शेगाव येथील ‘बंकट सदन’ हे संत गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल अग्रवाल यांचे निवासस्थान होय. येथे महाराजांचे सुरुवातीच्या दोन वर्षांचे वास्तव्य होते. या काळात त्यांनी विस्तवाशिवाय चिलीम प्रज्ज्वलित करणे आणि मरणोन्मुख जानराव देशमुखांना व्याधीमुक्त करणे अशा अनेक लीला केल्या. काशी क्षेत्राहून आलेल्या एका गोसाव्याने आणलेल्या प्रसादपुडीचा स्वीकार करून त्याची इच्छाही त्यांनी येथेच पूर्ण केली होती, असे सांगितले जाते. बंकटलाल यांच्या वंशजांनी हे निवासस्थान श्री गजानन महाराज संस्थानाकडे सुपूर्द केले. या स्थानाचे पावित्र्य जोपासण्याच्या हेतूने या जागेवर आता तीनमजली भव्य स्मृतीभवन उभारण्यात आले आहे. तेथे भाविकांना महाराजांच्या पादुका व प्रतिमेचे दर्शन घेता येते.
‘श्री गजानन विजय’ या ग्रंथानुसार, २३ फेब्रुवारी १८७८ रोजी माघ वद्य सप्तमीच्या दिवशी गजानन महाराज शेगाव येथे प्रकट झाले. त्या दिवशी गावातील मठाचे मठाधिपती देवीदास पातूरकर यांच्या मुलाची ऋतुशांती होती.
त्यानिमित्त भोजनावळी आयोजित केल्या होत्या. दुपारी दिगंबरावस्थेतील गजानन महाराज हे पातूरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील शिते वेचून खात असल्याचे गावातील सज्जन बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर गजानन महाराज गाई-गुरांना पिण्यासाठी ठेवलेल्या हौदातील पाणी पिऊन निघून गेले. ते थोर संत व योगीपुरुष असल्याची जाणीव झाल्यानंतर बंकटलाल व दामोदरपंत हे दोघे त्यांचे चरणस्पर्श करण्यासाठी त्यांच्या मागे गेले. मात्र गजानन महाराज तेथून अदृश्य झाले. या प्रसंगानंतर बंकटलाल यांना मोठी हुरहुर लागली. गजानन महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने त्यांना अन्नपाणीही गोड लागेनासे झाले.
चार दिवस त्यांचा शोध घेतल्यानंतर शेगावमधील शंकर मंदिरात प्रख्यात कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर यांच्या कीर्तनासाठी गावातील पितांबर शिंपीसह जात असताना वाटेत त्यांना गजानन महाराजांचे दर्शन झाले. त्यांनी गजानन महाराजांच्या जवळ जाऊन, ‘काही खाण्यासाठी आणू का?’ अशी विचारणा केल्यावर माळणीच्या घरातून पिठले-भाकरी आणण्याची आज्ञा गजानन महाराजांनी केली.
त्यानंतर बंकटलाल यांनी माळणीच्या घरातून अर्धी भाकरी आणि पिठले आणून दिले. ते खात असताना महाराजांनी पितांबराला ओढ्यावर जाऊन पाण्याचा तुंबा भरून आणण्यास सांगितले. परंतु ‘ओढ्याला जास्त पाणी नाही आणि तेथील पाणी गुराढोरांनी गढूळ केलेले आहे, हे पाणी कसे पिणार?’ अशी विचारणा केल्यानंतरही त्यांनी पितांबराला ओढ्यातूनच पाणी आणण्यास सांगितले. त्यानुसार ओढ्यावर गेलेल्या पितांबराने ओढ्यात तुंबा ठेवला. ओढ्यात गढूळ पाणी असले तरी तुंब्यात भरले गेलेले पाणी स्फटिकासमान स्वच्छ होते. हे पाणी प्यायल्यानंतर गजानन महाराजांनी बंकटलाल यांना कीर्तनासाठी मंदिरात जाण्यास सांगितले. कीर्तनात गोविंदबुवा यांनी निरूपणासाठी भागवतातील ‘एकादश स्कंधातील’ ‘हंसगीतेमधील’ श्लोक घेतला होता. गोविंदबुवांनी पूर्वार्ध सांगितल्यावर गजानन महाराजांनी या श्लोकाचा उत्तरार्ध कथन केला. त्यामुळे थक्क झालेल्या गोविंदबुवांनी हा उत्तरार्ध सांगणारा पुरुष एखादा थोर अधिकारी असावा, असे सांगत गजानन महाराजांना मंदिरात आणण्यास सांगितले. त्यानुसार बंकटलाल आणि पितांबर हे इतर मंडळींसह महाराजांकडे गेले. त्यांनी केलेल्या विनवणीनंतरही महाराज जागचे हलले नाहीत. अखेर गोविंदबुवांनी स्वतः
महाराजांजवळ येऊन मंदिरात येण्याची विनंती केली. त्यावेळी गजानन महाराजांनी त्यांना उपदेश करत मंदिरात जाऊन कीर्तन पूर्ण करण्यास सांगितले. त्यामुळे पुन्हा मंदिरात आलेल्या गोविंदबुवांनी, ‘शेगावमध्ये साक्षात पांडुरंग अवतरले आहेत. त्यांची सेवा करा, तसेच त्यांची आज्ञा म्हणजे वेदवाक्य समजून तिचे पालन करा,’ असा सल्ला उपस्थितांना दिला. कीर्तन संपल्यावर घरी आलेल्या बंकटलाल यांनी आपले वडील भवानीराम यांना घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. त्यावर भवानीराम यांनी महाराजांना घरी घेऊन येण्यास सांगितले. चार दिवसांनी महाराज माणिक चौकात दिसल्यावर बंकटलाल त्यांना आदराने घरी घेऊन आले. बंकटलाल यांच्या वडिलांनी दिलेल्या पदार्थांचे ग्रहण करून महाराजांनी त्या रात्री तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी बंकटलाल यांनी अवर्णनीय थाटात गजानन महाराजांना मंगलस्नान घातले. त्यावेळी भाविकांची खूप गर्दी झाली होती. बंकटलाल यांच्या घराला जणू द्वारकेचेच रूप आले होते. संतकवी दासगणू महाराज लिखित ‘श्री गजानन विजय’ ग्रंथातील अध्याय एक आणि दोनमध्ये या प्रसंगांचे सविस्तर वर्णन आहे.
गजानन महाराजांचे १८७८ आणि ७९ अशी दोन वर्षे बंकटलाल यांच्या घरी वास्तव्य होते. या काळात असंख्य भाविक त्यांच्या दर्शनासाठी येत. गजानन महाराजांच्या प्रकटस्थळापासून काही अंतरावरच हे सदन आहे. या जुन्या वास्तूचे महत्त्व अबाधित ठेवून शेगाव संस्थानाने तिचा नव्याने कायापालट केला आहे. या तीन मजली वास्तूच्या काही भागात बंकटलाल यांच्या वंशजांचे वास्तव्य आहे. या वास्तूमधील तळमजल्यावर नक्षीयुक्त खांब असलेल्या मोठ्या सभागृहात गजानन महाराजांचा पलंग आहे आणि त्यावर त्यांच्या पादुकांचे दर्शन होते. येथे महाराजांची प्रतिमा लावलेली आहे. येथील एका भिंतीवर गजानन महाराजांचे मूळ छायाचित्रही पाहायला मिळते. या सभागृहात बंकटलाल यांचा पुतळा तसेच त्यांच्या वापरातील वस्तूही ठेवलेल्या आहेत. गजानन महाराजांना ज्या कुंडात स्नान घातले होते, ते कुंडही परिसरात आहे. येथे वाड्याच्या जुन्या वास्तूचे अवशेषही दिसतात. शेगावमधील पाच धामांपैकी एक धाम असलेल्या या सदनात गजानन महाराजांच्या पलंगाचे तसेच पादुकांचे दर्शन घेण्यासाठी दररोज अनेक भाविक येतात.
येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. यातील सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे माघ वद्य सप्तमीला साजरा होणारा श्री गजानन महाराजांचा ‘प्रकट दिन’ उत्सव होय. या दिवशी संस्थानची मुख्य पालखी जेव्हा नगरप्रदक्षिणेसाठी निघते, तेव्हा ती आवर्जून बंकट सदन येथे येते. येथे तिचे स्वागत तसेच पूजन केले जाते. याशिवाय भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच ‘ऋषीपंचमी’ या महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या काळातही येथे भक्तांचा जनसागर लोटतो. श्रीराम हे महाराजांचे आराध्य दैवत असल्याने चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीला येथे रामजन्माचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो आणि भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हजारो भक्त या पवित्र सदनाला भेट देतात. या विशेष उत्सवांव्यतिरिक्त येथे दररोज सकाळी आणि सायंकाळी आरती केली जाते. प्रत्येक गुरुवारी येथे भाविकांची गर्दी असते.