मुंबईतील महालक्ष्मी मंदिरानजीक, भुलाभाई देसाई मार्गावर स्वामीनारायण संप्रदायाची संगमरवरी मंदिरवास्तू आहे. मुंबईत स्वामीनारायण संप्रदायाच्या ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’ (बीएपीएस), तसेच वडताल येथील लक्ष्मीनारायण देव गादी संस्थान या दोन्ही स्वतंत्र शाखांची मंदिरे आहेत. मणिनगरचे स्वामीनारायण गादी संस्थान ही या संप्रदायाची तिसरी महत्त्वाची शाखा आहे. महालक्ष्मी भागातील स्वामीनारायणाचे हे मंदिर या मणिनगर गादीतर्फे उभारण्यात आले आहे. या गादीच्या अनुयायांचे हे मंदिर एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. येथे स्वामीनारायण यांच्यासमवेत जीवनप्राण अबजी बापाश्री आणि गादीचे संस्थापक मुक्तजीवन स्वामीबापा यांच्या मूर्ती प्रतिष्ठित आहेत.
स्वामीनारायण हा भारतातील एक प्रसिद्ध धार्मिक संप्रदाय आहे. स्वामी सहजानंद हे या संप्रदायाचे संस्थापक आहेत. अयोध्येजवळील छपैया येथे ३ एप्रिल १७८१ रोजी सामवेदी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव घनश्याम पांडे असे होते. त्यांनी अनेक वर्षे हिमालयात तपश्चर्या केली. या काळात ते नीलकंठ वर्णी म्हणून ओळखले जात होते.
इ.स. १८०० मध्ये ते सौराष्ट्रात आले. त्यांनी रामानंदी किंवा उद्धव संप्रदायाचे गुरू रामानंद स्वामी (जन्म १७३९, उत्तर प्रदेशातील अयोध्या) यांच्याकडून दीक्षा घेतली. रामानंद स्वामी यांनी त्यांना सहजानंद स्वामी हे नाव दिले. त्यांनी रामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत आणि वल्लभाचार्यांचे शुद्धाद्वैत यांचा मुख्य आधार घेत, अन्य विचारांचा समन्वय करत, या समन्वयकारी संप्रदायाचा प्रसार केला. तत्कालीन समाजातील सती प्रथा, भ्रूणहत्या यांसारख्या अनिष्ट प्रथा, तसेच मद्यमांस भक्षण, हिंसा, पशुहत्या, चोरी, व्यभिचार आणि अंधश्रद्धा यांचा त्याग करण्याची शिकवण ते देत असत.
या पंथाच्या अनुयायांची अशी श्रद्धा आहे की सहजानंद हे स्वामीनारायण म्हणजेच ईश्वराचा अवतार आहेत. त्यांना स्वामीनारायण तसेच श्रीजी असे संबोधले जाते. १ जून १८३० रोजी त्यांचे निर्वाण झाले. तत्पूर्वी १८२५ मध्ये त्यांनी आपल्या संप्रदायात दोन गाद्यांची निर्मिती केली. त्यातील एक गादी अहमदाबाद येथे स्थापन करण्यात आली आणि ती नरनारायण देव गादी म्हणून, तर वडताल येथील गादी लक्ष्मीनारायण देव गादी म्हणून ओळखली जाते. या पंथाचे आचार्यपद वंशपरंपरागत चालावे, असा आदेश त्यांनी दिला होता.
त्यानुसार त्यांनी अहमदाबाद येथील नरनारायण देव गादीवर आपले ज्येष्ठ बंधू रामप्रताप पांडे यांचे पुत्र अयोध्याप्रसाद आणि वडताल येथील लक्ष्मीनारायण देव गादीवर धाकटे बंधू इच्छाराम यांचे पुत्र रघुवीर यांची नियुक्ती केली. पुढे आचार्यपदाच्या या मुद्द्यावरून तसेच पंथाच्या तत्त्वज्ञानाविषयीच्या मतभेदांतून १९०५ मध्ये वडताल गादी सोडून शास्त्री यज्ञपुरुषदास (शास्त्रीजी महाराज) यांनी बोचासन येथे वेगळ्या संस्थेची स्थापना केली. ती ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’ (बीएपीएस) म्हणून ओळखली जाते. स्वामीनारायण हे संप्रदायाच्या गुणातीत गुरूंच्या माध्यमातून पृथ्वीवर जिवंत आहेत, अशी या संस्थेची श्रद्धा आहे. पुढे १९६६ मध्ये बीएपीएसमधून ‘गुणातीत समाज’ ही स्वतंत्र संस्था निर्माण झाली. याशिवाय अहमदाबाद गादीपासून वेगळे होऊन १९४२ मध्ये ‘स्वामीनारायण गादी’ (मणिनगर) हे संस्थान तयार झाले. या गादीच्या अनुयायांची अशी श्रद्धा आहे की स्वामीनारायण यांनी अहमदाबाद आणि वडताल येथे स्थापन केलेल्या गाद्या या व्यावहारिक होत्या आणि त्यांचे खरे आध्यात्मिक वारसदार हे गोपालानंद स्वामी होते. निष्कुलानंद स्वामी लिखित ‘भक्तिचिंतामणी’ तसेच लक्ष्मीनारायण गादीचे तिसरे आचार्य विहारीलाल महाराज लिखित ‘हरिलीलामृत’ या ग्रंथांतून यास दुजोरा देण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने १९८४ मध्ये प्रसिद्ध केलेले रेमंड ब्रॅडी विलियम्स यांचे ‘ॲन इंट्रोडक्शन टू स्वामीनारायण हिंदुइझम’ हे संशोधनपर पुस्तक स्वामीनारायण संप्रदायाच्या इतिहासाचे एक अभ्यासपूर्ण साधन मानले जाते.
या पुस्तकातून तसेच ‘मणिनगर श्री स्वामीनारायण गादी संस्थान’ने १९८१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘श्री स्वामिनारायण गादी’ या पुस्तकातून मणिनगर संस्थानच्या इतिहासाची माहिती मिळते. या गादीची स्थापना आद्यआचार्यप्रवर मुक्तजीवनदास स्वामी यांनी केली. त्यांना संप्रदायात ‘जीवनप्राण स्वामीबापा’ असे म्हटले जाते. खेडा शहरानजीकच्या महीज नामक गावामध्ये ७ ऑक्टोबर १९०७ (भाद्रपद अमावास्या, संवत १९६३) रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव पुरुषोत्तम असे होते. त्यांच्या माता-पित्यांचे नाव मूलजीभाई पटेल आणि इच्छाबा असे होते. १३ नोव्हेंबर १९२९ (कार्तिक शुद्ध ११, संवत १९८६) रोजी ईश्वरचरणदास स्वामी यांनी त्यांनी दीक्षा दिली आणि त्यांचे नाव मुक्तजीवनदास असे ठेवले. अहमदाबाद गादीतील संतमालिकेतील एक प्रमुख संत म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. १९४० च्या सुमारास त्यांचे अहमदाबाद गादीच्या तत्कालीन प्रमुखांशी स्वामीनारायण यांचे खरे वारसदार कोण या मुद्द्यावरून वाद झाला. मुक्तजीवनदास स्वामी यांच्या मते, स्वामीनारायण यांचे समकालीन असलेले गोपालानंद स्वामी हेच त्यांचे खरे आध्यात्मिक वारसदार होते. स्वामीनारायण यांनी आपल्या सत्संगाची गादी ही ‘त्यागीची गादी’ आहे आणि ती गुप्त आहे असे सांगितले होते.
गोपालानंद हे माझ्या ठिकाणी आहेत असे सांगून स्वामीनारायण यांनी आपल्या ‘त्यागी गादी’वर गोपालानंद स्वामी यांची प्रतिष्ठापना केली थी. मुक्तजीवनदास स्वामी यांनी अहमदाबादच्या मणिनगर भागात १९४२ मध्ये या स्वामीनारायण गादीची स्थापना केली. या गादीची ऐतिहासिक आणि सांप्रदायिक गुरुपरंपरा स्वामीनारायण, गोपालानंद स्वामी, निर्गुणदास स्वामी, ईश्वरचरणदास स्वामी, जीवनप्राण अबजी बापाश्री, मुक्तजीवनदास स्वामी ऊर्फ जीवनप्राण स्वामीबापा आणि पुरुषोत्तमप्रियदास स्वामी अशी आहे. सन २०२० मध्ये कोरोनाच्या साथीमध्ये पुरुषोत्तमप्रियदास महाराज यांचे निधन झाल्यानंतर या गादीवर जितेन्द्रप्रियदास स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मणिनगर गादी संस्थानतर्फे देश-विदेशात स्वामीनारायणांची अनेक मंदिरे स्थापन करण्यात आली आहेत. यातील एक मोठे मंदिर मुंबईमध्ये सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरानजीक स्थित आहे.
या मंदिराची मुहूर्तमेढ आद्यआचार्यप्रवर मुक्तजीवनदास स्वामी ऊर्फ स्वामीबापा (१९०७-१९७९) यांच्या कारकिर्दीत रोवण्यात आली होती. स्वामीबापा हे अनेकदा धर्मप्रचारार्थ मुंबईत येत असत. मात्र त्या वेळी त्यांच्या निवासाची येथे व्यवस्था नव्हती.
तेव्हा त्यांचे भक्त त्या त्या वेळी आपले निवासस्थान रिकामे करून त्यांची व्यवस्था करत असत. अखेर काही भक्तांनी एकत्र येत १९६७ मध्ये बाबुलनाथ येथे दोन मोठ्या सदनिका खरेदी केल्या. त्या ठिकाणी स्वामीबापा यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आणि प्रथम येथे मंदिराची स्थापना करण्यात आली. मुंबईत स्वामीनारायण गादीचे मोठे शिखरबंद मंदिर असावे, अशी स्वामीबापा यांची इच्छा होती. त्यासाठी मोठी जागा शोधण्याची सूचना त्यांनी आपल्या अनुयायांना केली होती. त्यानुसार भुलाभाई देसाई मार्गावरील एक भूखंड नक्की करण्यात आला. महालक्ष्मी मंदिरानजीक असलेल्या या भूखंडावर त्या वेळी अनधिकृत झोपड्या होत्या. झोपडीदादांच्या गुंडगिरीमुळे तसेच येथे नित्य होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांमुळे हा भाग कुप्रसिद्ध होता. असे सांगितले जाते की येथील स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम सुरू होताच या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसला.
स्वामीबापा मुक्तजीवनदास स्वामी यांचे ३० ऑगस्ट १९७९ रोजी (भाद्रपद शु. ७, संवत २०३५) ब्रिटनमधील बोल्टन या शहरात देहावसान झाले. त्यांच्यानंतर या गादीवर आलेले स्वामी पुरुषोत्तमप्रियदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे काम सुरू राहिले.
८ जून १९८९ (ज्येष्ठ शु. ४, संवत २०४५) रोजी या मंदिराच्या नवीन वास्तूमध्ये पुरुषोत्तमप्रियदास स्वामी यांच्या हस्ते जीवनप्राण अबजी बापाश्री आणि जीवनप्राण मुक्तजीवन स्वामीबापा यांच्यासह अन्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. १९६७ मध्ये एका सदनिकेत स्थापन झालेले हे मंदिर आज एका भव्य वास्तूमध्ये आहे.
संगमरवरी पाषाणात केलेले बारीक कोरीव नक्षीकाम, गोलाकार नक्षीदार स्तंभ, त्यातील मकरतोरणे आणि मंदिराच्या बाह्यभिंतीवर कोरलेल्या गजराजांच्या प्रतिमा यांमुळे हे दुमजली मंदिर वैशिष्ट्यपूर्ण दिसते. स्वामीनारायण संप्रदायातील अन्य मंदिरांप्रमाणेच ही वास्तू उंच अधिष्ठानावर उभारलेली आहे. मंदिर आवाराच्या प्रवेशद्वारानजीक ब्रिटिशकालीन वेशभूषेतील द्वारपालांच्या दोन प्रतिमा आहेत. येथून संगमरवरी पाषाणात घडवलेला २६ पायऱ्यांचा जिना आहे. या रुंद जिन्याच्या मधोमध काचेच्या मोठ्या चौरसाकार पेटीमध्ये स्वामीबापा आणि पुरुषोत्तमप्रियदास स्वामी यांच्या कषायवस्त्रांमधील उभ्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या अधिष्ठानावर नंदीमुख आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.
अर्धगोलाकार छत असलेल्या मुखमंडपाच्या छतावर स्वामीनारायण आणि त्यांच्या शिष्य व अनुयायांचे भव्य भित्तीचित्र रंगवलेले आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस नीलकंठवर्णी, शंकर, पार्वती आणि गणपती यांचे उठावशिल्प आहे, तर उजवीकडे हनुमान नीलकंठवर्णी यांना फलाहार देत असल्याच्या प्रसंगाचे उठावशिल्प आहे. सभामंडपात डावीकडे संगमरवरी मखरामध्ये उंच अधिष्ठानावर गणेशाची, तर उजवीकडे हनुमानाची मोठी संगमरवरी मूर्ती आहे. येथे प्रवेशद्वारानजीक पितळेचे दोन गजराज आहेत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आणि दुमजली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाच्या छतावरील चौकटींमध्ये तसेच भिंतींवर रंगवलेली चित्रे होय. येथे स्वामीनारायण तसेच स्वामीनारायण गादीच्या गुरुपरंपरेतील स्वामींच्या जीवनातील विविध प्रसंग चितारलेले आहेत. समोरच मंदिराचे गर्भगृह आहे. पाच शिखरे असलेल्या या गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर सोनेरी चौकटींत स्वामीनारायण गादीतील पूजनीय स्वामींच्या तसबिरी लावलेल्या आहेत. गर्भगृहाच्या कमानींवर भक्त-वादकांची शिल्पे आहेत. छतावरील बाशिंगी कठड्याच्या दोन्ही बाजूंना मोठी मयूरशिल्पे बसवलेली आहेत. गर्भगृहास उरुशृंग प्रकारची तीन, तर घुमटाकार दोन अशी पाच शिखरे आहेत.
आत उंच वेदीवर मध्यभागी कमलपुष्पावर स्वामीनारायणांची मूर्ती विराजमान आहे. डावीकडे स्वामीनारायणांचा अवतार मानले गेलेले जीवनप्राण अबजी बापा यांची, तर उजवीकडे मुक्तजीवन स्वामीबापा यांची मूर्ती आहे. येथे स्वामीनारायण आणि अबजी बापा यांच्या संगमरवरी पाषाणात घडवलेल्या मूर्ती वस्त्रालंकारांनी शृंगारलेल्या आहेत. अबजी बापा यांनी गुजराती पद्धतीची पगडी धारण केलेली आहे, तर स्वामीनारायणांच्या मस्तकी मौल्यवान खड्यांनी मढवलेला मुकुट आहे.
स्वामीबापा यांनी सांप्रदायिक कषायवस्त्रांचा वेश परिधान केलेला आहे. या मूर्तींच्या वर सोनेरी छत्र आहे. या मंदिरावर उरुशृंग पद्धतीची दोन मोठी शिखरे आहेत. या शिखरांवर आमलक आणि त्रिस्तरीय सोनेरी कळस आहे आणि तेथे स्वामीनारायण गादीचा धर्मध्वज फडकत आहे.
या मंदिरात सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी ६.३० ते रात्री ८ आणि दर रविवारी सकाळी ६.३० ते रात्री ८.३० या काळात भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात नित्यपूजेसोबतच रोज कथा, ध्यानधारणा आणि ‘वचनामृत’ व ‘बापाश्रीनी वातो’ या ग्रंथांचे पारायण केले जाते. मंदिरात स्वामीनारायण जयंती तसेच रामनवमी, जन्माष्टमी, दिवाळी, नववर्षारंभी अन्नकूट, निर्जला (भीम) एकादशी आदी विविध हिंदू सण व उत्सव साजरे केले जातात. पाटोत्सव (मंदिर प्रतिष्ठापना दिन) हा येथील एक मोठा उत्सव असतो.
ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी / पंचमीला साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यात मुंबईतील स्वामीनारायण गादीचे अनुयायी सहभागी होतात. येथे आषाढ आणि श्रावण महिन्यात झुला दर्शन, तसेच दर अमावास्येला भजन-कीर्तन, प्रवचन आणि विशेष पूजेद्वारे सद्गुरू दिन साजरा केला जातो. या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बहुमजली इमारतीमध्ये भाविकांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते.
संस्थानतर्फे येथे स्वामीनारायण भोजनालयही चालवले जाते. येथे सकाळी ७.३० ते ९.३० या काळात नाश्ता, दुपारी ११.३० ते २.३० दरम्यान दुपारचे भोजन, तर ७.३० ते ९.३० या काळात रात्रीचे भोजन दिले जाते.