रेणुका देवीच्या प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले प्रसिद्ध देवालय बुलडाणा जिल्ह्यातील रोहडा येथे आहे. येथील रेणुका देवी तपोवन देवी म्हणून प्रख्यात आहे. चिखली येथील रेणुका देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या स्वामी बचानंद यांच्या शिष्याने येथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली. जागृत देवता असा लौकिक असलेली तपोवन देवी पंचक्रोशीतील असंख्य भाविकांची आराध्यदेवता आहे. नवरात्रोत्सवादरम्यान या मंदिरात होणारा दीपोत्सव संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे.
जगत्कल्याणासाठी अनादी काळापासून माहूरक्षेत्री विराजमान असलेली रेणुकामाता राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राजकन्या, ऋषीपत्नी, वीरमाता अशा विविध रूपांसाठी प्रसिद्ध असलेल्या रेणुका मातेची राज्यभरात अनेक मंदिरे आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही रेणुका मातेची अनेक प्राचीन देवालये आहेत. जिल्ह्यातील चिखली येथील रेणुका मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या स्वामी बचानंद यांचा शिष्य परिवार मोठा होता. त्यामध्ये देवानंद, परमानंद, शिवानंद, नागानंद यांचा समावेश होता. त्यापैकीच अनेक शिष्यांनी गुरूंच्या आज्ञेवरून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रेणुका मातेची मंदिरे उभारली.
या शिष्यांपैकी एक असलेल्या नारायण स्वामी यांनी रोहडा येथे या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
पौराणिक समजुतीनुसार प्राचीन काळी हे क्षेत्र घनदाट अरण्याने वेढलेले होते आणि अनेक ऋषी-मुनींनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती. या पवित्र तपोभूमीमध्ये देवीचे वास्तव्य असल्याने तिला तपोवन देवी किंवा तपोनिधी असे नाव पडले. ही देवी भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आणि संकटात रक्षण करणारी माता मानली जाते. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील लखुजी राजे जाधव हे मोहिमांवर जाण्यापूर्वी या मंदिरात मुक्काम करत असत. देवीची मूळ मूर्ती पाषाणात घडवलेली आहे. काही वर्षांपूर्वी या मूर्तीसमोरच आणखी एका तांदळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक वर्षे हे मंदिर वंशपरंपरेने येथील सुरडकर आडनाव असलेल्या कुटुंबीयांच्या ताब्यात होते. मुघल राजवटीत या कुटुंबाला देशमुखी बहाल करण्यात आली होती. १२ मार्च १९८४ पासून हे देवालय मंदिर संस्थानाच्या ताब्यात आले. पूर्वी हे मंदिर हेमांडपंती स्थापत्यशैलीचे होते,
परंतु अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
चिखलीपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर रोहडा हे गाव आहे. मंदिरासमोरील मोकळ्या जागेत वाहनतळ आहे. दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून १६ पायऱ्या चढून या मंदिराच्या अर्धखुल्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपाच्या दोन्ही बाजूंना दीपस्तंभ आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ देवीचे वाहन असलेल्या सिंहाचे शिल्प आहे. सभामंडपाच्या मध्यभागावर होमकुंड आहे व पुढील बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना केली आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन सिंहांची शिल्पे आहेत. लाकडी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना भिंतींच्या वरील भागात काचेची मिनाकारी सजावट आहे. गर्भगृहात वज्रपीठावर तपोवन देवीची शेंदरी रंगाची, तांदळा स्वरूपातील मोठी मूर्ती आहे. या मूर्तीचे डोळे मोठे आहेत. मस्तकावर चांदीचा मुकुट आणि त्यावर चांदीचे छत्र बसवलेले आहे. देवीच्या नाकात चांदीची नथ आणि कपाळावर पांढरा टिळा लावलेला आहे.
मूर्तीच्या डाव्या बाजूला एक धातूचा त्रिशूळ व बाजूला देवीचे सेवेकरी असलेल्या भोप्यांचे दोन शेंदूरचर्चित तांदळे आहेत. देवीसमोर पादुका तसेच धातूची भोगमूर्ती आहे. तांदळ्याच्या मागील बाजूस असलेल्या प्रभावळीवर तसेच संपूर्ण गर्भगृहातील भिंतींवर आणि छतावर काचेची सुंदर कलाकुसर आहे. त्यावर शिवशंकर, गणेश, गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या आकृत्या आहेत.
मंदिराच्या गर्भगृहावर असलेले शिखर उंच आणि निमुळत्या आकाराचे आहे. शिखरावर प्रथम लहान कमानींच्या आकाराची रचना आहे व त्यांत सुंदर कोरीव काम आहे. मध्यभागावर उभ्या ओळींचे आणि पानांच्या नक्षीसारखे वैविध्यपूर्ण थर आहेत. या शिखराच्या सर्वात वरच्या टोकावर कळस आहे. मंदिर परिसरात असलेल्या छोटेखानी शिवमंदिराला लागूनच असलेल्या कुंडाला काशीतीर्थ म्हणून ओळखले जाते. या कुंडातील गोमुखातून सतत जल बाहेर पडत असते. परिसरात एक चौकोनी आकाराची प्राचीन विहीरही आहे. या विहिरीजवळ काही तांदळे आहेत.
येथे शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान अखंड दीपोत्सव होतो. या उत्सवादरम्यान नऊही दिवस येथे अकराशेहून अधिक दीप उजळत असतात. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या तपोवन देवीच्या या मंदिरात नेहमी भाविकांची वर्दळ असते. ही देवी अनेक कुटुंबांची कुलदेवता असल्याने तालुक्यातील शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या नऊ दिवसांत देवीचा दररोज विविध प्रकारे शृंगार केला जातो. यावेळी देवीला अनेक सुवर्णालंकार घातले जातात. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी मंदिरात होमहवन करण्यात येते. या उत्सवादरम्यान भाविकांना उसळीचा महाप्रसाद देण्यात येतो. याशिवाय चैत्र पौर्णिमेलाही येथे उत्सव असतो.