उद्यान गणेश मंदिर

शिवाजी पार्क, दादर, मुंबई

आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय आणि क्रीडा इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या शिवाजी पार्कमध्ये (छत्रपती शिवाजी महाराज मैदान) गणेशाचे हे मंदिर वसले आहे. हे मंदिर मैदानामध्ये म्हणजेच उद्यानात असल्यामुळे या मंदिराला उद्यान गणेश या नावाने ओळखले जाते. शिवाजी पार्क परिसरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात हजारो भक्तगण सहभागी होतात आणि नव्या वाहनांची पूजा करण्यासाठी येथे दररोज अनेक भाविक येतात, हे या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

दादरमधील शिवाजी पार्क या मैदानास मोठा इतिहास आहे. मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब हा प्रथम इ.स. ११३८ मध्ये ‘बरडबेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावर आला. यापूर्वी त्याची राजधानी माहीम-केळवे येथे होती. त्याने आपल्या पूर्व राजधानीचे नाव येथील नवीन राजधानीला दिले. हेच आजचे माहीम होय. हे ठिकाण पूर्वी महिकावती या नावाने ओळखले जाई. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संपादित केलेल्या ‘महिकावतीच्या बखरी’नुसार, प्रताप बिंब याने माहीम हस्तगत केल्यानंतर येथे देशवसाहत स्थापन केली. या देशवसाहतीसाठी प्रताप बिंब याने माहीम-केळवे या आपल्या पूर्व राजधानीच्या भागातून आणलेल्या कुळांनी येथील गाव-पाड्यांना आपल्या मूळ गाव-पाड्यांची नावे दिली. मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक नितीन साळुंखे यांच्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकातील निष्कर्षानुसार, केळवे-माहीम-पालघर परिसरात असलेल्या दादरपाडा या भागाचे नाव त्या काळी मुंबई-माहीममधील एका पाड्यास देण्यात आले. तोच भाग आज दादर या नावाने ओळखला जातो.

ब्रिटिश काळामध्ये, १८ सप्टेंबर १८९६ रोजी मुंबईत ग्रंथिक सन्निपाताचा (प्लेग) पहिला रुग्ण आढळला. बॉंबे प्लेग कमिटीच्या १८९८ साली प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, पहिल्या सहा महिन्यांत प्लेगच्या साथीने मुंबईत २९,०१२ लोकांचा बळी घेतला. या साथीविरोधात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात लंडनमध्ये ब्रिटिश संसदेत विचारविनिमय झाला. १४ फेब्रुवारी १८९८ रोजी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी ‘सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेन्ट बिल’ सादर केले. ब्रिटिश संसदेने हे बिल मंजूर केल्यानंतर ९ नोव्हेंबर १८९८ रोजी ‘बॉम्बे सिटी इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्ट’ची (बीसीआयटी किंवा बीआयटी) स्थापना करण्यात आली. या ट्रस्टअंतर्गत ब्रिटिश सरकारने मुंबईची स्वच्छता सुरू केली. त्यांनी गलिच्छ वस्त्या हटवल्या आणि सुनियोजित शहराची उभारणी सुरू केली. दादरमधील हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी, फाईव्ह गार्डन हा परिसर त्याच वेळी आकारास आला. याच योजनेतून दादरमधील आजचे शिवाजी पार्क मैदान निर्माण झाले. या मैदानाची संकल्पना तत्कालीन अभियंते द्वारकानाथ वैद्य यांची होती, असे प्रबोधनकार ठाकरे यांनी नमूद केले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्रामध्ये ‘कै. द्वारकानाथ राजाराम ऊर्फ बाळासाहेब वैद्य, आर्किटेक्ट इंजिनिअर’ यांचा उल्लेख ‘दादरच्या शिवाजी पार्कचे आद्य कल्पक’ असा करण्यात आला आहे. या मैदानास त्या काळी ‘माहीम पार्क’ असे म्हटले जात असे.

पुढे प्रबोधनकार ठाकरे यांनी या मैदानाचे नाव ‘शिवाजी पार्क’ ठेवावे, अशी सूचना केली. स्वातंत्र्यसैनिक अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधींचे मराठीतील पहिले चरित्र लिहिले होते. त्या त्यावेळच्या मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांनी या मैदानाच्या नामांतराचा ठराव महापालिकेत मांडला. १० मे १९२७ रोजी हा ठराव मंजूर झाल्यामुळे ‘माहीम पार्क’चे नाव ‘शिवाजी पार्क’ झाले. या ऐतिहासिक घटनेला सन २०२७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात या मैदानात मोठ्या सभा होत असत. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या ‘जय महाराष्ट्र’ या पुस्तकानुसार, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी सर्वप्रथम या मैदानास ‘शिवतीर्थ’ असे नाव दिले. पुढे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर सन १९६६ मध्ये येथे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याच पुतळ्यानजीक उद्यान गणेश मंदिर वसलेले आहे.

या मंदिराच्या इतिहासानुसार, पूर्वी येथील एका मोठ्या वटवृक्षाखाली गणेशाची मूर्ती विराजमान होती. या मूर्तीच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक येत असत. त्यानंतर काही गणेशभक्तांनी येथे मोठे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लोकवर्गणी काढण्यात आली. महाराष्ट्राचे प्रेरक दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या स्थापनेनंतर चारच वर्षांत येथे गणेशाचे मंदिर उभे राहिले. माघ शुद्ध चतुर्थी, शके १८९१ म्हणजेच ९ फेब्रुवारी १९७० रोजी या मंदिरात श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिराला सध्याचे भव्य रूप प्राप्त झाले आहे.

हे मंदिर पूर्णपणे संगमरवरी पाषाणात बांधलेले आहे. मंदिराभोवतीच्या प्रांगणात फरसबंदी केली आहे. या प्रांगणात चारही दिशांना विद्युत दिव्यांचे कोरीव नक्षीकाम असलेले स्तंभ आहेत. मंदिराच्या उजवीकडे छोटेखानी उद्यान असून तेथे भाविकांसाठी विसाव्याची व्यवस्था आहे. तसेच या भागात एक मोठी दगडी दीपमाळही उभारण्यात आली आहे. या मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपाच्या बाह्यभिंतींवरील स्तंभांवर कोरीव नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या भिंतींमध्ये मोठी जालवातायने आहेत. छतावर पिरॅमिडच्या आकाराची दोन बसकी शिखरे असून त्यावर आमलक आणि कळस स्थापित आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर उरुशृंग प्रकारचे उंच शिखर आहे. त्यावर चक्राकार आमलक व सोनेरी कळस आहे.

उंच जगतीवर बांधलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या बाजूला संगमरवरी ओट्यावर दोन गजशिल्पे आहेत. या सभामंडपाला तीन प्रवेशद्वारे असून त्यात प्रवेश करताच समोर एका छोट्या स्तंभावर विराजमान असलेल्या चांदीच्या मूषकराजाचे दर्शन होते. त्याच्या पुढे एका उंच संगमरवरी अधिष्ठानावरील मूषकासनावर गणरायाची चांदीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. हे आसन सोनेरी नक्षीदार पत्र्याने मढवलेले आहे. पुष्पमालांनी शृंगारलेल्या या मूर्तीच्या मस्तकावर सोनेरी मुकूट आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना वस्त्र आणि अलंकारांनी भूषित केलेल्या रिद्धी-सिद्धीच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या मुख्य वेदीवर डाव्या बाजूस लक्ष्मी-नारायणाची संगमरवरी मूर्ती आहे, तर उजव्या बाजूला छोटे शिवलिंग आणि चांदीचा नंदी स्थापित आहे. मंदिराच्या बाजूच्या आणि मागच्या बाह्यभिंतींवरील देवकोष्ठकांमध्ये गणरायाची नृत्य व वादक मुद्रांमधील विविध शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांच्या बाजूलाच सूरसुंदरींची शिल्पेही कोरलेली आहेत.

या मंदिरात सकाळी ६.३० ते दुपारी २ आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ११ या वेळेत गणेशाचे दर्शन घेता येते. मंदिरात सकाळी ६.३० वाजता षोडशोपचार पूजा होते. सकाळी ७.२० वाजता मंगल आरती होते. त्यानंतर सकाळी ८ वाजता अभिषेक सुरू होतो. येथे रोज सकाळी ९.३० व सायंकाळी ५.३० वाजता सत्यनारायण आणि सत्यविनायक पूजा होते. रात्री ७.३० वाजता श्रींची षोडशोपचार पूजा होते. रात्री ८ वाजता सायंआरती होते. मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात येथे विविध धार्मिक तसेच संगीत, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माघ शुद्ध चतुर्थी हा मंदिराचा स्थापनादिन असून या निमित्ताने येथे विशेष धार्मिक पूजा विधी केले जातात. पाच दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाच्या अंतिम दिवशी येथे श्रींची भव्य मिरवणूक काढली जाते. वैशाख शुक्ल चतुर्थी ते वैशाख शुक्ल अष्टमी या काळात येथे वसंतोत्सव साजरा केला जातो. या काळात येथे पारायण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे येथे विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा उपक्रम आयोजित केले जातात. अनेक लोक नवीन वाहनांची खरेदी केल्यानंतर ती पूजेसाठी या मंदिरात आणतात. त्यामुळे मंदिर कार्यालयात पूजासामग्रीबरोबरच वाहनांमध्ये लावण्यात येणाऱ्या देवमूर्ती, हार, स्टीकर्सचीही विक्री केली जाते.

उपयुक्त माहिती

  • दादर रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२-२४४६६६३४

उद्यान गणेश मंदिर

शिवाजी पार्क, दादर, मुंबई

Back To Home