योगेश्वरी मंदिर

अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड

मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आणि महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत असलेली श्री योगेश्वरी देवी ही भारतीय धार्मिक परंपरेतील एक तेजस्वी शक्ती असल्याची मान्यता आहे. योगेश्वरी देवीचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील मंदिर ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. पौराणिक संदर्भांनुसार, या शहराचा उल्लेख ‘जयंती नगर’ असा आढळतो. परळीचे प्रभू वैद्यनाथ आणि योगेश्वरी देवी यांच्या विवाहाची आख्यायिका या मंदिराशी निगडीत आहे. विवाहाचा मुहूर्त टळल्यामुळे देवी याच ठिकाणी शिलारूप होऊन स्थिरावली, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हेमाडपंती शैलीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा काळ सुमारे अकरावे शतक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की परळीच्या वैजनाथाचे रूप जोगेश्वरी देवीच्या मनात भरले. वैजनाथाशी देवीचे लग्न ठरल्यावर सर्व वऱ्हाडी मंडळी हत्ती, घोडे घेऊन अंबाजोगाई या ठिकाणी आले. आपले लग्न रात्रीच्या अंधारात सूर्योदयापूर्वीच व्हावे, अशी देवाची अट होती. परंतु साजशृंगार करताना देवीला उशीर झाला व सूर्योदय होताच वैजनाथ निघून गेले. देवीचे लग्न न झाल्याने ती येथेच स्थापित झाली व हेच तिचे माहेर झाले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, या भागात दंतासुर नावाच्या दैत्याने उच्छाद मांडून जनतेला फार त्रास दिला होता. त्यावेळी भक्तांनी योगेश्वरी देवीला या दैत्याच्या त्रासातून सुटका करावी, अशी प्रार्थना केली. भक्तांच्या हाकेला धावून येत देवीने दंतासुराचा वध केला व ती येथे स्थिर झाली.

अंबाजोगाई शहरात जयंती नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. मंदिराला दुहेरी भक्कम तटबंदी आहे. पहिल्या तटबंदीत पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेला तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी उत्तर दिशेच्या दुमजली प्रवेशद्वारातून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जातो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर महिरपी तोरण आहे. तोरणाच्या वर मध्यभागी योगेश्वरी देवी व दोन्ही बाजूला सिंहाचे शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वारातून आत जाताच पुढे सुमारे पन्नास मीटर अंतरावर मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोर फरसबंदी प्रांगणात चौथरा व त्यावर निमुळती होत गेलेली अष्टकोनी दीपमाळ आहे. अशीच दीपमाळ मंदिराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर आहे. उत्सव काळात या दीपमाळांवर दिव्यांची रोषणाई केली जाते. या पुढे मंदिराची दुसरी तटबंदी आहे. या तटबंदीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत जाताच उंच शिखर असलेले मंदिर दृष्टीस पडते.

तीन अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वारात द्वारपालिकांची शिल्पे व स्तंभनक्षी आहे. ललाटबिंबावर गणपती शिल्प व तोरणात शिखरशिल्पे आहेत. सर्व अर्धमंडपांत प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व कणीवर हस्त आहेत. अर्धमंडपांच्या वितानांवर चक्राकार नक्षी आहेत.

अर्धमंडपातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. सभामंडपातील स्तंभांची रचना अर्धमंडपातील स्तंभांसारखीच आहे. सभामंडपात डाव्या बाजूला देवकोष्ठकात गणपतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे, तर उजव्या बाजूला उत्सवकाळात परडी ठेवण्यासाठी उंच चौथरा आहे. त्यावर केशवराज यांची काळ्या पाषाणातील मूर्ती व देवीची उत्सवमूर्ती ठेवलेली आहे. सभामंडपात जमिनीवर कासव शिल्प आहे. सभामंडपातून पुढे अंतराळ व त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास वेलबुट्टीशाखा, पर्णलताशाखा, पुष्पलताशाखा, स्तंभशाखा आदी पाच द्वारशाखा आहेत. त्यावर खालील बाजूला द्वारपालिका, द्वारपाल, गंगा, यमुना आदी शिल्पे आहेत. ललाटबिंबावर इष्टदेवतेचे शिल्प आहे. उत्तरांगावर शिखरशिल्पे आहेत.

गर्भगृहात वज्रपीठावरील चांदीच्या नक्षीदार मखरात देवीचा स्वयंभू तांदळा आहे. देवीचे मुख, नेत्र, नासिका चांदीचे आहेत. तसेच डोक्यावर चांदीचा मुकुट व कपाळावर चांदीचा टिळा आहे. मागील चांदीच्या नक्षीदार प्रभावळीत छत्र, चामर, ध्वज व पताका आहेत. गर्भगृहात उजव्या बाजूला देवकोष्ठकात महाकाली व तुळजाभवानी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या तिन्ही अर्धमंडपांच्या छतावर गोल घुमटाकार शिखरे व त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. शिखराच्या खालील चौकोनी थरात चारही बाजूंना प्रत्येकी पाच देवकोष्ठके आहेत. त्यातील समोरील बाजूस मध्यभागी हत्तीवर बसलेल्या माहूताचे शिल्प आहे. चौकोनी थराच्या वर चारही कोपऱ्यांवर चार उपशिखरे आहेत. शिखराचा दुसरा, तिसरा व चौथा थर गोलाकार आहेत. या सर्व थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. यात विष्णूचे दशावतार, योगिनी, मातृका अशी शिल्पे आहेत. यात अष्टोदशभुजा मातृ गणेश शिल्प विशेष आहे. स्त्रीरूपातील गणेशाची ही मूर्ती दुर्मिळ व अनोखी आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत. आमलकावर कळस व ध्वजपताका आहे.

मंदिराच्या प्रांगणात उत्तर दिशेच्या प्रवेशद्वारासमोर विशाल यज्ञमंडप आहे. त्यात यज्ञकुंड आहे. दसरा व मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे शतचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात येते. यज्ञकुंडाच्या सभोवती लोखंडी स्तंभ आहेत व त्यावर छत आहे. प्रांगणात मंदिरासमोर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे सभागृह आहे. येथे भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

प्रांगणात दंतासुराची मूर्ती आहे. प्रांगणात पूर्व व उत्तर दिशेला तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भाविकांसाठी भक्तनिवास व धर्मशाळा म्हणून केला जातो. यातील काही ओवऱ्या ग्वाल्हेर राज्याचे प्रधान दिनकरराव राजवाडे यांनी बांधल्या आहेत. येथे एक मोराची ओवरी आहे. ‘हरिवरदा’ ग्रंथाची रचना करताना ग्रंथरचयिता कृष्णदयार्णव येथेच राहिले होते. नैऋत्य दिशेच्या ओवरीत रेणुका देवीची मूर्ती स्थापित आहे. मंदिराच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराच्या समोर दीपमाळेच्या पलीकडे सर्वेश्वर तीर्थकुंड आहे. येथील पाण्याने देवीस अभिषेक केला जातो. कुंडाच्या काठावर सर्वेश्वर, महारुद्र व भैरव या देवतांची तीन लहान मंदिरे आहेत. प्रांगणात डोरगे बुवा, आबा बुवा डूबरगे महाराज यांचे समाधी मंदिर आहे. पुढे धर्मशाळेची प्रशस्त इमारत आहे.

मार्गशीर्ष पौर्णिमा हा देवीचा मुख्य वार्षिक उत्सव आहे. तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदेस देवीची घटस्थापना करून उत्सवास सुरुवात होते. पंचमी ते दशमी या पाच दिवसांत देवीची सालंकृत पूजा केली जाते. अष्टमी व नवमीच्या संधीकाळात शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती देऊन नवमीस महाभोग अर्पण केला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. यावेळी देवीचे सेवक काकडे (मशाल) नाचवत नृत्य, गायन करतात. सर्व उत्सवांच्या वेळी राज्यभरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. दररोज मंदिरात देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक येत असतात. येथे दररोज दुपारी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • अंबाजोगाई बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • बीड येथून ९६ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून अंबाजोगाईसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२४४६ २४७२४०

योगेश्वरी मंदिर

अंबाजोगाई, ताल। अम्बाजोगाई, जिला. बीड

Back To Home