कृष्णाजींचा मळा

शेगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा

संतनगरी शेगावच्या आध्यात्मिक वैभवात ‘कृष्णाजींचा मळा’ या पवित्र स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीतच अहंकारी ब्रह्मगिरी गोसाव्याचे गर्वहरण करून महाराजांनी आपल्या अगाध योगशक्तीची प्रचिती दिली होती. ‘श्री गजानन विजय’ ग्रंथातील आठव्या अध्यायात या प्रसंगाचे वर्णन आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेले हे स्थान आजही महाराजांच्या लाकडी पलंगाच्या आणि पादुकांच्या रूपाने त्या ऐतिहासिक स्मृती जपत आहे. शेगावमधील ‘पाच धाम’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्थानांमध्ये या ठिकाणाचा समावेश होतो. गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक आवर्जून येथे भेट देतात.

‘श्री गजानन विजय’ ग्रंथातील आठव्या अध्यायातील वर्णनानुसार, शेगाव नगरीच्या उत्तर दिशेला गजानन महाराजांचे निस्सीम भक्त कृष्णाजी पाटील यांचा मळा होता. तेथील वनराईत एका लिंबाच्या छायेत महादेवाचे छोटेसे मंदिर होते. याच पवित्र स्थानी राहण्याची इच्छा गजानन महाराजांनी व्यक्त केली आणि कृष्णाजींनी तिथे पत्र्यांचे साधे छप्पर उभारून महाराजांच्या वास्तव्याची सोय केली. भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे हे निष्ठावान सेवक सावलीसारखे महाराजांच्या सोबत असत आणि कृष्णाजी पाटील मोठ्या भक्तीभावाने त्यांच्या प्रसादाची सोय पाहत असत.

महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरत असतानाच, एके दिवशी ब्रह्मगिरी नावाचा एक गोसावी आपल्या शिष्यांच्या लवाजम्यासह येथे दाखल झाला. अनेक तीर्थक्षेत्रांची वारी केल्याचा आणि वेदांताचा गाढा अभ्यास असल्याचा प्रचंड अहंकार त्याच्या ठायी होता. शिष्यांच्या माध्यमातून त्याने कृष्णाजींकडे शिरापुरीच्या भोजनाची आणि गांजाची मागणी केली. परंतु कृष्णाजींची महाराजांप्रती असलेली ओढ पाहून या गोसाव्याच्या शिष्यांनी महाराजांचा अत्यंत हीन शब्दांत अपमान केला. महाराजांना ‘वेडापिसा’ आणि ‘नंगाधूत’ म्हणणाऱ्या त्या दांभिकांना कृष्णाजींनी प्रत्युत्तर दिले की जर तुम्हाला गांजाच हवा असेल, तर मळ्यात बसलेल्या त्या गजानन महाराजांकडेच तो मिळेल.

त्या सायंकाळी मळ्यातील वातावरण एका वेगळ्याच परीक्षेने भारले गेले. ब्रह्मगिरीने भगवद्गीतेतील ‘नैनं छिन्दन्ति’ या श्लोकावर निरूपण सुरू केले. त्याचे बोलणे केवळ पांडित्याचे प्रदर्शन होते. त्यात स्वानुभवाची जोड नव्हती. त्यामुळेच ग्रामस्थांना त्याचे ते कोरडे ज्ञान रुचले नाही आणि ते सर्वजण महाराजांच्या दर्शनासाठी समर्थांच्या छपराकडे वळले. आपला अपमान झाला या भावनेने संतापलेला ब्रह्मगिरी गांजा ओढण्याच्या निमित्ताने समर्थांच्या समोर येऊन बसला. तेथे महाराज एका सागवानी पलंगावर विश्रांती घेत होते. नियतीचा खेळ असा की चिलमीतील एक छोटीशी ठिणगी पलंगावर पडली आणि पाहता पाहता आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केले.

सर्वत्र धूर आणि अग्नीचे लोट उसळले असतानाही समर्थ शांतचित्ताने त्या जळत्या पलंगावर बसून राहिले. त्यांनी भास्कर पाटलांना आग विझवण्यापासून रोखले आणि ब्रह्मगिरीला एक मोठे आव्हान दिले. महाराज गरजले, ‘तुम्ही आताच प्रवचनात सांगितले की आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, मग आता या जळत्या पलंगावर बसून तुमच्या ब्रह्मज्ञानाची प्रचिती द्या!’ जेव्हा बलदंड भास्कर पाटलांनी महाराजांच्या आज्ञेनुसार ब्रह्मगिरीचा हात धरून त्याला आगीकडे ओढले, तेव्हा त्या गोसाव्याची सगळी विद्वत्ता गळून पडली. तो थरथरा कापू लागला आणि समर्थांच्या चरणी लोळण घेऊन त्याने आपली चूक कबूल केली. ‘मी केवळ पोटासाठी साधू झालो असून माझे ज्ञान केवळ शाब्दिक आहे,’ अशी कबुली त्याने दिली. जेव्हा त्याचा अहंकार पूर्णपणे भस्म झाला, तेव्हाच महाराज पलंगावरून उतरले आणि तो पलंग क्षणात कोसळून पडला. मध्यरात्री समर्थांनी त्याला खऱ्या आध्यात्मिक मार्गाचा उपदेश केला, ज्यामुळे त्याचे डोळे उघडले आणि दुसऱ्या दिवशी तो नम्र होऊन तिथून निघून गेला.

शेगावमधील मुख्य मंदिराच्या बाजूने एक रस्ता शहरातील महात्मा फुले चौकात येतो. येथून नजीकच हा मळा आहे. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मळ्याला चारही बाजूंनी आवारभिंत आहे. अलीकडेच या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. परिसरात अनेक झाडे आहेत. मंदिरासमोरच मोठा वटवृक्ष आहे. या वृक्षाच्या छायेत भाविक बसतात. या झाडासमोर नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपाला कमानीच्या आकाराची प्रवेशद्वारे आहेत. भाविकांच्या रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी सभामंडपात सर्वत्र स्टेनलेस स्टीलचे कठडे बसवण्यात आले आहेत. सभामंडपात डाव्या बाजूला गजानन महाराजांचा लाकडी पलंग आहे व त्यावर गादी आहे. या गादीवर गजानन महाराजांच्या लाकडी पादुका ठेवण्यात आल्या आहेत. वरच्या बाजूस गजानन महाराजांची प्रतिमा आहे. उजवीकडे शिवलिंग असलेले गर्भगृह आहे. येथील शिवलिंग आणि शाळुंका संगमरवरी दगडात घडवलेली आहे. गजानन महाराजांनीच या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याचे सांगण्यात येते. या गर्भगृहाच्या मागील बाजूकडील भिंतीनजीक गणेश, पार्वती आणि नागदेवतेच्या संगमरवरी मूर्ती आहेत. गर्भगृहातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूस ब्रह्मगिरी महाराजांच्या गर्वहरण प्रसंगाचे वर्णन असलेल्या व देवकोष्ठक स्वरूपातील ‘श्री गजानन विजय ग्रंथा’तील अध्यायांचा फलक आहे. नजीकच या प्रसंगाचे वर्णन करणारे तैलचित्र आहे.

मंदिरासमोर असलेल्या वटवृक्षाच्या पारावर बसून भाविक ‘श्री गजानन विजय ग्रंथा’तील अध्यायांचे पारायण करतात. परिसरात अनेक फुलझाडेही आहेत. परिसरात कृष्णाजी पाटील यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींच्या समाधी आहेत. त्यात रावसाहेब रामचंद्र कृष्णाजी पाटील यांच्या समाधीचाही समावेश आहे. त्यांना गजानन महाराजांनी गोसाव्याच्या रूपात दर्शन दिले होते, असा उल्लेख ‘श्री गजानन विजय ग्रंथा’तील विसाव्या अध्यायात आहे.

कृष्णाजींचा मळा या पवित्र स्थानावर वर्षभरातील विविध उत्सव साजरे होतात. मुख्य उत्सवांमध्ये ऋषीपंचमी या दिवसाला या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी श्री गजानन महाराजांनी महासमाधी घेतली होती आणि योगायोगाने त्यांचे परमशिष्य कृष्णाजी पाटील यांची पुण्यतिथीही याच काळात येते. या दिनानिमित्त संपूर्ण मळ्यात ‘गण गण गणात बोते’चा अखंड नामजप, भव्य कीर्तन महोत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथे सद्गुरूंच्या पूजनाचा सोहळा पार पडतो. त्यावेळी दूरदूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनादिवशी या मळ्यातून पालखी निघते. याशिवाय प्रत्येक गुरुवारी येथे विशेष उपासना होते.

उपयुक्त माहिती:

  • शेगाव बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ६९ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून शेगावसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने महाराजांच्या प्रकट स्थानापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

कृष्णाजी का बगीचा

शेगांव, ताल. शेगांव, जिला. बुलढाणा

Back To Home