फुलाई देवी मंदिर

सासवणे, ता. अलिबाग, जि. रायगड

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले सासवणे गाव जगप्रसिद्ध शिल्पकार नानासाहेब करमरकर यांच्या शिल्पसंग्रहामुळे देश-विदेशात ओळखले जाते. याच गावात स्थानिक कोळी आणि आगरी समाजाचे श्रद्धास्थान असलेले फुलाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. गावच्या स्थापनेपासूनच ही देवी कोकण किनारपट्टीची रक्षिका आणि संकटकाळात रक्षण करणारी देवता असल्याचे मानले जाते. ऐतिहासिक संदर्भांनुसार, अलिबाग परिसरातील किल्ल्यांच्या आणि आरमाराच्या रक्षणासाठी ही देवी आशीर्वाद देणारी ठरली, असा उल्लेख काही स्थानिक बखरींमध्ये आढळतो.

स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात आलेल्या उल्लेखानुसार, परशुरामाने कोकण भूमीची निर्मिती केल्यानंतर या प्रदेशाच्या संरक्षणासाठी विविध ठिकाणी शक्तीरूपांची स्थापना केली, त्यापैकीच फुलाई देवीला एक जागृत शक्तीपीठ मानले जाते. पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी या प्रदेशाात एका उन्मत्त असुराने ऋषीमुनींच्या यज्ञात आणि प्रजेच्या जीवनात अडथळे निर्माण केले होते. या संकटातून मुक्त होण्यासाठी महर्षींनी आदिशक्तीची आराधना केली आणि त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी प्रकट झाली. ज्यावेळी देवीचे आगमन झाले, तेव्हा संपूर्ण परिसर सुवासिक फुलांनी बहरून गेला आणि आकाशातून फुलांचा वर्षाव झाला. निसर्गातील या बदलामुळे देवीला ‘फुलाई’ हे नाव प्राप्त झाले. देवीने आपल्या तेजस्वी शक्तीने त्या असुराचा पराभव करून या प्रदेशाला भयमुक्त केले. सागरतटावर वसलेल्या अशा देवतांना ‘सिंधुरक्षक’ असेही संबोधले जाते. त्या समुद्रातून येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून गावकऱ्यांचे रक्षण करतात.

सासवणे गाव नारळ आणि सुपारीच्या बागांनी वेढलेले असून हे मंदिर अलिबाग या तालुक्याच्या शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून जलमार्गाने मांडवामार्गे येथे साधारण दीड तासात पोहोचता येते. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराच्या वाटेवर एक सुंदर कमान आहे. या कमानीपासून मंदिरापर्यंत पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेला रस्ता करण्यात आलेला आहे. येथून सात ते आठ पायऱ्या चढून मंदिरासमोरील प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात एक दीपस्तंभ आहे. दर्शनमंडप, मंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील दर्शनमंडप आणि मंडप हे अर्धखुल्या स्वरूपाचे आहेत. या मंडपातून चार पायऱ्या चढून उंच चौथऱ्यावर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथील मोठ्या आणि बंदिस्त सभामंडपात संगमरवरी फरसबंदी आहे. त्यापुढे प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात एका वज्रपिठावर सुंदर संगमरवरी मखरामध्ये फुलाई देवीची मूर्ती आहे. विविध वस्त्रे आणि अलंकार ल्यालेल्या या मूर्तीवर धातूचा मुखवटा आणि डोक्यावर मुकुट आहे. या मूर्तीच्या उजवीकडे आणखी एक लहान संगमरवरी मखर आहे. त्या मखरात गणेशाची मूर्ती आहे. देवीच्या मूर्तीसमोर वज्रपिठाच्या खालच्या बाजूला देवीच्या पादुका आहेत. मंदिराच्या सभामंडपावर आणि गर्भगृहावर दोन स्वतंत्र शिखरे आहेत. चौकोनी आकाराची आणि खालून वरच्या बाजूला निमुळती होत जाणाऱ्या या शिखरांवर अनेक लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. दोन्ही शिखरांच्या शिरोभागी दोन आमलक आणि त्यावर कळस आहेत.

या मंदिरात वर्षभर विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये नवरात्रोत्सवाचे स्वरूप अत्यंत भव्य असते. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा व अभिषेक केला जातो आणि नवमीला होम-हवन पार पडते. उत्सव काळात माहेरवाशिणी देवीची ओटी भरतात. उत्सव काळात सायंकाळी होणाऱ्या महाआरतीला देवीला साडी नेसवण्यासाठी भाविकांना आगाऊ नोंदणी करावी लागते. चैत्र महिन्यात देवीची मोठी यात्रा भरते आणि याच वेळी गावटाकणी हा महत्त्वाचा विधी पार पडतो. या दिवशी सर्व ग्रामस्थ गावाच्या वेशीला फेरी मारतात आणि हा दिवस परिस्थितीनुसार ठरवला जातो. माघ शुद्ध षष्ठी हा मंदिराचा वर्धापन दिन असून या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. मंदिर समितीकडून यावेळी भाविकांना महाप्रसाद दिला जातो. दुसरी मोठी यात्रा नारळी पौर्णिमेच्या दिवशी भरते. त्यावेळी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मंदिरात नवसपूर्तीनंतर तुला करण्याची विशेष पद्धत आहे. भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे स्वतःच्या वजनाइतकी फळे, फुले, मिठाई किंवा साखर देवीला अर्पण करतात. दररोज सकाळी सात ते दुपारी एक व सायंकाळी चार ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात फुलाई देवीचे दर्शन घेता येते.

फुलाई देवीच्या या मंदिराशिवाय सासवणे हे गाव जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री नानासाहेब करमरकर यांच्या शिल्पसंग्रहामुळे सर्वत्र प्रख्यात आहे. नानासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या मूळ निवासस्थानाचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले. येथे त्यांनी स्वतः घडवलेली सुमारे १५० हून अधिक शिल्पे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. ही शिल्पे ब्रॉन्झ, सिमेंट आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस या माध्यमांतून तयार केलेली असून ती अत्यंत जिवंत वाटतात. या संग्रहालयातील ‘हिरा’ नावाच्या कोळी कन्येचे शिल्प जगभरात नावाजले गेले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, विविध प्राणी आणि थोर व्यक्तींची वास्तववादी शिल्पे येथे पाहता येतात. नानासाहेबांच्या कलेचा हा दुर्मिळ वारसा आजही त्यांच्या कुटुंबाने तितक्याच आपुलकीने जतन केला असून हे दालन पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.

उपयुक्त माहिती

  • अलिबागहून १८ किमी अंतरावर
  • अलिबागहून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : गुरव, मो. ९६७३०२९५९६, ९४२०३२५२७६

फुलई देवी मंदिर

सासवने, ताल. अलीबाग, जिला. रायगढ़

Back To Home