“अशक्य ही शक्य करतील स्वामी” अशी असंख्य भाविकांची श्रद्धा असलेले अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे तिसरे अवतार मानले जातात. एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले स्वामी समर्थ हे आजही भक्तांच्या पाठीशी उभे राहतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आज महाराष्ट्रात गावोगावी स्वामी समर्थ यांचे मठ आहेत. त्यातील दादर येथील मठास सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी या मठाची स्थापना केली होती. मुंबई आणि परिसरातील असंख्य स्वामी समर्थ भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मठात स्वामी समर्थांच्या पादुका विराजमान आहेत.
श्री स्वामी समर्थ हे दत्तसंप्रदायी अवतारी पुरुष असून पुराणे व उपनिषदांनी वर्णिलेली वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा राखणारा, गुरुतत्त्वाचा आदर्श आणि योगाचा उपदेशक असे मानण्यात येणाऱ्या दत्तात्रेयाची उपासना देशभरात फार प्राचीन काळापासून होत आहे. पंधराव्या शतकात नृसिंह सरस्वती या विभूतीमुळे दत्तसंप्रदायाला संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयाचे पहिले अवतार मानले जातात. नृसिंह सरस्वती हे दुसरे अवतार, तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्ताचे तिसरे अवतार मानले जातात. स्वामी समर्थ यांचे पूर्वचरित्र अज्ञात आहे. ‘श्री स्वामी चरित्र सारामृता’त अशी आख्यायिका आहे की दत्ताचे पहिले अवतार नृसिंह सरस्वती हे अवतार समाप्तीवेळी, इ.स. १४५८ मध्ये आंध्र प्रदेशातील श्रीशैल कर्दलीबनात गेले. तेथे त्यांनी ३५० वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून या वारुळावर पडली. त्या वारुळातून स्वामी समर्थ प्रकट झाले.
श्रीशैल कर्दलीबनातून ते कलकत्ता, जगन्नाथपुरी, काशी अशा मार्गाने गोदावरीतीरी आले व इ.स. १८३८ मध्ये मंगळवेढ्यास ते प्रकट झाले. ‘स्वामी लीलामृत’ या ग्रंथात असे म्हटले आहे की, “शके सतराशे साठात। स्वामी जगदुद्धारार्थ। प्रकटले मंगळवेढ्यात। साक्षात दत्त अवतारे॥” यानंतर शके १७७९ (इ.स. १८५७) मधील आश्विन शुद्ध पंचमीस ते अक्कलकोटात अवतीर्ण झाले. स्वामी समर्थ यांच्या पूर्वजीवनाविषयी माहिती अनुपलब्ध आहे. मात्र “आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाव नृसिंहभान, काश्यप गोत्र, आमची मीन राशी…” असे एकदा त्यांनी सांगितले होते. त्यांनी आपल्या जीवनकाळात अनेकांवर कृपा केली. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या आश्वासनातून त्यांनी अनेकांना धैर्य दिले. “माझी अनन्यभावाने भक्ती करणाऱ्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो” असे त्यांचे वचन होते. स्वामी समर्थांनी कर्मकांड, सोवळे-ओवळे आदी अवडंबर टाळून सामान्यांना नामस्मरणाचा महिमा सांगितला. अक्कलकोटमध्ये त्यांचे सुमारे २० वर्षे वास्तव्य होते. त्यांच्या चमत्काराच्या, प्रचितीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. सन १८७८ मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला त्यांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली.
दादरच्या स्वामी समर्थ मठाचा इतिहास असा आहे की सद्गुरू बाळकृष्ण महाराजांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६६ रोजी सुरत येथे एका गुजराती कुटुंबात झाला आणि त्यांनी २९ मे १९१० रोजी या मठाची स्थापना केली. पुढे ते शिक्षणासाठी म्हणून मुंबईत आपले चुलते शिवशंकर यांच्याकडे आले. देशभरात त्या काळी धर्मसुधारणेची चळवळ जोरात होती. यातून प्रार्थना समाज, आर्य समाज, स्वामी नारायण संप्रदाय यांसारखे पंथ निर्माण झाले होते. मुंबईत आल्यानंतर बाळकृष्ण महाराज हे आर्य समाजाकडे वळले. या पंथाची स्थापना मूळची मुंबईची होती. स्वामी दयानंद (मूळ नाव मूलशंकर अंबाशंकर, जन्म – १८२४, टंकारा, काठेवाड) यांनी १० एप्रिल १८७५ रोजी या अर्वाचीन धर्मपंथाची स्थापना केली. मराठी विश्वकोशातील या पंथाविषयीच्या नोंदीनुसार, “भारताला पुन्हा वैदिक मार्गावर नेणे व सर्व जगाला वैदिक धर्म शिकविणे ही आर्यसमाजाने आपली परमश्रेष्ठ कर्तव्ये ठरविली व वेदांच्या उद्धाराचे व प्रचाराचे कार्य हिरिरीने चालू केले. मूळ वेदांत मूर्तिपूजा, अवतारवाद, तीर्थे, व्रते, पौराणिक अनुष्ठाने इत्यादींचा पुरस्कार नाही. त्यामुळे आर्यसमाजी प्रवर्तकांनी या सर्व गोष्टी त्याज्य ठरविल्या. श्राद्धे बंद केली व पुरोहितांनाही रजा दिली. राम-कृष्ण हे ईश्वरी अवतार नसून श्रेष्ठ मानव होते, असे ते लोकांना समजावून सांगू लागले.” चातुर्वर्ण्य मानणाऱ्या या संप्रदायाने जातीभेद व अस्पृश्यता मात्र त्याज्य ठरवली, तसेच सर्वांना वेदाध्ययनाचा अधिकार दिला.
बाळकृष्ण महाराजांचे चुलते शिवशंकर हे शैवपंथीय होते. महाराजांनी आर्य समाजासारख्या पंथाकडे वळावे हे त्यांना रुचले नाही.
त्यांच्या शेजारी स्वामी समर्थांचे भक्त रामचंद्र व्यंकटेश बरडकर उर्फ तात महाराज राहात असत. शिवशंकर यांनी बाळकृष्ण महाराजांना या तात महाराजांकडे नेले. त्यांनी बाळकृष्ण महाराजांना भुलेश्वरच्या अष्टभुजा देवीच्या देवळात नेले व तेथे त्यांना देवीचे दर्शन घडवले. यानंतर बाळकृष्ण महाराजांनी तात महाराजांना गुरूस्थानी मानले व ते स्वामी समर्थांचे भक्त बनले. प्रारंभीच्या काळात ते मुंबईतील गोकुळदास संस्कृत पाठशाळेत संस्कृतचे अध्यापक म्हणून काम करीत असत. त्याचप्रमाणे इंग्रजी व संस्कृतचे शिकवणी वर्ग चालवत. तेव्हा ते जांभुळवाडीत राहात असत. त्यांनी शेजारच्या एका कुटुंबातील व्यक्तीची भूतबाधा दूर केल्याची आख्यायिका सांगण्यात येते. या घटनेमुळे ते दैवी सामर्थ्य असलेले सत्पुरुष असल्याची ख्याती पसरली.
जांभुळवाडीतून ते मालाड येथे त्यांच्या मित्र द्वारकादास यांच्याकडे वास्तव्यास गेले. यानंतर काही काळ त्यांनी मालाडच्या मामलेदार वाडीतील एका घरात वास्तव्य केले. या काळात त्यांच्याकडे दूरदूरहून अनेक लोक आपल्या समस्या घेऊन येत. तेथे दर गुरुवारी व शनिवारी भजनाचे कार्यक्रम होत. रात्री उशीर झाल्यानंतर या भजनकऱ्यांना मालाडहून घरी परतणे गैरसोयीचे होई.
यातून भजनाच्या कार्यक्रमांसाठी मध्यवर्ती ठिकाणी व्यवस्था करावी असा विचार पुढे आला. त्यांच्या भक्तजनांत ब्रिटिश सरकारच्या जिल्हाधिकारी कचेरीत मुख्य कारकून असलेले भाऊसाहेब देशमुख हे गृहस्थ होते. त्यांनी दादर येथील एक बंगला पसंत केला. तो बंगला एका मुस्लिम व्यक्तीचा होता आणि तेथे भुताटकी असल्याचे म्हटले जात असे. परंतु बाळकृष्ण महाराजांनी, “आपण तेथे समर्थांची स्थापना करून सर्व भुतांना मुक्ती देऊ” असे सांगून तो बंगला ताब्यात घेण्यास सांगितले. या बंगल्याच्या जागीच आज मठ उभा आहे. दोन वर्षांनी या बंगल्याची दुरुस्ती करण्यात आली. त्या काळात मठ माटुंग्याला अन्य एका जागेत हलवण्यात आला होता. मात्र दुरुस्तीनंतर ३० ऑगस्ट १९१३ पासून आजतागायत या जागेवर स्वामी समर्थांचा मठ उभा आहे. या मठाप्रमाणेच सन १९११ मध्ये महाराजांनी सुरतच्या बेगमपुरा भागातही एका मठाची स्थापना केली. वैशाख वद्य एकादशी, शके १८४०, बुधवार, ५ जून १९१८ रोजी सूर्योदयाच्या समयी सुरत येथे महाराजांचे देहावसान झाले. त्यांची समाधी सुरत येथील स्वामींच्या मठाजवळ आहे.
दादर येथील ‘शिवसेना भवन’च्या परिसरात एका मोठ्या गल्लीमध्ये हा मठ वसलेला आहे.
मठाच्या बाहेर पूजासाहित्याची, तसेच स्वामी समर्थांच्या तसबिरी, मूर्तींची दुकाने आहेत. उंच कमानदार प्रवेशद्वारातून या मठाच प्रवेश होतो. भव्य सभामंडप आणि गर्भगृह असे या मठाचे स्वरूप आहे. संगमरवरी फरसबंदी असलेल्या या सभामंडपात रुंद चौरसाकार स्तंभ आहेत. कोरीव नक्षीकाम केलेल्या लाकडाचा मंदिरात मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. सभामंडपास काष्ठकारगिरीने व काचेच्या हंड्यांनी सुशोभित केलेले वितान आहे. सभामंडपातील भिंतीवर सुंदर काष्ठचौकटींमध्ये स्वामी समर्थ, बाळकृष्ण महाराज व कमलामाता आदींच्या मोठ्या प्रतिमा आहेत. रामकृष्ण परमहंस, समर्थ रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज, शंकर महाराज यांच्यासारखे महापुरुष, गणेश, दत्तात्रेय, सरस्वती आदी देवता, तसेच स्वामी समर्थ संप्रदायातील सत्पुरुषांच्या प्रतिमाही येथील भिंतींवर आहेत. सभामंडपात, गर्भगृहासमोर एक झोपाळा टांगलेला आहे. त्यावर स्वामींच्या प्रतिमा तसेच पादुका विराजमान आहेत. लाकडी पॅनेलने सजवलेल्या गर्भगृहात स्वामी समर्थांची भव्य प्रतिमा लावलेली आहे. येथील सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालून, त्यावर संगमरवरी लादी बसवून, बाळकृष्ण महाराजांनी समर्थांच्या प्रतिमेची स्थापना केली होती. या मठाचे भाविकांच्या दृष्टीने खास महत्त्व म्हणजे येथे स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. स्वामी समर्थांनी दिलेल्या दृष्टान्तानुसार बाळकृष्ण महाराजांनी स्वतः अक्कलकोट येथे जाऊन या पादुका आणल्या होत्या. या पादुका मठाच्या आतील एका खोलीमधील देवघरात ठेवलेल्या आहेत. तर मूळ गर्भगृहात चांदीच्या पादुका दर्शनार्थ ठेवलेल्या आहेत. गर्भगृहावर उंच शिखर आहे.
दादर मठ म्हणून सुविख्यात असलेल्या या मठात रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी रोज रात्री ७.३० वाजता व गुरुवारी व शनिवारी रात्री ७ वाजता आरती होते
. येथे वर्षभरात अनेक उत्सव होतात. त्यामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन, पुण्यतिथी, गुरुप्रतिपदा, कोजागरी पौर्णिमा, श्रीपाद वल्लभ पुण्यतिथी, दत्तजयंती, नृसिंह सरस्वती जयंती, महाशिवरात्र या उत्सवांचा समावेश आहे. स्वामी समर्थांच्या प्रकटदिन उत्सवाच्या वेळी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दर गुरुवारीही हजारोंच्या संख्येने भाविक येथे येतात. या उत्सवांच्या वेळी येथे सकाळी ६.३० ते ११.३० पर्यंत लघुरुद्र असतो. त्यानंतर आरती केली जाते. या मठाचा मुख्य वार शनिवार हा आहे. या दिवशी येथे भजनाचा मोठा सोहळा होतो. परंपरेनुसार लांबून येणार्या भक्तांसाठी गुरुवार आणि शनिवारी रात्री १० ते ११.३० वाजेपर्यंत आरती होत असे. त्यानंतर अर्धा-एक तास भक्तजनांचे बाळकृष्ण महाराजांना हार घालण्याचा कार्यक्रम चाले. त्यानंतर महाराज एकनाथी भागवतावर रात्री २ वाजेपर्यंत प्रवचन करीत. महाराजांची मातृभाषा गुजराती होती, तरीही हे प्रवचन मराठीत चाले हे विशेष वैशिष्ट्य होय. येथील गर्भगृहात कोणीही टोपी, पगडी किंवा रुमाल घालून जायचे नाही, असा त्यांचा आदेश आहे. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे या मठात स्पृश्य-अस्पृश्य, हिंदू-अहिंदू असा भेदभाव पाळला जात नाही.
या मंदिरात पूर्वी भक्तांना अभिषेकानंतर नारळ दिला जात असे. आता नारळाचा प्रसाद देण्याऐवजी येथे नारळपाक प्रसाद म्हणून दिला जातो. बाळकृष्ण महाराजांना चहा प्रिय होता. त्यामुळे येथे शनिवारी होणाऱ्या भजनाच्या मध्यंतरादरम्यान आजही भाविकांना चहा दिला जातो. तसेच मठात होणाऱ्या पारायणाच्या वेळी येथे ३०० ते ४०० लिटर दुधाचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. या मठामध्ये व्हिडीओ चित्रिकरण व फोटोग्राफीस मनाई आहे.