ज्योतिष शास्त्रात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे नवग्रह मानले जातात. बारा राशीतील प्रत्येक राशीत शनी अडीच वर्षे वास्तव्यास असतो. शनी जन्मराशीत अडीच वर्षे, जन्मराशीच्या आधीच्या व नंतरच्या राशीत प्रत्येकी अडीच वर्षे असा एकूण साडेसात वर्षे त्याचा प्रभाव पडतो. यालाच शनीची साडेसाती म्हणतात. या दरम्यान माणसाला भयंकर त्रास सहन करावा लागतो, असे ज्योतिष शास्त्र सांगते. या त्रासातून तत्काळ सुटका व्हावी म्हणून भाविक भारतातील साडेतीन शनी पीठांचे दर्शन घेतात. यापैकी अर्धे पीठ मानले जाणारे प्राचीन शनी मंदिर बीड शहरातील मोंढा भागात आहे. येथे दर्शन घेतल्याने शनीची कृपा होते व साडेसाती बाधत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर आठशे ते हजार वर्षे प्राचीन असावे, असे मानले जाते. मंदिराबाबत आख्यायिका अशी की उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य याला साडेसाती लागल्यानंतर त्याचे राज्य बुडाले. मानसिक व शारीरिक त्रासाने त्रस्त झालेल्या राजा विक्रमादित्याने या भागातील एका तेल्याच्या घरी घाणा ओढण्याची नोकरी पत्करली.
त्या काळात राजाने सातत्याने शनी देवाचा धावा केला. तेव्हा शनी देवाने प्रसन्न होऊन राजाच्या सर्व त्रासांचे निराकरण केले आणि राजाला त्याचे राज्य परत मिळाले. त्यावेळी राजाने शनी देवाला येथेच कायमस्वरूपी वास्तव्य करावे व सर्व भक्तांच्या साडेसातीचे निराकरण करावे, अशी विनंती केली. राजाच्या विनंतीचा मान ठेवून शनी देव मूर्ती रूपात येथे स्थापित झाले.
हे मंदिर रस्त्यालगत वसलेले आहे. या मंदिरास भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष आहेत, तसेच भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात कोरीव पाषाणात बांधलेली प्राचीन विहीर आहे. या विहिरीतील पाणीसाठा अक्षय असल्याचे सांगण्यात येते. प्रांगणात इतर देवी-देवतांची लहान मंदिरे, पुजाऱ्यांची निवासस्थाने व इतर वास्तू आहेत.
प्रांगणात मधोमध कोरीव पाषाणात बांधलेला शनी देवाचा चौथरा आहे. या चौथऱ्यावर समोरील दोन्ही बाजूला गोलाकार दीपमाळा आहेत. चौथऱ्याच्या चारही बाजूने सुमारे दोन फूट रुंद खोल खंदक आहे, ज्यामध्ये पाणी आहे. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी खंदकावर प्रवेशद्वारासमोर लहान पूल बांधलेला आहे.
चौथऱ्यावर बाह्यबाजूला पाषाणी कठडा आहे. त्यावर स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा बसविला आहे. चौथरा उंच असल्यामुळे वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. चौथऱ्यावर मध्यभागी वर्तुळाकार वज्रपीठावर शनी देवाची सिंहासनारूढ स्वयंभू मूर्ती आहे. देवाचे नेत्र, नासिका, मुख व मिश्या चांदीच्या आहेत, तसेच डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. सिंहासनात दोन्ही बाजूला पशू शिल्पे आहेत. छत व भिंती विरहित हे मंदिर पूर्णखुल्या स्वरूपाचे आहे.
शनी मंदिराच्या बाजूला शनी-मारुती मंदिर आहे. या मंदिरास स्वतंत्र तटबंदी आहे. तटबंदीत प्रवेशद्वार आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला दीपकोष्टके आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारातून पुढे बंदिस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात तटबंदीला लागून तिन्ही बाजूला ओवऱ्या आहेत. यांपैकी एका ओवरीत लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. ओवऱ्यांमध्ये काही प्राचीन पाषाण मूर्ती आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी शनी-मारुती मंदिराची रचना आहे. सभामंडपात समोरील बाजूला चार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभदंडात मारुती शिल्पे साकारली आहेत आणि त्यावर दीपकोष्टके आहेत. स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत.
गर्भगृहात वज्रपीठावर मारुतीची शेंदूर चर्चित पाषाण मूर्ती आहे. तिच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
वैशाख अमावस्या म्हणजेच शनैश्वर जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतून अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात महाअभिषेक, महाआरती, महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पौष शुक्ल प्रतिपदा ते दशमी हा दहा दिवसांचा शनी उत्सव मंदिरात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या दहा दिवसांत शनी मूर्तीवर तेलाचा अखंड अभिषेक केला जातो. या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता महाप्रसादाने केली जाते. दर महिन्याच्या अमावस्येला तसेच शनी अमावस्येला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर शनिवारी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या शेकडोंमध्ये असते.