बोरिवली (पश्चिम) येथील मंडपेश्वर गुहा मंदिर हे मुंबईतील वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांपैकी एक मानले जाते. दहिसर नदीच्या परिसरातील माउंट पॉयसर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या या सहाव्या शतकातील लेण्याचा संबंध मुख्यतः शैव परंपरेशी जोडला जातो. मंडपाचा ईश्वर असलेल्या त्या मंडपेश्वराची मोठी पिंड या ठिकाणी विराजमान आहे. येथील एका दालनातील नटराजाची खंडित मूर्ती या लेण्याच्या प्राचीन शिल्पवैभवाची साक्ष देते. ही लेणी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट आहेत.
सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी अपरांत म्हणजेच ठाणे, रायगड आणि मुंबई बेटांवर त्रैकूटक राजांची सत्ता होती. हे राजे मूळचे नाशिक विभागातील होते. सहाव्या शतकात कलचुरींनी त्यांना मांडलिक बनवले. कलचुरी हा प्राचीन भारतातील एक महत्त्वाचा राजवंश होय. वाकाटकांनंतर उदयास आलेल्या कलचुरी घराण्याचा मूळपुरुष कृष्णराज (इ.स. ५५० ते ५७०) हा होय. महिष्मती (मध्य प्रदेशातील महेश्वर) ही त्याची राजधानी होती.
या कृष्णराजाची चांदीची नाणी ‘कृष्णराज-रूपक’ म्हणून ओळखली जात. त्यांतील काही नाणी मुंबईच्या काळबादेवी-ठाकुरद्वार परिसरात सापडली होती. यावरून या बेटांवर त्यांची सत्ता होती हे दिसते. कलचुरी हे पाशुपतपंथीय शैव होते. त्यांच्या काळातच मुंबईजवळच्या घारापुरी बेटांवरील पाच लेण्यांची ‘शिवसृष्टी’ निर्माण झाली. घारापुरी तसेच जोगेश्वरी येथील या लेण्यांच्या उभारणीच्या काळातच, सहाव्या शतकात मंडपेश्वरच्या दोन लेण्यांची निर्मिती करण्यात आली.
काही संशोधकांच्या मते येथे सुरुवातीस बौद्ध विहारांचे अस्तित्व होते. पश्चिम किनारपट्टीवरील व्यापारी मार्गांच्या निकटतेमुळे बौद्ध भिक्षूंनी या प्रदेशात अनेक शैलगृहांची निर्मिती केली होती. पुढील काळात या स्थळाचे शैव केंद्रात रूपांतर झाले आणि शिवपुराणातील विविध प्रसंग येथे कोरण्यात आले. ‘मुंबईचा वैभवशाली वारसा’ (मूळ – कल्चरल हेरिटेज ऑफ मुंबई) या ग्रंथात डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी हे मूळचे शिवमंदिर असल्याचे प्रतिपादन केले आहे. या लेण्याचे वेरूळच्या रामेश्वर लेण्याशी (क्र. २१) विलक्षण साम्य आहे. या लेण्याचा आलेखच नव्हे, तर शिल्पांचे विषयही सारखेच आहेत.
बोरिवलीतच असलेल्या कान्हेरी लेण्यांच्या समूहात तिसऱ्या शतकापासून विहारांचा एक नवा प्रकार प्रस्तुत करण्यात आला होता. त्यात मंडपेश्वर लेण्यांच्या आराखड्याचे उगमस्थान असल्याचे ढवळीकर यांचे मत आहे.
या लेण्यामध्ये शिवमंदिराबरोबरच शैवांचा मोठा मठ होता. ‘रॉक कट टेंपल्स अराऊंड बॉम्बे’ (१९३२) या कन्हैयालाल एच. वकील यांच्या पुस्तकात, येथील शिवमंदिरास मिळणाऱ्या महसुलातून सुमारे पंधराव्या-सोळाव्या शतकात मोठा शिवमठ असल्याचे स्पष्ट होते. लेण्यातील लकुलीशाच्या शिल्पावरून हा मठ पाशुपत पंथीयांचा होता. प्राचीन काळी भारतात सर्वत्र पसरलेला पाशुपत हा पंथ पशुपती अथवा शिवास उपास्य दैवत मानणारा शैवपंथ आहे. त्याचा प्रसार गुजरात-राजस्थानच्या भूमीतून झाला असे मानले जाते. लकुलीश हे या पंथाचे अध्वर्यू मानले जातात. सत्ययुगात ‘इच्छापुरी’, त्रेतायुगात ‘मायापुरी’, द्वापरयुगात ‘मेघावती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायावरोहण (ता. दभोई, जि. वडोदरा, गुजरात) या गावामध्ये इ.स. पूर्व पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा दुसऱ्या शतकात आचार्य लकुलीश यांचा जन्म झाला.
ते भगवान शिवाचे अंतिम, २८वे अवतार मानले जातात. लकुलीश यांनी वेदकाळापासूनची प्राचीन परंपरा असलेल्या शैव संप्रदायाची सुसूत्रपणे मांडणी केली. याला ‘आगमान्त संप्रदाय’ असेही म्हणतात. या संप्रदायामध्ये शिवावतार लकुलीशाची मूर्तीस्वरूपात पूजा केली जाते. पद्मासनात बसलेला, जननेंद्रिय उत्थित असलेला, उजव्या हातात महाळुंग व डाव्या हातात दंड धारण केलेला असे लकुलीशाचे मूर्तिरूप असते, तर पशुपतीनाथ हा शिवलिंग स्वरूपात पूजला जातो. मराठी विश्वकोशानुसार, पाशुपतांच्या धार्मिक आचारात भस्माला विशेष महत्त्व आहे. या पंथात भस्मस्नान हाच खरा यज्ञ मानला जातो. या पंथात सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान हे पाच मंत्र सांगितले आहेत. ईश्वराच्या पूजेमध्ये सद्योजात मंत्राच्या आवर्तनाखेरीज अन्य कुठल्याही प्रकारच्या कर्माची आवश्यकता नाही. त्यात यज्ञ आणि श्राद्धकर्म सुद्धा वर्जित आहे. या पंथाची साधी, सोपी शिकवण आणि आचारपद्धत पुढे लयास गेली व त्यातून अघोरी व कापालिक पंथ निर्माण झाले.
सोळाव्या शतकापर्यंत मंडपेश्वर लेण्यात चाललेल्या पाशुपत शैव उपासनेवर पोर्तुगीजांनी गदा आणली. इ.स. १५१० मध्ये पोर्तुगीज सेनानी आफाँसो द अल्बुकर्क याने आदिलशाहाकडून गोवा जिंकले. इ.स. १५३३ पासून वसई, कल्याण, ठाणे, मुंबई आणि रेवदंडा या भागावर पोर्तुगीजांचे वर्चस्व निर्माण झाले.
त्यांच्यासोबत येथे धर्मप्रचारासाठी आलेल्या विविध ख्रिश्चन धर्मपंथांतील मिशनऱ्यांनी येथे धर्मांधतेचा कहर केला. अनेकांचे धर्मांतर केले. अनेक देवालये उद्ध्वस्त केली. त्याची झळ मंडपेश्वर मंदिरास देखील पोहोचली. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींनुसार इ.स. १५३८ मध्ये (काही संशोधकांच्या मते हे इ.स. १५४७ मध्ये) फ्रान्सिस्कन मिशनरी अँटोनिओ दो पोर्तो आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मंडपेश्वर लेण्यात प्रारंभी ‘नोस्सा सेन्होरा दे पिएदादे’ (अवर लेडी ऑफ पाएटी) या नावाने चर्च उभारले. पुढे त्याचे ‘अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन’ असे रूपांतर झाले. हे करताना त्यांनी या लेण्यातील मूर्ती आणि शिल्पांची तोडफोड केली. काही भागांवर चुन्याचा आणि प्लास्टरचा थर चढवण्यात आला, तर काही ठिकाणी भिंती बांधून मूर्ती झाकण्यात आल्या. या लेण्याचा समोरील भाग दगड-विटांच्या बांधकामाने बंद करण्यात आला होता. त्यात केवळ मध्यभागी प्रवेशद्वार आणि दोन्ही बाजूंना दोन खिडक्या ठेवलेल्या होत्या. या बांधकामाच्या दक्षिण टोकाला एक दगडी चबुतरा बांधून त्यावर मदर मेरीची मूर्ती स्थापित केली होती. 
या लेण्यामध्ये आजही एका ठिकाणी मूळ शिल्पाच्या जागी क्रूसचे चिन्ह कोरलेले दिसते. मंडपेश्वर परिसरात उभारलेले हे चर्च पुढे मोठ्या धार्मिक संकुलाचा भाग बनले. त्यात चर्च, मठ, धर्मशिक्षण केंद्र (रॉयल कॉलेज ऑफ मंडपेश्वर, स्थापना १५४९) आणि नंतर ‘सॅक्रोमोंटे’ प्रकारचे धार्मिक टेकडी-संकुल समाविष्ट झाले.
सोळाव्या शतकातील पोर्तुगीज इतिहासकार दिएगो दो कौटो याच्या ‘दा एसिया, डिकेड ७’ मधून पोर्तुगीजांच्या या धर्मांध कुवर्तनाची माहिती मिळते. त्याने दिलेल्या माहितीनुसार, १५३८ मध्ये फ्रान्सिस्कन धर्मगुरूंकडे कान्हेरी आणि मंडपेश्वर लेण्यांची सूत्रे आली आणि त्यांनी तेथील योगींना हाकलून लावले. त्या वेळी त्यांनी तेथील शिल्पे नष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. यानंतर सुमारे चाळीस वर्षांनी (इ.स. १६०३) कौटो याने लिहिले आहे: साष्टी बेटावर मनझापेर (मंडपेश्वर) नावाचे आणखी एक देवालय (पॅगोडा) होते. ते एका अखंड खडकातून कोरलेले होते. तेथे ५० योगींसह अत्यंत प्रसिद्ध असलेला रतेमनार नावाचा एक योगी राहात होता. आजूबाजूच्या गावांतील रहिवासी त्यांचा सांभाळ करत असत. फादर फ्रे आंतोनियो दे पोर्तो यांना याबद्दल समजताच ते त्याच्याकडे गेले. त्या बेटावरील योग्यांच्या मनात त्यांची इतकी प्रचंड भीती होती की त्यांनी फादरला पाहताच मंदिर सोडले आणि ते तिथून निघून गेले. त्या धर्मगुरूंनी लेण्यात प्रवेश केला आणि त्याचे ‘अवर लेडी ऑफ पाएटी’ला समर्पित असलेल्या चर्चमध्ये रूपांतर केले.
ब्रिटिश सरकारच्या ‘प्रोग्रेस रिपोर्ट ऑफ द आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया वेस्टर्न सर्कल (सन १९१८-१९)’ या अहवाल-ग्रंथानुसार या लेण्यांना पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता, त्यांना लेण्यांच्या वरच्या भागातील पुरातन चर्चचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे दिसले. त्याच्या शेजारी असलेल्या एका टेकाडावरील वॉच टॉवरजवळ एक अनाथालय बांधलेले होते आणि स्थानिक ख्रिस्ती धर्मगुरू (पाद्री) या लेण्यांचा वापर घोड्यांचा तबेला आणि गोदाम म्हणून करत होते. या केंद्रातून फ्रान्सिस्कन मिशनऱ्यांनी साष्टी बेटावरील इतर भागांत धर्मप्रसार केला. काही पोर्तुगीज दस्तऐवजांमध्ये मंडपेश्वरचा उल्लेख ‘मानपेसर’ किंवा ‘मनझापेर’ असा आढळतो. पुढे याच नावाचे रूपांतर होऊन माउंट पॉयसर हे नाव रूढ झाले. (मात्र काही इतिहासलेखकांच्या मते माउंट पॉयसर हे नाव थेट मंडपेश्वर या शब्दाच्या अपभ्रंशातून तयार झाले.)
इ.स. १७३९ मध्ये मराठ्यांनी वसईच्या मोहिमेत पोर्तुगीजांचा पराभव केला. त्यानंतर मंडपेश्वरवरील पोर्तुगीज धार्मिक नियंत्रण संपुष्टात आले. मिशनऱ्यांनी येथून काढता पाय घेतल्यानंतर पुढील किमान ५०-६० वर्षे हे स्थळ अंशतः ओस पडले. ब्रिटिश काळात आणि त्यानंतरच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणांमध्ये मंडपेश्वर लेण्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. ब्रिटिशांनी ही लेणी संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली. कालांतराने येथे पुन्हा एकदा शिवपूजा सुरू झाली. लेण्यामध्ये शंकराची पिंड प्रतिष्ठापित करण्यात आली. मात्र ही शिवउपासना पाशुपत पंथाच्या उपासना पद्धतीऐवजी लोकप्रिय शैव उपासना पद्धतीने सुरू झाली. अलीकडे, सन २०२४ मध्ये मंडपेश्वर लेण्यांचे सौंदर्यीकरण करण्यात आले. त्याचा एक भाग म्हणून ८ मार्च २०२४ रोजी येथे १८ किलो वजनाच्या चांदीच्या शिवलिंगाची चलित प्रतिष्ठा करण्यात आली. म्हणजेच हे शिवलिंग विशेष उत्सवांच्या वेळी येथे प्रतिष्ठापित करण्यात येते.
या मंदिरासमोर मोठी मोकळी जागा आहे. त्यात बागबगिचा आणि वृक्षराजी आहे.
तेथून दगडी फरसबंदीचा मार्ग जातो. येथून काही अंतर चालत गेल्यानंतर मंडपेश्वर मंदिराचे मुख्य लेणे लागते. पुढे स्तंभयुक्त ओसरी (सभामंडप) आणि आत चौरस दालन असा या लेण्याचा आलेख आहे. सहा पायऱ्या चढून या ओसरीत प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सिंह किंवा व्याघ्रशिल्पे असावीत. आता तेथे त्यांच्या पावलांचा अंशतः आकार दिसतो. पायऱ्यांच्या डावीकडे काही अंतरावर भूमिगत पाण्याची टाकी आहे. तेथील एका भिंतीवरील शिल्पे खरडून काढून तेथे क्रूसाचे चिन्ह कोरल्याचे दिसते.
या लेणी-मंदिराची ओसरी सुमारे ५१ × २१ फूट अशी प्रशस्त आहे. समोरच मंदिराचा अंतराळाचा भाग आहे. येथेच मोठा दगडी समईसारखा दीप आणि नंदीची मूर्ती आहे. मंदिराचे गर्भगृह चौरसाकार आहे. त्यास त्रिशाखीय द्वारचौकट आहे. द्वारचौकटीवर खालच्या बाजूला द्वारपालांची शिल्पे असावीत. ती अक्षरशः खरडून मिटवलेली आहेत. या द्वारचौकटीवर अस्पष्टसा शिलालेख आहे. त्याची भाषा मराठी व लिपी देवनागरी आहे. त्यात एकूण ११ ओळी आहेत. हा शिलालेख मंदिरास दिलेल्या दानाविषयीचा आहे. त्यात हे दान गोविंदा नामक व्यक्तीने दिल्याचा उल्लेख आढळतो. त्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये ‘संवत १९११’ असे वर्ष नोंदलेले आहे. यावरून हा शिलालेख सन १८५४-५५ मधील आहे.
गर्भगृहात दगडी फरसबंदी केलेली आहे. मध्यभागी जमिनीवर शंकराची पाषाण पिंड आहे. उंच शाळुंका आणि त्यात दंडगोलाकार लिंग असे या पिंडीचे स्वरूप आहे. त्यावर पितळी नागमूर्ती विराजमान आहे. त्याही वर पितळी अभिषेकपात्र आहे. गर्भगृहाच्या मागच्या बाजूच्या भिंतीलगत संगमरवरी अधिष्ठानावरही एक शिवलिंग विराजमान आहे. या शिवलिंगावर पितळी नागराजाने छत्र धरलेले आहे. या भिंतीवर शंकराची मोठी प्रतिमा लावलेली आहे.
मंदिराच्या ओसरीच्या डावीकडे आणि उजवीकडे मोठी दालने खोदलेली आहेत. ही दालने ओसरीच्या भूतलापासून उंचावर आहेत. त्यांच्या स्तंभांवर पूर्वी केलेल्या कोरीव नक्षीकामाच्या आणि शिल्पांच्या भग्न खुणा आहेत. या शिल्पांमध्ये शिव-पार्वती आणि गणेश यांच्या मूर्तींचा समावेश आहे. या दोन्ही दालनांच्या मागच्या भागात उपदालने आहेत. यातील डाव्या बाजूच्या दालनातील भिंतीवर शिवतांडव कोरलेले आहे. त्याचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालेला असला, तरी उरलेल्या शिल्पाकृतीच्या अवशेषांवरून त्याचे मूळ सौंदर्य प्रतीत होते. या शिल्पपटामध्ये मध्यभागी तांडवमुद्रेतील शंकर आहे.
त्याचे हात आणि कमरेखालील भाग नष्ट झालेला आहे. शंकराच्या उजवीकडे खालच्या बाजूस तीन स्त्रियांची शिल्पे आहेत. त्यातील मधली पार्वती व बाकीच्या दोन्ही तिच्या दासी असाव्यात, असे अभ्यासकांचे मत आहे. शंकराच्या डावीकडे खालच्या बाजूस भृंगी, तसेच मृदंगवादक व टाळवादक यांची शिल्पे आहेत. बाजूलाच गणेश आहे. डावीकडील वरच्या कोपऱ्यामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. त्याच्या हातात अक्षमाला आहे. उजवीकडे वरच्या कोपऱ्यात विष्णू आहे. त्याचप्रमाणे गंधर्व आणि विद्याधर हे आकाशात विहार करताना दाखवले आहेत. या शिल्पपटामध्ये लकुलीशाचेही छोटे शिल्प कोरलेले आहे. अशाच प्रकारचे शिल्प घारापुरीच्या लेण्यामध्येही आहे. डॉ. ढवळीकर यांच्या मते, घारापुरी आणि मंडपेश्वर लेणी जवळजवळ समकालीन असल्याने येथील शिल्पे एकाच कलाकाराने किंवा एकाच संप्रदायातील शिल्पकारांनी घडवली असण्याची शक्यता आहे.
या मंडपेश्वर गुहा मंदिरात नियमित पूजाअर्चा केली जाते. महाशिवरात्री हा येथे साजरा होणारा प्रमुख उत्सव आहे. येथे श्रावण महिन्यात विशेष अभिषेक, रुद्रपाठ आणि शिवपूजेचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दीपावलीत होणाऱ्या दीपोत्सवात येथे हजारो मातीचे दिवे लावून मंदिर परिसर उजळवण्यात येतो. याशिवाय येथे श्रावणी सोमवार, त्र्यंबक पूजन आदी विविध शैव धार्मिक विधी आयोजित केले जातात. मंडपेश्वर गुहा मंदिर भाविकांना दर्शनासाठी दररोज सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत खुले असते.