परभणी आणि बीड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर डिघोळ (देशमुख) नावाचे एक ऐतिहासिक गाव वसले आहे. या गावातील एका डोंगरावर रेणुका मातेचे प्राचीन मंदिर स्थित आहे. परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. हे स्थान माहूरच्या रेणुका मातेचे उपशक्तिपीठ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे माहूरची रेणुका माता, राणीसावरगावची राणुबाई आणि तुळजापूरची तुळजाभवानी या तीन देवींचे दर्शन एकाच ठिकाणी होते. या संगमामुळे या स्थानाला ‘त्रिविधा देवी मंदिर’ असेही म्हटले जाते. येथील देवी अत्यंत जागृत आणि नवसाला पावणाऱ्या आहेत, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
या प्राचीन मंदिराच्या निर्मितीची आणि तिन्ही देवी एकाच ठिकाणी केव्हापासून वसल्या, याबद्दलची नेमकी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. तथापि, या स्थानाविषयी काही प्राचीन आख्यायिका सांगितल्या जातात. त्यानुसार माहूरची रेणुका माता आणि तुळजापूरची तुळजाभवानी देवी या बहिणी मानल्या जातात.
या दोन्ही बहिणी शेजारच्या राणीसावरगाव येथील माळरानावर एकत्र येऊन सारीपाट खेळत असत अशी जुनी समजूत आहे. या तिन्ही देवता डिघोळ (देशमुख) येथील मंदिरात केव्हापासून आल्या, याबद्दल निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत. तथापि, सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामी यांनी या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. या देवस्थानच्या देखरेखीचा इतिहास थेट हैदराबादच्या निजाम काळाशी जोडलेला आहे. निजाम राजवटीच्या काळात या परिसरामध्ये बाजीराव देशमुख नावाचे सरदार होऊन गेले. त्या काळी त्यांच्याकडे या भागातील साठ गावांची जहागिरी होती. ते नियमितपणे या मंदिरात दर्शनासाठी येत असत. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाला जाण्यापूर्वी देवीची पहिली मुख्य आरती करण्याचा मान या बाजीराव देशमुख यांना होता. तेव्हापासून त्यांच्याच वंशजांकडे या मंदिरात आरती करण्याचा मान परंपरेने चालत आलेला आहे. सध्याच्या काळातही निजाम काळापासून चालत आलेली या मंदिराच्या देखरेखीची संपूर्ण जवाबदारी गावातील देशमुख घराण्याकडेच आहे.
सोनपेठ शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील डोंगरमाथ्यावर हेमाडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर उभारलेले आहे. मंदिर परिसरात पाच दगडी दीपमाळा आहेत. मंदिराच्या संरक्षणासाठी दगडी बांधकाम केलेले एक महाद्वार आहे. या महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर मंदिराची वास्तू दिसते. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. सभामंडपाच्या मध्यभागी एक अष्टकोनी आकाराचे यज्ञकुंड आहे. मंदिराच्या गर्भगृहात एका उंच पीठासनावरील वेदीवर रेणुका माता आणि राणीसावरगावची राणुबाई यांचे शेंदूरचर्चित तांदळे प्रतिष्ठित आहेत. या तांदळ्यांवर देवीच्या भुवया, डोळे, नाक आणि ओठ कोरलेले आहेत. त्यावर चांदीचा मुलामा दिलेला आहे. दोन्ही देवतांच्या कपाळावर नेहमी कुंकू लावलेले असते. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूला तुळजाभवानी देवीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंना काळोबा आणि तोळोबा हे देवींचे रक्षक मूर्तीरूपात आहेत. गर्भगृहाच्या वरच्या भागावर घुमटाकार शिखर आहे.
मंदिर परिसरामध्ये पाण्याची दोन कुंडे आहेत. यांना स्थानिक भाषेत ‘कल्लोळ’ म्हटले जाते.
पूर्वीच्या काळात या डोंगरमाथ्यावर पाण्याची कोणतीही दुसरी सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे डोंगरावरील या मंदिरात दर्शनासाठी येताना भाविक सोबत भाजी-भाकरी आणत असत. देवीचे दर्शन झाल्यावर भाविक या ‘कल्लोळाच्या’ शेजारी बसून भोजन करत आणि पिण्यासाठी याच कुंडातील पाणी वापरत असत.
मंदिरात वर्षभर विविध धार्मिक विधी आणि सोहळ्यांचे परंपरेनुसार आयोजन केले जाते. या मंदिरातील देवींची ख्याती नवसाला पावणाऱ्या देवता अशी असल्याने अनेक भाविक देवीला नवस करतात आणि नवसपूर्तीसाठी येथे येतात. येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये चैत्र शुद्ध नवमीला रेणुका मातेच्या तांदळ्याला पारंपरिक पद्धतीने हळद लावण्यात येते. यानंतर चैत्र वद्य अष्टमीच्या दिवशी येथे रेणुका देवी आणि जमदग्नी ऋषी यांचा विवाह लावला जातो. विवाहाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीला दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना ‘महाप्रसाद’ वाटप करण्यात येतो. या सर्व कार्यक्रमांमध्ये शारदीय नवरात्रोत्सव हा येथील प्रमुख उत्सव असतो. या उत्सवादरम्यान परभणी आणि बीड जिल्ह्यांतून असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या काळात हा डोंगर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री सभामंडपातील यज्ञकुंडात पूर्णाहुती होम केला जातो. या दिवशी मंदिरात महाआरती, गोंधळ, भजन, कीर्तन आणि हरिपाठ आदी कार्यक्रम होतात. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे दररोज दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान केले जाते. दररोज सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.