मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील बांगूर नगर भागात अय्यप्पा मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय मंदिर वास्तुकला आणि सांस्कृतिक परंपरेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. हे मंदिर मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रमुख अय्यप्पा मंदिरांपैकी एक मानले जाते. केरळच्या पारंपरिक ‘तच्छुशास्त्र’ नियमांनुसार या मंदिराची रचना केलेली आहे. सबरीमला येथील मूळ मंदिराचे मुख्य पुजारी ब्रह्मश्री कंदरारू महेश्वरारू तंत्री यांच्या हस्ते येथे मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. वास्तुरचना, शिस्तबद्ध पूजा विधी आणि ‘मंडला-मकरविलक्कू’ उत्सवांमुळे हे मंदिर मुंबईतील भक्तांचे मुख्य श्रद्धास्थान ठरले आहे.
केरळमधील सबरीमला येथे भगवान अय्यप्पाचे मूळ भव्य मंदिर आहे. सबरीमला हे नाव रामायणातील शबरीवरून पडल्याचे सांगितले जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार, षष्ठ, हरिहरपुत्र आणि मणिकंदन म्हणूनही ओळखले जाणारे अय्यप्पा हे शिव आणि मोहिनीच्या रूपातील विष्णू यांचे पुत्र मानले जातात. मोहिनी हा विष्णूचा एकमेव स्त्री अवतार आहे. भस्मासुराचा वध करण्यासाठी विष्णूने मोहिनी अवतार धारण केला होता. यानंतर मोहिनीने शिवशंकराला आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध केले आणि त्यांच्या मिलनातून अय्यप्पाचा जन्म झाला. यामुळेच भगवान अय्यप्पाला हरिहरपुत्र, अय्यप्पा शास्ता आणि मणिकंदन या नावांनीही ओळखले जाते. भगवान अय्यप्पाबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते. केरळमधील पंडालम संस्थानाचा वैष्णव राजा राजशेखर एकदा शिकारीसाठी गेला होता. त्याला पंबा नदीच्या तीरावर एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्या बालकाच्या गळ्यात मणिमाला होती आणि त्याच्या चेहऱ्याभोवती एक दिव्य प्रभा पसरली होती. राजा निपुत्रिक होता. त्या मुलाचा स्वीकार करण्याबाबत राजाच्या मनात शंका निर्माण झाली.
तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अगस्ती ऋषींनी हे बालक दैवी असल्यामुळे त्याचा स्वीकार करण्याचा सल्ला राजाला दिला. बालकाच्या गळ्यात मणिमाला असल्यामुळे त्याचे नाव मणिकंठ असे ठेवण्यात आले. काही काळाने राजा राजशेखरच्या राणीला एक पुत्र झाला. राजा मणिकंठलाच आपला थोरला पुत्र मानत होता आणि त्याने मणिकंठचा युवराज म्हणून अभिषेक करण्याचे ठरवले होते. मात्र मणिकंठला राज्यपद उपभोगण्यात रस नव्हता. दरम्यान, राजशेखरच्या दरबारातील काही दुष्ट मंत्र्यांनी राणीचे कान भरले आणि त्यांनी मणिकंठचा काटा काढण्याचा कट रचला. राणीचे पोट दुखत आहे आणि त्यावर इलाज म्हणून वाघिणीचे दूध हवे, असे त्यांनी राजाला सांगितले. मणिकंठने वाघिणीचे दूध आणण्याचे काम स्वीकारले आणि तो जंगलात गेला. जंगलात मणिकंठचा सामना महिषी नावाच्या राक्षसिणीशी झाला. महिषी ही महिषासुराची बहीण होती. दुर्गादेवीने महिषासुराचा वध केल्यानंतर महिषीने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता. शिव आणि विष्णूच्या पुत्राशिवाय तिला कोणीही मारू शकणार नाही, असा तो वर होता. शिव आणि विष्णूचा पुत्र असणे अशक्य आहे असे वाटल्यामुळे ती उन्मत्त झाली होती आणि तिचे अत्याचार वाढले होते. विष्णूने सागरमंथनाच्या वेळी मोहिनी रूप धारण केले होते.
त्या रूपातच शंकराशी विवाह करून झालेले मूल पंडालमच्या निपुत्रिक राजाकडे सोपवण्याचे विष्णूने ठरवले होते. अय्यप्पा हा शिव आणि विष्णूचा पुत्र असल्यामुळे तो महिषीचा वध करू शकला. यानंतर तो वाघिणीचे दूध घेऊन राजवाड्यात परतला. तेव्हा तो दैवी अवतार असल्याची सर्वांची खात्री पटली. महिषीवधाचे जीवनकार्य संपल्यामुळे त्याने राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने राजाला सबरीमला येथे आपले मंदिर बांधण्यास सांगितले.
गोरेगावच्या या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास पाहता, सन १९५३ मध्ये या परिसरातील काही अय्यप्पा भक्तांनी एकत्र येऊन एका लहान खोलीत सामूहिक भजन आणि पूजेची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात या भक्तांनी मिळून एक तात्पुरते मंडळ स्थापन केले आणि दरवर्षी मंडला पूजेच्या काळात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. गोरेगाव आणि आसपासच्या परिसरात जसजशी दक्षिण भारतीय आणि इतर समाजातील नागरिकांची संख्या वाढत गेली, तसतशी या धार्मिक उपक्रमांची व्याप्तीही वाढत गेली. भाविकांची संख्या वाढल्यामुळे एका मोठ्या आणि कायमस्वरूपी मंदिराची गरज भासू लागली. यासाठी सर्व भक्तांनी एकत्र येऊन अधिकृत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन १९७३ मध्ये ‘अय्यप्पा सेवा संघम बॉम्बे’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेची अधिकृत नोंदणी झाल्यानंतर मंदिरासाठी योग्य जागेचा शोध सुरू झाला. गोरेगाव पश्चिमेकडील बांगूर नगर हा परिसर शांत आणि मध्यवर्ती असल्यामुळे या ठिकाणी मंदिरासाठी जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक भाविक, व्यावसायिक आणि देणगीदारांच्या आर्थिक मदतीतून ही जागा ताब्यात घेण्यात आली. जागा मिळाल्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी केरळमधील अत्यंत प्रसिद्ध आणि अनुभवी मंदिर वास्तुकला तज्ज्ञ ब्रह्मश्री कणिप्पय्युर कृष्णन नंबुद्रीपाद यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. केरळमधील मंदिरांची रचना ही ‘तच्छुशास्त्र’ या वास्तुशास्त्राच्या अत्यंत कडक नियमांवर आधारित असते. या शास्त्रानुसार मंदिरातील प्रत्येक भागाची दिशा, उंची आणि आकार निश्चित केला जातो.
गोरेगावच्या या मंदिराचे नियोजन करतानाही या सर्व प्राचीन नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले, जेणेकरून मुंबईसारख्या आधुनिक शहरातही केरळमधील मूळ मंदिरांसारखीच पवित्रता आणि शांतता अनुभवता येईल.
मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर केरळमधून विशेष कारागीर आणि दगड घडवणारे शिल्पकार मुंबईत आणले गेले. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील ‘श्रीकोविल’ नावाची पाच मुख्य गर्भगृहे पूर्णपणे ग्रॅनाइट म्हणजेच कृष्णवर्णीय पाषाणातून घडवण्यात आली आहेत. हा ग्रॅनाइट दगड खास केरळ आणि तामिळनाडूच्या खाणींमधून निवडून मुंबईत आणला गेला होता. मंदिरातील पाच स्वतंत्र गर्भगृहे वेगवेगळ्या देवतांसाठी निश्चित करण्यात आली. यामध्ये मध्यभागी मुख्य गर्भगृह भगवान अय्यप्पा यांच्यासाठी तयार करण्यात आले आहे. या मुख्य गर्भगृहाच्या रचनेमध्ये पारंपरिक केरळी छताची रचना आणि लाकडी कोरीव कामाचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या वास्तुरचनेत गर्भगृह, अंतराळ आणि मंडपम अशा विविध भागांचा समावेश आहे. मुख्य गर्भगृहाच्या आजूबाजूला असलेल्या इतर चारही गर्भगृहांमध्ये भगवान श्रीकृष्ण, भगवान गणेश, अम्मे देवी आणि भगवान कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि कुंभाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमला मंदिराचे मुख्य पुजारी म्हणजेच मुख्य तंत्री ब्रह्मश्री कंदरारू महेश्वरारू तंत्री यांच्या हस्ते ‘श्रीभूतनाथ सदानन्द सर्वभूत दयापरः। रक्षः रक्षः महाबाहो शास्ते तुभ्यं नमोनमः।।’ या पूजामंत्राच्या गजरात या मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी केरळमधून अनेक नामवंत पंडित आणि वैदिक विद्वानांना आमंत्रित करण्यात आले होते. तांत्रिक आणि वैदिक विधींनुसार भगवान अय्यप्पा यांच्या मुख्य मूर्तीची येथे स्थापना करण्यात आली. या मूर्तीची रचना सबरीमला येथील मूळ मूर्तीशी साधर्म्य दर्शवणारी आहे. श्रीकोविलमध्ये उंच वज्रपीठावर अय्यप्पा स्वामींची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या सभोवताली अनेक दीप तेवत आहेत आणि त्यांची प्रभा मूर्तीच्या मुखावर पसरली आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्ण, गणपती, अम्मे देवी आणि कार्तिकेय यांच्या मूर्तींचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्राणप्रतिष्ठेनंतर हे मंदिर मुंबईतील सर्व अय्यप्पा भक्तांचे मुख्य केंद्र बनले.
गोरेगावमधील बांगूरनगर परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मंदिर प्रामुख्याने दक्षिण भारतीय, विशेषतः केरळच्या मंदिर स्थापत्यशैलीवर आधारित आहे. मंदिराच्या दुमजली प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गजराज शिल्पे आहेत.
प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या मुख्य चौकटीवर मल्याळम आणि देवनागरी लिपीमध्ये ‘तत्त्वमसि स्वामी शरणम्’ हा पवित्र संदेश लिहिलेला आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात शेषनागावर शयन मुद्रेत असलेल्या भगवान विष्णूंची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या मधोमध आतील बाजूला एक पारंपरिक बहुस्तरीय दीपस्तंभ आहे. मंदिराच्या वास्तुरचनेत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मंदिराचा ध्वजस्तंभ म्हणजेच ‘ध्वजस्तंभम’ होय. हा ध्वजस्तंभम सभामंडपाच्या अगदी समोर स्थापित करण्यात आलेला आहे आणि वो पूर्णपणे पितळी थराने मढवलेला आहे. सभामंडपात डावीकडे देवीचे स्थान आहे आणि उजवीकडे नवग्रहांच्या मूर्ती आहेत.
येथे दररोज पहाटे मंदिराचे दरवाजे उघडले जातात. पहाटेच्या वेळी केल्या जाणाऱ्या पूजेला ‘निर्माल्य दर्शन’ असे म्हणतात. या पूजेत आदल्या दिवशीचे अलंकार आणि फुले काढून देवाला शुद्ध स्वरूपात पाहिले जाते. त्यानंतर नैवेद्य आणि अभिषेकाचे विधी पार पडतात. मंदिरातील पाचही देवतांचे महत्त्व स्वतंत्र आहे. मुख्य देवता भगवान अय्यप्पा हे कलियुगाचे वरदहस्त मानले जातात.
भगवान श्रीकृष्ण म्हणजेच गुरुवायुरप्पन यांच्या मूर्तीसमोर भाविक प्रामुख्याने शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भगवान गणेशाची पूजा कोणत्याही नवीन कार्याच्या सुरुवातीला केली जाते. अम्मे देवी ही शक्तीचे प्रतीक आहे आणि तिची विशेष पूजा नवरात्रीच्या काळात केली जाते. भगवान सुब्रमण्यम म्हणजेच कार्तिकेय किंवा मुरुगन यांची पूजा प्रामुख्याने अडथळे दूर करण्यासाठी केली जाते. या पाचही देवतांच्या पूजा पद्धती केरळी परंपरेनुसारच पार पाडल्या जातात. अय्यप्पाची पूजा ही शैव, वैष्णव आणि शक्ती यांचा अनोखा संगम आहे. काटेकोर ब्रह्मचर्य, मद्यपान व मांसाहार निषिद्ध आणि कठोर आचारसंहिता त्याच्या भक्तीसाठी आवश्यक मानली जाते.
वार्षिक उत्सवांमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी या काळात चालणारा ‘मंडला-मकरविलक्कू’ हा उत्सव सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो. या ४१ दिवसांच्या काळात शेकडो भाविक या मंदिरात येतात. सबरीमला येथील मूळ मंदिराच्या यात्रेला जाणे शक्य नसलेले भक्त या गोरेगावच्या मंदिरात येऊन आपली व्रतधारणा पूर्ण करतात. या काळात भक्तांना विशेष ‘इरुमुडी’ म्हणजेच दोन कप्प्यांची पिशवी बांधून दिली जाते. या पिशवीत पूजेचे साहित्य आणि तुपाचा नारळ असतो. वार्षिक उत्सवाच्या सुरुवातीला या ध्वजस्तंभमवर अधिकृत ध्वजारोहण केले जाते. या विधीला ‘कोडिगेट्टू’ असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे ‘मकरविलक्कू’ हा विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी मंदिराला दिव्यांची विशेष रोषणाई केली जाते. याशिवाय दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात मंदिराचा वार्षिक प्रतिष्ठा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव सलग आठ ते दहा दिवस चालतो. या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शास्त्रीय संगीत आणि पारंपरिक केरळी वाद्यांचे वादन म्हणजेच ‘चेंडा मेलम’ केले जाते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर ‘आराट्टू’ म्हणजेच पवित्र स्नान घालून उत्सवाची सांगता होते. या मंदिरात छायाचित्रण किंवा भ्रमणध्वनी वापरण्यास पूर्ण बंदी आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते १०.३० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. शनिवारी सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. रविवारी देखील हीच वेळ सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९ अशी आहे.