झावबा श्रीराम मंदिर

झावबावाडी, गिरगाव, मुंबई

प्रभू श्रीरामांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये काळा राम आणि गोरा राम अशी दोन मंदिरे आहेत. अशीच दोन मंदिरे मुंबईतील गिरगाव या प्राचीन वस्तीतही वसलेली आहेत. यातील एक मंदिर आत्मारामबुवांचे काळा राम मंदिर म्हणून ख्यातनाम आहे. तर दुसरे मंदिर झावबांचे गोरा राम मंदिर म्हणून सुप्रसिद्ध आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उभारण्यात आलेले हे मंदिर परिसरातील श्रीराम भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दोन घुमटाकार शिखरे आहेत. त्यातील एक श्रीरामाच्या मूर्तीच्या वर असून दुसरे मंदिराच्या वर आहे.

सन १९०० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द ओरिजिन ऑफ बॉम्बे’ या इतिहासकार गेर्सन दा कुन्हा यांच्या पुस्तकानुसार, गिरगाव या नावाची उत्पत्ती गिरी आणि ग्राम या दोन शब्दांच्या समुच्चयातून झालेली आहे. हा भाग मलबार टेकडीच्या पायथ्याशी असल्याने त्यास गिरिग्राम असे म्हणण्यात येऊ लागले व त्याचा अपभ्रंश गिरगाव असा झाला. येथील या राम मंदिरास सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आहे. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनी (सव्वाशे वर्षांपूर्वी) मध्य आणि दक्षिण मुंबईतील देवळांची टिपणे असलेले ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ हे पुस्तक १८९५ साली प्रसिद्ध केले. या पुस्तकात असे म्हटले आहे, की सध्या हे मंदिर ज्या वास्तूमध्ये आहे, ती इमारत मूळची विठोबा कानोजी नामक प्रभू ज्ञातीतील गृहस्थाची होती.

विठोबा कानोजी यांच्याकडून ही बंगलेवजा इमारत विठोबा वासुदेवजी झावबा यांच्याकडे आली. इ.स. १८७६ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात या घराचे रूपांतर रामाच्या मंदिरात करण्याची आज्ञा आपले विश्वस्त व मृत्यूपत्राचे ‘एक्झिक्युटर्स’ यांना केली होती. मंदिराचे रूपांतर आणि देखभालीचा खर्च यासाठी त्यांनी मृत्यूपत्राद्वारे स्वतंत्र रक्कम राखून ठेवली होती. त्यानुसार या इमारतीचे मंदिरात रूपांतर करण्यात आले. त्यासाठी त्या काळी सुमारे २० हजार रुपये (आजच्या हिशेबाने सुमारे दीड ते दोन कोटी रुपये) खर्च आला. फाल्गुन शुद्ध १०, शके १७९९, ईश्वरनाम संवत्सर, संवत १९३४, १४ मार्च १८७८ रोजी या मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली.

ठाकूरद्वार, गिरगावातील अतिशय वर्दळीच्या, वाहत्या रस्त्यालगत तीन मजली बंगल्यासारखे हे झावबा श्रीराम मंदिर आजही दिमाखात उभे आहे. परिसरातील असंख्य रामभक्तांना ते नित्य आकर्षित करीत आहे. मंदिराच्या आवारास लोखंडी प्रवेशद्वार आहे. येथून आत येताच छोटेसे अंगण आहे. या अंगणामध्ये एका उंच चौथऱ्यावर उंच सुबक अष्टकोनी दीपस्तंभ उभा आहे. ही मंदिरवास्तू उंच अधिष्ठानावर उभारलेली आहे. नऊ संगमरवरी पायऱ्या चढून या मंदिराच्या ओसरीत प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या बाजूस असलेल्या चौथऱ्यांवर दोन सिंहशिल्पे आहेत. ओसरीस सुरुदार स्तंभ लावलेले आहेत. या स्तंभांच्या मध्ये महिरपी जाळीदार कमान आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या आलिशान निवासस्थानांचे स्वरूप कसे असेल याची झलक देणाऱ्या या ओसरीमध्ये भाविकांना बसण्यासाठी बाक ठेवलेले आहेत. ओसरीच्या वरच्या बाजूस दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीचा कठडा आहे. त्यात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण घड्याळ लावलेले आहे. या घड्याळात तासांच्या आकड्यांच्या जागी ‘रा म ज य रा म ज य ज य रा म’ हे बारा शब्द आहेत. ओसरीतून समोरच असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वरच्या कमानाकार भागामध्ये मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा माहितीफलक बसवलेला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. आत मधल्या बाजूस कोरीव काम केलेले गोलाकार स्तंभ आहेत. स्तंभांच्या शीर्षभागात सिंहादी प्राणीशिल्पे कोरलेली आहेत. दोन स्तंभांच्या मधोमध तुळयांलगत उत्कृष्ट कोरीव काम केलेल्या आडव्या काष्ठपट्ट्या लावलेल्या आहेत. सभामंडपाचे वितानही लाकडी बांधणीचे आहे. बाजूच्या भिंतींतील जुन्या पद्धतीच्या उंच कमानदार खिडक्यांमुळे सभामंडप प्रकाशमान आहे. मधल्या चौकाच्या वर वरच्या मजल्याचे सज्जे आहेत. या सज्जांवरील तुळयांवर आतल्या बाजूने मराठा चित्रशैलीतील प्रतिमा कोरलेल्या आहेत. समोरच्या बाजूस मंदिराचे गर्भगृह आहे. अत्यंत सुंदर नक्षीकाम आणि रंगसंगतीने नटलेल्या उंच मखरासारख्या या गर्भगृहाच्या तिन्ही बाजूंनी लाकडी कठडा लावलेला आहे. गर्भगृहाच्या समोरील दोन खांबांच्या मध्ये, दोन्ही बाजूंना वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. छतावर बिलोरी काचांचे सुमारे दीडशे ते दोनशे वर्षे जुने असे झुंबर आहे. आत काळ्या पाषाणाच्या उंच वेदीवर प्रभू श्रीरामचंद्रांची सुहास्यवदन मूर्ती प्रतिष्ठित आहे. या मूर्तीच्या शेजारी लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. संगमरवरी शिळेमध्ये कोरलेल्या या मूर्ती वस्त्र, अलंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेल्या आहेत. मूर्तींच्या मस्तकी सोनेरी मुकुट आहेत. येथे श्रीराम आणि लक्ष्मण हे कोदंडधारी आहेत. त्यांच्या उजव्या हातात बाण आहेत. श्रीरामाच्या मूर्तीच्या वर सोनेरी छत्र आहे. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती आणि त्यांमागील पाठशिळा या एकाच पाषाणात कोरलेल्या आहेत. या मूर्तींच्या डाव्या बाजूस हनुमानाची, तर उजवीकडे गणेशाची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. या मखरासारख्या गर्भगृहाच्या छतावरील कठड्यांवर चारही कोपऱ्यांत वानरमूर्ती आहेत. गर्भगृहावर घुमटाकार शिखर आहे. मंदिराच्या वरच्या भागातही असेच मोठे घुमटाकार शिखर आहे.

या मंदिरात रोज सकाळी ६ ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी ४ ते रात्री ९.३० या काळात भाविकांना देवदर्शन घेता येते. मंदिरात रोज सकाळ व सायंकाळी आठ वाजता आरती होते. येथे विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. येथील सर्वांत मोठा उत्सव हा रामनवमी आणि हनुमान जयंतीचा असतो. येथे गुढीपाडवा ते रामनवमी आणि रामनवमी ते हनुमान जयंती असे १५ दिवस मोठा सोहळा होतो. या काळात येथे रोज सायंकाळी ५.३० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानंतर रात्री आठ वाजता आरती व मंत्रपुष्प होते. या शिवाय येथे फाल्गुन शुद्ध दशमी, कार्तिक वद्य पंचमी या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथे श्रावण महिन्यात लघुरुद्र, तसेच कीर्तन सेवा होते. दर आषाढातही मंदिरात कीर्तनांचे आयोजन केले जाते. ‘कै. विठोबा वासुदेवजी झावबा चॅरिटीज’ या विश्वस्त संस्थेद्वारे या मंदिराचा कारभार पाहिला जातो.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : उदय शंकर झावबा, प्रमुख विश्वस्त, दूरध्वनी : ०२२-२२००७९७९

झावबा श्रीराम मंदिर

झावबावाड़ी, गिरगांव, मुंबई

Back To Home