कळवण देवी मंदिर

कळवा, ठाणे

ठाणे शहराच्या शेजारी वसलेल्या कळवा या शहरातील कळवण देवीचे मंदिर हे स्थानिक भाविकांचे अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. सुमारे हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या प्राचीन गावातील या मंदिरासही शिलाहार काळापासूनचा इतिहास असल्याचे सांगण्यात येते. येथील कळवण देवीच्या नावावरून या परिसरास कळवा असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. येथील मंदिरात कळवण देवीबरोबरच कळव्याची ग्रामदेवता असलेल्या गावदेवीचीही पूजा केली जाते. येथील देवी भक्तांच्या नवसाला पावणारी आणि संकटसमयी हाकेला धावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची मोहीम म्हणून वसईची मोहीम गणली जाते. पेशव्यांच्या मराठा फौजेने १७३९ मध्ये वसईचा किल्ला घेऊन या परिसरातील पोर्तुगीजांच्या धर्मांध राजवटीस उखडून फेकले होते. त्या मोहिमेतील दोन महत्त्वाच्या चकमकी कळवा परिसरात झालेल्या आहेत. डिसेंबर १५३३ मध्ये पोर्तुगिजांनी ठाण्यावर ताबा मिळविला होता. दोन शतके त्यांनी येथे उच्छाद मांडला होता. त्यांना निखंदून काढण्यासाठी मराठा फौजांनी कंबर कसली होती. त्यावेळी मराठ्यांचे हल्ले रोखण्यासाठी पोर्तुगिजांनी १७३० च्या सुमारास ठाण्यात कोट बांधण्यास प्रारंभ केला. त्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी कळव्याच्या किनाऱ्याजवळ एक गढी बांधल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी मराठ्यांचा सरदार गंगाजी नाईक याने इटावे या गावातून कळव्यावर हल्ला केला आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातील कळवे गाव लुटून फस्त करून टाकले.

ठाण्याचा कोट १७३४ साली बांधून पूर्ण झाला. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी पोर्तुगीजांनी कळव्याजवळ जेरोनिमो नावाचा पाणबुरुज बांधला होता. ठाणे जिंकण्यासाठी या पाणबुरुजावर ताबा मिळवणे आवश्यक होते. तेव्हा २६ मार्च १७३७ रोजी मराठ्यांच्या फौजेने या पाणबुरूजावर हल्ला चढवला. खंडोजी माणकर, होनाजी बलकवडे, रामचंद्र हरि पटवर्धन, रामाजी महादेव यांच्या नेतृत्वाखालील काही कोळी सैनिकांनी गुपचूप जाऊन त्या बुरूजास शिड्या लावल्या. शंभर लोक आत शिरले आणि त्यांनी तेथील एक पोर्तुगीज कप्तान व सहा शिपाई कापून काढून बुरूज सर केला. वसईच्या मोहिमेतील ही एक महत्त्वाची चकमक मानली जाते. अशा महत्त्वाच्या घटना घडलेल्या या कळवा शहराचे नाव आधुनिक भारतातील वाहतूक क्रांतीशीही जोडलेले आहे. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. यानंतर सुमारे पाव शतकात, १८७७ साली ब्रिटिशांनी कळवा खाडीवर पूल बांधला. १,६८,८६४ रुपये एवढ्या खर्चात बांधलेल्या त्या पुलामुळे कल्याण, भिवंडी, पनवेल, पुणे आणि मुंबई ही शहरे परस्परांच्या अधिक जवळ येऊन व्यापार-व्यवसायास चालना मिळाली. सध्या ‘जुना कळवा पूल’ म्हणून ओळखला जातो तो हाच पूल. असा इतिहास असलेल्या कळव्यातील कळवण देवीचे स्थानही प्राचीन असल्याचे सांगण्यात येते.

देवीच्या येथील मूळ मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास अनुपलब्ध आहे. पोर्तुगीज सत्तेच्या काळात त्यांनी ठाणे-कळवा परिसरातील सर्व मंदिरे उद्‌ध्वस्त केली होती. त्यात देवीच्या मूळ मंदिराचाही समावेश असावा, असे मानले जाते. यानंतर अनेक वर्षे देवीची मूर्ती उघड्या आकाशाखाली ऊन आणि पाऊस झेलत होती. सुमारे शंभर वर्षांपूर्वी एका घटनेमुळे या मंदिराच्या पुनरुत्थानाला सुरुवात झाली. त्याची आख्यायिका अशी की या गावातील एका स्त्रीची देवीवर प्रचंड भक्ती होती. ती नित्यनेमाने या ठिकाणी येऊन देवीची पूजा करीत असे. एके दिवशी तिला देवीने स्वप्नदृष्टान्त दिला आणि आपले मंदिर उभारण्याची सूचना केली. त्यानुसार मग गावातील महिलांनी एकत्र येऊन मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मोहीम सुरू केली. महिलांच्या या उपक्रमाला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. त्यातून येथे देवीचे मोठे मंदिर उभे राहिले.

मंदिराच्या फरसबंदीने आच्छादित प्रांगणात चौकोनी नक्षीदार तुळशीवृंदावन आहे. या वृंदावनाचे कुंड गोलाकार आहे. मंदिराच्या या खुल्या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या चौथऱ्यांवर दोन सिंहांची शिल्पे आहेत. बंदिस्त सभामंडपाच्या भिंतींमध्ये उजेड आणि हवा यायला खिडक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहाच्या अगदी मध्यभागी असलेल्या मुख्य वेदीवर म्हणजेच वज्रपिठावर गावदेवी व कळवण देवी अशा दोन शेंदूर लावलेल्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. दोन्ही मूर्ती द्विभुज आहेत. दोन्ही देवींनी डोक्यावर मुकुट धारण केले आहेत. हातात काकणे व पायात कडे आहेत. देवीच्या उजव्या व डाव्या बाजूस वज्रपिठावर देवींचे वाहन असलेली सिंहाची शिल्पे आहेत. उजव्या बाजूला वज्रपिठावर विठ्ठल-रखुमाई आहेत आणि डाव्या बाजूच्या वज्रपिठावर गणपतीची मूर्ती आहे.

मंदिराच्या छताला कठडा असून त्यावर बाहेरील बाजूस अर्धवर्तुळात कमळाच्या फुलांची नक्षी आहे. छतावर दोन थरांमध्ये असलेले नक्षीदार चौकोनी मुख्य शिखर आहे. मुख्य शिखरात चारही बाजूंनी खालच्या व वरच्या थरात देवकोष्टके आहेत. मुख्य शिखराचे दोन थर कमळाच्या फुलांच्या नक्षीने विभागलेले आहेत.

शिखरावर आमलक आणि त्यावर कळस आहे. शिखराला लागून चारही बाजूला लहान शिखरे आहेत. त्या लहान शिखरांमध्ये तिन्ही बाजूंनी देवकोष्टके आहेत. लहान शिखरांमध्ये कमळाच्या फुलांची नक्षी आहे आणि त्यावर उभ्या धारेची नक्षी आलेल्या निमुळत्या भागावर मोदकाच्या आकाराचे शिखर व कळस आहेत.

येथे चैत्र पाडवा, श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताह आणि शारदीय नवरात्रोत्सव इत्यादी उत्सव साजरे केले जातात. १ मे रोजी देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो.

जत्रोत्सवाच्या दिवशी रात्री एक वाजता देवीला अभिषेक घालून पूजन व नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच गणेश व विठ्ठल-रखुमाई यांचे पूजन होते. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत देवीच्या दर्शनासाठी रांगा लागतात. तसेच दुपारी ४ वाजता गावदेवी मैदानात कुस्त्यांचे जंगी फड सुरू होतात.

या कुस्ती स्पर्धेत अनेक नामांकित पैलवान सहभागी होतात. रात्री ८ वाजता देवी पालखीत विराजमान होऊन ग्रामप्रदक्षिणेला निघते. ही पालखी रात्री बारा वाजता पुन्हा मंदिरात प्रवेश करते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • ठाणे एसटी व रेल्वे स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून ठाण्यासाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

कलवन देवी मंदिर 

कलवा, ठाणे

Back To Home