भारतभरात गंगेनंतर सर्वाधिक लांब नदी म्हणून गोदावरी नदीची ख्याती आहे. याच कारणामुळे या नदीला दक्षिणेतील गंगा असे म्हटले जाते. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर या नदीचा उगम होतो. तिथून पुढे महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतून सुमारे १४६५ किलोमीटरचा प्रवास करत ही नदी आंध्रमधील राजमहेंद्रीपाशी बंगालच्या उपसागराला मिळते. नाशिक आणि राजमहेंद्री येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या नदीच्या काठावर अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे वसलेली आहेत. याच नदीच्या पात्रात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चक्रधर स्वामी दत्तस्थान आणि आत्मतीर्थ मंदिर हे ऐतिहासिक स्थान स्थित आहे.
महानुभाव पंथाचा आद्यग्रंथ असलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात तसेच इतर अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या स्थानाचे विशेष उल्लेख आढळतात. या तीर्थस्थानाबाबत अनेक प्राचीन दंतकथा आणि आख्यायिका प्रचलित आहेत. हे स्थान सुमारे पाच हजार वर्षे जुने आहे आणि त्याचा संबंध थेट त्रेतायुगाशी जोडला जातो. त्या काळात या परिसरात कुसुमावती नावाची नगरी होती. या नगरीत देवश्रवा ऋषी आपल्या आत्मश्रवा नावाच्या पुत्रासोबत राहत होते. ते प्रभू दत्तात्रेयांचे भक्त होते.
त्यांच्या भक्तीवर आणि पुण्याईवर प्रसन्न होऊन भगवान दत्तात्रेय त्यांच्या निवासस्थानी सगुण रूपात प्रकट झाले. त्याच वेळी देवश्रवा ऋषींचे शिष्य असलेले पांचाळ राजे हे आपल्या गुरूंच्या भेटीसाठी तेथे आले होते. तेथे त्यांना भगवान दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. या दर्शनामुळे राजाच्या मनात तीव्र विरक्ती निर्माण झाली आणि त्यांनी दत्तप्रभूंकडे मोक्षाची मागणी केली. राजाची ही मागणी स्वीकारताना दत्तप्रभूंनी त्यांना सांगितले की “तुझ्या हातून भविष्यात काही दिव्य कार्ये पार पडायची आहेत.”
त्या कालखंडात पुलस्त्य ऋषींचे कुंभ आणि निकुंभ नावाचे दोघे पुत्र होते. त्यांच्या बुद्धीवर कलीचा प्रभाव पडल्यामुळे त्यांच्या अंगी राक्षसी वृत्ती वाढीस लागली होती. त्यांनी सामान्य प्रजा आणि साधू-संन्यासी यांचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या त्रासाला कंटाळून आत्मऋषींनी पांचाळ राजाला या संकटातून प्रजेची सुटका करण्याचा आदेश दिला. गुरूंच्या आज्ञेनुसार राजाने कुंभ आणि निकुंभ या दोन्ही राक्षसांचा वध केला आणि प्रजेला त्यांच्या जुलमातून मुक्त केले. परंतु, या वधामुळे राजाला ब्रह्महत्येचे पातक लागले.
या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी राजाला जमिनीत बाण मारून पाताळातून जल म्हणजेच अग्रोदक काढण्याचा आदेश दिला. दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार राजाने जमिनीत बाण मारताच तेथून पाताळगंगा प्रकट झाली. आत्मऋषींनी या गंगेच्या पाण्याने भगवान दत्तात्रेयांचे चरणप्रक्षालन केले आणि ते चरणामृत पांचाळ राजाला प्राशन करण्यासाठी दिले. हे चरणोदक प्राशन करताच पांचाळ राजा ब्रह्महत्येच्या पापातून पूर्णपणे मुक्त झाला. भगवान दत्तात्रेयांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या या जलप्रवाहाला पुढे ‘आत्मतीर्थ’ असे नाव पडले. तसेच पांचाळ राजाच्या नावावरूनच या संपूर्ण गावाला ‘पांचाळेश्वर’ या नावाने ओळखले जाऊ लागले. नंतरच्या काळात या स्थानाचा थेट संबंध महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचे गुरू श्री गोविंद प्रभू यांच्याशी आला. महानुभाव पंथात ईश्वराच्या ज्या पाच अवतारांना मानले जाते, त्यांपैकी प्रभू दत्तात्रेय, श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी या तीन अवतारांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे एक दुर्मिळ क्षेत्र आहे. यामुळे महानुभाव पंथाच्या अनुयायांसाठी हे मुख्य आणि आदरणीय स्थान मानले जाते.
हे ऐतिहासिक आत्मतीर्थ स्थान पांचाळेश्वर गावाजवळ गोदावरी नदीच्या पात्रातच स्थित आहे. नदीच्या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी पक्की सडक आणि वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ आहे. येथून पुढे मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. गोदावरी नदीच्या पात्रात अगदी मधोमध अर्धखुल्या स्वरूपाचे एक अष्टकोनी मंदिर उभे आहे, हेच ‘आत्मतीर्थ मंदिर’ होय. आठ कोनांवर उभारलेले आठ गोलाकार पाषाणी स्तंभ आणि त्या स्तंभांवरील तुळईवर तोललेले अष्टकोनी छत, असे या भिंती नसलेल्या मंदिराचे स्वरूप आहे. या मंदिराच्या आत श्री चक्रधर स्वामींची चरणांकित स्थाने आहेत. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. मंदिराच्या शेजारी एक निवारामंडप बांधण्यात आलेला आहे. या मंदिराच्या आसपास नदीच्या पात्रात इतर अनेक समाधीमंदिरेही पाहायला मिळतात.
महानुभाव पंथाच्या विविध धार्मिक ग्रंथांमधील नोंदी आणि आख्यायिकांनुसार, याच ठिकाणी आत्मऋषींनी तीर्थाने प्रभू दत्तात्रेयांची चरणसेवा केली होती आणि पांचाळ राजाने बाण मारून तीर्थ निर्माण केले होते.
या ग्रंथांमधील उल्लेखांनुसार आणि स्थानिक परंपरेनुसार, भगवान दत्तात्रेय रोज दुपारी भोजनासाठी या स्थानी येतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. तसेच महानुभाव पंथाच्या ‘लीळाचरित्र’ या आद्यग्रंथातील नोंदींनुसार, याच ठिकाणी श्री गोविंदप्रभूंना भगवान दत्तात्रेयांनी दर्शन दिले होते, तसेच श्री चक्रधर स्वामी यांनीही या स्थानी आसन केले होते. या स्थानावरूनच पुढे श्री चक्रधर स्वामी बळेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले होते.
गोदावरी नदीच्या तीरावर याच परिसरात ‘गुफास्थानमंदिर’ वसलेले आहे. महानुभाव पंथाच्या ‘लीळाचरित्र’ आणि इतर स्मृतिग्रंथांमधील कथांनुसार, आपेगाव येथील एका ब्राह्मणाची व्यभिचाराच्या पापातून सुटका करण्यासाठी श्री चक्रधर स्वामी यांनी त्याच्याकडून या गुफेची निर्मिती करून घेतली होती. या मंदिराच्या सभोवताली भक्कम तटबंदी व त्यात एक मोठे प्रवेशद्वार बांधलेले आहे. मंदिराची रचना मुख्यत्वे मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. मुखमंडप हा समोरील प्रांगणापेक्षा काहीसा उंचावर असल्यामुळे त्यात प्रवेश करण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. मुखमंडपाच्या पुढे बंदिस्त स्वरूपाचा सभामंडप आहे. या मंडपाच्या पुढे सभामंडप लागतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वारापाशी चार पाषाणी स्तंभ आहेत. सभामंडपाचे छत समोरील स्तंभांवर आणि इतर तीन दिशांना असलेल्या भिंतींवर आधारलेले आहे.
या सभामंडपाच्या पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या आत श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान पूजले जाते. मंदिराच्या छतावर सभोवताली सुरक्षेसाठी कठडा लावलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर उंच आणि वरच्या बाजूला निमुळते होत गेलेले चौकोनी शिखर आहे. या मंदिरापासून काही अंतरावर पांचाळेश्वर गावाच्या आत ‘अवताराभिमुख मंदिर’ स्थित आहे, यालाच ‘अवस्थान मंदिर’ असेही म्हणतात. श्री चक्रधर स्वामी यांनी या मंदिराच्या जागेवर सलग पाच दिवस वास्तव्य केले होते. स्वामींच्या या वास्तव्यामुळे येथे त्यांची अनेक चरणांकित स्थाने पूजली जातात. यामध्ये प्रामुख्याने अवस्थान, वेदिकास्थान आणि पूजा आरोगणास्थान या स्थानांचा समावेश होतो. या दत्तस्थानामध्ये वर्षभरात अनेक धार्मिक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्रीदत्त जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मानला जातो. या उत्सवाच्या दिवशी प्रभू दत्तात्रेयांची एक पितळी मूर्ती पाळण्यात ठेवून पारंपरिक पाळणे गाण्याची प्रथा आहे. चैत्र शुद्ध चतुर्दशीला श्री चक्रधर स्वामींचा अवतारदिन ‘दवणापर्व’ म्हणून साजरा केला जातो. याशिवाय श्रावण वद्य अष्टमीला येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होतो. वैशाख महिन्यातील ‘अक्षय तृतीया’ हा सण एक विशेष पर्व म्हणून साजरा करण्याची येथे जुनी परंपरा आहे. महानुभाव पंथातील प्रमुख संत श्री गोविंद प्रभू यांच्या जयंतीचा सोहळाही या मंदिरात मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. या सर्व सणउत्सवांच्या वेळी मंदिरात महानुभावी भजने, श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचे वर्णन करणाऱ्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाचे अखंड वाचन आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या विशेष सोहळ्यांना दर्शनासाठी हजारो भाविक पांचाळेश्वरला येतात. उत्सवाच्या दिवसांशिवाय प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. या मंदिरात नित्यनियमाने महानुभाव पंथाचे धर्मग्रंथ, श्रीमद्भगवद्गीता आणि सूत्रपाठ यांचे सामूहिक पठण केले जाते. दररोज सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ९ या वेळेत भाविकांना चक्रधर स्वामींच्या चरणांकित स्थानांचे दर्शन व पूजा-अर्चा करता येते.