मुंबईच्या दादर या उपनगराच्या पश्चिम भागातील तीन रस्त्यांच्या तिठ्यावर सर्वधर्मसमभाव संस्कृतीची प्रचिती देणारे पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर स्थित आहे. हे मंदिर या परिसरातील कष्टकऱ्यांसह अनेक हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्याच्या विशिष्ट गोलाकार आकारामुळे या मंदिराला ‘गोल देऊळ’ म्हणून ओळखले जाते. येथील हनुमानाचे स्थान प्राचीन मानले जाते. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती जागृत आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेथे मनोभावे पूजा केल्यास इच्छित फळ मिळते, असा भाविकांचा विश्वास आहे.
या मंदिराच्या दादर परिसराला किमान बाराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. पूर्वी सात बेटांनी बनलेल्या मुंबईतील एका बरडबेटावरील जंगलभागात हा छोटा पाडा वसलेला होता. इ.स. ११३८ मध्ये या बेटावर आलेल्या प्रताप बिंब राजाने येथे आपली राजधानी वसवली. त्याने या राजधानीला ‘माहीम’ म्हणजेच ‘महिकावती’ असे नाव दिले. प्रताप बिंब हा मुंबईचा आद्य राजा होय. त्याने येथे अनेक कुळे वसवली. ही सर्व कुळे त्याच्या आधीच्या माहीम-केळवे या राजधानीच्या भागातून आली होती. त्यांनी आपल्या मूळ भागातील ठिकाणांची नावे येथील नवीन वस्त्यांना दिली. मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक नितीन साळुंखे यांच्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकातील निष्कर्षानुसार, केळवे-माहीम-पालघर परिसरात असलेल्या ‘दादरपाडा’ या भागाचे नाव त्या काळी मुंबई-माहीममधील एका पाड्याला देण्यात आले. तोच भाग आज दादर म्हणून ओळखला जातो.
पुढे ब्रिटिश काळात या गावाचा विकास झाला. सन १८५७ च्या बंडाच्या चार वर्षे आधी, १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली.
यानंतर पुढील चार-पाच महिन्यांत म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबर १८५३ या काळात ‘माहीम रोड’ हे रेल्वे स्थानक सुरू करण्यात आले. पुढे १ ऑक्टोबर १८५६ रोजी या स्थानकाचे नामांतर करून त्याला ‘दादर’ असे नाव देण्यात आले. यानंतर सन १८६७ मध्ये आजच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील तत्कालीन ‘बॉम्बे बरोडा अँड सेंट्रल इंडिया’ (बीबीसीआय) रेल्वेचे दादर स्थानक कार्यरत झाले. त्या काळात दादर हे एका छोट्या गावासारखेच होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे सन १९१० मध्ये दादर येथील नव्याने बांधलेल्या ‘मिरांडा चाळीत’ राहण्यासाठी आले. त्यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्रानुसार, सन १९१८ पर्यंत दादरचे मूळ खेड्याचे रूप झपाट्याने बदलत गेले. याच काळात दादरमधील हनुमानाचे हे मंदिर स्थापन झाल्याचे सांगण्यात येते.
या मंदिराच्या आख्यायिकेनुसार, पूर्वी दादरच्या घनदाट वनराईने व्यापलेल्या भागात एका मोठ्या वटवृक्षाखाली हनुमानाची ही मूर्ती स्थापित होती. परिसरातील भाविक या हनुमानाची पूजा करीत असत. कालांतराने काही भाविकांनी येथे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येथे सन १९२० मध्ये एक छोटेखानी मंदिर उभारण्यात आले.
स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या माहितीनुसार, त्या काळी ‘कोदण्डाचा टणत्कार’ या पुस्तकामुळे प्रबोधनकार ठाकरे यांचे सर्वत्र नाव झाले होते. ते या भागात सामाजिक कार्य करीत असत आणि त्यांच्या हस्ते या मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कालांतराने झालेल्या जीर्णोद्धारामुळे या मंदिराला सध्याचे सुंदर रूप प्राप्त झाले आहे.
दादरमzधील कबुतरखान्याजवळ, वर्दळीच्या तीन रस्त्यांच्या संगमावर, मधोमध हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर काहीसे गोलाकार असल्यामुळे त्याला ‘गोल देऊळ’ असेही म्हटले जाते. सध्या या ठिकाणी वटवृक्ष नसला, तरी त्या पुरातन वटवृक्षाची स्मृती मंदिराच्या नावात कायम आहे. मंदिराची वास्तुरचना अनोखी आहे. येथील सभामंडपाच्या भिंतींवर त्रिकोणी कमानींमध्ये विशिष्ट प्रकारची जाळीदार रचना करण्यात आली आहे. सभामंडपाला एक मुख्य आणि दोन उप अशी एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वार रुंदीने मोठे आहे. त्याच्यावर नगारखान्यासारखी बंद रचना असून छतावर पिरॅमिडच्या आकाराचा कळस आहे. गर्भगृहावरही पिरॅमिडच्या आकाराचे रुंदसर पायऱ्यांचे शिखर आहे.
त्यावर चक्राकार कळस आणि चारस्तरीय कळस स्थापित आहे.
आत एका उंच अधिष्ठानावर तीन महिरपी कमानी असलेले सोनेरी मखर आहे. त्यात मध्यभागी हनुमानाची मूर्ती विराजमान आहे. पाषाणशिळेवर कोरलेल्या या हनुमानमूर्तीवर चांदीचे आवरण आहे. येथे हनुमान उड्डाणाच्या पवित्र्यात दिसतात.
त्यांनी आपल्या एका हातामध्ये गदा धरलेली आहे. या मूर्तीच्या पाठीमागे सुमारे १५ किलो वजनाची चांदीची गदा आहे आणि मूर्तीच्या मागे श्रीराम, लक्ष्मण व जानकीची मोठी प्रतिमा आहे. हनुमानाच्या मूर्तीच्या उजवीकडे त्रिमुखी दत्ताची संगमरवरी मूर्ती आहे, तर डावीकडे गणपती, पार्वती आणि शंकराची चांदीची पिंड स्थापित आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिरात शनीच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली.
या मंदिराच्या मागच्या बाजूला बाह्यभिंतीवरील एका मोठ्या देवळीत ख्रिश्चन धर्मीयांचा क्रूस (क्रॉस) आहे, हे या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. त्या क्रूसावर येशू ख्रिस्ताची मूर्ती स्थापित आहे. यासोबतच मंदिराच्या मागच्या बाजूस काही अंतरावर जैन धर्मीयांचे देरासर आहे आणि समोरच रस्त्याच्या पलीकडे मुस्लिमांचा मोठा दर्गा आहे. या सर्व धार्मिक स्थळांमुळे हा परिसर सर्व धर्मपंथीयांना सामावून घेणाऱ्या मुंबईचे एक प्रतीक मानला जातो.
पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिरात रोज सकाळ-सायंकाळी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भक्त मंडळी येत असतात.
हे मंदिर मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे येथून ये-जा करणारे लोक नेहमी हनुमानासमोर नतमस्तक होतात.q43दर शुक्रवार आणि शनिवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. शनिवारी येथे शनी आणि मारुतीला तेल अर्पण केले जाते.
या मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जातो. जयंतीच्या आदल्या दिवसापासूनच येथे सोहळ्यास प्रारंभ होतो. आदल्या दिवशी सायंकाळी संत तुलसीदास यांनी १६ व्या शतकात रचलेल्या ‘हनुमान चालीसा’ चे पठण करून हनुमान जयंती उत्सवास सुरुवात केली जाते. जयंतीच्या दिवशी सकाळी ६.२९ वाजता हनुमानाचा जन्मोत्सव साजरा होतो.
या दोन्ही दिवसांत मंदिरात भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या काळात परिसरातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात शनीजयंतीही उत्साहाने साजरी केली जाते. त्या दिवशी येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले असते.