नवी मुंबईतील नियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर नोडमधील सेक्टर १२ मध्ये देवाळेश्वर मंदिर वसले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हे मंदिर परिसरातील हजारो भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. गजबजलेल्या शहरी वातावरणात हे शिवालय शांती आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. दररोज शेकडो भाविक या मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी येतात. हा देव इच्छापूर्ती करणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेषतः ज्या दाम्पत्यांना मुले होत नाहीत, असे भाविक या ठिकाणी आवर्जून नवस करायला येतात.
हिंदू धर्मशास्त्रात भगवान शिवशंकराला विश्वाचा तारणहार आणि लयाचा देव मानले जाते. पुराणानुसार शिव हा निराकार आणि अनंत आहे. शिवपुराण आणि लिंगपुराणात विशद केल्याप्रमाणे, देशात शिवाच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक म्हणून शिवलिंगाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. ‘देवाळेश्वर’ या शब्दाचा अर्थ देवांचा ईश्वर असा होतो. याच भावनेतून या मंदिरात महादेवाची उपासना केली जाते. शिव हे भोलेनाथ असून ते भक्तांच्या साध्या पूजेनेही प्रसन्न होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देशातील प्राचीन मंदिरांप्रमाणेच आधुनिक काळात बांधलेल्या या देवाळेश्वर मंदिरातही तीच वैदिक परंपरा आणि भक्तीभाव जपण्यात आला आहे.
भगवान शिवाचे हे रूप मानवी मनातील विकार नष्ट करून आत्मज्ञानाचा मार्ग दाखवते, अशी मान्यता आहे.
या मंदिराचा इतिहास खारघर शहराच्या विकासाशी जोडलेला आहे. १९९० च्या दशकानंतर सिडकोच्या माध्यमातून खारघरचा विस्तार वेगाने होऊ लागला. जसजशी या भागात नागरिकांची वस्ती वाढली, तसतशी भाविकांना एका मध्यवर्ती धार्मिक स्थळाची गरज भासू लागली. त्यातून सेक्टर १२ परिसरातील काही भाविकांनी एकत्र येऊन येथे मोठे शिवमंदिर उभारण्याचा संकल्प केला. या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी एका विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर परिसरातील भाविकांनी दिलेल्या लोकवर्गणीतून आणि देणग्यांमधून मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि वास्तूशास्त्राचे नियम पाळून हे मंदिर उभारण्यात आले आहे. काही वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर वैदिक मंत्रोपचारात या मंदिरात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज हे मंदिर खारघरमधील एक जागृत आणि महत्त्वाचे देवस्थान म्हणून ओळखले जाते.
हे मंदिर अत्यंत प्रशस्त आणि मोकळ्या जागेत वसलेले आहे. मंदिराच्या सभोवताली भक्कम आवारभिंत असून त्यात प्रवेशासाठी एक मोठी कमान आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण कमानीला तीन प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी आसनांची व्यवस्था आहे. प्रांगणातून नऊ पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. या अर्धखुल्या स्वरूपाच्या मुखमंडपात मध्यभागी असलेल्या एका चौथऱ्यावर शुभ्र संगमरवरी नंदीची मूर्ती आहे. दर्शनमंडपातून मंदिराच्या संगमरवरी फरबंदी असलेल्या सभामंडपात प्रवेश होतो. संगमरवरी फरसबंदी असलेल्या सभामंडपात मध्यभागी कासवशिल्प आहे. त्यापुढे गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी काही पायऱ्या उतरून यावे लागते. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर अखंड पाषाणातील शिवपिंड आहे. या पिंडीला तांब्याच्या पत्र्याचे आवरण आहे. त्यावर छत्र धरलेला नाग व वरच्या बाजूला एक तांब्याचे अभिषेकपात्र आहे. त्यातून पिंडीवर जलाभिषेक होत असतो. शिव हा उष्ण प्रकृतीचा देव मानला गेल्याने त्याला शांत ठेवण्यासाठी ही जलाभिषेकाची पद्धत वापरली जाते. गर्भगृहाच्या मागील भिंतीवरील एका देवळीत माता पार्वतीची मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या मुखमंडप, सभामंडप व गर्भगृहांवर शिखरे आहेत.
त्यापैकी गर्भगृहावरील मूख्य शिखर हे उरूश्रृंग प्रकारचे असून त्यावर अनेक लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. या शिखराच्या शिरोभागी एक चक्राकार मोठा आमलक व त्यावर सोनेरी कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात एक हवन मंडप व विठ्ठल-रुक्णिणीचे मंदिर आहे.
मंदिरात दररोज सकाळी ६ वाजता पूजा आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती होते. मंदिरात कार्तिक महिन्यात तुळशी विवाह साजरा केला जातो. श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची गर्दी असते. दर सोमवारी विशेष पूजा, लघुरुद्र, महारुद्र आणि भजनाचे आयोजन केले जाते. या काळात संपूर्ण मंदिर फुलांच्या माळांनी आणि विद्युत रोषणाईने सजवले जाते. महाशिवरात्र हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी येथे मोठी जत्रा असते. शहराच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर असल्यामुळे या जत्रेच्या निमित्ताने या शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले जातात. या दिवशी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागतात. महाशिवरात्रीला महादेवाचा विशेष अभिषेक आणि होमहवन केले जाते. संध्याकाळी खारघर शहरातून देवाची पालखी मिरवणूक काढली जाते. यात टाळ-मृदंगाच्या गजरात शेकडो भाविक सहभागी होतात. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरातर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते. या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, हनुमान जयंती आणि रामनवमी हे सण देखील मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात. दररोज पहाटे पाच ते दुपारी साडेबारा व सायंकाळी चार ते रात्री साडे नऊपर्यंत भाविकांना येथे देवाळेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.