मुंबईचा राजा बिंबदेव यादव याच्या गजशाळेचे स्थान म्हणजेच ‘मातंगालय’ असलेला परिसर आज ओळखला जातो तो माटुंगा या नावाने. ब्रिटिश सरकारने विकसित केलेल्या पहिल्या नियोजित उपनगरांमधील हे एक उपनगर होय. याच माटुंग्यामध्ये सुमारे अडीचशे वर्षांपासून काशी विश्वेश्वर महादेवाचे देवालय उभे आहे. ‘मुंबईची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराची स्थापना सोमवंशी पांचकळशी ज्ञातीतर्फे करण्यात आली. जुन्या पेशवाई वाड्यासारखी रचना, महादेवाची मोठी पितळी पिंड हे या मंदिराचे एक आकर्षण मानले जाते. या मंदिरास ‘राज्य संरक्षित स्मारका’चा दर्जा देण्यात आलेला आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत माटुंगा परिसर म्हणजे एक ओसाड रान होते. देवगिरीच्या रामदेवराव यादवाचा चौथा पुत्र असलेला राजा बिंबदेव ऊर्फ भीमदेव यादव हा तेराव्या शतकात येथे राज्य करीत होता. इ.स. १२९५ मध्ये त्याने माहीम (बिंबस्थान) येथे आपली राजधानी स्थापन केली. असे सांगण्यात येते की माटुंग्याच्या परिसरात या राजाची मोठी गजशाळा होती. संस्कृतमध्ये हत्तीला मातंग असेही म्हटले जाते. यावरून या भागास मातंगालय असे म्हटले जाऊ लागले.
त्याचा मातंगा, मातुंगा असा अपभ्रंश होत माटुंगा हे नाव पडले असावे. काहींच्या मते, येथील हत्तींच्या देखभालीसाठी बिंब राजाच्या काळात येथे मातंग समाजाची वस्ती होती. त्यामुळे या भागास माटुंगा हे नाव पडले असावे. पौराणिक आख्यायिकेनुसार या परिसरात मातंग ऋषींचे निवासस्थान होते. त्यावरून माटुंगा हे नाव आले, अशीही एक व्युत्पत्ती सांगण्यात येते.
इ.स. १७२० ते १७२८ या काळात ब्रिटिशांनी वरळीचा बांध (हॉर्नबी वेलार्ड) बांधला. या बांधामुळे मुंबईस आजचे भौगोलिक स्वरूप प्राप्त झाले. या बांधामुळे तसेच माहीमच्या खाडीत भराव टाकण्यात आल्यानंतर महालक्ष्मी, परळ, वरळी, माहीम आदी ठिकाणांबरोबरच माटुंग्यात धान्यशेती होऊ लागली. या भागात मिठागरे देखील होती. इ.स. १७२० ते ३९ च्या सुमारास मुंबईचे जे आठ पोटभाग होते (ज्यांत माजगाव, वरळी, परळ, वडाळे, नायगाव, धारावी आणि कुलाबा यांचा समावेश होता), त्यात माटुंग्याचाही समावेश होता. पुढे १७७१ च्या सुमारास, मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर विल्यम हॉर्नबी याने वरळीच्या बांधाची मोठ्या प्रमाणावर डागडुजी सुरू केली.
हे काम १७८५ पर्यंत सुरू होते. याच कालखंडात, सन १७८३ मध्ये माटुंगा या तेव्हाच्या छोट्याशा गावामध्ये नारायण दाजी मंत्री यांनी काशी विश्वेश्वराचे हे भव्य मंदिर उभारले. मंदिरातील शिलालेखानुसार, शालिवाहन शके १७०४, माघ शुक्ल पौर्णिमा, सोमवार १७ फेब्रुवारी १७८३ रोजी या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. हे मंदिर सोमवंशी क्षत्रिय (पांचकळशी) ज्ञातीच्या मालकीचे असून त्याचा कारभार ‘दादोबा जगन्नाथ रिलिजियस ट्रस्ट’द्वारे पाहिला जातो. या ट्रस्टतर्फे २०१३ साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
माटुंग्यातील सिटी लाइट मार्केटच्या गजबजलेल्या परिसरात वसलेल्या या देवालयास समोर छोटेसे अंगण आहे. मंदिराची वास्तू उंच दुमजली आहे. त्याची स्थापत्य रचना तत्कालीन मराठा-पेशवाई पद्धतीच्या वाड्यासारखी आहे. छोट्याशा प्रवेशद्वारातून या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप प्रशस्त आकाराचा आहे. आत संगमरवरी फरसबंदी केलेली आहे. त्यात चौरसाकार स्तंभ आहेत.
मध्ये चौकासारखा आकार तयार करण्यात आला असून वर तीन बाजूंनी लाकडी कठड्यांचा सज्जा तयार केलेला आहे. पूर्वीच्या मंदिरांमध्ये घरंदाज स्त्रियाना देवालयातील कीर्तन-प्रवचनाचा श्रवणलाभ घेता यावा याकरिता ही सज्जाची व्यवस्था करण्यात येत असे. मंदिराच्या सभामंडपात येताच भाविकांना आकर्षित करून घेते ते येथील शिवपरिवाराचे भव्य उठावशिल्प. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर वरच्या बाजूला हे भव्य शिल्प आहे. शंकर, पार्वती, गणेश, नंदी आणि मूषक यांच्या प्रतिमा असलेल्या या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शंकराने दाढीमिशा धारण केलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदी आणि कासवाची मूर्ती आहे. नंदी मूर्तीच्या बाजूलाच खड्गधारिणी चतुर्भुज देवीची मूर्ती विराजमान आहे. संगमरवरी फरशांनी सजवलेल्या गर्भगृहामध्ये जमिनीवर महादेवाची मोठी शिवपिंड प्रतिष्ठापित आहे. या पिंडीची शाळुंका, तसेच शिवलिंगास कोरीव नक्षीकाम केलेले पितळी आवरण चढवण्यात आलेले आहे. पिंडीच्या वर अभिषेक पात्र आहे. मंदिरातील देवकोष्टकांमध्ये दत्तात्रेय, लक्ष्मी-नारायण, गणेश, शीतलादेवी, हनुमान आदी देवतांच्या मूर्तीही विराजमान आहेत.
काशीविश्वेश्वराच्या या मंदिरामध्ये रोज सकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत भक्तगण देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात रोज सकाळ आणि सायंकाळच्या वेळी भाविकांची मोठी वर्दळ असते. सोमवार हा शिवशंकराचा आवडता वार असल्याने या दिवशी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. श्रावणातील सोमवार, तसेच महाशिवरात्रीस मंदिरात मोठी गर्दी होते. महाशिवरात्र हा उत्सव येथे अत्यंत उत्साहाने व पूर्ण धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. त्या दिवशी मंदिरास रोषणाई केली जाते. अनेक भक्त रांगा लावून येथे शंकराचे दर्शन घेतात.