बीड शहराचे ग्रामदैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे खंडेश्वरी देवी मंदिर शहराच्या पूर्व दिशेला एका टेकडीवर वसलेले आहे. खंडेश्वरी देवी ही रेणुका मातेचेच एक रूप मानली जाते आणि हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराची मूळ उभारणी काळोजी नामक धनगराने केली होती, असे सांगितले जाते. पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला भव्यता प्राप्त करून दिली. नवरात्रोत्सवामध्ये येथे भरणारी यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहे.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की शेकडो वर्षांपूर्वी बीड शहरात काळोबा वीर नावाचा धनगर राहत होता. तो माहूरच्या रेणुका देवीचा निःसीम भक्त होता. दर पौर्णिमेस तो माहूरगडावर जाऊन देवीचे दर्शन घ्यायचा. पुढे वृद्धापकाळाने त्याला माहूरला जाणे कठीण होऊ लागले, तेव्हा त्याने देवीला आपल्या गावी येण्याची विनंती केली. “मी तेजोरूपात तुझ्या मागोमाग येते; मात्र ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहशील, त्याच ठिकाणी मी स्थापित होईन.”, अशी अट देवीने घातली. काळोबांनी देवीची अट मान्य केली आणि परतीचा प्रवास सुरू केला. देवीच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना होत होती. सध्या जिथे खंडेश्वरी मंदिर आहे, त्या खडकाळ भागातून जात असताना काळोबांच्या मनात अचानक एक शंका डोकावली. खरंच देवी आपल्या मागे येत आहे की हा केवळ भास आहे? या द्विधा मनस्थितीत, बीडच्या वेशीवर आल्यावर काळोबांचा संयम सुटला आणि त्यांनी मागे वळून पाहिले. ज्या क्षणी काळोबांनी मागे वळून पाहिले, त्या क्षणी देवीने दिलेले वचन पूर्ण केले. ती त्याच जागी थांबली. ती एका खडकाळ दगडातून तांदळा स्वरूपात प्रकट झाली आणि तिथेच स्थिर झाली.
देवीचा पुढील प्रवास तिथेच ‘खंडित’ झाला, म्हणून या देवीला खंडेश्वरी असे नाव पडले. ही घटना ज्या ठिकाणी घडली, तेथेच आजचे खंडेश्वरी मंदिर आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक महान राज्यकर्त्या आणि शिवभक्त म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अहिल्यानगर (पूर्वीचे नाव अहिल्यानगर) जिल्ह्यातील चोंडी या गावात झाला होता. त्यामुळे बीड आणि आसपासच्या प्रदेशाशी त्यांचे भावनिक नाते होते. अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीत राज्यकारभारासोबतच देशभर उध्वस्त झालेली मंदिरे, घाट आणि धर्मशाळा पुन्हा बांधल्या. काशी, मथुरा, गया, सोमनाथ ते रामेश्वरमपर्यंत त्यांच्या कार्याचा विस्तार होता. ऐतिहासिक नोंदींनुसार खंडेश्वरी मातेच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धारही अहिल्यादेवी होळकर यांनी केला. ज्या काळात मुघल आणि निजामी आक्रमणांमुळे अनेक मंदिरांची पडझड झाली होती, त्या काळात अहिल्यादेवींनी केलेले हे कार्य अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी केवळ या मंदिराचा जीर्णोद्धारच केला नाही, तर मंदिराच्या दैनंदिन पूजा-अर्चेसाठी आणि उत्सवांसाठी व्यवस्थाही लावून दिली होती.
मराठा वास्तुशैलीतील हे मंदिर बीड शहरात मुख्य रस्त्यालगत व रस्त्यापेक्षा उंचावर आहे. या मंदिरास दुहेरी तटबंदी आहे. पहिल्या तटबंदीत प्रांगणात चढण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. पायरी मार्गाच्या डाव्या बाजूला प्राचीन दीपमाळ आहे. प्रांगणाच्या या भागात दुसऱ्या तटबंदीलगत लहानशी पुष्करणी आहे. या पुष्करणीच्या काठावर कुंभसुंदरी शिल्प आहे. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिराची दुसरी तटबंदी भक्कम व सुमारे दहा फूट उंच आहे. यात प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर दुमजली अर्धमंडप आहे. अर्धमंडपात पुढील बाजूस दोन चौकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांवर महिरपी कमानीचा भार तोलून धरलेल्या यक्षांची शिल्पे आहेत. अशीच शिल्पे तटबंदीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालपीठ आहेत व त्यावर द्वारपाल शिल्पे आहेत. वरील बाजूस, तटबंदीच्या दर्शनी भिंतीवर गणेश शिल्प आहे. या प्रवेशद्वारास दुहेरी झडपा आहेत. यातील बाह्य बाजूच्या झडपा लोखंडी व जाळीदार आहेत, तर आतील बाजूला नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना व आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत.
प्रवेशद्वारासमोर, मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रशस्त प्रांगणात देवीचे भक्त काळोबा वीर यांची समाधी आहे. समाधीवर चरण पादुका व मुखशिल्प आहे. समाधीपुढे यज्ञकुंड आहे. तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांचा वापर भाविकांसाठी विश्रांतीस्थळ व भक्तनिवास म्हणून केला जातो.
सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपाची समोरील बाजू खुली आहे. तिथे दोन्ही बाजूला पद्मासनावर उभ्या असलेल्या स्वागत सुंदरींची शिल्पे आहेत. सभामंडपासमोर दोन्ही बाजूस वज्रपीठावर सिंह शिल्पे आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. मध्यभागी चार स्तंभांच्या मधील जागा सुमारे एक फूट उंच आहे. तिथे कासव शिल्प आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत, त्यात देवमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पाच द्वारशाखा आहेत, त्यावर अस्पष्ट नक्षी व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या सभोवती गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर काचेची मिनाकारी सजावट केलेली आहे. गर्भगृहात वज्रपीठावर चार नक्षीदार स्तंभ आहेत. त्यावर छत असलेला चांदीचा नक्षीदार मखर आहे. या मखरात खंडेश्वरी देवीचा स्वयंभू तांदळा आहे. देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे.
तसेच देवीचे नेत्र व नासिका चांदीच्या आहेत. देवीच्या बाजूला पितळी त्रिशूल आहे. गर्भगृहाच्या भिंती व घुमटाकार वितानावर काचेची मिनाकारी सजावट केलेली आहे.
मंदिराच्या छतावर चहुबाजूंनी कठडा आहे. कठड्यात समोरील बाजूला पाच देवकोष्ठके आहेत. यातील मधल्या देवकोष्ठकात श्री गणेशाची मूर्ती आहे. या देवकोष्ठकाच्या वर दक्षिणी शैलीतील आडव्या रचनेचे शिखर आहे, ज्यावर रांगेत पाच कळस आहेत. गणेशकोष्ठकाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन देवकोष्ठके आहेत, ज्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. इतर तीन बाजूंच्या कठड्यातील कोष्ठकांतही देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे वर निमुळते होत गेलेले अष्टकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात आठ देवकोष्ठके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व कळस आहे.
नवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवीची आरती, भजन, संगीत, जागरण, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सलग नऊ दिवस संध्याकाळी देवीचा छबिना (मिरवणूक) काढून मंदिराभोवती प्रदक्षिणा केली जाते. या दरम्यान रात्री बारा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम सुरू असतात. नवरात्रीत सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवशी नवचंडी यज्ञाचे आयोजन केले जाते. मंदिरात चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, चैत्र नवरात्री, शाकंभरी नवरात्री आदी सण व उत्सव साजरे केले जातात. मंदिरात पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, मंगळवार, शुक्रवार आदी दिवशी भाविकांची विशेष गर्दी असते.