वैकुंठमाता गावदेवी मंदिर

भंडारवाडा टेकडी, माझगाव, मुंबई

मुंबईच्या सात बेटांपैकी एक असलेल्या माझगाव बेटावरील अधिष्ठात्री देवता असलेल्या वैकुंठमातेचे मंदिर येथील भंडारवाडा टेकडीवर आहे. माझगावची गावदेवी या नावाने ओळखली जाणारी ही देवी कोळी समाजातील अनेक कुटुंबांची आराध्य देवता आहे. देवीचे येथील स्थान प्राचीन काळापासून असल्याचे सांगितले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील देवी जागृत व नवसाला पावणारी आहे. येथील मंदिरात पाताळेश्वर महादेवाचे स्वयंभू शिवलिंगही विद्यमान आहे. नवरात्रोत्सवाप्रमाणेच येथे महाशिवरात्रीलाही मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते.

मुंबई हे शहर मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबापुरी, माझगाव, परळ, वरळी व माहीम या मूळ सात बेटांचे एकत्रीकरण होऊन तयार झाले आहे. या बेटांना अश्मयुगापासूनचा इतिहास आहे. मुंबईतील बॅक बे भागात अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. इ.स. १९१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘गॅझेटिअर ऑफ बॉम्बे सिटी अँड आयलंड, खंड २’ मधील नोंदीनुसार, या अश्मयुगीन मानवांचा थेट संबंध येथील मूळ द्रविड वंशाच्या कोळी जमातीशी आहे. या बेटांवरील कोळी जमातींचे मूलस्थान गुजरातचा भाग असल्याचेही गॅझेटिअरमध्ये म्हटले आहे. या जमातींनी मुंबईच्या सात बेटांवर वस्ती केल्यानंतर तेथे आपापल्या अधिष्ठात्री देवतांची प्रतिष्ठापना केली. मुंबादेवी ही त्यातीलच एक देवता असून तिच्यावरून मुंबई हे नाव पडले, असे सर्वसाधारणपणे मान्य करण्यात येते.

माझगावमधील कोळी समाजाने येथील एका उंच टेकडीवर स्थापन केलेली देवी म्हणजे वैकुंठमाता होय. ती माझगावची ग्रामदेवता मानली जाते. पोर्तुगीज इतिहासकार जे. गर्सन दा कुन्हा यांच्या ‘द ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (१९००) या ग्रंथानुसार, माझगाव या गावाच्या नावाची उत्पत्ती तीन प्रकारे सांगण्यात येते. काही जणांच्या म्हणण्यानुसार हे गाव बेटाच्या केंद्रस्थानी असल्याने त्यास ‘माजघर’ असे म्हटले जाई व त्यावरून माझगाव हे नाव पडले. काही जण याची उत्पत्ती ‘मसागांव’ म्हणजे ‘महिषग्राम’ म्हणजे म्हशींचे गाव अशी सांगतात. दा कुन्हा यांच्या मते, या गावाचे पूर्वीचे नाव ‘मच्छगाव’ असे असावे. त्याचे संस्कृतीकरण ‘मत्स्यग्राम’ असे करण्यात येते. या मच्छगावचे पुढे माझगाव झाले. मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक नितीन साळुंखे यांनी ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकात माझगाव हे नाव पोर्तुगीजांनी दिले असल्याचे म्हटले आहे. इ.स. १७६९ पर्यंत सुमारे २६७ वर्षे मोरोक्कोतील पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांची वसाहत होती. तेथील स्थानिक स्वतःस ‘माझिघान’ असे म्हणत असत. त्यावरून पोर्तुगीजांनी त्या वसाहतीस ‘माझगाँव’ हे नाव दिले. त्याचा अर्थ मूळ रहिवाशांची भूमी. पुढे मोरोक्कोच्या सुलतानाने पोर्तुगीजांची हकालपट्टी केली. त्यानंतर पोर्तुगीजांनी ब्राझीलच्या किनारपट्टीवर आपली वसाहत निर्माण केली. त्या वसाहतीला त्यांनी ‘नोव्हा डे माझगाँव’ असे नाव दिले. आजही ते शहर ब्राझीलमध्ये आहे. यानंतर जेव्हा पोर्तुगीजांनी मुंबईतील बेटे ताब्यात घेतली, तेव्हा त्यांनी एका बेटास आपल्या जुन्या वसाहतीचे – माझगावचे – नाव दिले.

येथील वैकुंठमाता गावदेवी मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास उपलब्ध नाही. स्थानिक जाणकारांच्या मते किमान सोळाव्या-सतराव्या शतकापासून येथे देवीचे छोटे मंदिर होते. त्यात पाषाणशिळेच्या स्वरूपात देवीची पूजा केली जात असे. या मंदिराविषयीची आख्यायिका अशी की इ.स. १७३९ मध्ये पोर्तुगीजांविरोधात झालेल्या वसईच्या युद्धाच्या वेळी शूरवीर चिमाजी अप्पा यांनी माझगावच्या या देवीस नवस केला होता. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अलीकडे करण्यात आलेल्या जीर्णोद्धार व नूतनीकरणानंतर या मंदिरास तसेच मंदिर परिसरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

माझगावमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जोसेफ बाप्टीस्टा उद्याना’तून काही अंतर पुढे भंडारवाडा टेकडीवर हे मंदिर वसले आहे. टेकडीवर जाण्याच्या मार्गावर अलीकडेच पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. टेकडीच्या माथ्यावर जाताच प्रथम दर्शन होते ते पाताळेश्वर महादेवाच्या मंदिराचे. सिमेंट काँक्रीटच्या मंडपात हे संगमरवरी फरशांनी बांधलेले मंदिर स्थित आहे. मंदिरासमोर संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची पाषाणमूर्ती आहे. चौथऱ्यालगत कासवमूर्ती आहे. आत तळघरात पाताळेश्वर महादेवाचे स्वयंभू शिवलिंग प्रतिष्ठित आहे. त्याभोवती संगमरवरी फरशांनी तयार केलेली मोठी शाळुंका आहे. शिवलिंगास तांब्याच्या नागदेवतेने विळखा घातलेला असून वर फणा उभारलेला आहे. त्याच्या वरच्या बाजूस तांब्याची गलंतिका आहे. गर्भगृहाच्या भिंतींमधील कोनाड्यांमध्ये सरस्वती, गणपती, पार्वतीमाता, दत्तात्रेय आणि लक्ष्मी-नारायण यांच्या संगमरवरी मूर्ती विराजमान आहेत.

या मंदिराच्या उजवीकडे असलेल्या मोठ्या चौथऱ्यावर एका बाजूस बांधलेल्या संगमरवरी देव्हाऱ्यांमध्ये भगवान कृष्ण, मारुती, खंडोबा व देवी भगवती यांच्या मूर्ती आहेत. येथून खाली ११ पायऱ्या उतरल्यानंतर वैकुंठमाता देवीच्या मंदिरात प्रवेश होतो. सभामंडप आणि त्यात देवीचा चांदीचा देव्हारा, असे या मंदिराचे स्वरूप आहे. सन २०२१ मध्ये येथे हा देव्हारा बसवण्यात आला. सिमेंट काँक्रीटमध्ये बांधलेल्या या सभामंडपाच्या समोरील भागास लोखंडी जाळी लावलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रकाश असतो. सभामंडपात देवीच्या देव्हाऱ्यासमोर छतास दोन मोठ्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. बारीक नक्षीकाम केलेला चंदेरी पत्रा लावलेल्या या मोठ्या देव्हाऱ्यामध्ये वैकुंठमातेची मूर्ती विराजमान आहे. येथे देवी चतुर्भुज स्वरूपात व शस्त्रधारिणी आहे. मूर्तीस वस्त्रालंकार व पुष्पमालांनी शृंगारलेले आहे. या मूर्तीस पितळी मुखवटा असून त्यावर मुकुट आहे. देव्हाऱ्याच्या मागच्या बाजूच्या भिंतीला लागून एक आडवी नैसर्गिक शिळा आहे. देवीच्या या पाषाणस्वरूपातील मूर्तीस शेंदूर लावला जातो. या देव्हाऱ्याच्या डावीकडे एक छोटा लाकडी देव्हारा आहे व त्यात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती विराजमान आहे. उंच टेकडीवर असल्यामुळे या मंदिरातून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते. येथून माझगाव डॉकचा परिसर दृष्टीस पडतो.

माझगावच्या या गावदेवीचा वार्षिक जत्रोत्सव महाशिवरात्रीला भरतो. या परिसरातील अनेक कुटुंबांची देवीवर श्रद्धा आहे. कालौघात येथील अनेक कुटुंबे अन्यत्र स्थलांतरित झाली आणि येथील मुली विवाह होऊन सासरी गेल्या, परंतु या यात्रेच्या वेळी ही कुटुंबे आणि माहेरवाशिणी सवाष्णी देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. या देवीची खणानारळाने ओटी भरण्याची प्रथा आहे. यात्रोत्सवाप्रमाणेच चैत्र पौर्णिमेला होणारा पालखी सोहळा हा या मंदिरातील एक मोठा उत्सव आहे. ‘माझगाव गावदेवी उत्सव मंडळा’तर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या पालखी सोहळ्यात परिसरातील अनेक भाविक सहभागी होतात. मंदिरात सकाळी सहापासून रात्री साडेआठपर्यंत भाविक देवदर्शन घेऊ शकतात.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिर असलेल्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

वैकुंठमाता गादेवी मंदिर

भंडारवाड़ा हिल, मझगांव, मुंबई

Back To Home