सोमेश्वर मंदिर

जिरेवाडी, ता. परळी, जि. बीड

भारतात शैव पूजनाची परंपरा अतिशय प्राचीन आहे. तसेच शैव भक्तांचा एक स्वतंत्र पंथ आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी येथील वैजनाथ मंदिर जगप्रसिद्ध आहे. त्यामुळेच परळी तालुक्यात सर्वाधिक मंदिरे महादेवाचीच आहेत. महादेवाच्या अनेक नावांपैकी सोमेश्वर हे अत्यंत लोकप्रिय नाव आहे. परळी तालुक्यातील जिरेवाडीच्या डोंगरावर सोमेश्वराचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सोमेश्वर महादेव हे परळीच्या वैजनाथाचे बंधू मानले जातात.

हे देवस्थान स्वयंभू आहे. ते हजारो वर्षांपूर्वीचे असल्याची माहिती येथील पुजारी सांगतात. मंदिरातील स्वयंभू शिवपिंडी व शिवपिंडीतील पाण्याचा नैसर्गिक स्रोत शेकडो वर्षांपूर्वीचा असावा, असे सांगितले जाते. परळी वैजनाथ मंदिराच्या समकालीन असलेल्या या मंदिरात पालखी सोहळा व हरिनाम सप्ताहाची परंपराही दीर्घकाळापासून सुरू आहे.

हे मंदिर गावापासून काही अंतरावरील एका उंच टेकडीवर आहे. मंदिराकडे /येण्यासाठी रस्ता व पायरीमार्ग असे दोन पर्याय आहेत. खाजगी वाहने रस्त्याने टेकडीवरील मंदिरापर्यंत थेट पोहोचतात. मंदिराजवळ प्रशस्त वाहनतळ आहे. तेथून सुमारे वीस पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात पोहोचता येते. तरीही अनेक भाविक पायरी मार्गाने जाणेच पसंत करतात. पायरी मार्गाच्या प्रारंभी टेकडीच्या पायथ्याशी एक साधीशी स्वागत कमान आहे. येथून सुमारे पन्नास पायऱ्या चढून मंदिराच्या महाद्वारापर्यंत पोहोचता येते. पायरी मार्गावर उजव्या व डाव्या बाजूला सुरक्षा कठडे बसवले आहेत. येथे भाविकांचे ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप उभारण्यात आला आहे. मंदिरासमोर दुमजली महाद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन स्तंभ व त्यावर छत आहे. अशीच रचना वरील मजल्यावर पाहायला मिळते.

येथून पुढे थेट मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. सभामंडपात उजव्या व डाव्या बाजूला तसेच गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंना दरवाजे आहेत. सभामंडपात खिडक्यांची व्यवस्था असल्यामुळे हवेशीर वातावरण व पुरेसा उजेड आहे. पुढे हेमाडपंती शैलीतील बांधकाम असलेले गर्भगृह आहे. सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास एक पायरी आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. या झडपांवर नक्षीदार रजतपटल आच्छादन आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपाषाणाच्या बाजूने पाण्याचा अखंड व नैसर्गिक स्रोत वाहतो. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर सोमेश्वर महादेवाची चांदीची मूर्ती आहे. देवाच्या डोक्यावर फेटा आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावर दोन्ही बाजूला गोलाकार स्तंभ व स्तंभांवर गजपृष्ठ आकाराचे छत आहे. मंदिराच्या छताला चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे द्रविडी शैलीतील चौकोनी शिखर आहे. शिखराच्या चारही थरात कुट व शाल रचना आहे. तसेच देवकोष्ठके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आहे. या स्तूपिकेवर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या प्रांगणात वाहनतळाकडे जाणाऱ्या पायरीमार्गाच्या डाव्या बाजूला दोन लहान मंदिरे आहेत. येथील डाव्या बाजूच्या मंदिरात वज्रपीठावर चतुर्भुज भैरवनाथांची प्राचीन मूर्ती आहे. देवाच्या हातात त्रिशूल, डमरू व पानपात्र आहे, तसेच पायाजवळ श्वान आहे. उजव्या बाजूच्या मंदिरात वज्रपीठावर साईबाबांची मूर्ती आहे. दोन्ही मंदिरांच्या छतावर गोलाकार निमुळते शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.

पायरीमार्गाच्या उजव्या बाजूला जोगेश्वरी व भैरवनाथाचे लहान मंदिर आहे. या मंदिरात वज्रपीठावर देवांच्या शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहेत. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व आमलकावर कळस आहे. मंदिराच्या मागील बाजूला वाहनतळाला लागून एक लहान मंदिर आहे. त्यात स्थानिक देवतांची शेंदूर लावलेली पाषाणे आहेत. मंदिराच्या प्रांगणात भक्तनिवास, विश्रामधाम, सेवेकऱ्यांची निवासस्थाने व इतर वास्तू आहेत.

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी सोमेश्वर देवाची पालखी परळीच्या वैजनाथाच्या भेटीला जाते. नंतर पालखी ग्रामप्रदक्षिणा करते. रात्री उशिरा पालखी मंदिरात परत येते. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील दुसरा वार्षिक उत्सव आहे. या उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी पालखी सोहळ्याने होते. यावेळी देव पालखीत बसून नदी तीरावर सीमोलंघनाला जातात. फाल्गुन मासात मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहाची सांगता आमळी बारशीला देवाच्या पालखी सोहळ्याने होते. तिन्ही पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेकडो भाविक येथे येतात. ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत भाविक देवाच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. उत्सवांच्या निमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

दर सोमवार, गुरुवार व शनिवारी मंदिरात नगरभोजन आयोजित केले जाते. देवाला अन्नदान करण्याचा नवस करण्याची प्रथा असल्यामुळे नवस फेडण्यासाठी भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिरात दसरा, दिवाळी, श्रावणमास, नागपंचमी, मकरसंक्रांत, चैत्रपाडवा, हनुमान जयंती, रामनवमी असे वर्षभरातील सण व उत्सव साजरे केले जातात. मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. परळीच्या वैजनाथाच्या दर्शनाला येणारे भाविक या मंदिरास आवर्जून भेट देतात.

उपयुक्त माहिती:

  • परळी येथून ५ किमी अंतरावर
  • बीड येथून ९२ किमी अंतरावर
  • परळी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे

सोमेश्वर मंदिर

जिरेवाडी, ताल. परली, जिला. बीड

Back To Home