सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणजवळील धारूर हे शहर प्राचीन काळापासून एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. आजही येथील सराफा बाजार, खवा आणि सीताफळे भारतभर विख्यात आहेत. याच गावाजवळ असलेला धारूरचा किल्ला राष्ट्रकूट राजांनी बांधला. राष्ट्रकूट राजा गोविंद तृतीय (कारकीर्द सन ७९३ ते ८१४) याच्या दानपत्रात धारूर गावाचा उल्लेख आढळतो. राष्ट्रकुटांनंतर कल्याणीचे चालुक्य व देवगिरीच्या यादव राजांनी येथे सत्ता गाजवली. त्यानंतर बहामनी, आदिलशाही आणि निजामशाही अशा अनेक सत्तांतरांचा हा किल्ला साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची साथ सोडल्यानंतर नेताजी पालकर यांनी याच किल्ल्याचा आश्रय घेतला होता. ११ मार्च १७९५ रोजी खर्ड्याच्या लढाईनंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला, मात्र काही काळानंतर तो पुन्हा निजामाच्या ताब्यात गेला. याच किल्ल्याच्या परिसरात अंबाचंडी देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. ही देवी भक्तांच्या नवसाला पावते अशी सर्वत्र श्रद्धा आहे.
हे देवस्थान सुमारे बाराशे ते तेराशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील बांधकाम सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असावे, असे मत जाणकार व्यक्त करतात. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी या भागावर चंडासूर दैत्याचे राज्य होते. सत्तेच्या उन्मादात हा दैत्य आपल्या प्रजेवर अनन्वित अत्याचार करू लागला. या दैत्याच्या जाचातून मुक्तता व्हावी म्हणून प्रजेने अंबा भवानीची प्रार्थना केली. भक्तांच्या हाकेला धावून अंबा भवानीने त्या दैत्याचा वध केला व आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी ती येथेच स्थिरावली.
हे मंदिर नदीच्या तीरावर व टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आहे. प्रांगणाच्या प्रारंभी दोन गोलाकार स्तंभांवर बाशिंगी सज्जा असलेली स्वागत कमान आहे. पुढे फरसबंदी प्रांगणात सुरुवातीलाच महादेवाचे मंदिर लागते. मंदिरासमोर वज्रपीठावर नंदीची मूर्ती व जमिनीवर शिवपिंडी आहे. या शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे, तसेच पिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. मंदिराच्या छतावर घुमटाकार लहान शिखर आणि शिखरावर कळस आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत.
पुढे डोंगरकड्याला लागून अंबाचंडी मातेचे मंदिर आहे. मंदिरासमोर दोन चौथरे आहेत आणि त्या चौथऱ्यांवर मेघडंबरी आहेत. यातील एका मेघडंबरीत मारुतीची मूर्ती व शिवपिंडी आहे, तर दुसऱ्या मेघडंबरीत खंडोबाचे पाषाण आहे. पुढे प्रांगणात दीपमाळेचा चौथरा आहे. या चौथऱ्यातील देवकोष्ठकात गणपतीची शेंदूरचर्चित प्राचीन मूर्ती आहे. चौथऱ्यावर गोलाकार दीपमाळ आहे आणि दीपमाळेच्या बाजूला जमिनीवर यज्ञकुंड आहे. दीपमाळेसमोर तुळशीवृंदावन आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार मुक्तद्वार स्वरूपाचे आहे.
सभामंडपात प्रत्येकी तीन चौकोनी स्तंभांच्या तीन रांगा आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत. कमानीच्या वर छत आहे. सभामंडपाची डावी बाजू डोंगरकड्याला लागून असल्याने ती बंदिस्त आहे. या बाजूला असलेल्या पहिल्या गर्भगृहात खोकल्या देवीचा स्वयंभू तांदळा आहे. या देवीच्या दर्शनाने लहान मुलांचे सर्दी, खोकला, ताप आदी आजार दूर होतात, अशी भाविकांची धारणा आहे. सभामंडपाची उजवी बाजू खुली आहे आणि त्या बाजूला लोखंडी जाळीदार सरकत्या झडपा आहेत. सभामंडपापुढे अरुंद व लहानसे अंतराळ आहे, त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास लोखंडी जाळीदार सरकत्या झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावरील देवकोष्ठकात अंबाचंडी भवानी देवीचा स्वयंभू तांदळा आहे. वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीच्या मूर्तीवर चांदीचा मुकुट आहे. देवकोष्ठकाच्या बाह्य बाजूने नक्षीदार तोरण आहे आणि त्यात मध्यभागी कीर्तिमुख आहे. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे.
मंदिरासमोर नदीवर बंधारा बांधलेला आहे. बंधाऱ्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. प्रांगणात जलसाठ्याच्या कडेने सुशोभीकरण करण्यात आले आहे व येथे भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिराचा संपूर्ण परिसर वनराईने नटलेला आहे.
शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सलग दहा दिवस देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी असते. यानिमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. चैत्र पाडवा ते रामनवमी या चैत्र नवरात्रीच्या पर्वकाळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, कोजागरी पौर्णिमा, श्रावण मास, नागपंचमी आदी सर्व सण-उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावास्या, अष्टमी आदी दिवशी भाविकांची येथे गर्दी असते.