बीड जिल्ह्यात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. त्यापैकी अनेक मंदिरे चालुक्य, शिलाहार व यादवकालीन स्थापत्यशैलीचा वारसा सांगतात. जिल्ह्यात नाथपंथाचा मोठा प्रभाव जाणवतो आणि येथे अनेक नाथपंथीय मठ व नवनाथांची समाधी मंदिरे आहेत. यासोबतच गिरी, पुरी, गोसावी, कानफाटे आदी उपपंथांचे मठ व मंदिरे जिल्ह्यात विखुरलेली आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त प्रभाव वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी केंद्रे म्हणून अनेक देवस्थाने व गडांचा उल्लेख येतो. यामध्ये नारायण गड हे महत्त्वाचे देवस्थान मानले जाते आणि ‘धाकटी पंढरी’ म्हणून ते प्रसिद्ध आहे.
विठ्ठल-रखुमाईचे हे देवस्थान शेकडो वर्षे प्राचीन असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. येथे एक प्राचीन शिवमंदिर देखील आहे. असे सांगितले जाते की पौंडुल गावी अवडंबर कुळात जन्मलेल्या नारायणास लहानपणापासून अध्यात्म व देवादिकांची ओढ होती. त्याने लहानपणीच सर्वसंग परित्याग करून डोंगरावरील शिवमंदिरात आश्रय घेतला व तेथे विठ्ठल नामाचा जप सुरू केला. विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घडल्यानंतर ते ‘नगदनारायण’ नावाने प्रसिद्ध झाले. हळूहळू या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली. शेकडो वर्षांपासून या गडाचे कार्य गुरू-शिष्य परंपरेने सुरू आहे. येथील गुरू-शिष्य परंपरेची नामावली पुढीलप्रमाणे आहे – आद्य गुरु आदीनारायण, विधी, अत्री, दत्तात्रय, जनार्दन, एकनाथ, गावबा, अनंत, दयानंदस्वामी पैठणकर, आनंदऋषी, नगदनारायण, महादेव (पहिले), शेटीबाबा (दादासाहेब महाराज), गोविंद महाराज, नरसू, महादेव (दुसरे), माणिकबाबा, भगवानबाबा, महादेवबाबा व विद्यमान महंत शिवाजी महाराज.
या मंदिराबाबतची पौराणिक कथा अशी की रावणाचा वध करून श्रीराम आपल्या प्रियजनांसह विमानाने अयोध्येकडे जात असताना, विमान या डोंगरावर क्षणभर विसावले. श्रीरामाने अंतर्ज्ञानाने ओळखले की या डोंगरावर सिद्ध साधू तपस्या करीत आहेत व त्यांना आपल्या दर्शनाची उत्सुकता आहे. रामाने विमान डोंगरावर उतरवून त्या सिद्ध साधूंना दर्शन दिले व कलियुगापर्यंत या पवित्र डोंगरावर तपस्या करण्याचा त्यांना आशीर्वाद दिला.
हे मंदिर पौंडुल गावाजवळील सुमारे सात किलोमीटर लांब व तीन किलोमीटर रुंद असलेल्या उंच डोंगरावर आहे. डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी आता पक्की सडक उपलब्ध आहे. डोंगरावर मध्यभागी एक भूमिगत तलाव आहे. तेथे जाण्यासाठी पश्चिम दिशेने अरुंद भुयारी मार्ग आहे. पूर्वी उत्तरेकडून असलेला मार्ग डोंगरकडा कोसळल्याने बंद झाला आहे. असे सांगितले जाते की याच तलावाच्या काठी प्राचीन काळी सात सिद्ध साधू तपस्येला बसले होते. मंदिराच्या तटबंदीच्या बाहेर अनेक वास्तू आहेत. यामध्ये भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणारी कार्यालये, स्वच्छतागृहे, शाळा, महाविद्यालयाची इमारत व इतर इमारतींचा समावेश आहे.
मंदिराला सुमारे वीस फूट उंच भक्कम तटभिंत आहे. या भिंतीवर वानरशिल्पे कोरलेली आहेत. तटबंदीत पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेला दुमजली प्रवेशद्वारे आहेत. पूर्व दिशेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला चौथरे आहेत, ज्यांवर गजराज शिल्पे आहेत. प्रवेशद्वारासमोर पूजा साहित्याची दुकाने आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला द्वारपालपीठ आणि त्यावर द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा व आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. या नगारखान्याच्या दर्शनी भिंतीवर महिरपी तोरण व त्याखाली गणेशाचे शिल्प आहे. छतावर विशाल गरुड शिल्प आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला देव-देवतांची शिल्पे आहेत.
प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात तटबंदीला लागून चारही बाजूंनी दुमजली ओवऱ्या आहेत. तटबंदीत उत्तर दिशेला ९०, दक्षिण दिशेला ६२, पूर्वेला ८८ व पश्चिमेस ७२ ओवऱ्या व ५२ माड्या, अशा प्रकारे तटबंदीत एकूण ३६४ कक्ष आहेत.
उत्सव काळात भाविकांना राहण्यासाठी या वास्तूचा उपयोग केला जातो. प्रांगणात मंदिरासमोर दोन्ही बाजूला दोन चौथरे आहेत व त्यावर गोलाकार दीपमाळा आहेत. प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष व स्थानिक देवतांची लहान मंदिरे आहेत. याशिवाय येथे मंदिराचे वर्तमान महंत शिवाजी महाराज यांचे प्रासादतुल्य निवासस्थान आहे. बाजूलाच प्राचीन पिंपळ वृक्ष असून त्याच्या भोवती पार बांधलेला आहे.
प्रांगणात मध्यभागी विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. सभामंडप, मुख्य सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाह्य बाजूला दहा गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. हा सभामंडप अलीकडील काळात बांधलेला असल्याने याची स्थापत्यशैली आधुनिक असल्याची जाणवते. पुढे सुमारे पाच फूट जागा मोकळी आहे आणि त्यापुढील प्राचीन स्थापत्यशैलीतील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या समोरच डाव्या बाजूला महंत महादेवबाबा यांचे समाधी मंदिर आहे. समाधी मंदिरात महादेवबाबांची ध्यानमुद्रेतील मूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला भीमाबाई यांचे समाधी मंदिर व तुलसी वृंदावन आहे. मंदिराच्या मुख्य सभामंडपाचे प्रवेशद्वार काहीसे उंचावर आहे.
प्रांगणातून चार पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेच्या व पानाफुलांची नक्षी आणि ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. बंदिस्त स्वरूपाच्या मुख्य सभामंडपात नक्षीदार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. मुख्य सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला गुरु-शिष्य परंपरेतील दिवंगत महंतांच्या समाध्या आहेत. येथे नगदनारायण महाराज यांची समाधी स्वतंत्र गर्भगृहात आहे. मुख्य सभामंडपात समाधी चौथऱ्यांच्या मागे भिंतीवर काचेची मीनाकारी सजावट केलेली आहे. पुढे उजव्या बाजूला महादेवाचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. मंडारकावर कीर्तिमुख आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. डावीकडील गर्भगृहात वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. तिन्ही गर्भगृहांच्या छतावर पाच थरांची गोलाकार शिखरे असून शिखरात देवकोष्ठके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरांवर पानाफुलांची, स्तंभ व पद्म नक्षी आहेत. तिन्ही शिखरांच्या शीर्षभागी आमलक व कळस आहेत.
गडावर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. आठ दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवात अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी रक्तदान शिबिर देखील आयोजित केले जाते. दसरा हा नारायण गडावरील मुख्य वार्षिक उत्सव आहे. यावेळी राज्यातील प्रभावशाली राजकीय नेते आवर्जून येथे उपस्थित राहतात. संपूर्ण राज्यातून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्ताने गडावरून नारायण महाराजांची पालखी पंढरपुरास प्रस्थान करते, ज्यात हजारो भाविक वारकऱ्यांचा सहभाग असतो. मंदिरात वर्षातून तीन वेळा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन होते. मंदिरात दसरा, दिवाळी, चैत्र पाडवा, श्रावण मास, कोजागिरी पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरात एकादशी, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशीही भाविकांची संख्या मोठी असते.