मारुती व शीतलामाता मंदिर

शेगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा

शेगावमधील पाच धामांपैकी एक असलेल्या मारुती व शीतलामातेच्या मंदिरात गजानन महाराजांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. येथेच पाटलाच्या मुलांनी गजानन महाराजांना उसाने मारहाण केल्यानंतर महाराजांनी त्याच उसाची मोळी बांधून त्यातून रस काढला व तो याच मुलांना पाजल्याची कथा आहे. शेगाव संस्थानात हे मंदिर विलीन झाल्यानंतर संस्थानाने येथे भव्य संगमरवरी मंदिर बांधले आहे. येथे गजानन महाराजांच्या गादीचे व पादुकांचेही दर्शन घडते. गजानन महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर भाविक येथे आवर्जून भेट देतात.

संत दासगणू महाराज विरचित ‘श्री गजानन विजय’ ग्रंथातील सहाव्या आणि सातव्या अध्यायात या स्थानाचे वर्णन आहे. त्यानुसार, शेगावमधील पाटील घराणे धनसंपन्न होते. त्यांच्या घरी पूर्वीपासून संतांची सेवा केली जात असे. या घराण्यातील महादाजी पाटील यांना कडताजी आणि कुकाजी नावाची दोन मुले होती. थोरल्या कडताजीला सहा मुले होती. विठ्ठलभक्त असलेल्या कुकाजीला अपत्य नव्हते. कडताजीच्या पश्चात कुकाजीने त्याच्या सहाही मुलांचे संगोपन केले. त्याच्या कारकिर्दीत या घराण्याची भरभराट झाली. कुकाजीच्या पश्चात कडताजीचा थोरला मुलगा खंडू पाटील कारभार करू लागला. सहाही भावांमध्ये त्याचा शब्द अंतिम मानला जाई. त्याच्या भावांची नावे गणपती, नारायण, मारुती, हरि व कृष्णाजी अशी होती. या भावांना कुस्तीचा छंद होता. या गावात श्रावण महिन्यात मारुतीचा उत्सव होत असे. महिनाभर चालणाऱ्या या उत्सवादरम्यान अभिषेक, पूजा आणि कीर्तन होत असे. एकदा या उत्सवासाठी श्रावण महिन्याच्या आरंभी गजानन महाराज या मंदिरात वास्तव्यासाठी आले होते. त्यावेळी पाटील यांचे बंधू महाराजांना अपशब्द बोलून त्यांची हेटाळणी करत. एके दिवशी हरिने महाराजांना कुस्तीचे आव्हान दिले. महाराजांनी त्याला प्रोत्साहन दिले व त्याच्यासोबत आखाड्यात जाऊन रिंगणाच्या मध्यभागी बसले. ‘तू कुस्तीपटू असल्यास मला उचलून दाखव’ असे आव्हान त्यांनी हरिला दिले. अनेक प्रयत्न करूनही ते शक्य न झाल्याने हरिने पराभव मान्य करून महाराजांचा आशीर्वाद मागितला. तेव्हापासून हरिने महाराजांना वावगे बोलणे सोडून दिले. मात्र, ते पाहून त्याच्या बंधूंनी त्याला बोल लावले. महाराजांची परीक्षा घेण्यासाठी एके दिवशी ते उसाची मोळी घेऊन मंदिरात आले. ‘आम्ही तुझ्या अंगावर उसाने प्रहार करू. त्यानंतरही तुझ्या अंगावर वळ उठला नाही, तरच आम्ही तुला योगी मानू’ असे ते म्हणाले. त्याकडे दुर्लक्ष करून महाराज शांत बसून राहिले. तीच त्यांची संमती असल्याचे मानत हे बंधू त्यांच्या अंगावर धावून आले. महाराजांची सेवा करण्यासाठी तेथे असलेल्या भास्कर पाटील यांनी सांगूनही ते ऐकले नाहीत आणि त्यांनी महाराजांना उसाने मारण्यास सुरुवात केली. ते मारत असताना महाराज त्यांच्याकडे पाहून हसत होते. उसाच्या माराने त्यांच्या अंगावर एकही वळ उठला नाही. त्यामुळे महाराजांची महती पटून या भावांनी त्यांची माफी मागितली. त्यानंतर महाराजांनी त्याच उसाची मोळी बांधली व ती पिळून रस काढला. तो रस त्यांनी या भावंडांना प्यायला दिला. याबाबत समजल्यानंतर खंडू पाटीलही महाराजांच्या दर्शनासाठी येऊ लागला. पुढे कुकाजीच्या सांगण्यावरून खंडू पाटील याने पुत्रप्राप्तीसाठी महाराजांकडे आशीर्वाद मागितला. महाराजांच्या कृपेमुळे त्याला पुत्रप्राप्ती झाली. महाराजांच्या सांगण्यावरून या बालकाचे नाव ‘भिका’ असे ठेवण्यात आले. महाराजांच्याच आदेशानुसार त्याने दरवर्षी ब्राह्मणांना आमरसाचे भोजन देण्यास सुरुवात केली. ही प्रथा शेगावमध्ये आजही सुरू आहे.

शेगावमधील मुख्य मंदिरापासून काही अंतरावरच हे मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या संगमरवरी पाषाणातील भव्य मंदिराची संरचना आहे. मुखमंडपातील एका देव्हाऱ्यात हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडील भिंतीमधील देवकोष्ठकात गणेशाची मूर्ती आहे. सभामंडपातील स्तंभांवर व वितानावर सुंदर कोरीव काम आहे. सभामंडपात डाव्या बाजूला एके ठिकाणी गजानन महाराजांची गादी आहे आणि त्यावर त्यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. येथे गजानन महाराजांची सुंदर प्रतिमाही आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारस्तंभ व प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर सुंदर कलाकुसर आहे. द्वारपट्टीच्या मध्यभागी असलेल्या ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी दोन्ही बाजूंना कीर्तिमुखे आहेत आणि त्यांच्या मधोमध असलेल्या छोट्या चबुतऱ्यावर पादुका आहेत. गर्भगृहात मारुती, गणेश व शीतलामातेच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. वरच्या बाजूला हनुमान, गणेश व लक्ष्मी देवीच्या प्रतिमा आहेत. डावीकडे एक शेंदूरचर्चित मूर्ती आहे आणि नजीकच पादुका आहेत.

मंदिराच्या मुखमंडप आणि सभामंडपावर सुंदर शिखरे आहेत. छताच्या भागावरील बाशिंग कठड्यामध्ये वरच्या बाजूने निमुळते होत जाणारे चौकोनी स्तर आहेत. त्यावर द्विस्तरीय आमलक व कळस आहेत. गर्भगृहावर उंच शिखरावर लहान लहान शिखराच्या प्रतिकृती आहेत. कोरीव कलाकुसर असलेल्या या शिखरावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे.

शेगावमधील ‘पाच धामांपैकी’ एक असलेल्या मारुती व शीतलामातेच्या मंदिरात वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये हनुमान जयंती हा सर्वात मुख्य उत्सव आहे. चैत्र पौर्णिमेला मारुतीरायाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात अभिषेक, होमहवन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात शीतलामातेची विशेष पूजा, आरती आणि घटस्थापना केली जाते. श्रावण महिन्यात दर शनिवारी मारुतीरायाला तेलाचा अभिषेक आणि रुईच्या पानांची माळ अर्पण करण्यासाठी भाविकांची रीघ लागते. श्रीरामनवमीच्या दिवशीही मंदिरात विशेष भजनांचे आणि रामजन्माचे आयोजन केले जाते. संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त या मंदिराला आकर्षक सजावट केली जाते आणि पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • शेगाव बस स्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ६८ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून शेगावसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने महाराजांच्या प्रकट स्थानापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

मारुति और शीतलमाता मंदिर

शेगांव, शेगांव, जिला बुलढाणा

Back To Home