साकेश्वर मंदिर

साकेगाव, ता. चिखली, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेले साकेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचा एक महत्त्वाचा वारसा आहे. हे मंदिर बाराव्या किंवा तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजांच्या कार्यकाळात उभारले आहे. स्थानिक स्तरावर हे मंदिर ‘हेमांडपंती’ शैलीचे मानले जाते; मात्र वास्तुशास्त्राच्या परिभाषेत याची रचना ‘भूमिज’ शैलीतील आहे. साकेगावच्या पश्चिमेला एका शांत टेकडीच्या पायथ्याशी वसलेले हे मंदिर काळ्या पाषाणात अत्यंत सुबकपणे घडवलेले आहे. या मंदिराचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीनेही मोलाचा आहे.

१९१० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स’मध्ये या मंदिराचा विशेष उल्लेख आढळतो. तसेच प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञ हेन्री कझिन्स यांनी १९३१ मध्ये लिहिलेल्या ‘द मेडिव्हल टेम्पल्स ऑफ द डेक्कन’ या ग्रंथात या मंदिराची सविस्तर माहिती आणि तत्कालीन पडलेल्या शिखराची छायाचित्रे दिली आहेत. कझिन्स यांनी लिहिलेला हा ग्रंथ आजही मध्ययुगीन स्थापत्यकलेच्या अभ्यासकांसाठी अत्यंत मार्गदर्शक मानला जातो. या ग्रंथामध्ये त्यांनी साकेश्वर महादेव मंदिराचे ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व अतिशय नेमक्या शब्दांत मांडले आहे. कझिन्स यांच्या निरीक्षणांनुसार हे मंदिर साधारणपणे बाराव्या वा तेराव्या शतकातील आहे आणि ते देवगिरीच्या यादव राजांच्या काळातील वैभवाची साक्ष देते. साकेश्वर मंदिराची रचना प्रामुख्याने ‘भूमिज’ शैलीतील आहे. ही रचना चिखली तालुक्यातीलच सातगाव भुसारे येथील विष्णू मंदिराच्या रचनेशी तंतोतंत जुळते. कझिन्स यांनी आपल्या ग्रंथात या दोन्ही मंदिरांची तुलना करताना साकेश्वर मंदिरातील कोरीव कामाचे विशेष कौतुक केले आहे.

त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये साकेश्वर मंदिराच्या शिखराची तत्कालीन स्थिती छायाचित्रांसह नोंदवली आहे. त्या काळात मंदिराचे शिखर काही अंशी पडलेल्या अवस्थेत होते. मात्र कझिन्स यांनी केलेल्या नोंदींमुळे शिखराची मूळ रचना कशी होती ते स्पष्ट झाले. याच संदर्भाचा वापर करून पुढे पुरातत्त्व विभागाला या शिखराचे यशस्वी पुनर्निर्माण करणे शक्य झाले. मंदिराच्या सभामंडपातील स्तंभांची रचना आणि त्यावर असलेले ‘घटपल्लव’ (पूर्ण कलश व पाने) हे कोरीव काम यादवकालीन स्थापत्यकलेचे एक प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. या स्तंभांवरील भारवाहक कीचक आणि त्यांच्या विविध मुद्रांमधील शिल्पे तत्कालीन कारागिरांच्या प्रगल्भ कल्पकतेचे दर्शन घडवतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर कोरलेली गणेशाची मूर्ती आणि एकूणच प्रवेशद्वाराच्या पाच शाखांचे सौंदर्य कझिन्स यांनी वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानले आहे. कझिन्स यांच्या लेखनात साकेश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या शिलालेखाचा आणि त्यावरील ‘गद्धेगळ’ चिन्हाचाही संदर्भ येतो. हा शिलालेख मंदिराच्या प्राचीनत्वाचा आणि तत्कालीन सामाजिक-राजकीय संरक्षणाचा एक महत्त्वाचा पुरावा ठरतो. हेन्री कझिन्स यांच्या या दस्तऐजीकरणामुळे साकेश्वर मंदिराला जागतिक स्तरावर एक ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली.

गावाच्या पश्चिमेला एका लहान टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. मंदिराच्या सभोवताली शेती आहे आणि पुरातत्त्व विभागाने सुरक्षिततेसाठी मंदिराभोवती लोखंडी कुंपण घातले आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दगडी मार्गिका आहे. मंदिराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला आहे. मुख्य संरचनेत मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे भाग आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि त्याची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की वर्षातील काही दिवस उगवत्या सूर्याची किरणे गर्भगृहातील शिवलिंगावर पडतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या मुखमंडपात नंदीच्या तीन मूर्ती आहेत. त्यातील एक मूळ प्राचीन मूर्ती आहे. या नंदींच्या बाजूलाच सिंहाचे एक शिल्प कोरलेले आहे आणि मुखमंडपाच्या छतावर कमळाची आकर्षक आकृती आहे. येथील स्तंभांवर असलेले नागांचे नक्षीकाम आणि दगडी स्तंभपादांवरील विविध आकार कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देतात. मुखमंडपातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात मध्यभागी चार स्तंभांच्या मध्ये रंगशिला व छतावर वर्तुळाकार नक्षीकाम आहे. येथील चार मुख्य स्तंभांवर कीर्तिमुखे आणि भारवाहक कीचकांच्या विविध मुद्रांमधील शिल्पे कोरलेली आहेत. त्यांत स्त्रीरूपातील कीचक, शंखनाद करणारा किचक, नमस्कार मुद्रेतील कीचक व चौथ्या स्तंभावर कीचकाऐवजी गणपतीची चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात भग्नदंत, कमळ, परशू आणि मोदक आहेत. स्तंभांच्या खालच्या भागात विविध देव-देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर गणपती आणि कुबेर यांच्या मूर्ती असलेली देवकोष्टके आहेत. मंदिराचे मुख्य गर्भगृह काहीसे खोलगट भागात असल्यामुळे तिथे दोन पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर पाच नक्षीदार द्वारशाखा व ललाटबिंबस्थानी गणेशाचे शिल्प आहे. गर्भगृहात मध्यभागी साकेश्वर महादेवाची पिंड आहे.

मंदिराच्या बाह्य भिंतींची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराचे अधिष्ठान हे खूर, पद्म, उपान आणि कणी अशा विविध आडव्या थरांच्या रचनेने बनलेले आहे. या थरांमुळे मंदिराला एक भक्कम आणि भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. बाह्य भिंतींवर ठराविक अंतरावर देवकोष्टके आहेत. त्यांत नटराज, महिषासुरमर्दिनी आणि इतर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. बाह्य भिंतींवरील कोरीव कामात हत्तींच्या रांगा (गजथर) आणि मानवी जीवनातील विविध प्रसंग दर्शवणारी शिल्पे आहेत. मंदिराच्या भिंतींवरील शिल्पकाम आजही बऱ्याच अंशी सुस्थितीत असून त्यावरील लहान-लहान तपशील स्पष्टपणे जाणवतात. काळाच्या ओघात काही भागांची झीज झाली असली, तरी शिखराची भव्यता आणि भिंतींवरील कोरीव कलेचे सौंदर्य आजही टिकून आहे.

या मंदिराचे शिखर प्रामुख्याने ‘भूमिज’ शैलीमध्ये बांधलेले आहे. शिखराची रचना तळापासून वरपर्यंत अत्यंत प्रमाणबद्ध आणि लयबद्ध दिसते. या शिखरावर लहान-लहान शिखरांच्या अनेक रांगा आहेत आणि त्या वरच्या दिशेला निमुळत्या होत जातात. शिखराच्या प्रत्येक बाजूला मध्यभागी एक उभा पट्टा असून त्यावर अतिशय सूक्ष्म आणि भौमितिक नक्षीकाम केलेले आहे. या शिखराच्या अगदी वरच्या भागात आमलक आणि त्यावर कलश आहे. शिखराचा प्रत्येक थर काळ्या पाषाणात कौशल्याने कोरलेला आहे व त्यामध्ये विविध देव-देवतांच्या आकृत्यांचा समावेश आहे. शिखराच्या खालच्या भागात असलेल्या शुकनासिका भागावरही विविध पौराणिक शिल्पे कोरलेली स्पष्टपणे जाणवतात.

मंदिर परिसरात एक प्राचीन शिलालेख आहे. त्यावर देवनागरी लिपीत मजकूर कोरलेला आहे. या शिळेवर ‘गद्धेगळ’ देखील कोरलेला आहे. मंदिराच्या आजूबाजूला श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि सतीची छोटी मंदिरे आहेत. प्राचीन वारसा आणि कोरीव कलेचे संवर्धन करणारे हे मंदिर आजही आपले ऐतिहासिक महत्त्व टिकवून आहे. सध्या हे मंदिर राज्य पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहे.
या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्रीचा असतो. या दिवशी पहाटेपासून येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. महाशिवरात्रीच्या रात्री मंदिरात जागर करण्याची विशेष परंपरा आहे. यादरम्यान रात्रभर भजन, कीर्तन आणि ‘ओम नमः शिवाय’चा अखंड जयघोष चालतो. महाशिवरात्री व्यतिरिक्त श्रावणातील प्रत्येक सोमवारी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • चिखली येथून १४ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ३१ किमी अंतरावर
  • चिखली व बुलडाणा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही

साकेश्वर मंदिर

साकेगांव, चिखली, जिला. बुलढाणा

Back To Home