जगदंबा माता मंदिर

भादोला, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा

‘विश्वाची आई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगदंबा मातेची बुलडाणा जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचे देवस्थान बुलडाणा शहराजवळील भादोला येथे आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या जागृत मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक येतात. रंगपंचमीपासून येथे भरणारी देवीची पाचदिवसीय यात्रा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सुमारे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेदरम्यान काढण्यात येणारे ‘देवीचे सोंग’ हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे, तशीच ती शक्तीच्या उपासनेचीही भूमी मानली जाते. राज्यातील मातीच्या कणाकणात आई जगदंबेचे अस्तित्व असल्याचे जाणवते. सह्याद्रीच्या रांगा आणि अरबी समुद्राच्या सान्निध्यात वसलेल्या या राज्यात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची भवानी माता आणि वणीची सप्तशृंगी माता ही राज्यातील प्रमुख श्रद्धास्थाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारी तुळजापूरची भवानी माता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानली जाते. नाशिकच्या वणी गडावर अठरा हातांची जगदंबा सप्तशृंगी माता म्हणून विराजमान आहे. तिच्या दर्शनाने भक्तांची दुःखे दूर होतात, अशी मान्यता आहे. महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृती जगदंबेच्या आराधनेशिवाय अपूर्ण मानली जाते. संबळ आणि डफाच्या तालावर जेव्हा गोंधळी ‘आई जगदंबेचा उदो उदो…’ असा जयघोष करतात, तेव्हा संपूर्ण वातावरणात एक चैतन्य निर्माण होते.

बुलडाणा जिल्ह्यात शेंदळा, सव, पिंपळगाव देवी, सुलज, वानखेड, जानेफळ, शिवणी टाका येथे देवीची जागृत स्थाने आहेत. भादोला येथील मंदिर हे त्यापैकीच एक होय. ही देवी या गावात नेमकी केव्हा वसली, याचा लेखी इतिहास उपलब्ध नाही. या मंदिराजवळच एक प्राचीन बारव आहे. काही वर्षांपूर्वी त्यातील गाळ उपसताना तेथे अनेक शिवकालीन नाणी सापडली होती. त्यामुळे हे मंदिर शिवकालीन असावे, असा अंदाज वर्तवण्यात येतो. पूर्वी हे मंदिर छोटेखानी व दगडी बांधकाम असलेले होते. अलीकडेच झालेल्या जीर्णोद्धारादरम्यान मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. राज्य सरकारने या मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा बहाल केला आहे.

चारही बाजूंना डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या मंदिरापासून काही अंतरावरच एक छोटा तलाव आहे. गावातील बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर, निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेले आहे. मंदिराभोवती आवारभिंत आहे. या भिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर दोन्ही बाजूंना चौथऱ्यांवर दीपस्तंभ आहेत. या दीपस्तंभांच्या वरच्या बाजूला दिवे लावण्यासाठी देवकोष्टकांची रचना आहे. या दीपस्तंभांच्या मध्यभागी मंदिराच्या समोर होमकुंड व काही शेंदूरचर्चित शिळा आहेत. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. दर्शनमंडपात मध्यभागी देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. जीर्णोद्धारादरम्यान सभामंडपात मधोमध असलेल्या गर्भगृहाचे दगडी बांधकाम कायम ठेवण्यात आले आहे. गर्भगृहाला चौकोनी आकाराचे छोटे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे. गर्भगृहात एका मोठ्या वज्रपीठावर देवीची तांदळा स्वरूपातील शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीवर भुवया, डोळे, नाक, ओठ कोरण्यात आले आहेत. देवीच्या नाकात नथ व डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. या मंदिराच्या गर्भगृहावर घुमटाकार शिखर, त्यावर आमलक व कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात हनुमानाचे लहानसे मंदिर आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासव्यवस्थेसाठी येथे भक्तनिवास आहे.

रंगपंचमीपासून पाच दिवस येथे देवीची मोठी यात्रा भरते. रंगपंचमीच्या दिवशी गावातून रंगाचा गाडा काढून ग्रामस्थ रंगांची उधळण करतात. त्यानंतर मंदिरात घटस्थापना करण्यात येते. त्या दिवशी सायंकाळपासून पुढील चार दिवस गावात विविध देव-देवतांची सोंगे काढण्यात येतात. या सोंगांची घरोघरी पूजा करण्यात येते. या काळात मंदिरात विविध धार्मिक विधी होतात. चौथ्या दिवशी मंदिरात देवीला शेंदूर चढवण्यात येतो. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. रात्री डफड्यांच्या निनादात देवीचे ताट काढण्यात येते आणि देवीची पूजा केली जाते. याचवेळी, दुसऱ्या दिवशी (एकनाथ षष्ठी) गावातून निघणाऱ्या शोभायात्रेत देवीचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीची निवड करण्यात येते. या शोभायात्रेत देवीचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीची मंदिरासमोर पूजा करण्यात येते. त्यानंतर गावातून त्याची मिरवणूक काढण्यात येते. शोभायात्रेच्या स्वागतासाठी गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात येते. गावातील महिला सोंगाची पूजा करून खणा-नारळाने ओटी भरतात. तत्पूर्वी या ओटीची घरातील देवघरात पूजा केली जाते. या यात्रेला गावात दिवाळीपेक्षाही मोठे महत्त्व आहे. त्यामुळे नोकरी-व्यवसायानिमित्त विविध भागांमध्ये स्थायिक झालेली गावातील मंडळी या यात्रेसाठी आवर्जून गावात येतात. या यात्रेदरम्यान देवीची ओटी भरण्यासाठी माहेरवाशिणीही येतात. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान नऊही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्यानिमित्तही मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह पार पडतो.

उपयुक्त माहिती:

  • बुलडाणा येथून ८ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा आहे

जगदंबा माता मंदिर

भदोला, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा

 

Back To Home