जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये सूर्य या ताऱ्याला देवता मानून त्याची पूजा केली जाते. येथे सवितृ, विवस्वत, आणि पूषन अशा विविध नावांनी सूर्यपूजा केली जाते. ऋग्वेदातील प्रसिद्ध ‘गायत्रीमंत्र’ हा ‘सावित्री’ या देवतेला म्हणजेच सूर्याला समर्पित आहे. प्राचीन काळापासून भारतात सूर्याची अनेक मंदिरे बांधली गेली आहेत. त्यांच्यामध्ये ओडिशातील ‘कोणार्क’, तसेच गुजरातमधील ‘मोढेरा’ येथील सूर्यमंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील कशेळी येथेही सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे सूर्यमंदिर आहे. तसेच एक ऐतिहासिक काळातील सूर्यमंदिर मुंबईतील भुलेश्वर येथे स्थित आहे. प्रेक्षणीय मंदिरवास्तू आणि वर्षाचे ३६५ दिवस होणारे हवन हे या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
पौराणिक परंपरेनुसार, शाकद्वीप म्हणजे सध्याच्या इराणमधून आलेल्या ‘मग’ ब्राह्मणांनी येथे सूर्यपूजा आणली. ‘सांबपुराणातील’ कथेनुसार, श्रीकृष्णाचा ज्येष्ठ पुत्र सांब हा अत्यंत बलवान होता. एकदा कृष्णाला भेटण्यासाठी दुर्वास ऋषी आले तेव्हा त्यांची दुर्बल शरीरयष्टी पाहून सांब त्यांना हसला. त्यामुळे क्रोधित झालेल्या दुर्वासांनी त्याला शाप दिला आणि त्यामुळे सांबाला कुष्ठरोग झाला. तेव्हा देवर्षी नारदांनी सांबाला शापमुक्त होण्यासाठी सूर्यपूजा करण्याचा सल्ला दिला. त्या पूजेचे पौरोहित्य स्वीकारण्यास येथील एकही ब्राह्मण तयार नव्हता. त्यामुळे सांबाने शाकद्वीपातून सूर्यपूजक ‘मग’ ब्राह्मणांना येथे आणले. ‘भविष्यपुराणा’च्या १४० व्या अध्यायात असे म्हटले आहे की सूर्यप्रतिष्ठानार्थ श्रीकृष्णपुत्र सांब याने शाकद्वीपातील मगांची १८ कुळे सांबपुरात आणली.
भारतील सूर्यमंदिराचा सर्वांत पहिला अभिलेखीय संदर्भ मध्य प्रदेशातून आलेला आहे. मंदसौर येथे सूर्यमंदिर बांधण्यात आले असल्याचा उल्लेख पाचव्या शतकातील एका गुप्तकालीन शिलालेखात आढळतो.
त्याचप्रमाणे चीनमधून बाहेर पडलेल्या हूण वंशाचा राजा मिहिरकुल याने ग्वाल्हेरजवळ सूर्यमंदिर बांधल्याचा उल्लेख एका दानपत्रात आहे. त्याचप्रमाणे टीकमगड येथेही नवव्या शतकातील सूर्यमंदिर आहे. गुर्जर-प्रतिहारांनी सध्याच्या मध्य प्रदेशातील भाग ताब्यात घेतल्यानंतर येथे सूर्यपूजेस प्रोत्साहन मिळाले. गुर्जर-प्रतिहार राजे हे सूर्यभक्त होते. या वंशातील सुप्रसिद्ध राजा ‘भोज’ हा होता. तो जरी देवीभक्त होता, तरी त्याने ‘मिहिर’ ही उपाधी धारण केली होती. यावरून सूर्य ही त्याचीही आराध्य देवता होती, असे स्पष्ट होते. इ.स. ५०५ मध्ये अवंती देशातील उज्जयनी शहरात राहणारा ‘बृहत्संहिते’चा कर्ता वराहमिहिर हा सूर्योपासक होता आणि त्याच्या पित्याचे नाव आदित्यदास होते, असा उल्लेख इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी त्यांच्या ‘मग ब्राह्मण कोण?’ या निबंधात केलेला आहे. यावरून भारतात प्राचीन काळापासून सूर्योपासना रूढ असल्याचे स्पष्ट होते.
ऋग्वेदात सूर्याविषयीची काही सूक्ते आहेत. त्यातील प्रस्कण्व कण्व ऋषींनी रचलेल्या सूक्तातील एका ऋचेमध्ये सूर्याला उद्देशून असे म्हटले आहे की “आपण सर्व रोगांचा नाश करण्यासाठी आपल्या पूर्ण तेजाने उगवले आहात.
आम्ही कधीही रोगवश होऊ नये.” (उदगादयमादित्यो विश्वेन सहसा सह । द्विषन्तं मह्यं रन्धयन्मो अहं द्विषते रधम् ॥ – ऋग्वेद १.५०.१३) यावरून सूर्य ही रोगविनाशक देवता असल्याचे प्राचीन काळापासून मानले जाते. तो विशेषतः त्वचारोग दूर करणारा मानला जातो. या सूर्यनारायणाला समर्पित असलेले मुंबईतील एकमेव मोठे मंदिर भुलेश्वर येथे आहे आणि या मंदिराची आख्यायिका सूर्याच्या रोगहारक सामर्थ्याशी निगडित आहे.
मुलुंड येथील व्ही. जी. वझे महाविद्यालयातील इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापक जाई भट यांच्या ‘ए कल्चरल अँड हिस्टॉरिकल केस स्टडी : द ओल्डेस्ट सन टेम्पल इन मुंबई’ (‘शोधकोश’, जुलै २०२४) या प्रबंधानुसार, या मंदिराची स्थापना येथील एक दानशूर व्यापारी हरिजीवन वासनजी मणियार यांनी केली. त्यांना एका त्वचारोगाने ग्रासले होते. या आजारात त्वचेच्या रंगद्रव्यांसाठी कारणीभूत असलेल्या आणि सूर्यकिरणांपासून संरक्षण देणाऱ्या ‘मेलेनोसाइट्स’ नावाच्या पेशी नष्ट होऊन तेथे पांढरे डाग पडू लागतात. याला ‘श्वेतकुष्ठ’ म्हणजेच व्हिटिलिगो किंवा कोड असे म्हणतात.
‘मग’ ब्राह्मणांनी मूळ पर्शियामधून सूर्यपूजा आणली आणि त्या पर्शियनांमध्ये अशी समजूत होती की कुष्ठरोग ही सूर्यदेवतेने तिच्या विरोधात केलेल्या पापाबद्दल माणसाला दिलेली शिक्षा आहे. ही बाब प्राचीन ग्रीक इतिहासकार हेरॉडोटस याने नमूद केली आहे. हा त्वचारोग दूर करण्यासाठी सूर्योपासना करून सूर्यदेवाचे मंदिर बांधावे, असा सल्ला हरिजीवन मणियार यांना त्यांच्या आध्यात्मिक गुरूने दिला. त्यानुसार त्यांनी येथे मंदिर उभारणीचे काम सुरू केले, मात्र ते काम सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सन १८९९ मध्ये त्यांच्या पत्नीने ते पूर्णत्वास नेले.
भुलेश्वरच्या तिसऱ्या पांजरपोळ लेनमध्ये, सी. पी. टँकजवळ ‘सूरजवाडी’ नावाच्या एका भव्य राजेशाही हवेलीमध्ये हे मंदिर वसले आहे. ग्रीक पुनरुज्जीवन शैलीतील उंच स्तंभ आणि मुस्लिम स्थापत्यशैलीतील भव्य कमानी हे या हवेलीच्या दर्शनी भागाचे वैशिष्ट्य आहे. हवेलीच्या कमानदार महाद्वाराच्या वरच्या भागात, छतावर गुर्जर राजस्थानी शैलीतील दोन देवळ्या आहेत. तेथे मध्यभागी एका सूर्योपासकाचे शिल्प आहे आणि त्याच्या बाजूला दोन सिंहमूर्ती विराजमान आहेत. येथून मंदिराच्या संगमरवरी फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या भोवती चारही बाजूंनी या हवेलीच्या इमारती आहेत. या इमारतींना असलेल्या प्रशस्त ओवऱ्यांच्या कमानींच्या स्तंभांवर विभिन्न मुद्रांमधील ऋषीशिल्पे विराजमान आहेत. हवेलीच्या मधल्या चौकात उंच जगतीवर मंदिरवास्तू उभी आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सहा पायऱ्या चढून या सभामंडपात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या बाजूस असलेल्या ओट्यावर सोनेरी रंगात रंगवलेल्या दोन मोठ्या सिंहमूर्ती आहेत. मंदिराचा सभामंडप खुल्या पद्धतीचा आहे. उंच स्तंभ आणि महिरपी कमानी असलेल्या सभामंडपाच्या छतावरील कठड्यांवरही विविध मुद्रांमधील ऋषीमूर्ती आहेत.
मंदिराच्या गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर डावीकडील देवकोष्ठकात गणेशाची, तर उजवीकडील देवकोष्ठकात हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार चालुक्यकालीन मंदिरस्थापत्याची आठवण करून देणारे आहे. प्रवेशद्वारास त्रिशाखीय द्वारचौकट आहे. कोरीव नक्षीकाम केलेल्या या द्वारशाखांवर खालच्या भागात वैष्णव द्वारपाल आणि द्वारसेविकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंडारकास अर्धचंद्रशीला आहे आणि त्या अर्धचंद्रशिलेच्या दोन्ही बाजूंना कीर्तिमुखे आहेत. चौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती विराजमान आहे. द्वारचौकटीच्या वरच्या उतरांग भागामध्येही गणेशाचे मोठे शिल्प आहे. त्यात मध्यभागी गणेश आणि त्याच्या दोन्ही बाजूंस रिद्धी-सिद्धी, तसेच गजारूढ आणि पदाती सेवकांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना भिंतीवर खालच्या बाजूला गुर्जर शैलीतील दंडधारी द्वारपालांच्या मूर्ती आहेत आणि त्यावर मत्स्यमुखावर विराजमान सेविकांची शिल्पे आहेत. गर्भगृहात वेदीवर सूर्यनारायणाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे.
येतील शुभ्र संगमरवरात घडवलेली सूर्यमूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्राचीन मूर्तीशास्त्रामध्ये सूर्यप्रतिमांची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत.
‘बृहत्संहिते’नुसार सूर्याला उदीच्यवेशामध्ये दाखवावे, असे सांगितले आहे. उदीच्यवेश म्हणजे उत्तर भारताच्याही उत्तरेकडील वेशभूषा होय. पर्शियन किंवा इराणी प्रभावामुळे या वेशभूषेत सूर्य कोटासारखे वस्त्र धारण करतो आणि त्याच्या पायात बूट असतात. ही पायात बूट असलेली एकमेव हिंदू देवता आहे. कोल्हापूरमधील मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलमूर्तीच्या पायात वहाणा असल्याचे सांगण्यात येते, मात्र तो ‘पादजालिका’ नावाचा अलंकार आहे आणि गैरसमजातून त्याला पादत्राण समजले जाते. उत्तर भारतात उदीच्यवेशातील सूर्यमूर्ती आढळतात. दक्षिण भारतीय सूर्यप्रतिमांवर हा पर्शियन वा इराणी प्रभाव दिसून येत नाही. दक्षिणेतील सूर्यप्रतिमांमध्ये सूर्याचे हात खांद्यांच्या पातळीपर्यंत उचललेले असतात आणि त्याने अर्धवट उन्मिलित कमळे धारण केलेली असतात. तसेच त्यांच्या कमरेभोवती उदरबंध असतो. महत्त्वाचे म्हणजे येथे सूर्याच्या पायात बूट नसतात. दक्षिण भारतीय सूर्यमूर्तींमध्ये ‘अरुण’ आणि सात घोडे नसतात, तर उत्तर भारतीय सूर्यमूर्ती मात्र सात घोड्यांच्या रथावर आरूढ असलेली दाखवली जाते.
सूर्याचे वर्णन करताना कुत्स आंगिरस ऋषी यांनी ‘सूर्यसूक्तात’ (ऋग्वेद १.११५),
“कल्याणस्वरूप, सोनेरी प्रकाशाने युक्त असणाऱ्या मार्गातून सूर्याचे घोडे जातात” आणि “अंधःकार दूर करणे हे सूर्याचे दिव्य कर्म आहे. जेव्हा तो आपले सोनेरी घोडे हटवतो, तेव्हा रात्र आपली काळी वस्त्रे फैलावत लागते”, अशी काव्यमय कल्पना केली आहे. ही कल्पना पुढे मूर्तीशास्त्रात प्रतिबिंबित झाली. शुंगकालात सूर्याच्या रथास चार घोडे दाखवले जात तर कुषाण काळात दोन वा चार घोडे असत. सूर्याच्या सात अश्वांच्या मूर्ती प्रामुख्याने गुप्तकालात लोकप्रिय झाल्या. हे अश्व वेगवेगळे असत. भुलेश्वरच्या या सूर्यमंदिरातील सूर्यदेवताही अश्वरथावर आरूढ आहे. मात्र येथील रथास एकच अश्व जोडलेला आहे आणि त्याला सात शिरे दाखवलेली आहेत. या रथाचे सारथ्य अरुण करीत आहे. त्याच्या हातात कासऱ्याच्या जागी सर्परज्जू आहे. कोरीव नक्षीकाम, ऋषी प्रतिमा, आणि मयूरशिल्पे यांनी सुशोभित केलेल्या या रथामध्ये चतुर्भुज सूर्यनारायणाची बसलेल्या मुद्रेतील मूर्ती आहे. येथे सूर्याने पायघोळ पीतवस्त्र परिधान केलेले आहे. त्यांच्या मस्तकावर सोनेरी मुकुट आहे आणि मस्तकामागे प्रभावळ आहे. सूर्यमूर्तीच्या दोन्ही बाजूंना ‘उषा’ आणि ‘प्रत्युषा’ या त्यांच्या दोन पत्नींच्या मूर्ती आहेत, तर खाली अश्वांजवळ काठियावाडी वेशभूषेतील दोन सेवकांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहावर उंच शिखर आहे आणि त्यावरही सोनेरी कलश आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतींवर ब्रह्मदेव, कालभैरव, यम, विश्वकर्मा, शिव, अग्नी, विष्णू आणि यज्ञनारायण यांच्या मूर्ती आहेत.
या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते सूर्यास्त या दरम्यान भाविक सूर्यनारायणाचे दर्शन घेऊ शकतात. मंदिरात सूर्योपासनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे गेल्या सुमारे २० वर्षांपासून वर्षाचे ३६५ दिवस सकाळी ६, दुपारी ११.१५ आणि सूर्यास्ताच्या सव्वा मिनिट आधी त्रिकाल हवन केले जाते. मंदिरात रोज सकाळी ७ आणि दुपारी १२ वाजता आरती केली जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे वर्षाच्या बारा महिन्यांत बारा संक्रांती साजऱ्या केल्या जातात. त्यांचा प्रारंभ मकर संक्रांतीपासून होतो. यानंतर कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक आणि धनु संक्रांत साजरी होते. त्या दिवसाच्या पंचांगानुसार असणाऱ्या पुण्यकालात येथे सूर्यनारायणाचे अनुष्ठान केले जाते.