घोडपदेव मंदिर,

केशव बोरकर चाळ, घोडपदेव, रे रोड, मुंबई

सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या महाकाय उद्रेकाची स्मृती जपणारे एक छोटेसे परंतु अनोखे मंदिर घोडपदेव येथे वसले आहे. या परिसराच्या नावावरूनच येथील देवास घोडपदेव हे संबोधन प्राप्त झाले. हिंदू धार्मिक परंपरेमध्ये निसर्गपूजा हा एक महत्त्वाचा भाग असून येथे पंचमहाभूतांना परमेश्वर मानले जाते. त्यामुळे दगडालाही देव मानले जाते. त्याचे एक उदाहरण या मंदिरात पाहायला मिळते. येथे एका थंड झालेल्या लाव्हा खडकाच्या रूपात घोडपदेव विराजमान असल्याचे सांगण्यात येते. हे एक प्रखर दैवत मानले जाते आणि काही भाविकांच्या मते घोडपदेव हे हनुमानाचे रूप आहे.

भूगर्भशास्त्रानुसार, सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी म्हणजे ‘क्रिटेशियस’ कालखंडाच्या अखेरीस जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगांमधून (फिशर इरप्शन) ज्वालामुखीचा उद्रेक झाला. पृथ्वीच्या पोटातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर, परंतु संथपणे लाव्हारस बाहेर पडला आणि कित्येक किलोमीटर परिसरात तो पसरला. लाव्हारसाचे एकावर एक थर साचत जाऊन ‘डेक्कन ट्रॅप्स’ किंवा ‘डेक्कन ज्वालामुखी प्रांत’ तयार झाला. महाराष्ट्राचा मोठा भाग या लाव्हा उद्रेकातून तयार झालेल्या बेसाल्ट खडकाने बनलेला आहे. मुंबईची बेटे हीसुद्धा या उद्रेकाची निर्मिती आहेत. त्या नैसर्गिक किमयेचा एक अवशेष घोडपदेव येथील मंदिरात लाव्हा शिळेच्या रूपाने पूजला जात असल्याचे सांगण्यात येते. मुंबईतील अनेक स्थाननामांप्रमाणेच घोडपदेव या नावाविषयीही एक आख्यायिका सांगण्यात येते. या भागामध्ये पूर्वी एक मोठी टेकडी होती. मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक नितीन साळुंखे यांच्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकानुसार, घोडपदेव मंदिरापासून न्यू हिंद मिलपर्यंतच्या परिसरावर, माझगावच्या उत्तर हद्दीपर्यंत ही टेकडी पसरलेली होती.

पूर्वी या टेकडीच्या पायापर्यंत समुद्र होता आणि टेकडीच्या वरच्या भागात एक मोठी शिळा बाहेर आलेली होती. या शिळेचा आकार घोड्याच्या मुखासारखा दिसत असे. समुद्रातून येणाऱ्या कोळ्यांसाठी ही शिळा म्हणजे एक महत्त्वाची खूण होती. त्या निसर्गपूजक कोळ्यांनी त्या शिळेलाच देव मानले व तिला ‘घोरपदेव’ हे नाव दिले, त्याचे पुढे घोडपदेव झाले. मुंबई शहरावर लिहिल्या गेलेल्या काही जुन्या इंग्रजी पुस्तकांतही या देवाचा उल्लेख ‘घोरपदेव’ असाच आहे. बाळकृष्ण आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी १८८९ साली प्रसिद्ध केलेल्या ‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकातही घोडपदेवचा उल्लेख आढळतो. त्यात असे म्हटले आहे की ‘माजगांवच्या शेवटास मोटेचें माजगांव म्हणतात. ह्याच्याच शेजारीं एक लहानशीं डोंगरी आहे, तीस व तिच्या आसपासच्या जागेस घोडपदेव म्हणतात. ह्या जागेस घोडपदेव म्हणण्याचे कारण असें दिसते कीं पाहण्याबरोबर ह्या डोंगरीची आकृती घोड्याच्या आकारासारखी दिसते.’ ही टेकडी १८९३ ते १९०८ या दरम्यान तोडण्यात आली.

१८५७ च्या बंडानंतर अवघ्या सहा वर्षांनी म्हणजे १८६३ मध्ये गोविंद नारायण माडगांवकर यांचे ‘मुंबईचें वर्णन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्यात घोडपदेव मंदिराविषयी असे म्हटले आहे की ‘घोडपदेव याचें वास्तविक नांव खडकदेव असावें, कारण हा एक मोठा खडक असून त्याच्या समोरच्या भागास शेंदूर चोपडून ह्यास देव बनविला आहे.’ ‘मुंबईचा वृत्तांत’कारांनुसार, हे स्थान अतिशय पुरातन आहे. पुत्रप्राप्तीसाठी या देवास सुपारीचा कौल लावला जातो व ज्यांना मुले होतात अशी दांपत्ये येथे पाळणे व झोळ्या बांधून नवसफेड करतात, अशी माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे. घोडपदेवमधील बॅरिस्टर नाथ पै मार्गावरील (रे रोड) केशव बोरकर चाळीमध्ये हे मंदिर वसलेले आहे. मंदिर चाळमालक बोरकर यांच्या खासगी मालकीचे असून चाळीच्या पत्र्याच्या मोठ्या दरवाजातून काही पावले पुढे आल्यावर हे मंदिर दिसते.

मंदिरासमोर छोटेसे अंगण असून त्यात उंच दगडी दीपस्तंभ आणि तुळशीवृंदावन आहे. येथेच देवीची पाषाणमूर्ती असलेली एक छोटी देवळी आहे. मंदिर साध्या बांधणीचे असून त्याचे छत कोकणी पद्धतीचे उतरत्या छपराचे व काहीसे पॅगोडाच्या आकारासारखे दिसणारे आहे. त्याच्या टोकावर कलश बसवलेला आहे. सभामंडप आणि त्यातच समोरच्या बाजूस देवाचा चौथरा अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या भिंतींमध्ये लोखंडी जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रवेशद्वारही लोखंडी जाळीचे आहे. सभामंडपातील चौथऱ्याला स्टीलच्या सळ्यांचा कठडा लावलेला आहे. छतास चार मोठ्या पितळी घंटा व छोटेसे झुंबर टांगलेले आहे. समोर चौथऱ्यावर घोडपदेवाची रुंदसर शिळा आहे, तिला खालच्या बाजूस काळसर रंग दिलेला आहे आणि वरच्या बाजूस शेंदूर लावलेला आहे. या शिळेच्या उजव्या बाजूस दगडी पादुका विराजमान आहेत, तर तिच्या समोर विविध देवतांच्या छोट्या पितळी मूर्ती ठेवलेल्या आहेत.

बोरकरांची सहावी पिढी सध्या या मंदिराचा कारभार पाहते. येथे पौष पौर्णिमेस देवाची यात्रा भरते आणि या निमित्ताने देवाची पालखी काढली जाते. या सोहळ्यात परिसरातील असंख्य भाविक सहभागी होतात. याच दिवशी येथे विशेष भजन-कीर्तन, महाप्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. येथील घोडपदेव हे हनुमानाचे रूप असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने हनुमान जयंतीचा सोहळाही मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. भाविक सकाळी ६:३० ते रात्री ८:३० या कालावधीत दर्शन घेऊ शकतात.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

घोपदेव मंदिर,

केशव बोरकर चाल, घोपदेव, रे रोड, मुंबई

Back To Home