बुलडाणा जिल्ह्यातील जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवराच्या घनदाट वनराईत वसलेले कमळजा देवी मंदिर हे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक आकर्षणाचे केंद्र आहे. लोणारची ग्रामदेवता असलेल्या या देवीला श्रीलक्ष्मीचा अवतार मानले जाते. चालुक्य-यादव काळात हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले हे अष्टकोनी मंदिर वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. सरोवराचे पाणी खारट असतानाही या मंदिराजवळील ‘सासू-सुनेच्या विहिरीत’ गोड्या पाण्याचा प्रवाह असणे आणि मंदिराच्या परिसरात दिशादर्शक सुई दिशाहीन होणे, हे येथील मोठे भौगोलिक चमत्कार मानले जातात.
माहूरच्या रेणुका मातेसारखे स्वरूप लाभलेली ही देवी अत्यंत जागृत मानली जाते. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या परिसरावर मौर्य, सातवाहन, चालुक्य आणि यादव अशा प्रबळ राजवटींचा प्रभाव राहिला आहे. या राजवटींनी या ठिकाणचे महत्त्व ओळखून येथे विविध मंदिरांची उभारणी केली.
कमळजा देवीचे हे भव्य मंदिर १०व्या ते १२व्या शतकादरम्यान चालुक्य-यादव काळात हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधण्यात आले आहे. लोणार सरोवर परिसरात असलेल्या एकूण १६ मंदिरांपैकी सध्या केवळ हे एकच मंदिर पूर्णपणे अखंड आणि सुरक्षित अवस्थेत आहे.
हे मंदिर आणि येथील परिसर भौगोलिकदृष्ट्या एका मोठ्या आश्चर्याचा भाग आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार, लोणार सरोवराचे विवर हजारो वर्षांपूर्वी अवकाशातून आलेल्या एका अवाढव्य उल्केच्या आघातामुळे बेसाल्ट खडकात तयार झाले आहे. सुमारे १.८ किलोमीटर व्यासाच्या या विवरातील पाणी एकाच वेळी खारे आणि अल्कधर्मी आहे. हे जगातील एक नैसर्गिक आश्चर्य मानले जाते. अशा या खारट पाण्याच्या सरोवराच्या काठी हे मंदिर वसलेले असतानाही मंदिराच्या परिसरात काही वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक घटना घडतात. मंदिराच्या व्हरांड्यात दिशादर्शक चुंबकाची सुई आपली दिशा सोडून भरकटते किंवा दिशाहीन होते; हे एक मोठे रहस्य मानले जाते. तसेच या मंदिर परिसरात एक प्राचीन विहीर आहे.
ती सासू-सुनेची विहीर या नावाने प्रसिद्ध आहे. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या एका भागात गोड्या पाण्याचा प्रवाह आहे, तर सरोवराकडील भागात खारे पाणी आढळते. मध्ययुगीन काळात मुघल सम्राट अकबराच्या काळात या सरोवरातील पाण्याचा वापर करून साबण तयार करण्याचा मोठा व्यापार चालत असे. त्याची अधिकृत नोंद ‘आयन-इ-अकबरी’ या ग्रंथात सापडते.
पौराणिक कथांनुसार, जेव्हा भगवान विष्णूंनी दैत्यसूदन अवतार धारण करून पृथ्वीला त्रास देणाऱ्या लवणासुर राक्षसाचा वध केला, तेव्हा कमळजा देवी त्यांच्यासोबत शक्ती रूपात येथे उपस्थित होती. राक्षसाचा नाश झाल्यानंतर भक्तांच्या आग्रहास्तव आणि या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य पाहून देवी येथेच स्थायिक झाली, अशी भाविकांची श्रद्धा आहे. स्कंद पुराण आणि पद्म पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये या क्षेत्राचा उल्लेख लवणपुर असा आढळतो आणि देवीला पद्मावती या नावाने संबोधले गेले आहे. असे म्हटले जाते की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात असताना दंडकारण्यात आले होते, तेव्हा त्यांनी आणि सीतामातेने या ठिकाणी भेट देऊन देवीची पूजा केली होती. या देवीच्या पद्मावती नावावरूनच लोणार सरोवराला प्राचीन काळी पद्मतीर्थ असे म्हटले जात असे.
मंदिराशी संबंधित एक प्रसिद्ध लोककथा कंचनी नावाच्या शरीर विक्रय करणाऱ्या महिलेची आहे. मेहकर येथे राहणाऱ्या या महिलेची कमळजा देवीवर निस्सीम श्रद्धा होती. तिने गावात सात मजली महाल बांधला होता, जेणेकरून तिला तेथून देवीच्या मंदिरातील दीपमाळेचे दर्शन घेता येईल.
परंतु सातव्या मजल्यावरून ती खाली पडली आणि तिचे रूपांतर शिळेत झाले, असे सांगितले जाते. आजही त्या महालासमोर एक मोठी शिळा पाहायला मिळते.
वास्तुकलेच्या दृष्टीने हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय आहे. काळ्या पाषाणात बांधलेल्या व अष्टकोनाकृती असलेल्या या मंदिराच्या वरील भागाची रचना गोलाकार आहे. या मंदिराच्या वास्तुरचनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या सभामंडपात एकही आधारभूत स्तंभ किंवा खांब नाही, तरीही हे मंदिर शेकडो वर्षांपासून भक्कमपणे उभे आहे. मंदिराला तीन मुखे आहेत. त्यातील उत्तरेकडील महाद्वारातून पापनाशिनी गंगाभोगावती धारेचे दर्शन घडते. अनेक ऋषी-मुनी आणि संतांनी या धारेखाली स्नान करून देवीची आराधना केली आहे. हे ठिकाण योगसिद्धी प्राप्त करून देणारे मानले जाते. मंदिराच्या संरचनेत सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे तीन मुख्य भाग आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी राक्षसाचे कीर्तिमुख कोरलेले असून द्वारशाखेच्या दोन्ही बाजूंना सुंदर नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत.
प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणेशाचे द्वारशिल्प कोरलेले आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर विविध देवकोष्टके आहेत. ती सध्या रिक्त असली तरी त्यांच्यावरील कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडपातील भिंतींवरही अनेक देवकोष्टके असून एका कोष्टकात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. स्थानिक या मूर्तीला अष्टविनायक म्हणतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला पाच द्वारशाखा आहेत. त्यावर अत्यंत बारीक आणि सुंदर कलाकुसर केलेली आहे. गर्भगृहाच्या आत एका उंच दगडी वज्रपिठावर कमळजा देवीची काळ्या पाषाणातील, तांदळास्वरूपातील शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीला सुंदर डोळे आणि भुवया आहेत. देवीच्या नाकात नथ आणि डोक्यावर मुकुट आहे. मंदिराच्या गर्भगृहावर घुमटाकार शिखर आहे व मंदिराच्या मागील बाजूस भगवान शंकराचे एक भग्नावस्थेतील मंदिर आणि त्यासमोर नंदीची मूर्ती आहे.
मंदिराच्या परिसरातही अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. मंदिरासमोर जुनी दगडी कमान आहे आणि एका दगडी चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेल्या वाघाचे शिल्प कोरलेले आहे. या वाघाचे तोंड देवीच्या दिशेला आहे. या शिल्पाजवळ गणपतीची मूर्ती आणि दोन दगडी स्तंभ आहेत. मंदिरासमोर एक प्राचीन यज्ञकुंड आहे. येथून काही अंतरावर उघड्यावर एक शिवलिंगही पाहायला मिळते. मंदिराच्या परिसरात एक प्राचीन नरचिंचेचे झाड आहे.
भाविक आपल्या मुलांच्या जावळाचे केस एका गाठोड्यात बांधून या झाडाला टांगतात. तसेच मंदिर परिसरात शकुनाचे दोन दगड आहेत. या दगडांवर एक नाणे ठेवून त्यावर दुसरा दगड ठेवला जातो. जर तो दगड सहजपणे फिरला तर मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची समजूत आहे.
हे मंदिर लोणार वन्यजीव अभयारण्याच्या क्षेत्रात येत असल्यामुळे येथे पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून पायी प्रवास करावा लागतो. या जंगल परिसरात बिबटे, रानडुक्कर, कोल्हे आणि विविध प्रकारचे विषारी साप यांचा मोठा वावर असतो. त्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना केवळ सूर्यप्रकाशातच आणि वनविभागाने निश्चित केलेल्या पायवाटेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाते. हे मंदिर सध्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहे आणि भाविकांच्या सोयीसाठी येथे रेलिंग आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वनविभागामार्फत केली जाते. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठी जत्रा भरते. विदर्भ आणि मराठवाड्यातून अनेक भाविक देवीची ओटी भरण्यासाठी आणि दर्शनासाठी सरोवराची तीव्र उतरण पार करून या ठिकाणी येतात.