सिद्धेश्वर नागनाथ मंदिर

नवकुंड झरी, ता. चाकूर, जि. लातूर

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात नवकुंड झरी येथे सिद्धेश्वर नागनाथ मंदिर आहे. हिंदू धर्मपरंपरेत मंदिराच्या परिसरातील जलकुंडांना तीर्थाचा दर्जा आहे. या कुंडांमध्ये स्नान केल्याने शारीरिक व मानसिक व्याधी दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भारतामध्ये विविध धार्मिक स्थळांवर अशी जलकुंडे आढळतात, परंतु एकाच मंदिर क्षेत्रात नऊ कुंडे असणे दुर्मिळ मानले जाते. या नऊ जलकुंडांच्या वैशिष्ट्यामुळे नवकुंड झरी येथील हे शिवालय महत्त्वाचे धार्मिक स्थान ठरते. मंदिराची हेमाडपंती वास्तुकला आणि त्यासोबत जोडलेले ताम्रपट यामुळे या परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

महादेवाला ‘सिद्धेश्वर नागनाथ’ असे संबोधण्यामागे ‘शिवपुराण’ आणि ‘स्कंदपुराण’ या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्ट संदर्भ आढळतात. शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेच्या एकोणतीसाव्या आणि तिसाव्या अध्यायात दारुकावनातील नागनाथ महादेवाच्या उत्पत्तीची कथा सविस्तर दिलेली आहे. ग्रंथांमधील संदर्भानुसार प्राचीन काळी या परिसरात दारुक नावाचा असुर आणि त्याची पत्नी दारुका राहत होते. त्यांनी आपल्या शक्तीने ऋषीमुनींना आणि देवांना छळण्यास सुरुवात केली होती. या राक्षसांच्या कैदेत सुप्रिय नावाचा एक शिवभक्त होता. त्याने कारागृहातच इतर कैद्यांना सोबत घेऊन भगवान शिवांची आराधना आणि शिवमंत्राचा जप सुरू केला. भक्ताची ही निष्ठा पाहून भगवान शिव तेथे भूमीतून प्रकट झाले. भगवान शिवांनी राक्षसांचा पराभव केला आणि भक्तांचे रक्षण केले. त्यांनी आपल्या शरीरावर नाग धारण केलेले रूप प्रकट केले. ते याच वनात लिंगरूपाने स्थापित झाले. यामुळे त्यांना ‘नागनाथ’ किंवा ‘नागेश्वर’ म्हणजेच नागांचा ईश्वर असे नाव मिळाले.

या नावातील सिद्धेश्वर या भागाचा संबंध प्राचीन ऋषी आणि सिद्ध पुरुषांच्या तपस्येशी जोडलेला आहे. स्कंदपुराणातील कुमारिका खंडात आणि शिवपुराणात दारुकावनाचा परिसर आध्यात्मिक ऊर्जेने समृद्ध असल्याचा उल्लेख आढळतो. या वनामध्ये अनेक सिद्ध योगी, ऋषीमुनी आणि नाथ संप्रदायातील सिद्धांनी मोक्ष व विविध अलौकिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी भगवान शिवांची तपश्चर्या केली होती. या सिद्धांना त्यांच्या योगसाधनेचे फळ म्हणजेच सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या महादेवाच्या रूपाला ‘सिद्धेश्वर’ म्हणजेच सिद्धांचा ईश्वर म्हणून ओळखले गेले. ही दोन्ही रूपे आणि संकल्पना एकाच देवतेमध्ये सामावलेली आहेत. नागांना धारण करणारा आणि सिद्धांना सिद्धी देणारा एकच परमेश्वर म्हणजे सिद्धेश्वर नागनाथ आहे, अशी मान्यता आहे.

या मंदिराचा सर्वात जुना इतिहास राष्ट्रकूट राजांच्या काळात आढळतो. राष्ट्रकूट राजा गोविंद (तिसरा) यांच्या कारकिर्दीतील इसवी सन ८०३ मधील ‘झरिका ताम्रपट’ उपलब्ध झाला आहे. या ताम्रपटात गावाचा नामोल्लेख सापडतो. तत्कालीन प्रशासकीय रचनेनुसार हे गाव पौना विभागातील एक महत्त्वाचे ‘अग्रहार’ म्हणजेच धार्मिक कार्याकरिता ब्राह्मणांना दान दिलेले गाव होते. येथील जमीन धाराशिव निवासी विद्वान ऋष्यप्पभट्ट यांना दान दिल्याचा उल्लेख या ताम्रपटात आढळतो. या पुराव्यावरून नवव्या शतकात लातूर परिसरातील हे गाव एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट होते.

या सिद्धेश्वर नागनाथ मंदिराला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंगे आणि अनेक शिवमंदिरे आहेत. महाराष्ट्रात सोलापूर, लातूर आणि आळंदी येथे स्वतंत्र सिद्धेश्वर मंदिरे आहेत, तसेच औंढा नागनाथ येथे स्वतंत्र नागनाथाचे मंदिर आहे. परंतु, श्री सिद्धेश्वर आणि श्री नागनाथ यांचे एकाच ठिकाणी आणि एकमेकांसमोर मुख असलेले हे दुर्मिळ मंदिर केवळ उत्तर काशी म्हणजेच वाराणसी आणि दक्षिणेकडील नवकुंड झरी येथेच आहे, असे सांगितले जाते.

मंदिराची आख्यायिका अशी की प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता वनवासात दंडकारण्यातून दक्षिणेकडे जात असताना त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता. प्रभू श्रीराम नित्य शिवपूजन करीत असत. त्यासाठी त्यांनी येथे शिवपिंडीची स्थापना केली. शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी त्यांनी नवग्रहांना आवाहन केले. श्रीरामांनी भूमीत बाण मारून नऊ कुंडांची निर्मिती केली. या नऊ कुंडांतील पाण्याने नवग्रहांनी महादेवाचा अभिषेक केला. या प्रसंगाची साक्ष देणारी एक नवग्रह शिल्पपट्ट मंदिरात कोरलेला आहे. या नऊ कुंडांमध्ये भूगर्भातील झऱ्यांतून पाणी येत असल्यामुळे या गावाला नवकुंड झरी असे नाव मिळाले आहे.

मंदिराला असलेल्या तटबंदीमध्ये मंदिराचे प्रवेशद्वार आहे. त्यातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात पाषाणात घडवलेला एक चौथरा आहे. त्यावर मध्यभागी तुळशीवृंदावन आणि दोन्ही बाजूंना दोन दीपमाळा आहेत. दीपमाळांच्या पायाशी प्राचीन शिल्पे व वीरगळ ठेवलेले आहेत. प्रांगणात कोरीव पाषाणात बांधलेले आणि खाली उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या असलेले जलकुंड आहे. या परिसरात एकूण नऊ कुंडे आहेत. यातील काही कुंडांच्या तळातून पाण्याचा नैसर्गिक झरा वाहतो, तर काही कुंडांमध्ये इतर कुंडांतून पाणी प्रवाहित होते. ही सर्व कुंडे वर्षभर समपातळीवर पाण्याने भरलेली असतात. प्रांगणातील कुंडाच्या काठावर जलदेवतेचे लहान मंदिर आहे. येथील सर्व मंदिरे हेमाडपंती स्थापत्यशैलीची आहेत.

प्रांगणाच्या मध्यभागी श्री सिद्धेश्वर आणि श्री नागनाथ यांचे संयुक्त मंदिर उभे आहे. या मंदिराची रचना अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि एकापेक्षा अधिक गर्भगृहे अशी आहे. अर्धमंडपाच्या प्रवेशद्वारातील स्तंभांना टेकवून वीरगळ शिल्पे ठेवलेली आहेत. हा अर्धमंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे व त्यात भाविकांसाठी कक्षासने आहेत. अर्धमंडपाच्या पुढे बंदिस्त सभामंडप आहे. या सभामंडपात चार पाषाणस्तंभ आहेत. स्तंभांच्या पायावर आणि स्तंभाच्या भागावर चौकोन, षटकोन, अष्टकोन व वर्तुळ असे विविध भौमितिक आकार कोरलेले आहेत. स्तंभावरील चौकोनी पट्ट्यांवर विविध देवीदेवतांची शिल्पे आणि पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. सभामंडपाच्या छताच्या मध्यभागी पाषाणी पद्मपुष्प आणि त्यात दगडी झुंबर कोरलेले आहे.

सभामंडपामध्ये नंदीची पाषाणमूर्ती आहे. या नंदीची मान एका बाजूला कललेली आहे. सभामंडपाच्या डाव्या बाजूला नागेश्वर देवाचे अंतराळ आणि गर्भगृह आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल शिल्पे आणि नक्षीदार द्वारशाखा कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटपट्टीवर पुष्पलता, ललाटबिंबावर गजलक्ष्मीचे शिल्प आणि त्यावर मयूर तोरण आहे. अंतराळातील जमिनीवर शिवपिंड प्रतिष्ठित आहे. या शिवपिंडीवर पितळी नाग बसवलेला आहे आणि बाजूला महादेवाचा पितळी मुखवटा ठेवलेला आहे. याच्यापुढे पशुपतीनाथ गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल शिल्पे आणि नक्षीदार द्वारशाखा कोरलेल्या आहेत. ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी आणि ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे. हे गर्भगृह अंतराळाच्या पातळीपेक्षा सुमारे चार फूट खोल आहे आणि ते पूर्णपणे पाण्याने भरलेले असते. गर्भगृहात खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. जमिनीवर मध्यभागी पाण्याखाली शिवपिंड आहे.

सभामंडपाच्या उजव्या बाजूला सिद्धेश्वराचे गर्भगृह आणि त्यासमोर अंतराळ आहे. या अंतराळात एक नवग्रह शिल्पपट्टिका बसवलेली आहे. प्रभू श्रीरामांनी आवाहन केल्यामुळे हे नवग्रह येथे अवतरले, अशी आख्यायिका सांगितले जाते. अंतराळाच्या पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल, द्वारपालिका आणि गंगा-यमुना यांची शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराला नक्षीदार द्वारशाखा जोडलेल्या आहेत आणि ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या पायाशी पायरीच्या ठिकाणी चंद्रशिळा कोरलेली आहे. गर्भगृहातील जमिनीवर शिवपिंड प्रतिष्ठित आहे. या शिवपिंडीवर पितळी नागाचे छत्र आहे आणि छताला जलधारा धरलेले अभिषेकपात्र टांगलेले आहे. सभामंडपाच्या समोरील बाजूला आणखी एक गर्भगृह आहे. या गर्भगृहात एका भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार असल्याचे सांगितले जाते.

वास्तूच्या बाह्यभागातील मंडोवरावर तीन दिशांना तीन देवकोष्टके आहेत. या देवकोष्टकांमध्ये देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तिन्ही गर्भगृहांच्या छतावर पिरॅमिड आकाराची आणि उतरत्या पायऱ्यांची रचना असलेली शिखरे बांधलेली आहेत. या तिन्ही शिखरांच्या शीर्षभागावर आमलक आणि कळस आहेत. सिद्धेश्वर नागनाथ मंदिराच्या समोरच नृसिंह मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहामध्ये नक्षीदार पाषाणी वज्रपीठावर हिरण्यकश्यपूचे पोट फाडणाऱ्या भगवान नृसिंहाची मूर्ती प्रतिष्ठित आहे. या गर्भगृहाच्या छतावर पिरॅमिड आकाराचे व उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले शिखर आहे. मंदिराच्या समोर मल्लिकार्जुन मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपामध्ये दोन देवकोष्टके बांधलेली आहेत. यातील एका देवकोष्टकात गणपतीची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे, तर दुसऱ्यांत श्रीविष्णूचे उठावशिल्प कोरलेले आहे. विष्णूच्या मूर्तीच्या पायाशी उजव्या बाजूला गरुड आणि डाव्या बाजूला देवी लक्ष्मीचे शिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. हे गर्भगृह प्रवेशद्वाराच्या पातळीपेक्षा सुमारे चार फूट खोल आहे आणि त्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहात नैसर्गिक पाणी साठलेले असते आणि जमिनीवर पाण्याखाली शिवपिंड स्थित आहे. हे गर्भगृह म्हणजेच मंदिरातील कुंडांपैकी एक कुंड मानले जाते. गर्भगृहाच्या छतावर पिरॅमिड आकाराचे चौकोनी शिखर बांधलेले आहे आणि त्यावर आमलक व कळस आहे.

महाशिवरात्री हा या मंदिरातील वार्षिक उत्सव आहे. याशिवाय मंदिरात नागपंचमी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी होते. उत्सवांच्या वेळी मंदिरात पहाटे रुद्राभिषेकाने दिवसाची सुरुवात होते. महादेवाचा पारंपरिक शृंगार करून पूजापाठ केले जातात. मंदिर परिसरात भजन, कीर्तन, ग्रंथवाचन आणि महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, प्रदोष, पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मंदिरात विशेष गर्दी असते. दर सोमवारी दुपारच्या वेळी आलेल्या भाविकांना येथे महाप्रसाद दिला जातो. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • चाकूर येथून १६ किमी अंतरावर
  • लातूर शहरापासून ४५ किमी अंतरावर
  • चाकूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : शिवाजी सुगावकर, मो. ९८२२८९४७५१

सिद्धेश्वर नागनाथ मंदिर

नवकुंड झारी, तालुका चाकुर, जिला लातूर

Back To Home