जय भवानी मंदिर

शिवाजीनगर, गढी, ता. गेवराई, जि. बीड

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ मानले जाते. तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, पुणे जिल्ह्यातील हवेली, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड इत्यादी अनेक ठिकाणी देवीची प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकीच एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर येथे आहे. येथील देवी जागृत असल्याने ती नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिराबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी गढी गावात तुळजाभवानीचे एक निःसीम भक्त राहत होते. ते या डोंगरावर देवीच्या नावाचा अखंड जप करीत. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा देवीने कायमस्वरूपी येथेच स्थापित व्हावे व भक्तांचे कल्याण करावे, असा वर भक्ताने मागितला. भक्ताच्या इच्छेचा मान ठेवून देवी मूर्तीरूपात येथे स्थापित झाली. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते, असेही सांगितले जाते.

हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. अभ्यासकांच्या मते ते त्याहून अधिक प्राचीन, म्हणजेच १३व्या ते १४व्या शतकातील असावे. अलीकडील काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे मंदिराला आधुनिक झळाळी प्राप्त झाली आहे. गावाजवळील उंच टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी कोरीव पाषाणात बांधलेला पायरीमार्ग आहे. जवळपास शंभर पायऱ्या असलेला हा मार्ग सुमारे दहा फूट रुंद असून दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. मंदिरास भक्कम तटबंदी आणि तटबंदीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्तंभांवर नगारा वाजवणाऱ्या स्वागतसुंदरींची चित्रे आहेत, तर वरील बाजूस चक्रनक्षी आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने तसेच इतर वास्तू आहेत.

प्रांगणात विविध प्रकारची झाडे लावून उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. येथे मंदिरासमोर चौथरा आहे आणि चौथऱ्यावर दीपमाळ आहे. गोलाकार व उंच दीपमाळ वर निमुळती होत गेली आहे. प्रांगणात विशिष्ट प्रकारच्या उद्यान रचनेने सुंदर पायवाटा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तसेच मंदिरासमोर भव्य यज्ञमंडप आहे आणि मंडपात मध्यभागी यज्ञकुंड आहे. यज्ञकुंडाच्या बाजूने चार स्तंभ आहेत. यज्ञमंडपाच्या बाह्य बाजूने स्तंभिकांची रचना असलेला कठडा आहे. यज्ञमंडपात स्तंभपादावर उभे असलेले सोळा गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. येथील छत मध्यभागी खुले आहे, यज्ञ करतेवेळी धूर छतातून बाहेर पडण्यासाठी ही विशिष्ट रचना करण्यात आली आहे. यज्ञमंडपाच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. पुढे पाषाणी चौथऱ्यावर मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेले मंदिर आहे. चौथरा प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे मुखमंडपात येण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. मुखमंडपापुढे सभामंडप आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात बाह्य बाजूंनी सोळा नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत आणि हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात जमिनीवर मध्यभागी कासव शिल्प आहे. गर्भगृह सभामंडपापेक्षा काहीसे उंचावर आहे. गर्भगृहात वज्रपीठावर संगमरवरी मखरात तुळजाभवानीची काळ्या पाषाणातील अष्टभुजा मूर्ती आहे. देवी महिषासुरमर्दिनी रूपात असून हातात विविध आयुधे आहेत. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या देवीच्या शिरावर चांदीचा मुकुट आहे. वज्रपीठाच्या उजव्या बाजूला देवीचे शय्यामंचक आहे. मंचकावर तीन तलवारी ठेवलेल्या आहेत. या तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस अर्पण केल्या असल्याचे सांगितले जाते. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.

मुखमंडपाच्या छतावरील कठड्यावर समोरील बाजूला तुळजाभवानीचे शिल्प आहे. सभामंडपाच्या छतावर चोहोबाजूंनी लोखंडी जाळीदार सुरक्षा कठडा आहे, तर गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात आठ देवकोष्ठके आहेत, ज्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. देवकोष्ठकांवर शिखरशिल्पे व लहान-लहान कळस आहेत. मुख्यशिखराचा शीर्षभाग घुमटाकार आहे आणि त्यावर आमलक व कळस आहे.

प्रांगणात दीपमाळेच्या पुढे प्राचीन हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूच्या भिंती जाळीदार आहेत आणि प्रवेशद्वारास जाळीदार लाकडी झडपा आहेत. मंदिरात वज्रपीठावर हनुमानाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. हनुमानाच्या एका हातात पर्वत व दुसऱ्या हातात गदा आहे. मंदिराच्या छतावर चौकोनी घुमटाकार शिखर आहे.

शारदीय नवरात्रौत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी सलग दहा दिवस मंदिरात भाविकांची गर्दी होते. यावेळी शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात दहा दिवस भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र पाडवा, हनुमान जयंती, दसरा, दिवाळी, श्रावण मास, कोजागरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष, अष्टमी आदी दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

उपयुक्त माहिती:

  • गेवराई येथून ६ किमी अंतरावर
  • बीड येथून २७ किमी अंतरावर
  • गेवराई व बीड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

जय भवानी मंदिर

शिवाजी नगर, गढ़ी, ता. गेवराई, जिला. बीड

Back To Home