पांचाळेश्वर मंदिर

रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड

रायगड जिल्ह्यातील रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंतचा समुद्रकिनाऱ्यालगतचा भाग अष्टागर म्हणून ओळखला जातो. या भागातील दक्षिणेकडील कुंडलिका खाडीवरील शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा. या गावाचे नाव श्रीकृष्णाची भावजय रेवती हिच्या नावावरून पडल्याची आख्यायिका आहे. या परिसरातील निरनिराळ्या देवतांची मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. याच भागातील एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे श्री पांचाळेश्वर मंदिर. या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच शाळुंकेत शिवशंकराची पाच शिवलिंगे आहेत.

रेवदंडा गावाचा इतिहास अत्यंत प्राचीन असून सहाव्या शतकापासून हे एक महत्त्वाचे व्यापारी बंदर म्हणून नावारूपास आले होते. पुढे पंधराव्या शतकातील निजामशाही शासकांच्या काळात व्यापाराच्या वृद्धीमुळे या बंदराचे महत्त्व अधिक वाढले. इसवी सन १५५८ मध्ये पोर्तुगीज राजवटीने या ठिकाणी रेवदंडा किल्ल्याचे बांधकाम केले. कॅप्टन सोझा याने या किल्ल्याचे मुख्य वास्तुकार म्हणून काम केले होते. रेवदंडा किल्ल्याच्या भक्कम भिंती आणि समुद्राला भिडलेले बुरुज आजही या ऐतिहासिक कालखंडाची साक्ष देतात. इसवी सन १६३६ मध्ये शहाजी महाराजांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोर्तुगीज कॅप्टनकडे या किल्ल्यात राहण्याची परवानगी मागितली होती. इसवी सन १७४० मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर हा किल्ला आणि मंदिर परिसर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला. ऐतिहासिक नोंदीनुसार चौल आणि रेवदंडा परिसरात प्राचीन काळी शेकडो मंदिरे अस्तित्वात होती.

महादेवाच्या पांचाळेश्वर या नावाचा संदर्भ महर्षी व्यास रचित महाभारत आणि शिव महापुराण या ग्रंथांमध्ये आढळतो. त्यानुसार महादेवाचे हे नाव द्वापर युगातील घटनांशी आणि थेट द्रौपदीशी जोडलेले आहे. द्रौपदी ही पांचाळ देशाची राजकन्या होती. पांचाळ देशाची असल्यामुळे तिला पांचाली या नावानेही ओळखले जात असे. द्वापर युगात जेव्हा पांडवांना वनवास आणि अज्ञातवास भोगावा लागला, तेव्हा त्यांच्यासोबत द्रौपदीही होती. या कठीण काळात संकटांवर मात करण्यासाठी पांचालीने भगवान शिवाची तपस्या केली होती. तिच्या या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिले होते. ज्या ठिकाणी भगवान शिवाने द्रौपदीला दर्शन दिले, तेथे ते शिवलिंगाच्या रूपात विराजमान झाले. काही कथांनुसार पांचालीने स्वतः तेथे शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा केली होती. पांचालीने ज्या शिवाची आराधना केली आणि जेथे शिव प्रगट झाले, त्या महादेवाला पुढे पांचाळेश्वर महादेव असे नाव पडले. पांचालीने पूजलेला महादेव या अर्थाने हे नाव सर्वत्र रूढ झाले.

एकाच ठिकाणी पाच शिवलिंगे असणे हे प्रामुख्याने सृष्टीच्या पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्त्वांनी हे विश्व साकारले असून भगवान शिव या पाचही तत्त्वांचे अधिपती आहेत. पौराणिक दृष्टिकोनातून हे शिवाच्या ‘पंचवक्त्र’ म्हणजेच पाच मुखांच्या स्वरूपाचे दर्शन घडवते. सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान ही शिवाची पाच मुखे सृष्टीची निर्मिती, पालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह या पाच दैवी कार्यांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे एकाच शाळुंखेत पाच शिवलिंगांचे दर्शन घेणे म्हणजे या वैश्विक शक्तींच्या एकत्रित रूपाची आराधना करणे होय, अशी मान्यता आहे.

रेवदंडा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील कमानदार प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशकमानीच्या वरच्या बाजूला तुलसीवृंदावन आहे, हे येथील वेगळेपण आहे. प्रांगणात उजवीकडे एका मोठ्या चौथऱ्यावर चार थरांचा दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाला सर्व बाजूंनी दिवे लावण्यासाठी दीपकोष्टके आहेत. प्रांगणातून तीन पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात मध्यभागी गोलाकार स्तंभ व भिंतींमध्ये चौकोनी स्तंभ आहेत. या सभामंडपाच्या छताला काचेचे प्राचीन दिवे व अनेक पितळी घंटा लावलेल्या आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला असलेल्या देवकोष्टकांत गणपती व श्रीकृष्ण यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर नक्षीकाम आहे व खालील बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर एका चौकोनी संगमरवरी शाळुंखेमध्ये पाच शिवपिंडी आहेत. गर्भगृहातील मागील भिंतीतील देवकोष्टकात माता पार्वतीची आसनस्थ मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहावर उरुशृंग पद्धतीचे शिखर असून त्यावर अनेक लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत.

पांचाळेश्वर मंदिरात वर्षभरात स्थानिक ब्राह्मण समाजाच्या वतीने अनेक महत्त्वाचे सण आणि धार्मिक उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्री हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागतात आणि महादेवाला अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या आवारात विशेष पूजा आणि आरत्यांचे आयोजन करण्यात येते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी होते. या काळात मंदिराला फुलांची सजावट केली जाते आणि भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दसरा आणि दिवाळीच्या काळात मंदिराच्या परिसरात दिव्यांची रोषणाई केली जाते. दररोज सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना येथे पांचाळेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • अलिबाग येथून २० किमी अंतरावर
  • रेवदंडा बस स्थानकापासून पायी ५ मिनिटांच्या अंतरावर
  • अलिबाग व मुरूड येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

पंचलेश्वर मंदिर

रेवदांडा, तहसील अलीबाग, जिला रायगढ़

Back To Home