मुंबईत विविध देव-देवतांची असंख्य देवालये आहेत. या शहराचे नावच मुळी एका देवीच्या नावावरून पडलेले आहे. असे असले तरी या महानगरीची खरी उत्सवी आराध्य देवता म्हणजे गणपती. आबालवृद्धांना प्रिय असलेल्या या सुखकर्त्या गणेशाची उपासना येथील विविध मंदिरांतून अखंड चालते. या मंदिरांतील एक सुप्रसिद्ध मंदिर सिक्कानगर समोरील फडकेवाडी येथे आहे. फडक्यांचे गणपती मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर सव्वाशे वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिरातील गणेश सर्व कामनापूर्ती करणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
गणेश ही आशिया खंडातील एक लोकप्रिय अशी देवता आहे. थोर प्राच्यविद्यासंशोधक व संस्कृतचे प्रकांड पंडित डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मते इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून गणेशाची उपासना लोकप्रिय झाली, तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या मते सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी गणेशाची उपासना सुरू झाली.
विघ्नहर्ता मानला जाणारा गणेश तर मुंबईकरांचा लाडका देव. येथे पूर्वापार गणेशोत्सव साजरा केला जात असे. १८५७ च्या बंडानंतर सहा वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या ग्रंथात गोविंद नारायण माडगांवकर यांनी या उत्सवाबद्दल अशी माहिती दिली आहे, की ‘गणपतीचा उत्साह ह्या शहरांत दहा दिवसपर्यंत एक सारखा मोठ्या कडाक्यानें चालतो. कित्येक गृहस्थ वर्ष सहा महिने खपून गणपति स्वतः तयार करितात. हा मातीचा असतो खरा, परंतु ह्यांत कुशळतेचें काम असून शें दोनशें रुपये खर्च करितात. कोठें कोठें उत्कृष्ट चित्रें होतात. जागोजागीं शेंकडो गणपति तयार होतात. कित्येक सुंदर मखरें करितात. गणपतीचा उत्साह दक्षिणी हिंदुलोकांतच होतो. गुजराथी व घाटी लोकांत गणपतीचें नांव देखील माहीत नाहीं.’
अशा या उत्सवास १८९३ साली लोकमान्य टिळकांनी राजकीय व सामाजिक हेतूंनी सार्वजनिक स्वरूप दिले. याची प्रेरणाही मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव ही होती. पुण्यात लो. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याच्या एक वर्ष आधी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला होता. पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करणारे भाऊसाहेब लक्ष्मण जावळे (भाऊ रंगारी), सरदार घराण्यातील विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर या तिघांनी १८९२ साली हा उत्सव सुरू केला.
त्याची नोंद टिळकांनी १८९३ मध्ये एक स्फूट लेख लिहून केसरीतून घेतली होती.
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ होण्याच्या केवळ दोन वर्षे आधी, १८९० मध्ये फडकेवाडीत या गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली. या मंदिराचा इतिहास असा की रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आवास या गावचे गोविंद गंगाधर फडके हे इ.स. १८६५ मध्ये मुंबईस आले. ते उच्च न्यायालयात नोकरीस होते. शांत, स्वच्छ सागरकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आवास या गावामध्ये वक्रतुंड विनायकाचे प्राचीन स्थान आहे. अभिजित नामक एका राजाने अपत्यप्राप्तीसाठी कनकेश्वराच्या डोंगरावर जाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याला वक्रतुंडाचा जप करीत लोकसेवा करण्याचा आदेश दिला. या वक्रतुंडाच्या कृपेने राजास अपत्यप्राप्ती झाली, अशी या वक्रतुंड विनायकाची आख्यायिका सांगण्यात येते. गोविंद फडके यांची या वक्रतुंडावर अपार श्रद्धा होती. मुंबईत आल्यानंतर दोनच वर्षांत त्यांनी, सध्या हे मंदिर जेथे उभे आहे, तेथील मोठी जागा विकत घेतली. त्यांच्या पत्नीचे नाव यशोदाबाई असे होते. या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते. अशात गोविंद फडके यांचे अकाली निधन झाले.
जनरीतीनुसार यशोदाबाईंनी दत्तक पुत्र घ्यावा, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्यांना ते नामंजूर होते. त्यांनी आपली मालमत्ता गणेशाच्या चरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. ‘गजानन चिरंजीव जाहला’ या भावनेने यशोदाबाईंनी येथे गणपती मंदिर बांधण्याचा संकल्प केला. फडके कुटुंबांचे स्नेही बालाजी पांडुरंग भालेराव व अन्य काही प्रतिष्ठित मंडळींच्या साहाय्याने त्यांनी मंदिराचे बांधकाम सुरू केले. १८९० च्या सुमारास ते पूर्ण झाले. यशोदाबाईंनी या जागेत एक मोठी बाग तयार करून तिला ‘गोविंदबाग’ आणि या परिसराला ‘फडकेवाडी’ असे नाव दिले.
चर्नी रोड स्थानकापासून २०-२५ मिनिटांच्या अंतरावर फडकेवाडीत स्थित असलेले हे देवालय उत्तराभिमुख आहे. बाहेरून चौरसाकार असलेले हे मंदिर दुमजली आहे. मंदिरासमोर मोठे प्रांगण आहे. ओसरी, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिर उंच अधिष्ठानावर उभारलेले आहे. ओसरीच्या भिंतींवर काचेच्या पेट्यांमध्ये श्रीराम-लक्ष्मण-सीता, तसेच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी, साईबाबा या संतमहात्म्यांच्या मूर्ती आहेत.
ओसरीच्या बाजूने असलेल्या पायऱ्यावरून पुढे जाऊन मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप सुमारे २०० लोक बसू शकतात इतका प्रशस्त आहे. संगमरवरी फरशा लावलेला हा सभामंडप बिलोरी झुंबराने सुशोभित केलेला आहे. सभामंडपात उंच चौथऱ्यावर काचेच्या बंद पेटीमध्ये गणेशाचे वाहन असलेल्या मूषकाची चांदीची मूर्ती आहे. गर्भगृहास लाकडी प्रवेशद्वार आहे. त्याच्या डाव्या बाजूस उंच उभ्या देवळीमध्ये गोपाल कृष्णाची संगमरवरी मूर्ती आहे, तर उजव्या बाजूच्या देवळीत त्रिमुखी दत्ताची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराचे गर्भगृह १० फूट रुंद व ८ फूट लांब आहे. त्यात उंच वेदीवर सुंदर नक्षीकाम, बिलोरी झुंबर यांनी सुशोभित असे चांदीचे मखर आहे. या मखरामध्ये चांदीच्या सिंहासनावर, कमळामध्ये विराजमान असलेल्या गणेशाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित आहे. वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेल्या या प्रसन्न मूर्तीच्या मस्तकी सोनेरी मुकूट आहे. १८९० च्या सुमारास १७ हजार रुपये खर्चून ही मूर्ती बडोद्याहून आणण्यात आली. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंस रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. बाजूलाच शिसवी लाकडाचे दोन गजराज आहेत. मंदिराला घुमटाकार शिखर आहे. घुमटावर मोठा गोलाकार कलश आहे.
या मंदिरात सकाळी ६ ते १ आणि दुपारी ३ ते १० या काळात भाविक देवदर्शन घेऊ शकतात. मंदिरात गणेशाच्या दर्शनासाठी रोज सकाळ-सायंकाळी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. चतुर्थी, अंगारकी चतुर्थी या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. गणेशोत्सव हा या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव होय. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी तो साजरा केला जातो. या काळात मंदिर विद्युत रोषणाई आणि पुष्पमालांनी सुशोभित केले जाते. ‘धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट’द्वारे या मंदिराचा कारभार पाहिला जातो. या ट्रस्टतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.