बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे एकेकाळी चालुक्य व यादव राजघराण्यांच्या राजधानीचे शहर होते. या भागावर राज्य करणारे अनेक राजे शिवभक्त होते, ज्याचा प्रत्यय जिल्ह्यात पावलोपावली येतो. परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे व महत्त्वाचे शिवमंदिर याच जिल्ह्यात आहे. एकट्या बीड शहरात बारा शिवमंदिरे आहेत तर जिल्ह्याच्या विविध भागात कनकाळेश्वर, रामेश्वर, सोमेश्वर आणि पापनेश्वर अशी अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे पाहायला मिळतात. असेच एक प्राचीन शिवमंदिर गेवराई तालुक्यातील उक्कडपिंपरी गावात आहे. या मंदिरावरील प्राचीन शिल्पकला भाविकांसोबतच अभ्यासकांचेही लक्ष वेधून घेते.
हे मंदिर सुमारे अकराव्या शतकातील चालुक्यकालीन असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मंदिराचा नेमका काळ सिद्ध करणारा कोणताही शिलालेख अथवा ताम्रपट उपलब्ध नसला तरी मंदिराचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील बांधकाम, स्तंभ व वितानावरील शिल्पे आणि परिसरात सापडणारे वीरगळ या वास्तूचे प्राचीनत्व सिद्ध करण्यास पुरेसे ठरतात.
हे मंदिर सिंदफणा नदीच्या तीरापासून काही अंतरावर, गावाच्या वेशीजवळ, रस्त्यालगत उंच जागी आहे. रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पाषाणी बांधणीचा पायरीमार्ग आहे. मंदिरासमोरच्या चौथऱ्यावर भग्नावस्थेत असलेली घोडेस्वाराची मूर्ती खंडोबाची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष आहेत.
मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या मुखमंडपात प्रवेशद्वार सोडून तिन्ही बाजूंना भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या कक्षासनांमध्ये चार अर्धस्तंभ आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोण, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार कोरलेले असून स्तंभांच्या शीर्षभागावरील हस्तांवर तुळई व छत पेललेले आहे. मुखमंडपाच्या वितानावर मध्यभागी बासरी वाजवणारा श्रीकृष्ण व गोपिकांचे दुर्लभ व अनोखे शिल्प आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. हे सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडातील चौकोनी पटावर विविध पौराणिक प्रसंग व नक्षी कोरलेली आहे. स्तंभांच्या शीर्षभागी हस्तांवर छताचा भार तोलून धरलेल्या यक्षांची शिल्पे आहेत.
प्रत्येक चार स्तंभांच्या मधील अष्टकोनी वितानावरही चक्रनक्षी आहे. सभामंडपातील चार स्तंभांदरम्यान वर्तुळाकार रंगशिळा आहे, जिचा वापर प्राचीन काळी नृत्य-गायनासाठी केला जात असे. सभामंडपात अंतराळाच्या दोन्ही बाजूंना दोन देवकोष्टके आहेत आणि त्यांच्या वर घटपल्लव शिल्पे आहेत. येथेच उजव्या बाजूला सुमारे चार फूट उंचीची पंचफणी नागशिळा आहे.
सभामंडपाच्या पुढे अंतराळ व गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास वेलबुट्टी, पर्णलता, पुष्पलता, स्तंभ आणि नरशाखा अशा पाच द्वारशाखा आहेत. यांच्या खालील बाजूस द्वारपाल, द्वारपालिका, गंगा, यमुना यांची शिल्पे व त्यांच्या खाली पशुशिल्पे कोरलेली आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प व ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी आहे. तोरणात शिखरशिल्पे आहेत तर मंडारकास चंद्रशिळा व दोन्ही बाजूंना कीर्तिमुखे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे आणि जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे.
मंदिराच्या मुखमंडपाकडील बाह्य भिंतीवर पायाकडील बाजूस गजथर, नरथर आणि पुष्पथर आहेत तर वरील बाजूस व्याल व मयूर शिल्पे आहेत. मुखमंडपाच्या डाव्या बाजूला भिंतीवर हातात डमरू, त्रिशूल व कपाल धारण केलेले भैरवशिल्प आणि मागील भिंतीवरील देवकोष्ठकात सप्ताश्वरथारूढ सूर्यदेवाचे शिल्प आहे. मांडोवरावर अश्वयुद्ध, गजयुद्ध आणि उंटांचे युद्ध यांसारखे प्रसंग व पशू-पक्ष्यांच्या विविध मुद्रा असलेले थर आहेत. येथे विविध देवी-देवतांची शिल्पे व देवकोष्ठके आहेत. मंदिराच्या छतात पावसाचे पाणी वाहून नेणारे प्रणाल आहेत. मंदिराच्या बाजूला बंदिस्त स्वरूपाचा मंडप आहे, ज्यामध्ये पाच चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. या मंडपात नक्षीकाम व शिल्पांचा अभाव असल्याने प्राचीन काळी याचा वापर यात्रीनिवास म्हणून केला जात असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. प्रांगणात मंदिराचे अवशेष व वीरगळ विखुरलेले आहेत. मंदिरापासून जवळच मारुतीचे प्राचीन मंदिर आहे.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यातही गर्दी मोठी असते. मंदिरात चैत्र पाडवा, चैत्र पौर्णिमा, दसरा, दिवाळी, वैकुंठ चतुर्दशी आणि कार्तिक पौर्णिमा या सणांच्या वेळी भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन आणि संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.