हनुमानाची पूजा समाजात प्रामुख्याने बल, बुद्धी, विद्या आणि निस्सीम भक्तीचे दैवत म्हणून केली जाते. त्यांना ‘संकटमोचक’ म्हणजेच मानवी जीवनातील सर्व प्रकारची संकटे, भीती आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारे रक्षक म्हणून पूजले जाते. महाराष्ट्रात हनुमानाच्या या वीर आणि महारुद्र रूपाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाला शक्तीचे उपास्य दैवत मानून गावोगावी मारुतींची स्थापना केली. त्यांनी रचलेल्या प्रसिद्ध भीमरूपी स्तोत्रात ‘भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती’ अशी पहिलीच ओळ आहे. ही ओळ हनुमानाच्या महारुद्र रूपाची थेट आळवणी करते. तरुणांमध्ये बलोपासना आणि जागृती निर्माण करण्यासाठी हनुमानाच्या या पराक्रमी रूपाची पूजा करण्याची पद्धत त्यांनी रूढ केली. हनुमानाच्या या प्रसिद्ध मंदिरांपैकी गोदावरी नदीच्या काठावर वसलेले परभणी जिल्ह्यातील भोगाव येथील महारुद्र हनुमान मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
हनुमानाला ‘महारुद्र’ हे नाव पडण्यामागे पौराणिक ग्रंथांमध्ये महत्त्वाचे संदर्भ आढळतात. हिंदू धर्मात ‘रुद्र’ हे भगवान शंकराचे अत्यंत तेजस्वी, शक्तिशाली आणि संहारक रूप मानले जाते. शिवपुराणाच्या ‘शतरुद्र संहिता’ या ग्रंथात या कथेचा सविस्तर उल्लेख आहे. त्यानुसार, जेव्हा पृथ्वीवर भगवान विष्णूंनी श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला,
तेव्हा त्यांची सेवा करण्यासाठी आणि दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या अकराव्या रुद्राच्या अंशाने माता अंजनीच्या पोटी हनुमानाच्या रूपात जन्म घेतला. हनुमानाला भगवान शिवाचा प्रत्यक्ष अकरावा रुद्रावतार मानले गेल्यामुळे आणि त्यांच्यात रुद्रासारखीच अथांग शक्ती असल्याने त्यांना ‘महारुद्र’ किंवा ‘रुद्रावतार’ असे म्हटले जाते.
शिवपुराणाव्यतिरिक्त इतरही अनेक ग्रंथांमध्ये हनुमानाच्या या महारुद्र रूपाचा गौरव करण्यात आला आहे. स्कंद पुराणात हनुमानाला अफाट पराक्रमाचे आणि संकटांचे निवारण करणाऱ्या रुद्र शक्तीचे प्रतीक म्हटले आहे. तसेच ‘आनंद रामायण’ आणि ‘भविष्य पुराण’ या ग्रंथांमध्येही हनुमानाच्या दिव्य जन्माचा संबंध शिवाच्या रुद्र तत्त्वाशी जोडलेला आहे. हनुमानाची अफाट शारीरिक शक्ती, उडण्याची क्षमता आणि संकटाच्या वेळी प्रकट होणारे त्यांचे रौद्र रूप या सर्व गोष्टी त्यांच्यातील महारुद्र तत्त्व अधोरेखित करतात.
या मंदिराच्या स्थापनेचा किंवा ते केव्हापासून अस्तित्वात आहे याचा कोणताही अधिकृत इतिहास उपलब्ध नाही. अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी हनुमानाची स्वयंभू मूर्ती आढळली, असे सांगितले जाते.
मूर्ती सापडल्यानंतर येथे सुरुवातीला एक छोटे मंदिर उभारण्यात आले होते. येथील स्वयंभू हनुमान अतिशय जागृत आहे. तो नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. हा लौकिक हळूहळू सर्वदूर पसरत गेल्यामुळे दूरदूरच्या भागांतून भाविक येथे दर्शनासाठी आणि नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी येऊ लागले. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मंदिराला विस्तीर्ण परिसर लाभलेला आहे. प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपातील स्तंभांवर रंगरंगोटी आणि कलाकुसर केलेली दिसते. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडील भिंतीवर हनुमानाची, तर उजवीकडील भिंतीवर प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. गर्भगृहामध्ये हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीवर डोळे आणि पाय कोरलेले आहेत. या मूर्तीचे आणि मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी येथे दर्शनाचे कडक नियम पाळले जातात. भाविकांना गोदावरी नदीच्या पात्रात स्नान केल्यानंतर ओल्या अंगानेच गर्भगृहात जाऊन दर्शन घ्यावे लागते.
या मंदिराच्या गर्भगृहावर एक सुंदर शिखर उभारलेले आहे. या शिखरावर विविध देवकोष्टके कोरलेली आहेत. शिखराच्या सर्वात वरच्या बाजूस आमलक आणि त्यावर सोनेरी कळस विराजमान आहे.
मुख्य हनुमान मंदिराच्या अगदी समोरच विठ्ठल-रखुमाईचे स्वतंत्र मंदिर आहे. या मंदिरालाही मोठा सभामंडप आहे. येथील भिंतींवर अनेक पौराणिक प्रसंगांची तसेच विविध देव-देवतांची चित्रे रेखाटलेली आहेत. गर्भगृहात विठ्ठल आणि रखुमाई यांच्या मूर्ती विराजमान आहेत. या मंदिराच्या वरच्या भागात श्रीविष्णूंची उभी मूर्ती आहे. या विठ्ठल मंदिरावरही मुख्य मंदिराप्रमाणेच शिखर आहे. हनुमान मंदिराच्या परिसरात एक प्राचीन शिवलिंगही स्थापित आहे. याशिवाय येथे एका ठिकाणी शनिदेवाचे स्वतंत्र स्थान आहे. मुख्य मंदिराच्या मागील बाजूस मोठा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात भाविकांसाठी अन्नदान केले जाते. या मंडपाच्या नजीकच असलेल्या स्वयंपाकगृहात देवाचा नैवेद्य आणि अन्नदानाचा महाप्रसाद बनवण्याची व्यवस्था आहे. गोदावरी नदीच्या काठावर जाण्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे घाट बांधण्यात आलेला आहे. नदीच्या पात्रात भाविकांना सुलभतेने जाता यावे यासाठी अलीकडच्या काळात मंदिरापासून थेट नदीपात्रापर्यंत मोठा पूलही बांधण्यात आला आहे.
येथील स्वयंभू हनुमानाच्या दर्शनासाठी परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना यांसह विविध भागांतील अनेक भाविक येतात. हे मंदिर दररोज पहाटे ४ वाजता दर्शनासाठी खुले होते. एकादशीचा अपवाद वगळता वर्षाचे ३६५ दिवस येथे भाविकांना अन्नदान केले जाते. दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत या मंदिरात भाविक विविध प्रकारचे अभिषेक करतात. दुपारच्या वेळी १२.३० वाजण्याच्या सुमारास हनुमानाला रोठाचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास महाप्रसादाच्या वितरणाला सुरुवात होते. येथे दररोज अंदाजे दीड हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. एकादशीच्या दिवशी येथे महाप्रसादाऐवजी सर्व भाविकांना फराळाचे वाटप केले जाते.
या मंदिरात एकादशीचा दिवस वगळता दररोज हनुमानावर विशेष अभिषेक करण्याची परंपरा आहे. येथील हनुमान अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारा आहे. त्यामुळे भाविक विविध संकटांतून मुक्ती मिळवण्यासाठी या हनुमानाला नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता म्हणून हनुमानाच्या मूर्तीवर महाअभिषेक केला जातो. या अभिषेक विधीसाठी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यासाठी येथे सुमारे सहा महिने आधीच आगाऊ नोंदणी करावी लागते. अभिषेकासाठी नोंदणी केलेल्या मुख्य यजमानांना अभिषेकाच्या आदल्या दिवशीच मंदिर परिसरात येथे येऊन मुक्काम करावा लागतो. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गोदावरी नदीच्या पात्रात स्नान केल्यानंतर ओल्या अंगानेच हा विधीपूर्वक अभिषेक करावा लागतो. दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला या संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.