जगदंबा मंदिर

वानखेड, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा

सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत आणि वान नदीच्या तीरावरील वानखेड येथे विराजमान आई जगदंबेचे जागृत स्थान जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध आहे. महाकाली, महालक्ष्मी व सरस्वती या तीन शक्तीरूपांच्या मूर्ती येथे प्रतिष्ठित आहेत. या मंदिराचे वेगळेपण म्हणजे देवीच्या ‘माहेरपणाची’ अनोखी परंपरा. दरवर्षी पौष पौर्णिमेला देवींच्या मूर्ती नदीच्या ऐलतीरावरील गावातून पैलतीरावरील टेकडीवर असलेल्या मूळ मंदिरात एका महिन्यासाठी वास्तव्याला जातात. त्या ठिकाणाला देवीचे माहेर मानले जाते. या निमित्ताने येथे चार दिवसांची मोठी यात्रा भरते. मंदिराच्या प्रांगणातील पाच मजली देखणी अष्टकोनी दीपमाळ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे आले असताना त्यांच्या रसाळ वाणीतून स्फुरलेले ‘जिवाभवानी जवा मी पाहिलं…’ हे भजन या क्षेत्राचे आध्यात्मिक व स्थापत्यविषयक श्रेष्ठत्व अधोरेखित करते.

वानखेड हे गाव ‘वानखेड दुर्गादैत्य’ तसेच ‘पातुर्डा वानखेड’ या नावांनीही ओळखले जाते. या गावात नदीच्या पैलतीरावर, उत्तर दिशेकडील टेकडीवर एका छोट्या उंचवट्यावर देवीचे मूळ मंदिर आहे. या मंदिराच्या आसपास पूर्वी लोकवस्ती होती, मात्र प्राचीन काळी आलेल्या प्लेगच्या साथीनंतर येथील वस्ती कमी होऊ लागली. गावातील लोकांनी नदीच्या पलीकडील भागात घरे बांधल्याचे सांगितले जाते. शिवाजी महाराजांच्या राजवटीदरम्यान या गावातील शक्तिउपासक अमृतराव देशमुख यांना देवींनी दृष्टांत दिला आणि गावात आपल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. त्यानंतर गावात मंदिर उभारून जुन्या मंदिरातील मूर्तींची येथे प्रतिष्ठापना करण्यात आल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ मध्येही या मंदिराची माहिती देण्यात आली आहे. १९४५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वानखेड येथे आले असताना त्यांच्या मुखातून ‘जिवाभवानी जवा मी पाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं…’ हे लोकप्रिय भजन स्फुरले. त्याकाळी वानखेड व परिसरातील पन्नास हजारांहून अधिक लोक त्यांचे भजन ऐकण्यासाठी जमले होते, असा उल्लेखही या गॅझेटियरमध्ये आढळतो.

टेकडीवर असलेल्या मूळ मंदिरात येण्यासाठी काही पायऱ्या लागतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रांगणात उजव्या बाजूला अष्टकोनी पाच टप्प्यांची वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ आहे. वानखेड येथील ही दीपमाळ मराठाकालीन स्थापत्यशैलीचा एक सुंदर नमुना समजली जाते. जमिनीपासून आकाशाकडे झेपावणाऱ्या या दीपमाळेची रचना अष्टकोनी आहे आणि ती अनेक मजल्यांमध्ये विभागलेली आहे. खालच्या बाजूला विस्तारलेली ही वास्तू वरच्या दिशेला जाताना हळूहळू निमुळती होत गेलेली दिसते. या दीपमाळेच्या प्रत्येक बाजूला असलेले सुबक कमानदार कोनाडे व देवकोष्ठके तिच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. या वास्तूच्या विविध टप्प्यांवर असलेले छोटे शोभिवंत घुमट आणि त्यावरील बारीक कलाकुसर त्या काळातील प्रगत वास्तुकलेची साक्ष देतात. वरपर्यंत जाण्यासाठी या दीपमाळेच्या आतून जिना बांधण्यात आला आहे. या दीपमाळेच्या वरच्या शिखरावर असलेला छोटा घुमट आणि त्यावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज वानखेडच्या आध्यात्मिक परंपरेची पताका उंचावतो.

या दीपमाळेच्या समोर प्रांगणात विटा व चुन्याचा वापर करून बांधकाम केलेले छोटेखानी मंदिर आहे. मंदिरासमोर पत्र्याचे छप्पर असलेला मंडप आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारानजीकच्या भिंतींवर दोन्ही बाजूंना देवकोष्ठके आहेत. गर्भगृहासमोर स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहे. या गर्भगृहात देवींच्या तीन मूर्ती आहेत. त्यापैकी एक मूर्ती चतुर्भुज स्वरूपातील महिषासूरमर्दिनी आहे. अन्य दोन मूर्ती काळ्या पाषाणातील द्विभुजा आहेत. त्यापैकी सरस्वतीची मूर्ती नदीपात्रात वाहून आली होती, असे सांगण्यात येते. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमेपर्यंत या मूर्ती टेकडीवरील मंदिरात आणल्या जातात. त्या काळात गावातील मंदिरातील गर्भगृह रिकामे असते. इतर अकरा महिने टेकडीवरील मंदिराच्या गर्भगृहात देवींची प्रतिमा असते. या मंदिरावर घुमटाकार शिखर आहे.

गावातील मंदिराचे स्वरूप सभामंडप आणि गर्भगृह असे आहे. सभामंडपाबाहेर मोठा मंडप आहे. सभामंडपात विठ्ठल-रखुमाई, गजानन महाराज व गणपती यांच्या मूर्ती आहेत. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमेपर्यंतचा कालावधी वगळल्यास उर्वरित काळ येथील गर्भगृहात देवींच्या मूर्ती विराजमान असतात.

येथे शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी मंदिरात घटस्थापना करण्यात येते. या उत्सवादरम्यान नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतात. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. उत्सवानिमित्त मंदिरातील मूर्तींना सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी मढवण्यात येते. उत्सवकाळात पहाटे सहा वाजता जगदंबेचा नामजप झाल्यानंतर आरती होते. त्यानंतर जगदंबेचा जोगवा व गोंधळ होतो. सायंकाळच्या आरतीनंतर जगदंबेच्या ओव्या गायल्या जातात व त्यानंतर कीर्तन होते. मंदिरात दीप प्रज्ज्वलित केले जातात. नवमीच्या दिवशी देवीची विशेष आरती केली जाते आणि देवीचा तांबूल प्रसादही बनवला जातो. जिल्ह्यातील हजारो भाविक या काळात देवीच्या दर्शनासाठी येतात.

पौष पौर्णिमेपासून चार दिवस गावात मोठी यात्रा भरते. पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मूर्तींवर अभिषेक, पूजा व आरती झाल्यानंतर गावातून देवींच्या मूर्तींची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर टेकडीवरील मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. सायंकाळी देवीच्या दागिन्यांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. रात्री गावात रथोत्सव होतो. या रथोत्सवादरम्यान गावातील तरुण श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या वेशभूषा करतात. या रथोत्सवादरम्यान सीताहरण, श्रीराम-रावण युद्ध, भरतभेट आदी कार्यक्रमही होतात. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत हा रथोत्सव सुरू असतो. त्यानंतर सकाळी दहीहंडी उत्सव झाल्यावर भाविकांना वरण आणि भाकरीचा समावेश असलेल्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. हजारो भाविक यावेळी उपस्थित असतात. या महाप्रसादासाठी सुमारे १५ क्विंटल डाळ व ५५ क्विंटलच्या पोळ्या बनवण्यात येतात.

उपयुक्त माहिती:

  • संग्रामपूर येथून १० किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ९८ किमी अंतरावर
  • संग्रामपूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८९७५१३५०६३

जगदंबा मंदिर

वानखेड, ताल. संग्रामपुर, जिला. बुलढाणा

Back To Home