आसरा देवी मंदिर

गायगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा

भारतीय संस्कृतीत शक्तीउपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील गायगाव हे ६४ योगिनींच्या मोजक्या जागृत स्थानांपैकी एक मानले जाते. येथील ६४ योगिनी आदिमाया शक्तीचेच अंश मानल्या जातात. निसर्गरम्य परिसरात असलेले हे आसरा देवी मंदिर विदर्भातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन काळापासून या योगिनी परिसराचे रक्षण करत असल्याची लोकांची धारणा आहे. भूमीतून बाणरूपाने प्रकट झालेल्या या देवींच्या दैवी अस्तित्वामुळेच गावाला ‘पऱ्यांचे गाव’ अशी आगळीवेगळी ओळख प्राप्त झाली आहे.

अध्यात्म आणि शक्तीउपासनेच्या परंपरेत ६४ योगिनींना आदिमाया शक्तीचे अत्यंत सामर्थ्यशाली अंश मानले जाते. मार्कंडेय पुराणातील ‘देवी महात्म्य’नुसार, जेव्हा शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज यांसारख्या राक्षसांनी सृष्टीवर संकट आणले, तेव्हा त्यांच्या संहारासाठी देवी भगवतीच्या तेजातून किंवा अष्टमातृकांपासून या योगिनींचा उगम झाला. प्रत्येक मातृकेच्या आठ सहाय्यक शक्ती असल्याने त्यांची संख्या चौसष्ट झाली. या शक्ती केवळ युद्धापुरत्या मर्यादित नसून सृष्टीच्या निर्मितीपासून विसर्जनापर्यंतच्या सर्व क्रियांवर त्यांचे नियंत्रण असते, असा उल्लेख विविध पुराणांत आढळतो.

तंत्रशास्त्र आणि योगविद्येतही या योगिनींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या सृष्टीच्या ६४ वेगवेगळ्या कलांच्या किंवा आयामांच्या अधिष्ठात्री मानल्या जातात. ग्रामीण संस्कृतीत आजही या योगिनींना ‘आसरा’ किंवा ‘साती आसरा’ या नावाने ओळखले जाते आणि त्यांना माता पार्वतीच्या सखी मानले जाते. निसर्गातील विविध शक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या देवी भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या आणि कठीण प्रसंगी रक्षण करणाऱ्या मातृवत देवता आहेत. केवळ साधू-संन्यासीच नव्हे, तर सामान्य भाविकही आपल्या मनोकामना पूर्तीसाठी त्यांची मनोभावे प्रार्थना करतात. मानवी मनातील काम, क्रोध, लोभ यांसारख्या षडरिपुंचा नाश करून आत्मिक शांती आणि सामर्थ्य देण्याची अद्भुत शक्ती या योगिनींच्या उपासनेत सामावलेली आहे.

गायगाव येथे ६४ योगिनींच्या वास्तव्यामागील आख्यायिका अशी की प्राचीन काळी सप्तशृंगगड, मेळघाट आणि ताडाक (आजचे ताडोबा अभयारण्य) हा संपूर्ण भूप्रदेश अत्यंत दुर्गम आणि निर्जन होता. पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या निशिचर प्रवृत्तीच्या लोकांचे, म्हणजेच अधर्मी आणि दुष्ट शक्तींचे या भागात प्राबल्य होते, जे आपल्या दुष्कृत्यांनी ऋषीमुनी आणि सामान्य जनांना त्रास देत असत. अशा काळात साक्षात माता पार्वती हिमालयातून दक्षिण दिशेला मार्गक्रमण करत असताना त्यांच्यासोबत ६४ योगिनी आणि एक पवित्र गाय होती. या परिसरातील राक्षसी प्रवृत्तीचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मातेने आपल्या ६४ योगिनींना आणि त्या गायीला याच भूमीत वास्तव्याची आज्ञा दिली. लोककल्याणाचे हे महान कार्य आपल्या सखींवर सोपवून माता पार्वती स्वतः मल्लिकार्जुनाकडे मार्गस्थ झाल्या.

मातेच्या आज्ञेचे पालन करत, नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर या ६४ योगिनी शेंदरी बाणरूपाने या पवित्र मातीत प्रकटल्या. त्यांच्या दैवी तेजाने येथील नकारात्मक शक्तींचे निर्दालन झाले आणि हा परिसर सुरक्षित झाला. योगिनींसोबत आलेल्या त्या गायीचे येथे कायमस्वरूपी वास्तव्य झाले. त्यामुळेच पुढे या गावाला ‘गायगाव’ असे नाव प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला एका पुरातन वृक्षाखाली असलेल्या या स्थानावर देवींच्या चमत्काराची प्रचिती ग्रामस्थांना येऊ लागली. देवीच्या माहात्म्याचा लौकिक जसा सर्वदूर पसरला, तसा भाविकांचा ओघही वाढला. भक्तांच्या श्रद्धेतूनच पुढे एका झाडाखाली लहानसे मंदिर बांधण्यात आले.

काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. मंदिरासमोर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेले मोठे प्रांगण आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. येथील सभामंडपात दोन पाळणे ठेवलेले आहेत. अनेक दाम्पत्ये देवीसमोर अपत्यप्राप्तीसाठी नवस बोलतात. अपत्यप्राप्ती झाल्यावर ते दाम्पत्य नवजात बालकांना देवीच्या दर्शनासाठी आणतात. या बालकांना या पाळण्यांमध्ये काही वेळ ठेवण्यात येते. सभामंडपात देवीची पालखीही आहे. सभामंडपात मध्यभागी असलेल्या गर्भगृहावर सुंदर कलाकुसर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गर्भगृहात मोठ्या, आडव्या ओट्यावर देवींचे शेंदूरचर्चित बाणरूपी स्थान आहे. प्रत्येक स्थानावर चांदीचा मुकुट आहे. मागील बाजूस करण्यात आलेल्या प्रभावळीवर सुंदर नक्षीकाम आहे. या पूर्वाभिमुख मंदिराच्या गर्भगृहावर वरच्या बाजूने निमुळते होत जाणारे चौकोनी शिखर आहे, ज्यावर लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. शिखऱ्यावर दोन आमलक आहेत आणि त्यावर कळस आहे.

दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी परिसरात छोटे भक्तनिवास बांधण्यात आले आहे. आसरा देवी संस्थानतर्फे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या या मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा करण्यात येते. नवसाला पावणारी देवी असा लौकिक असल्याने या देवींच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात. एखाद्या मनोरुग्ण व्यक्तीला दर्शनासाठी आणल्यास ती बरी होते, अशीही भाविकांची भावना आहे. बुधवार हा देवीचा वार समजला जातो, त्यामुळे या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्रोत्सवादरम्यान नऊही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गुढीपाडव्याच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेला दूरदूरवरून हजारो भाविक येतात. रात्री उशिरापर्यंत येथे दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. या यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव व खामगाव आगारांतून विशेष बसही सोडण्यात येतात.

उपयुक्त माहिती:

  • शेगाव येथून १० किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ६३ किमी अंतरावर
  • शेगाव व खामगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा आहे

आसरा देवी मंदिर

गाइगांव, शेगांव, जिला. बुलढाणा

Back To Home