स्वयंभू गणेश देवस्थान

वझिरा, बोरिवली (प.), मुंबई

मुंबईच्या बोरिवली या उपनगरात वसलेले वझिरा स्वयंभू गणेश मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. साष्टी (सालशेत) बेटावरील प्राचीन गावांपैकी एक असलेल्या वझिरा गावाच्या नाक्याजवळ हे मंदिर आहे. येथील गणेशमूर्ती स्वयंभू आणि जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर जेवढे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, तेवढेच त्यास मुंबईच्या भौगोलिक इतिहासातही महत्त्वाचे स्थान आहे. याचे कारण म्हणजे या मंदिरात गणेशशिळेच्या रूपाने सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या महाकाय उद्रेकाची स्मृती जपली गेलेली आहे.

भूगर्भशास्त्रानुसार, सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी म्हणजे ‘क्रिटेशियस’ कालखंडाच्या अखेरीस जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगांमधून (फिशर इरप्शन) ज्वालामुखीचा उद्रेक झाला. पृथ्वीच्या पोटातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर, परंतु संथपणे लाव्हारस बाहेर पडला. कित्येक किलोमीटर परिसरात तो पसरला. लाव्हारसाचे एकावर एक थर साचत जाऊन ‘डेक्कन ट्रॅप्स’ किंवा ‘डेक्कन ज्वालामुखी प्रांत’ तयार झाला. महाराष्ट्राचा मोठा भाग या लांवाउद्रेकातून तयार झालेल्या बेसाल्ट खडकाने बनलेला आहे. मुंबईची बेटे हीसुद्धा या उद्रेकाची निर्मिती आहेत. साष्टी बेटातील कान्हेरीच्या डोंगरावर या ज्वालामुखीचे तोंड होते. त्यातून बाहेर पडलेल्या राखेचे हळूहळू खडकात रूपांतर झाले. येथील गणेशशिलाखंड हा त्याच नैसर्गिक किमयेचा एक अवशेष आहे. या शिलाखंडाचा आकार काहीसा गजमुखासारखा असल्यामुळे प्राचीन काळात त्याची स्वयंभू गणेश म्हणून पूजा करण्यात येऊ लागली.

त्या काळात बोरिवलीचा हा भाग एकसार, पोयसर, शिंपोली, मगाठणे आणि वझिरा अशा लहान गावांचा समूह होता. इ.स. ११४२ मध्ये मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी स्थापन करणाऱ्या मुंबईच्या आद्य राजा प्रताप बिंब यांची आणि त्यानंतर इ.स. १२९५ मध्ये सत्तेवर आलेल्या यादव राजा रामदेवराय यांचा पुत्र बिंबदेव यादव यांची हकीकत ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथात आढळते. या ग्रंथात या भागाचा उल्लेख ‘बोरवली’ असा करण्यात आला आहे. लोककथेनुसार, पोयसर आणि दहिसर या नद्यांच्या दरम्यान वसलेल्या या परिसरातपूर्वी बोरांची मुबलक झाडे होती. त्यावरून त्या परिसराला ‘बोरवली’ असे नाव पडले आणि नंतर त्याचे ‘बोरिवली’ झाले. पूर्वी घनदाट जंगल आणि डोंगरटेकड्यांनी वेढलेले वझिरा गावठाण आता बोरिवलीचाच एक भाग बनलेले आहे. या भागातून पूर्वी बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर दगड खोदून काढण्यात येत असे. त्या दगडखाणींमुळे येथे अनेक तलाव निर्माण झाले होते. गणेश देवस्थानाच्या शेजारी असलेला तलाव हा त्यांच्यापैकीच एक.

स्थानिक आख्यायिकेनुसार, अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी दगड खणण्याचे काम सुरू होते. एक कामगार तेथील एका मोठ्या शिळेला सुरुंग लावून ती फोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचवेळी दुपारच्या भोजनाची सुटी झाली. त्याने जेवण केले आणि थोडा वेळ विश्रांतीसाठी तो तेथेच पहुडला. झोपेत असताना त्याला स्वप्नात दृष्टांत झाला. स्वप्नात आलेल्या गणपतीने त्याला सांगितले की “तू फोडणार असलेल्या शिळेमध्ये माझे स्थान आहे.” तत्क्षणी त्याची झोप उडाली आणि त्याने ही बाब संबंधित ठेकेदाराला सांगितली. ठेकेदाराने पाहिले असता, त्या शिळेमध्ये त्यांना गणेशाचा आकार दिसला. यानंतर सर्वांनी मिळून या गणेशशिळेची पूजा केली. ही कथा पंचक्रोशीत पसरल्यानंतर येथील कोळी बांधव आणि पाचकळशी समाजातील भाविक श्रद्धेने येथे येऊन गणेशाची पूजा करू लागले. कालांतराने येथे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले. या मंदिराच्या स्थापनेच्या सनावळीची नेमकी नोंद अनुपलब्ध आहे. मात्र स्थानिक मौखिक परंपरेनुसार या स्थानाचा इतिहास अनेक पिढ्या जुना आहे. साधारणतः पाऊण शतकापूर्वीपर्यंत हा गणपती ‘खाण तलावातला गणपती’ म्हणून ओळखला जात असे. वझिरा आणि त्याच्या शेजारी असलेल्या बाभई या गावांचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या या गणेशाच्या मंदिराचा जीर्णोद्धार, तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण अलीकडच्या काळात करण्यात आले आहे.

वझिरा नाक्यावरील प्रशस्त प्राकारात हे मंदिर स्थित आहे. मंदिरासमोरील मोकळ्या प्रांगणात भाविकांसाठी मोठी पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. येथून मंदिराची दर्शनरांग सुरू होते. येथील मंदिर आधुनिक स्थापत्य शैलीतील आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या पद्धतीचा आहे. संगमरवरी फरशांनी सुशोभित केलेल्या साध्या परंतु देखण्या गर्भगृहात विशालाकार गणेशशिलाखंड आहे. त्या शिळेवर गणेशाची शेंदूरचर्चित कोरीव मूर्ती आहे. या मूर्तीला पुष्पमालांनी शृंगारले आहे आणि तिच्या मस्तकावर सुवर्णमुकुट आहे. या शिळेसमोर बांधण्यात आलेल्या संगमरवरी वेदीवर गणेशाचे वाहन असलेल्या मूषकाची सुवर्णरंगी मूर्ती विराजमान आहे. या गर्भगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे यात गणेशाचा शिलाखंड अर्धा गर्भगृहात आणि त्याचा पाठीमागचा अर्धा भाग गर्भगृहाच्या बाहेर आहे. गर्भगृहास प्रदक्षिणा घालताना भाविकांना त्याचे दर्शन होते. या ठिकाणी गणेशशिळेचा गजमुखासारखा भाग स्पष्ट होतो. या मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे.

स्वयंभू गणेशाच्या या मंदिरामध्ये सकाळी ५.३० ते रात्री ९.३० या कालावधीत भाविक गणेशदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात वर्षभरात अनेक धार्मिक उत्सव तिथीनुसार अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच ‘गणेश चतुर्थी’ हा येथील मुख्य आणि सर्वांत मोठा उत्सव होय. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मंदिरात विविध धार्मिक विधी, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय माघ शुद्ध चतुर्थीला येथे ‘गणेश जयंती’ साजरी होते. या दिवशी मूर्तीला विशेष अलंकार घालून महापूजा आणि अन्नदान केले जाते. दिवाळी, नववर्ष आणि त्रिपुरी पौर्णिमेला संपूर्ण मंदिरावर आकर्षक दीपोत्सव आणि रोषणाई केली जाते. बोरिवली परिसरातील ‘सिद्धिविनायक’ अशी या स्वयंभू गणेशाची ख्याती पसरल्यामुळे येथे दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. संकष्टी, अंगारकी चतुर्थी, तसेच गणेशोत्सवाच्या काळात या मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या मंदिरामध्ये छायाचित्रे काढण्यास सक्त मनाई आहे. त्याचप्रमाणे येथे अन्य कोणत्याही देवदेवतांच्या प्रतिमा लावल्या जात नाहीत.

उपयुक्त माहिती

  • बोरिवली रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • बोरिवली एसटी स्थानकापासून ४.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून बोरिवलीसाठी एसटी व ट्रेनची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

स्वयंभू गणेश मंदिर

वज़ीरा, बोरीवली (पश्चिम), मुंबई

Back To Home