व्यंकेश्वर महादेव मंदिर

उस्वद, ता. मंठा, जि. जालना

महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या मराठवाड्यातील जालना जिल्हा ऐतिहासिक वारसास्थळांच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा आहे. तेराव्या शतकापर्यंत जालना शहराला हिवरडी या नावाने ओळखले जात असे. त्यानंतरच्या काळात जलराव नावाच्या शासकावरून या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव जालना पडले असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. या भागात प्राचीन काळी यादवांचे आणि त्यानंतर निजामशाहीचे वर्चस्व होते. १ मे १९८१ मध्ये औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यांचे विभाजन करून जालना हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील उस्वद गावातील प्राचीन व्यंकेश्वर महादेव मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. येथील महादेव जागृत असल्याची व तो भाविकांच्या हाकेला धावून येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

भारतीय अध्यात्म आणि पुराणांमध्ये हरी आणि हर म्हणजेच विष्णू आणि शिव यांच्यातील अभेद्य तत्त्वाचे विवेचन केलेले आहे. सामान्यतः व्यंकेश्वर किंवा व्यंकटेश्वर हे नाव कलियुगातील भगवान विष्णूंच्या रूपाशी जोडले जात असले, तरी सनातन परंपरेतील शैव आणि वैष्णव पंथांच्या आंतरिक समन्वयामुळे भगवान शिवाचेही ‘व्यंकेश्वर महादेव’ हे रूप श्रद्धापूर्वक पूजले जाते. ब्रह्मांड पुराण आणि भविष्योत्तर पुराणात या नावाच्या व्युत्पत्तीचा मूळ आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करण्यात आलेला आहे. पुराणातील संस्कृत व्याख्येनुसार ‘वेम’ म्हणजे जीवाकडून घडलेली पापे आणि ‘कट’ म्हणजे त्या पापांचे समूळ उच्चाटन करणे. जो परमेश्वर आपल्या चरणी लीन झालेल्या भक्तांच्या संचित पापांचा नाश करतो, तो ‘व्यंकट’ संज्ञेला पात्र ठरतो. पापांचे क्षालन करणाऱ्या या शिवस्वरूपी ईश्वरालाच ‘व्यंकट-ईश्वर’ म्हणजेच ‘व्यंकेश्वर’ म्हणून संबोधले गेले आहे.

स्कंद पुराणातील ‘व्यंकटाचल माहात्म्य’ या नावाच्या संदर्भावर अधिक प्रकाश टाकते. पौराणिक वर्णनानुसार, दक्षिण भारतातील तिरुमला म्हणजेच व्यंकट पर्वत हे मूळचे भगवान शिवाचे प्राचीन ध्यानस्थान आणि तपोभूमी होते. कलियुगाच्या आरंभी जेव्हा भगवान विष्णूंनी पृथ्वीतळावर श्रीनिवास रूपात अवतार घेतला, तेव्हा शिवांनी आपल्या परम सख्याच्या निवासासाठी हे स्थान सोडून दिले. परंतु, शैव आणि वैष्णव अनुयायांमध्ये कोणताही भेद उरू नये आणि उभय तत्त्वांचे ऐक्य प्रस्थापित व्हावे, म्हणून या पर्वतावरील अधिष्ठात्या देवामध्ये शिव आणि विष्णू या दोन्ही शक्तींचे एकत्रीकरण झाले. पर्वताच्या नावावरून या संयुक्त तत्त्वाला व्यंकेश्वर म्हटले गेले आणि पुढे याच परंपरेतून अनेक ठिकाणी स्वयंभू शिवपिंडीची स्थापना ‘व्यंकेश्वर महादेव’ म्हणून झाली.

या तात्त्विक अधिष्ठानाव्यतिरिक्त वराह पुराण आणि प्रादेशिक इतिहासामध्ये या नावाचा संबंध एका भक्तीकथेशी जोडलेला आहे. पश्चिमेकडील सोमनाथ क्षेत्रामध्ये एका शिवभक्त राजकुमारीच्या अनन्य भक्तीमुळे तिच्या केसांची वेणी शिवाच्या लिंगात विलीन झाली होती. वेणी धारण करणारा देव म्हणून सुरुवातीला महादेवाला ‘वेणेश्वर’ म्हटले गेले, ज्याचा कालौघात प्रादेशिक भाषेच्या प्रभावामुळे ‘व्यंकेश्वर’ असा अपभ्रंश झाला. अशा प्रकारे, ग्रंथांमधील तात्त्विक सत्य आणि भक्तांच्या आस्थेचा आदर करत, विष्णूशी एकरूप झालेले भगवान शिवाचे पावन रूप पुराण साहित्यात ‘व्यंकेश्वर महादेव’ या नावाने प्रतिष्ठित झालेले आहे.

हे मंदिर सुमारे सातशे वर्षे प्राचीन असल्याचे येथील स्थानिक सांगतात. गावापासून जवळ वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिरास तटबंदी असून या तटबंदीत एक प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूस दोन स्तंभ व स्तंभांवरील आडव्या सज्जावर पाच मखर आहेत. या मखरांत देवीदेवतांच्या मूर्ती व शीर्षभागी घुमटाकार शिखरे आहेत. शिखरांच्या शीर्षभागी स्तूपिका व कळस आहेत. मंदिराच्या पेव्हर ब्लॉकने आच्छादित प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत.

मंदिर सुमारे सहा फूट उंच जगतीवर स्थित आहे. सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मूळ मंदिरास जोडून नव्याने सभामंडप बांधण्यात आलेला आहे. प्रांगणापेक्षा उंच असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराला दहा पायऱ्या आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाह्य बाजूने कठडा आहे. कठड्यात चौकोनी स्तंभ व वितानावर चक्रनक्षी आहे. सभामंडपात वज्रपीठावर नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार सुमारे दोन फूट उंच आहे व त्यास तीन पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन देवकोष्टके आहेत. प्रवेशद्वारात नक्षीदार द्वारशाखा आहेत.

सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. मधल्या चार स्तंभांच्या स्तंभदंडात चौकोन, षटकोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. सर्व स्तंभांच्या शीर्षभागी कणी आणि त्यावर हस्त आहेत. हस्तांवर भारवाहक यक्षशिल्पे आहेत. येथील तुळईंवर चक्रनक्षी व देवीदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपात उजव्या व डाव्या बाजूच्या भिंतीत देवकोष्टके आहेत.

अंतराळात उजव्या व डाव्या बाजूच्या भिंतीत देवकोष्टके आहेत. पुढे अंतराळापेक्षा उंचावर गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूस द्वारपालशिल्पे आहेत. येथील द्वारशाखा नक्षीदार आहेत. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प व मंदारकास चंद्रशिला आहे. गर्भगृह प्रवेशद्वारापेक्षा सुमारे चार फूट खोल असून त्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी व्यंकेश्वर महादेवाची पिंड आहे. या पिंडीवर छत्र धरलेल्या नागाची पितळी प्रतिकृती असून जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात महादेवाचा पितळी मुखवटा आहे व तो उत्सवकाळात शिवपिंडीवर ठेवला जातो.

सभामंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखरात शुकनासिका रचना आहे व तेथे गुप्त कक्ष असल्याचे सांगितले जाते. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे. गर्भगृहासमोर असणाऱ्या सभामंडपाच्या छतावरील रचनेव्यतिरिक्त गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या सभोवती सुरक्षा कठडा आहे. शिखराचा प्रत्येक थर हस्तांवरील सज्जाने विभागला आहे व वरील दोन थरांत प्रत्येकी वीस देवकोष्टके व त्यात विविध देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या वरील निमूळत्या होत गेलेल्या चौथ्या थरावर अंगशिखरांची रचना आहे. तेथे त्रिशूळ व डमरू शिल्पे आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, कळस व ध्वजपताका आहेत.

मंदिरासमोर प्रांगणात प्रशस्त सभागृह आहे. येथे उत्सवकाळात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथेच महाप्रसादाचे वाटप केले जाते. मंदिरालगत पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने, धान्यकोठार, स्वयंपाकघर व भक्तनिवासाच्या खोल्या आहेत. मंदिराच्या मागील बाजूस नदीच्या तीरावर असलेल्या चबूतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. येथेच उतरत्या पायऱ्यांची रचना असलेले चौकोनी कुंड आहे. कुंडात गोमुखातून अखंड जलधारा पडत आहे. कुंडाच्या बाजूला प्राचीन समाधी मंदिर आहे.

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. या वेळी मंदिर परिसरात जत्रा भरते. श्रावणातील सर्व सोमवारी भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते. मार्गशीर्ष महिन्यात सात दिवसांचा हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. याशिवाय नागपंचमी, श्रावण पौर्णिमा, दसरा, दिवाळी इत्यादी सण व उत्सव येथे साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात लघुरुद्र, महाभिषेक, महामृत्युंजय मंत्रपठण, ग्रंथवाचन, भजन, कीर्तन, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या इत्यादी दिवशी मंदिरात दर्शनार्थी भाविकांची येथे गर्दी असते. दररोज पहाटे पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • मंठा येथून २६ किमी अंतरावर
  • जालना येथून ९८ किमी अंतरावर
  • मंठा शहरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

व्यंकेश्वर महादेव मंदिर

उसवाड, तालुका मंथा, जिला जालना

Back To Home