद्ध नागनाथ हे नवनारायणांपैकी ‘आविर्होत्र’ नारायणाचा अवतार आहेत. कलियुगाच्या सुरुवातीला भगवान विष्णूंनी नवनारायणांना पृथ्वीवर धर्म स्थापनेसाठी अवतार घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आविर्होत्र नारायण यांनी नागनाथांच्या रूपात अवतार घेतला. ग्रंथातील कथेनुसार, ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्षण केले. तिच्या गर्भात नारायण शक्तीचा संचार झाला आणि तिने एका वडाच्या झाडाच्या ढोलीत अंडे घातले. हे अंडे कालांतराने फुटून त्यातून एक बालक जन्माला आले. याच वेळी कोशधर्म नावाचे गरीब परंतु वेदशास्त्रसंपन्न अथर्ववेदी गौडब्राह्मण वडाची पाने गोळा करत होते. त्यावेळी त्यांना बालकाच्या रडण्याचा आवाज आला. हे दैवी बालक असल्याचे ओळखून त्यांनी त्याला घरी आणले. त्यांची पत्नी सुरादेवी हिने बालकाचे पालनपोषण केले. वडाच्या ढोलीत जन्म झाल्यामुळे आणि वडाच्या झाडाखाली त्यांनी चमत्कार दाखविल्यामुळे त्यांना ‘वटसिद्ध नागनाथ’ किंवा ‘वडवळसिद्ध’ हे नाव प्राप्त झाले. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे मौंजीबंधन झाले आणि पुढे गुरु दत्तात्रेयांनी त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली. पौराणिक रूपकांचा शास्त्रीय अर्थ लावताना असे मानले जाते की वटसिद्ध नागनाथ हे वडाच्या ढोलीत बसून सर्पाच्या कातीचे आसन ग्रहण करून ‘बिंदु त्राटक’ नावाची कठीण योगसाधना करत असत. वटसिद्ध नागनाथांनी आपले अवतारकार्य संपवताना लातूर जिल्ह्यातील वडवळ येथे संजीवन समाधी घेतली. या समाधीला प्रत्येक शुक्रवारी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या भस्माचा लेप लावण्याची प्रथा पाळली जाते.

अशी मान्यता आहे की रामायणानुसार राम-रावण युद्धात लक्ष्मणाला शक्तीबाण लागल्यामुळे तो मूर्छित झाला. त्यावेळी हनुमानाला संजीवनी बुटी आणण्यासाठी पाठवण्यात आले. हनुमानाने याच डोंगरातून संजीवनी बुटी नेऊन लक्ष्मणाचे प्राण वाचवले, म्हणून या डोंगराला संजीवनी बेट हे नाव पडले. संजीवनी बेटाच्या पायथ्याशी असलेल्या वडवळ गावातील कसदार लाल माती टोमॅटोच्या पिकासाठी सुपीक मानली जाते. वडवळ हे ‘टोमॅटोचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनात मोठी क्रांती केली आहे. येथील टोमॅटो दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात केला जातो. या कृषी व्यापारातून गावात दरवर्षी १८ ते २० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते.

गावात असलेल्या या मंदिरापर्यंत थेट रस्ता आहे. मंदिराला भक्कम तटबंदी असून या तटबंदीमध्ये प्रवेशद्वार आणि स्वागतकमान बांधलेली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन गोलाकार स्तंभ आहेत. स्तंभांवरील सज्जावर द्रविडी शैलीतील आडवे शिखर, असे या स्वागतकमानीचे स्वरूप आहे. शिखरामध्ये मधोमध देवकोष्टक असून त्यात नागनाथाची ध्यानस्थ मूर्ती कोरलेली आहे. देवकोष्टकाच्या दोन्ही बाजूंना कूट आणि शालरचना केलेली आहे व त्यावर कळस बसवलेले आहेत. मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात वृक्षांच्या छायेत भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात एक प्राचीन विहीर आहे. असे सांगितले जाते की तिचा जलसाठा अक्षय आहे. याशिवाय प्रांगणात सेवेकऱ्यांची निवासस्थाने आणि इतर वास्तू आहेत. प्रांगणात एक वटवृक्ष असून या वृक्षाखाली पारावर नागनाथाची मूर्ती प्रतिष्ठित आहे.

दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मूळ मंदिराला दर्शनमंडप अलीकडील काळात जोडण्यात आला. अर्धखुल्या स्वरूपाच्या दर्शनमंडपात बाह्य बाजूने कठडा बांधलेला आहे. या कठड्यात एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले स्तंभ आहेत. दर्शनमंडपात सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर वज्रपीठावर शिवपिंड आणि नंदीची मूर्ती आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात भिंतींवर देवकोष्टके आहेत आणि त्यामध्ये देवीदेवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारात नक्षीदार द्वारशाखा आणि द्वारपाल शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणेश शिल्प कोरलेले आहे आणि त्याच्या वर ॐ कार अंकित आहे. प्रवेशद्वारावर तीन देवकोष्टके असून त्यात महादेव, गणपती आणि दत्तात्रेय यांच्या मूर्ती आहेत.

सभामंडपापेक्षा खोल असलेल्या गर्भगृहात सुमारे पाच पायऱ्या उतरून यावे लागते. गर्भगृहात जमिनीखाली नागनाथ महाराजांची समाधी असून जमिनीवर शिवपिंड आहे. या शिवपिंडीवर नागाची चांदीची प्रतिकृती बसवलेली आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात चारही कोपऱ्यांवर कूट शिखर रचना केलेली असून त्यावर कळस आहेत. शिखराच्या दुसऱ्या थरात समोरील भिंतीवर नवनाथांची शिल्पे आहेत तर तिसऱ्या थरात इतर देवीदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. शिखरातील सर्वात वरचा थर चौकोनी व घुमटाकार आहे.

मंदिराच्या परिसरात आणि गावाजवळ असलेल्या संजीवनी बेटाच्या परिसरात प्राचीन शिल्पे, देवीदेवतांच्या मूर्ती आणि वीरगळ विखुरलेल्या आढळतात. या भौतिक अवशेषांवरून प्राचीन काळी येथे युद्ध झाले असल्याचे स्पष्ट होते. संजीवनी बेट हा औषधी वनस्पतीयुक्त डोंगर असून या डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेल्या पायऱ्या आहेत. संजीवनी बेट हे वनौषधी आणि जैवविविधतेने नटलेले संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव संरक्षित पठार आहे. या बेटावर सुमारे १७७ हून अधिक प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती नैसर्गिकरीत्या वाढतात. या डोंगराची वैशिष्ट्यपूर्ण माती, खनिजयुक्त खडक आणि येथील हवामान यांमुळे येथे उगवणाऱ्या वनस्पतींमध्ये औषधी गुणांची जोपासना होते. येथे दगड पिंपळ नावाची दुर्मिळ वनस्पती आढळते, जी मूत्रपिंडाचे आजार आणि शरीरातील अंतर्गत शुद्धीसाठी उपयुक्त ठरते. येथे आढळणारी पुनर्नवा वनस्पती नैसर्गिक उत्तेजक असून ती सूज कमी करण्यास मदत करते आणि ही वनस्पती यकृत तसेच मूत्रमार्गाच्या विकारांवर गुणकारी ठरते. ‘शिवलिंगी’ ही दुर्मिळ वेलवर्गीय वनस्पती स्त्रियांचे वंध्यत्व आणि गर्भाशयाच्या आजारांवर उपयुक्त औषध आहे. दमवेल ही श्वसनविकार नाशक औषधी दमा, खोकला आणि फुफ्फुसांच्या इतर आजारांवर परिणामकारक आहे. याशिवाय अडुळसा, गुळवेल, सोमलता, जखमजोडी आणि कापूर माधुरी या औषधी वनस्पती येथे मुबलक प्रमाणात आढळतात.

संजीवनी बेटाचे वैज्ञानिक आकर्षण म्हणजे येथील पठारावरील ‘लोटांगण पॉईंट’ होय. या पठारावर १०० फुटांपेक्षा जास्त व्यासाचे एक विशिष्ट चुंबकीय क्षेत्र कार्यरत आहे. या जागेवर जेव्हा एखादी व्यक्ती जमिनीवर उताणी झोपून दोन मिनिटे आपले शरीर व मन पूर्णपणे स्थिर करते आणि तीन ते चार गिरक्या घेते, तेव्हा तिचा स्वतःच्या शरीरावरील ताबा सुटतो आणि ती व्यक्ती जमिनीवरून आपोआप पुढे घसरत जाते. दुसऱ्या व्यक्तीने पकडून थांबवेपर्यंत ती व्यक्ती जमिनीच्या गुरुत्वीय ओढीने पुढे घसरत राहते. या भौतिक घटनेमागे चुंबकीय आणि गुरुत्वीय बलाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. या बेटावर सुमारे ३० ते ३५ फूट लांबीची एक अरुंद गुहा आहे, जी पुढे चिंचोळी होऊन बंद होते. गुहेच्या बाजूला चौकोनी व आयताकृती आकाराच्या दगडी बांधकामाच्या खुणा दिसतात. येथे प्राचीन काळी सैनिक किंवा ऋषीमुनींचे निवासस्थान असल्याचे ऐतिहासिक अवशेष दर्शवतात. पठारावर पाणी साठवण्यासाठी खडकात खोदलेल्या तीन मोठ्या विहिरी आहेत. याशिवाय खडकांमध्ये विविध आकारांचे गोल खड्डे आहेत, ज्यांचा वापर प्राचीन काळी वैद्य मंडळी औषधी वनस्पतींमधून रस काढण्यासाठी खलबत्त्यासारखा करत असत. पठारावर विठ्ठल-रखुमाई आणि इतर देवीदेवतांची लहान मंदिरे आहेत.

संजीवनी बेटावर दरवर्षी ‘उत्तरा नक्षत्रावर’ १५ दिवसांची आरोग्य यात्रा भरते. या यात्रेसाठी देशभरातून रुग्ण, वैद्य, आयुर्वेदिक संशोधक आणि वनऔषधींचे जाणकार मोठ्या संख्येने येतात. या बेटावर आलेले रुग्ण सलग तीन दिवस फक्त दुर्मिळ वनस्पती आणि पाने यांचे सेवन करतात. तीन दिवसांच्या औषधी सेवनानंतर शरीरातील औषधांचे पचन आणि चयापचय क्रिया संतुलित करण्यासाठी येथे ‘काळ्या साळीचा भात’ शिजवून खाण्याची प्रथा पाळली जाते. याच काळात बेटावरून वाहून जाणारे पाणी डोंगराखाली एका तलावामध्ये साठवले जाते आणि उत्तरा नक्षत्रात या तलावातील पाण्यात स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात, असा विश्वास आहे. महाराष्ट्र सरकारने या वनौषधींच्या जतनासाठी येथे एक ‘औषधी वनस्पती संशोधन केंद्र’ स्थापन केले आहे.

चैत्र पौर्णिमा हा या मंदिरातील प्रमुख वार्षिक जत्रोत्सव असून महाशिवरात्री, श्रावण मास, नागपंचमी, दसरा आणि दिवाळी हे सण मंदिरात नियमित साजरे केले जातात. याशिवाय वैशाख महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात पारंपरिक भजन, कीर्तन आणि प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि येथे आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • चाकूर येथून १२ किमी अंतरावर
  • लातूर शहरापासून ३६ किमी अंतरावर
  • चाकूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : अण्णासाहेब पाटील, विश्वस्त, मो. ९४२२४६९२२६,
  • नागनाथ मठपती, मो. ९४०३५४१३८५

वटसिद्ध नागनाथ मंदिर

और संजीवनी द्वीप वडवल नागनाथ, तालुका चाकुर, जिला लातूर

Back To Home