सोमनाथ महादेव मंदिर

डोंगराशेवली, ता. चिखली, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यात महादेवाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकीच एक पुरातन मंदिर चिखली तालुक्यातील डोंगराशेवली येथे आहे. ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या या गावातील हे मंदिर पूर्वी हेमाडपंती स्थापत्यशैलीत होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारादरम्यान मूळ वास्तू पाडून त्याजागी नवे मंदिर उभारण्यात आले. नावाप्रमाणेच डोंगरात वसलेल्या या गावातील सोमनाथ महादेवाच्या जागृत शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक येतात. चैत्र महिन्यात ‘आमली बारस’ च्या मुहूर्तावर येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ‘शिळ्या यात्रे’ दरम्यान निघणारे देवीचे सोंग हे येथील मुख्य आकर्षण असते.

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर नेमके केव्हा बांधण्यात आले, याबाबतचे लेखी पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, यादव राजवटीदरम्यान हेमाडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. हे स्थान दरीत असल्याने पूर्वी येथे घनदाट जंगल होते. या मंदिराच्या परिसरात अनेक वर्षांपूर्वी सोमनाथ महाराज नावाच्या तपस्व्याने तप केले. त्यामुळे या मंदिराला सोमनाथ महादेव मंदिर असे नाव पडले. शेगावच्या गजानन महाराजांनीही या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतल्याची आख्यायिका आहे. मंदिराची जुनी वास्तू जीर्ण झाल्याने काही वर्षांपूर्वी ती पाडून नवे मंदिर बांधण्यात आले. ‘बुलडाणा डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’मध्ये या मंदिराची माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने या मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा दिला आहे.

गावापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराकडे येण्याच्या मार्गावर आजूबाजूला हिरवीगार शेते तसेच वृक्षांचे दर्शन होते. मंदिर परिसरातही अजानवृक्ष, टेंभुर्णीसह विविध प्रकारची झाडे आहेत. मंदिरासमोरील दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात पुरातन वटवृक्ष आहे. मंदिरासमोर जुन्या मंदिराच्या स्तंभांपैकी एक स्तंभ आहे. त्यावर कासवमूर्ती विराजमान आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. या मंडपातील बाह्यबाजूचे स्तंभ कमानींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. येथील छताजवळील भागामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची चित्रे रंगवण्यात आली आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात शिवशंकरांची मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराजवळ अंतराळात एका चौथऱ्यावर नंदीची पाषाणात घडवलेली मूर्ती आहे. येथून सुमारे आठ पायऱ्या उतरून खोलवर असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात गणेशाचे शिल्प आहे. मोठ्या आकाराच्या या गर्भगृहात मध्यभागी सोमनाथ महादेवाची पिंडी आहे. या पिंडीवर शिवशंकरांचा पंचमुखी पितळी मुखवटा आहे. येथील शाळुंकेवरही पितळी पत्र्याचे आवरण आहे. या पत्र्यावर शंख व नाग कोरण्यात आले आहेत. शिवलिंगावर मोठ्या नागाने छत्र धरलेले आहे. शिवलिंगाच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीवरील देवकोष्टकात पार्वतीमातेची मूर्ती आहे.

मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे. छतावरील बाशिंगी कठड्यावर दोन मोठे चौकोनी स्तर आहेत. येथील देवकोष्टकांमध्ये शिवशंकरांच्या मूर्ती आहेत. त्यावरील भागात कळसाची प्रतिकृती आहे. मधोमध मोठ्या आमलकावर कळस आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमानाचे छोटे मंदिर आहे. मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्गावर रांगेच्या व्यवस्थापनासाठी कठडे बसवण्यात आले आहेत. या परिसरात धर्मशाळा तसेच भक्तनिवासही आहे. मंदिराच्या परिसरात असलेल्या दगडी आवारभिंतीमध्ये जुन्या मंदिराचे काही अवशेष आहेत. आवारभिंतीवरील देवकोष्टकांमध्ये गणेश, हनुमानासह विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. आवारभिंतीच्या मधोमध वर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. येथे दुर्गामातेचे छोटे मंदिर आहे. या मंदिरात सिंहावर स्वार झालेल्या अष्टभुजा देवीच्या हातांमध्ये विविध आयुधे आहेत. तसेच, देवीचा एक हात अभय मुद्रेत आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला एक प्राचीन कुंडही आहे. दगडी बांधकाम असलेल्या या कुंडाला लागूनच एक विहीर आहे. कुंडामध्ये एक गोमुखही कोरलेले आहे. या कुंडाजवळून ज्ञानगंगा नदीचा छोटा प्रवाह वाहत असतो. या कुंडाच्या पलीकडील भागात एक गुहा आहे. या गुहेतून पुढे असलेल्या वरवंड गावात जाता येते, असे सांगितले जाते.

सोमनाथ महादेवाचे शिवलिंग जागृत आहे, त्याच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. महाशिवरात्रीनिमित्त येथे मोठा उत्सव होतो. या दिवशी पंचक्रोशीतील शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. चैत्र महिन्यातील ‘आमली बारस’च्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. यात्रेनिमित्त आसपासच्या गावांतूनही येथे दिंड्या येतात. रात्री मंदिरात भजन व कीर्तन होते. या दिवशी भाविकांना २१ क्विंटल गव्हाच्या पुऱ्या, वांग्याची भाजी तसेच शिऱ्याचा महाप्रसाद देण्यात येतो. दुसऱ्या दिवशी ‘शिळी यात्रा’ भरते. त्या दिवशी देवीचे सोंग काढण्यात येते. गावातील सावळे कुटुंबाला हे सोंग काढण्याचा मान देण्यात आला आहे. सकाळी देवीची पूजा झाल्यावर सोंगाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सोमनाथ महादेवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात. कार्तिक पौर्णिमेनिमित्त येथे मोठा दीपोत्सव होतो. या दिवशी मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघतो.

उपयुक्त माहिती:

  • चिखली येथून २२ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून २० किमी अंतरावर
  • बुलडाणा व चिखली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

सोमनाथ महादेव मंदिर

डोंगराशेवली, चिखली, जिला। बुलढाणा

Back To Home