ज्योतिर्लिंग याचा शब्दशः अर्थ ज्योतीचे म्हणजेच प्रकाशाचे लिंग असा होतो. हिंदू धार्मिक परंपरेनुसार, भगवान शंकर ज्योतिस्वरूपात ज्या-ज्या स्थानी प्रकट झाले, त्या स्थानांना ज्योतिर्लिंग असे म्हटले जाते. शिवपुराणातील कोटीरुद्र संहितेनुसार, संपूर्ण ब्रह्मांडात शंकराची असंख्य लिंगे व उपलिंगे आहेत. त्यातील बारा लिंगांना मुख्य लिंग मानले जाते. हीच द्वादश ज्योतिर्लिंगे होत. या बारापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात असून परळी वैजनाथ येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग हे त्यातील एक होय. भव्य वास्तुशिल्प आणि पौराणिक महत्त्व यामुळे येथे दर्शनासाठी सातत्याने भक्तांची रिघ लागलेली असते.
वैजनाथ ज्योतिर्लिंगास वैद्यनाथ असेही म्हटले जाते. ‘द्वादश ज्योतिर्लिंग स्तुती’ श्लोकांमध्ये या स्थानाबद्दल असा श्लोक आहे – पूर्वोत्तरे प्रज्वलिकानिधाने सदा वसन्तं गिरिजासमेतम्। सुरासुराराधितपादपद्मं श्रीवैद्यनाथं तमहं नमामि॥ म्हणजे ‘जो पूर्वोत्तर दिशेस चिताभूमी (वैद्यनाथधाम) मध्ये सतत पार्वतीसह वास करतो आणि सुर व असुर ज्याच्या चरणकमलांची आराधना करतात, त्या वैद्यनाथास मी प्रणाम करतो.’ यावरून वैजनाथाचे नाव वैद्यनाथ हेही असल्याचे स्पष्ट होते. याबाबतची आख्यायिका अशी की येथील मेरू पर्वत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागनारायण टेकडीच्या कुशीत वैजनाथ महादेवाचे मंदिर वसले आहे. प्राचीन काळी येथील पहाडावर विपुल प्रमाणात औषधी वनस्पती मिळत असत व वैद्य त्यांचा वापर करीत असत. त्यामुळे या महादेवास वैद्यनाथ म्हणजे चिकित्सकांचा ईश्वर असे नाव पडले.
‘शिवपुराणा’तील ‘कोटीरुद्र संहिते’च्या २८व्या अध्यायात वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे की लंकाधिपती रावणाने भगवान शंकरास प्रसन्न करून घेण्यासाठी खूप तपस्या केली. परंतु शंकर त्यास प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा रावणाने एक मोठा खड्डा खोदून त्यात अग्नी पेटवला. तेथे शंकराची प्रतिमा स्थापन केली आणि तेथे कठोर तपस्येस प्रारंभ केला. त्यानेही शंकर प्रसन्न न झाल्याने त्याने स्वतःचे एकेक शिर कापून शंकरास अर्पण करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने आपली नऊ शिरे त्या अग्निकुंडात टाकली. अखेरचे दहावे शिर कापण्यास तो जेव्हा सज्ज झाला, तेव्हा शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी रावणास त्याची मनीषा विचारली. तेव्हा रावण त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्यासमवेत लंकेस यावे आणि माझे आतिथ्य स्वीकारावे. तेव्हा प्रथम शंकराने रावणाला अतिबलिष्ठ बनवले आणि मग त्याच्या हाती आपले ज्योतिर्लिंग सोपवले. त्यावेळी शंकराने रावणाला ज्योतिर्लिंग जमिनीवर न ठेवण्याची अट घातली. रस्त्यात जाताना रावणास लघुशंकेची भावना झाली. त्यावेळी त्याला तेथे एक गोपालक दिसला. त्याने त्याच्या हाती शिवलिंग ठेवले. काही वेळ त्या गोपालक बालकाने रावण परत येण्याची वाट पाहिली व अखेर ते शिवलिंग जमिनीवर ठेवले. तेव्हा ते शिवलिंग तेथेच स्थिर झाले. तेच वैद्यनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या ‘भक्तीकोशा’त वैजनाथ याची नामस्पष्टिकरणकथा अशी सांगण्यात आली आहे की ज्योतिर्लिंग जमिनीवर ठेवणारा तो गोपालक म्हणजे शिवपुत्र गणेश होता व त्याने वैजू हे नाव धारण केले होते. त्यामुळे या ज्योतिर्लिंगास वैजनाथ असे नाव पडले.
परळीचे प्राचीन नाव परयली असे होते. इ.स. ७९३ च्या सुमारास गादीवर आलेला राष्ट्रकूट राजा गोविंद (तृतीय) याच्या मयूरखंडी (मोरखंडी, कर्नाटक) शिलालेखात या परयलीचा उल्लेख आहे. मौर्यकाळात दक्षिणेकडे १६ महाजनपदे होती, असा उल्लेख ‘अंगुत्तर निकाय’ या ग्रंथात आहे. अश्मक किंवा अस्सक वा आंधक महाजनपद हे त्यापैकी एक होते. हा भाग शैवांचा गड होता, तसेच येथे तंत्र परंपरा मूळ धरून होती. पाशुपत, कालामुख या शैव संप्रदायांचा वावर या भागात असल्याचे शिलालेखीय पुरावे उपलब्ध आहेत. अशा या अश्मक महाजनपदाचा भाग असलेल्या परळी येथील मेरू पर्वत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागनारायण टेकडीच्या कुशीत वैजनाथ महादेवाचे मंदिर वसले आहे.
या मंदिराचा इतिहास यादवांशी निगडित आहे. हे मंदिर रामदेवराय यादवांचा करणाधिपती (प्रधान) हेमाद्री उर्फ हेमाडपंत यांनी बांधल्याचे सांगण्यात येते. हेमाद्रीचा जीवनकाळ तेराव्या शतकातील आहे, तर या मंदिराची स्थापना बाराव्या शतकातील आहे. इतिहास अभ्यासक सुधाकर देशमुख यांच्या ‘अश्मक’ या पुस्तकानुसार, इ.स. ११८६ मध्ये हे मंदिर बांधण्यात आले होते. त्यावेळी येथे, इ.स. ११७८मध्ये गादीवर आलेला यादव राजा भिल्लम हा राज्य करीत होता. या मंदिराची बांधणी हेमाडपंती स्थापत्यशैलीतील असली, तरी या शैलीतील मंदिरे हेमाडपंतांच्या आधीपासूनच बांधली जात होती. त्या शैलीस भूमिज असे म्हणत. हेमाडपंतांनी या पद्धतीची अनेक मंदिरे बांधल्यामुळे त्या शैलीस त्यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले. कालौघात या मंदिराची मोठी पडझड झाली. ‘बीड डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’नुसार, इंदूर संस्थानच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या शिवभक्त होत्या. एकदा त्या येथे दर्शनासाठी आल्या असता, त्यांच्या दृष्टीस मंदिराची दुरवस्था पडली. ते पाहून त्यांनी लागलीच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आदेश दिले. मंदिराच्या पूर्वदरवाजाच्या उत्तरभागी असलेल्या एका संस्कृत शिलालेखावरील नोंदीनुसार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी क्रोधनाम
संवत्सर चैत्र शुक्ल पंचमी, शके १७०६ (इ.स. १७८४) या मुहूर्तावर या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पेशवाईमध्ये या देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी गावातील समस्त ब्राह्मणांना मिळून ५२८० बिघे जमीन इनाम म्हणून देण्यात आली होती.
काळ्या पाषाणांनी बांधलेल्या भव्य परकोटाच्या आत प्रशस्त परिसरात वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर वसलेले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी परकोटामध्ये उत्तर, दक्षिण आणि पूर्व अशी तीन प्रवेशद्वारे आहेत. भाविकांसाठी उत्तर दिशेने असलेले प्रवेशद्वार खुले आहे. अनेक दगडी पायऱ्या असलेल्या प्रशस्त मार्गिकेतून पुढे आल्यानंतर हे प्रवेशद्वार लागते. दगडात बांधलेले, द्वारपालांच्या रंगीत चित्रांनी सजवलेल्या या द्वारास कोरीव नक्षीकाम केलेली सागवानी लाकडाची चौकट आणि भक्कम दरवाजा आहे. आत एकाच वेळी हजारो भाविक बसू शकतील असे प्रशस्त प्रांगण आहे. बाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. येथील लांबच लांब दर्शनमार्गिकेतून थेट मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो.
भव्य असे दुमजली महाद्वार, आत भव्य स्तंभ, दगडी कमानी, कोरीवकाम केलेले सागवानी लाकडाचे छत, वरच्या बाजूस सज्जासारखी रचना, जमिनीवर संगमरवरी फरशी असा हा सभामंडप उंच व प्रशस्त आहे. सभामंडपात मध्यभागी मोठा दगडी नंदीमंडप आहे. उंच चौथऱ्यावर उभारलेल्या या नंदीमंडपाची रचना यादवकालीन स्थापत्यशैलीतील आहे. या मंडपास मध्यभागी चौकोनाकार व वरच्या बाजूस तबकडीसारखा आकार असलेले कोरीव दगडी स्तंभ आहेत. त्यावर लाकडी छत आहे. या मंडपात नंदीच्या पितळी पत्र्याने मढवलेल्या तीन मोठ्या मूर्ती विराजमान आहेत. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे वैजनाथ महादेव रोज पहाटे चार वाजता, तसेच दुपारी व रात्री १२ वाजता असे दिवसातून तीन वेळा नंदीवर बसून नगरप्रदक्षिणा करतात. त्यासाठी हे तीन नंदी येथे आहेत. या नंदीमंडपाच्या स्तंभालगत गणेशाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती विराजमान आहे. येथील दर्शनरांगेतून जाताना भाविकांना प्रथम वीरभद्राच्या मूर्तीचे दर्शन होते. मंदिराच्या पूर्व दिशेस, सभामंडपाच्या भिंतीतील एका देवळीमध्ये वीरभद्राची पितळी मूर्ती विराजमान आहे. येथे दाढी-मिशाधारी आणि मस्तकी मुकूट धारण केलेला वीरभद्र हा शिवगण आशीर्वाद आणि अभय हस्तमुद्रेत असून त्याच्या एका हातात त्रिशूळही आहे. येथे
वीरभद्र दोन्ही पाय खाली सोडून आसनस्थ झालेल्या स्थितीत आहे. येथून पुढे काही अंतरावर एका चौथऱ्यावर सोमनाथाचे लिंग प्रतिष्ठापित आहे. जवळच देवाचा पालखी-रथ ठेवलेला आहे. दर्शनमार्गिकेतून गर्भगृहाकडे जाताना एका ओवरीत काशी विश्वनाथाच्या मोठ्या शिवलिंगाचेही दर्शन होते. सभामंडपामध्ये नागनाथाचेही स्थान आहे.
येथून महामंडपात प्रवेश होतो. महामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांची प्राचीन शिल्पे आहेत. महामंडपाचे प्रवेशद्वार चांदीच्या, कोरीव नक्षीकाम केलेल्या पत्र्याने सुशोभित केलेले आहे. त्याच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची कोरीव मूर्ती आहे. मंडारकावर अर्धचंद्रशिला असून बाजूला दोन कीर्तिमुखे आहेत. या द्वारचौकटीच्या एका बाजूस या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केल्याची नोंद असलेला शिलालेख आहे. यात वैजनाथाचा उल्लेख ‘वैद्यनाथ’ असा करण्यात आलेला आहे. महामंडपाचे छत दगडी घुमटाकार आहे. भिंतींच्या पुढच्या भागात महिरपी कमानी असलेल्या या गोलाकार महामंडपातून मंदिराच्या छोट्या अंतराळात व तेथून गर्भगृहात प्रवेश होतो. येथे एका बाजूस गणेशाची मूर्ती विराजमान आहे, तर दुसऱ्या बाजूस तुळजाभवानीसह काही प्राचीन मूर्ती व शिल्पे ठेवलेली आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार चांदीच्या, कोरीव नक्षीकाम केलेल्या पत्र्याने मढवलेले आहे. द्वारचौकटीवर ललाटबिंबस्थानी गणेशशिल्प आहे. गर्भगृहात भूतलावर मोठ्या व्यासाची दगडी शिवपिंडी आहे. या पिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग गुळगुळीत शाळिग्राम शिळेचे आहे. शिवपिंडीवर चांदीचे छत्र आहे. येथे भाविकांना ज्योतिर्लिंगास स्पर्श करून पूजा करता येते. भाविकांची अशी श्रद्धा आहे, की या स्पर्शाने विविध व्याधी दूर होतात. गाभाऱ्यात चारही बाजूंनी नंदादीप लावलेले आहेत. ते सतत तेवत असतात असे सांगण्यात येते. वैजनाथ महादेव मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवपिंडीच्या वामांगी पार्वती आहे. चांदीच्या सुशोभित देव्हाऱ्यामध्ये पार्वतीमातेची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीच्या एका हातात कमलपुष्प आणि एका हातात डमरू आहे.
मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूस प्रांगणात त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर महादेवाच्या छोट्या देवळ्या आहेत. प्रांगणात साध्वी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा असून, त्याच्या मागच्या बाजूला मोठी दगडी दीपमाळ आहे.
मंदिरात विविध धार्मिक सण व उत्सव अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. श्रावणात येथे रोज रुद्राभिषेक केला जातो. श्रावणी सोमवारी मंदिराभोवती निघणारी शोभायात्रा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. विजयादशमीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा व यज्ञ होतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येथे दीपोत्सव होतो. त्या रात्री अवघे मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. याच प्रमाणे येथे कालरात्री देवी नवरात्रोत्सव, वैकुंठ चतुर्दशी, दीपावली, मकर संक्रांत हे सणही धार्मिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात. महाशिवरात्र हा येथील सर्वांत मोठा सोहळा होय. या मुहूर्तावर येथे हजारो भक्त रात्रभर जागरण करतात. मंदिरात विशेष पूजाअर्चा व अखंड ओंकार जप केला जातो. या उत्सवांच्या वेळी येथे बेल आणि तुळशी असा फरक केला जात नाही. परळी हे हरिहर मिलनाचे स्थान मानले जाते. येथे वैजनाथाच्या रोजच्या पूजेसाठी येथील हरिहर तीर्थाचे पाणी आणले जाते.