प्राचीन इतिहास असलेल्या मलकापूर शहरातील कुलमखेड परिसरातील भुलेश्वर संस्थान प्रसिद्ध आहे. या मंदिर संकुलात सव्वाशे वर्षांपूर्वीचे दत्तात्रेयांचे मुख्य मंदिर आहे. येथे गणेश, शनिदेव, श्रीराम, संतोषीमातेसह विविध देवदेवतांचे दर्शन घडते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिर संकुलात भुलेश्वर महादेव मंदिर तसेच गजानन महाराजांचे मंदिरही आहे. गजानन महाराजांचे शिष्य गंगाभारती यांचे समाधिस्थळही येथे आहे. दत्तजयंतीसह विविध सण-उत्सवांप्रसंगी येथे भाविकांची मांदियाळी असते.
अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत विसावलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर हा महत्त्वाचा तालुका आहे. नलगंगा नदीच्या काठावर वसलेल्या मलकापूरला प्राचीन इतिहास आहे. ‘आईन-इ-अकबरी’मध्येही मलकापूरचा उल्लेख आहे. त्यावेळी ते नरनाळा सरकारातील परगण्याचे ठिकाण होते. खानदेशवर पूर्वी फारुकी राजांचे राज्य होते. तत्कालीन फारुकी राजाने हे शहर वसवले. त्या राजाला मलिका नावाची मुलगी होती. या राजकन्येच्या नावावरून मलकापूर हे नाव पडल्याची दंतकथा आहे.
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. वि. भि. कोलते यांनी मलकापूर या ग्रामनावाच्या व्युत्पत्तीबाबत संशोधन करताना असे मत मांडले आहे की मलकापूर येथे मल्लिकेचे प्राचीन देवस्थान आहे. मल्लिकार्जुनाचेही येथे पुरातन देवालय आहे. त्यावरून मल्लिका + पूर = मल्लिकापूर असे या गावाचे नाव पडले. ‘मलकापूर’ हा त्याचा अपभ्रंश आहे. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्येही या मंदिराचा उल्लेख आहे. या गावाभोवती १७२९ मध्ये मुहम्मद मलीखान याच्या काळात बांधलेली तटबंदी आजही अस्तित्वात आहे. नळगंगा नदीमुळे या शहराचे साळीपुरा व पारपेठ या दोन भागांमध्ये विभाजन झाले आहे. पारपेठ आणि मलकापूरला जोडणारे दोनही पूल नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांनी बांधले होते. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग हे नांदेडला जाण्यापूर्वी साळीपुरा परिसरात काही दिवस मुक्कामाला होते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या उद्देशाने शहरात दहा एकर जागेत गुरुद्वाराही उभारण्यात आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भातील राजकीय चळवळीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले मलकापूर हे शहर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांत आपले वेगळेपण टिकवून आहे.
या शहरात दुर्गादेवी मंदिर, राजे नेमिवंतांचे श्रीराम मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, गौरीशंकर मंदिर आदी प्राचीन मंदिरे आहेत. शहरातील गांधी चौकात वसलेल्या भुलेश्वर संस्थानातील दत्तमंदिर त्यापैकीच एक आहे. हे दत्तमंदिर १८९९ मध्ये उभारण्यात आले. येथील शनिमंदिरही शंभर वर्षांहून अधिक प्राचीन आहे. येथील हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना १९१० मध्ये करण्यात आली. येथे गजानन महाराजांचे शिष्य गंगाभारती यांचीही समाधी आहे. गंगाभारती यांना कुष्ठरोग झाला होता; मात्र गजानन महाराजांच्या कृपेमुळे तो बरा झाला. त्यानंतर गजानन महाराजांच्या आज्ञेनुसार ते मलकापूर येथे स्थायिक झाले, अशी आख्यायिका आहे. या संकुलात असलेली त्यांची समाधी १९१५ मध्ये बांधण्यात आली. २६ डिसेंबर १९७१ रोजी या संकुलात गजानन महाराजांचे मंदिर बांधण्यात आले. या संकुलात शिवमंदिरही आहे. काही वर्षांपूर्वी येथे श्रीराम मंदिरही उभारण्यात आले आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिर संकुलाच्या प्रांगणात प्रवेश होतो.
प्रांगणात उजव्या बाजूला असलेल्या भिंतींवर श्रीराम मृगाची शिकार करतानाचे चित्र रेखाटण्यात आले आहे. येथील दत्त मंदिरात दत्तात्रेयांची त्रिमुखी संगमरवरी मूर्ती आहे. सहा हात असलेल्या या मूर्तीच्या हातांत जपमाळ, कमंडलू आणि त्रिशूळ आहेत. या मूर्तीच्या डाव्या चरणाजवळ गाय तर उजव्या चरणाजवळ श्वान आहे. मूर्तीच्या मागील बाजूस प्रभावळ आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला नमस्कार मुद्रेत असलेली देवीची बैठी मूर्ती आहे, तसेच उजव्या बाजूला काही इतरही मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला महिरपी कमानी असलेला मोठा सभामंडप आहे. येथे हनुमानाची मूर्ती तसेच गणेश मंदिर आहे. या संकुलातील शिवालयात अष्टकोनी शाळुंकेत छोटे शिवलिंग आहे. या गर्भगृहासमोर नंदीची दगडी मूर्ती आहे. येथील गर्भगृहाच्या मध्यभागी संतोषीमातेची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे दुर्गादेवीची तर डावीकडे राधा-कृष्णाच्या मूर्ती आहेत. संकुलातील राममंदिरात मध्यभागी श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डावीकडे स्वामी समर्थ तर उजवीकडे साईबाबांच्या मूर्ती विराजमान आहेत. या संकुलात अलीकडेच नूतनीकरण करण्यात आलेले गजानन महाराज मंदिर आहे. सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात मोठ्या वज्रपिठावर गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. या संकुल परिसरातच गंगाभारती यांचे समाधिस्थळ आहे. मंदिर संकुलाला लागून शनिदेवाचे मंदिर आहे.
शहरातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथील शनिमंदिरात शनिवारी भाविकांची गर्दी असते. अमावास्येला येथे शनिदेवाला अभिषेक करण्यासाठी अनेक लोक येतात. या मंदिर संकुलात दत्तजयंती, महाशिवरात्र, हनुमान जयंती, गणेशोत्सव, शारदीय नवरात्रोत्सव तसेच गजानन महाराज प्रगटदिन आदी उत्सव साजरे केले जातात.
मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिर संकुलाच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजव्या बाजूला असलेल्या भिंतींवर श्रीराम मृगाची शिकार करतानाचे चित्र रेखाटण्यात आले आहे. येथील दत्त मंदिरात दत्तात्रेयांची त्रिमुखी संगमरवरी मूर्ती आहे. सहा हात असलेल्या या मूर्तीच्या हातांत जपमाळ, कमंडलू आणि त्रिशूळ आहेत. या मूर्तीच्या डाव्या चरणाजवळ गाय तर उजव्या चरणाजवळ श्वान आहे. मूर्तीच्या मागील बाजूस प्रभावळ आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला नमस्कार मुद्रेत असलेली देवीची बैठी मूर्ती आहे, तसेच उजव्या बाजूला काही इतरही मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला महिरपी कमानी असलेला मोठा सभामंडप आहे. येथे हनुमानाची मूर्ती तसेच गणेश मंदिर आहे. या संकुलातील शिवालयात अष्टकोनी शाळुंकेत छोटे शिवलिंग आहे. या गर्भगृहासमोर नंदीची दगडी मूर्ती आहे. येथील गर्भगृहाच्या मध्यभागी संतोषीमातेची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे दुर्गादेवीची तर डावीकडे राधा-कृष्णाच्या मूर्ती आहेत. संकुलातील राममंदिरात मध्यभागी श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डावीकडे स्वामी समर्थ तर उजवीकडे साईबाबांच्या मूर्ती विराजमान आहेत. या संकुलात अलीकडेच नूतनीकरण करण्यात आलेले गजानन महाराज मंदिर आहे. सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात मोठ्या वज्रपिठावर गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. या संकुल परिसरातच गंगाभारती यांचे समाधिस्थळ आहे. मंदिर संकुलाला लागून शनिदेवाचे मंदिर आहे.
शहरातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथील शनिमंदिरात शनिवारी भाविकांची गर्दी असते. अमावास्येला येथे शनिदेवाला अभिषेक करण्यासाठी अनेक लोक येतात. या मंदिर संकुलात दत्तजयंती, महाशिवरात्र, हनुमान जयंती, गणेशोत्सव, शारदीय नवरात्रोत्सव तसेच गजानन महाराज प्रगटदिन आदी उत्सव साजरे केले जातात.