स्वयंभू सिद्ध बाल गणेश मंदिर

टाटा कॉलनी नजीक, राम टेकडी, परळ गाव, मुंबई

गणपती हे मुंबईकरांचे लाडके दैवत. प्राचीन काळापासून येथील बेटांवर गणेशाची उपासना करण्यात येत आहे. केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण आशियात पूजल्या जाणाऱ्या गणेशाची अनेक मंदिरे मुंबईत आहेत. यातील प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे मंदिर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. परळ गावातील गणेशाचे मंदिरही गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झाले आहे. येथे बाल स्वरूपातील गणेशाची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. ही आगळीवेगळी भव्य मूर्ती आणि मंदिराची सजावट यामुळे हे मंदिर गणेशभक्तांचे आकर्षण केंद्र बनले आहे.

प्राच्यविद्यापंडित डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी ‘आशियाचे आराध्य दैवत’ म्हटलेल्या गणेशाची पूजा महाराष्ट्रात प्राचीन काळापासून रूढ आहे. इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात हाल सातवाहन राजाने संपादित केलेल्या ‘गाहा सत्तसई’ (गाथा सप्तशती) या ७०० गाथांच्या (गीतांच्या) संग्रहामध्ये गणेशाचा उल्लेख ‘गणवई’ या नावाने आलेला आहे. त्यातील एका प्राकृत गीतामध्ये गणेशाचे वर्णन पुढीलप्रमाणे आढळते:
“हेलाकरग्ग-अत्थि-अजरिक्खंम-मआरम-पसान्तो। जाई अणिग्ग-अवडग्गी-भरिअ-गगणो-गणहिवै।।” (गाथा क्र. ४०३)
याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे, “सोंडेच्या अग्राने समुद्राचे पाणी शोषून घेऊन समुद्र कोरडा करणाऱ्या व त्यामुळे अनिर्बंध झालेल्या वडवाग्नीला आकाश व्यापू देणाऱ्या गणपतीचा विजय असो.”
मुंबईनजीक ठाणे येथे ३२ सेंटीमीटर उंचीची इसवी सन १००० ते १२०० या काळातील एकदंत गणेशाची मूर्ती सापडली होती. यावरून महाराष्ट्रात आणि मुंबई परिसरात त्या काळात गणेशपूजा प्रचलित होती, असे दिसते.

मुंबईत खासकरून गणेशोत्सवाचा सोहळा भव्य प्रमाणात होतो. १८५७ च्या बंडानंतर सहा वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या ‘मुंबईचा वृत्तांत’ या ग्रंथात गोविंद नारायण माडगांवकर यांनी या उत्सवाबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या लेखनानुसार, “गणपतीचा उत्साह ह्या शहरांत दहा दिवसपर्यंत एक सारखा मोठ्या कडाक्यानें चालतो. कित्येक गृहस्थ वर्ष सहा महिने खपून गणपति स्वतः तयार करितात. हा मातीचा असतो खरा, परंतु ह्यांत कुशळतेचें काम असून शें दोनशें रूपय या खर्च करितात.

कोठें कोठें उत्कृष्ट चित्रें होतात. जागोजागीं शेंकडो गणपति तयार होतात. कित्येक सुंदर मखरें करितात.” हा गणेशोत्सव घरगुती स्वरूपाचा असे. त्या काळातील भाऊचा धक्का बांधणारे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य ऊर्फ ‘भाऊ रसूल’ यांचा गणपती विशेष नामांकित होता. त्याची सुरुवात १८४५ साली गिरगावातील त्यांच्या घरी झाली होती. १८९३ साली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवास राजकीय व सामाजिक हेतूंनी सार्वजनिक स्वरूप दिले. त्याच वर्षी गिरगावातील केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ झाला. मुंबईकरांच्या या लाडक्या बाप्पाची अनेक मंदिरे शहरात ठिकठिकाणी वसलेली आहेत. परळ येथील टाटा कॉलनीनजीक वसलेले स्वयंभू सिद्ध बाल गणेश मंदिर हे त्यातीलच एक होय.

या मंदिराच्या स्थापनेविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यानुसार येथील राम टेकडीच्या या भागामध्ये १९३२ साली गंगाराम नारायण साळुंके हे गणेशभक्त राहात होते. एके रात्री त्यांना गणेशाचा स्वप्नदृष्टान्त झाला. त्यात आपण शिळास्वरूपात या टेकडीवर विराजमान असल्याचे गणेशाने त्यांना सांगितले.

त्या दृष्टान्तावरून त्यांनी दुसऱ्या दिवशी येथे त्या शिळेचा शोध सुरू केला. अखेर एके ठिकाणी खोदकाम करीत असताना त्यांना ही शिळा दिसली. त्यावर गणेशाची प्रतिमा आपोआप उमटलेली होती. त्यांनी ही शिळा साफ केली व त्याच ठिकाणी एक मंदिर उभारून तिची विधिवत प्रतिष्ठापना केली. १९३२ मध्ये बांधलेल्या या मंदिराचा कालौघात अनेकदा जीर्णोद्धार करण्यात आला. अलीकडे या मंदिरास अत्यंत सुंदर असे स्वरूप देण्यात आले आहे.

परळमधील गणेशवाडी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या परिसरातील टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. येथील गणेशवाडी इमारतीपासून १५ पायऱ्या उतरून या मंदिरात प्रवेश होतो. कोकणी पद्धतीच्या उतरत्या छपराच्या टुमदार वास्तूमध्ये हे मंदिर आहे. मंदिरासमोर छोटेसे अंगण आहे. सभामंडप आणि त्यात गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. गर्भगृहावर छोटे सोनेरी शिखर आहे आणि त्यावर कलश आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर वैष्णव द्वारपालांच्या दोन उंच रंगीत मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात, छतालगत मोठे नागशिल्प आहे.

नक्षीकाम आणि शिल्पांनी विनटलेले अर्धस्तंभ, गवाक्षांच्या चौकटींना केलेली कोरीव सजावट, भिंतींच्या शीर्षभागातील गजथर, वितानावरील नक्षीकाम, आणि गेरू रंगाने हा सभामंडप सजलेला आहे. सभामंडपातील एका भिंतीवर मोठे उठावशिल्प आहे. त्यात गणेशाची पाषाणमूर्ती सापडल्याचा प्रसंग चित्रित करण्यात आला आहे.

मंदिराचे गर्भगृह पूर्वाभिमुख आहे. ते खुल्या स्वरूपाचे आहे. मध्यभागी उंच दगडी अधिष्ठान आणि त्याच्या चारही बाजूंनी कोरीव नक्षीकाम केलेले रंगीत स्तंभ, त्यात सुंदर मकरतोरणे आणि वर सुशोभित वितान असे या गर्भगृहाचे स्वरूप आहे. या दगडी अधिष्ठानावर मध्यभागी बाल गणेशाची मोठी शिळा प्रतिष्ठित आहे. शेंदूर लावलेल्या या शिळेच्या समोरच्या बाजूस गणेशाचे मुख कोरलेले आहे.

त्यावर सोनेरी मुकुट आहे. हे गणेशाचे बाल स्वरूप असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या गणेशशिळेसमोर गणपतीची छोटी संगमरवरी मूर्ती आहे.

याचप्रमाणे येथे विठ्ठल-रुक्मिणी, दत्त, स्वामी समर्थ, शंकर महाराज, तुळजाभवानी, गणपती, तसेच दुर्गामातेच्या मूर्ती आहेत. गणेशमूर्तीच्या बाजूस चांदीचे मूषकराज आहेत. येथे शंकराची पिंडही आहे आणि ती प्राचीन असल्याचे सांगितले जाते.

या मंदिरात सकाळी ६ ते रात्री १० या काळात गणेशाचे दर्शन घेता येते. येथील बालगणेश नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

त्यामुळे या मंदिरात संकष्टी व अंगारकी चतुर्थीला, तसेच गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते. गणेशवाडीतील या बालगणेश मंदिरात अत्यंत जल्लोषात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो.

उपयुक्त माहिती:

  • दादर रेल्वे स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : सचिन गुरव, मो. ९८२०४७३७३६

स्वयंभू सिद्ध बाल गणेश मंदिर

टाटा कॉलोनी के पास, राम टेकड़ी, परेल गांव, मुंबई

Back To Home